डावा--उजवा

Submitted by shilpa mahajan on 3 July, 2012 - 04:24

डावा--उजवा

जन्माने हो आम्ही सहोदर
तो कर उजवा , मी डावा
का म्हणता तो मजहून उजवा
त्याच्यापुढती मी डावा ?

आज गती थबके उजव्याची
नशीब रुसे का तयावरी ?
स्थित्यंतर हे साहू न शकतो
करू न शके जरी बरोबरी!

करू नको तू चिंता उजव्या
असे तुझ्या मी साथीला,
तोल तुझा वाटे जरी ढळला
समर्थ मी सावरण्याला.

कार्य करुनी शिणलासी बंधो ,
घेई विसावा तू पळभरी
नकोस वाहू चिंता काही,
घेईन मी ती खांद्यावरी!

आजवरी जी कामे केली
दो बाजूनी धरून करी,
पहा कसा मी करीन एकला
साहस मनी तू फक्त धरी!

पावलावरी ठेवून पाउल
आजवरी तुज अनुसरलो,
आता भूमिका बदलून घेऊ
नेईन मी तुज बरोबरी!

क्षणभर मानी मजला उजवा
हो डावा तू मनांतरी
विश्वासून माझ्यावर पळभर
उजवेपण दे उसने तरी !

सरता थकवा झुगारून दे
उसनवार तो डावेपणा
उजवेपण मम उतरवून मी
पुन्हा पांघरीन डावेपणा !!!
------------०---------------

गुलमोहर: 

कवितेने तुमची निराशा केली असेल कदाचित पण उजव्या अंगावरून वारं गेलेल्या व्यक्ती डोळ्यासमोर आणा. कदाचित निराशा कमी होईल .

कारण महत्वाचे नाही. पण जेव्हा अशी वेळ येते तेव्हा अशी तुलना मनात येतेच . अशा वेळी देवाचे आभार मानावेसे वाटतात कि त्याने एकाची जागा भरून
काढायला दुसरा हात दिला आहे. जन्मभर दुय्यम कामे केलेल्या हाताने महत्वाची कामे करावी लागतात [ आणि त्याच्यात यश मिळते ] तेव्हा मनात
जागणाऱ्या भावनांना तोड नाही. त्या शब्दात व्यक्त करणे फार कठीण आहे. त्या दृष्टीने ही कविता खरच कमकुवत आहे.