काही जखमा भरल्या होत्या
काही जखमा उरल्या होत्या
उरल्या जखमा मात्र सा-या
आयुष्याला पुरल्या होत्या....
जखमा द्याव्या कशा कुणी
याही गोष्टी ठरल्या होत्या
जिंकून सार जगं देखील
तूझ्यापुढे का हरल्या होत्या....
एका हाकेच्या प्रतिक्षेतच
नजरा या झूरल्या होत्या
तू गेलीस तिथेच मग मी
आठवणीही पुरल्या होत्या.....
- किरण कुमार
चैत्र चिल्लीका-
लहडेल पुष्पांनी निदसुरा कुंज
नवल गात्रात भरेल चैत्र फ़ुंज
रसनेला फ़ुटेल वाचा
स्पर्श बोलेल भाषा
येई उधाण गंधांच्या कोशा
वाजे सृष्टीचा पायरव
सुरू होईल पाना फ़ुलात
मधुशोध गुंजारव .....
अवकाशी कूजन ध्वनींची दाटी
पक्षी उडती प्रणय नदीचे काठी
पाण्यास येई सुगंध
नजरेचा उडे मिलींद
रानी भुंग्यांचा वैखर
सुरू होईल पाना फ़ुलात
मधुशोध गुंजारव .....
येई फ़ांदीवर पोपटी लव
अनंत रंगांचे तरू वैभव
लुटण्यास त्या सुटेल
मादक उष्ण सलील
सांडेल मोहराची कुसर
सुरू होईल पाना फ़ुलात
मधुशोध गुंजारव .....
अधीर किती शोधीती विरहिणी
तृप्त रसाची ती पुष्करणी
मिळता घालीती उडी
काज पांडुरंगाचे....
कटेवरी हात | विचाराल मात | पाहतसे वाट | भक्तांची मी ||
कुठे गेला ज्ञाना | नामाही दिसे ना | टाहो ऐकू ये ना | तुकयाचा ||
आता येथ सारी | गर्दीचीच वारी | नावा वारकरी | उरलासे ||
भक्तीचा जिव्हाळा | नामाचा उमाळा | सकळ लोपला | इये काळी ||
काय उरलेसे | काज ते कोणते | मजलागि निके | कळेचिना ||
परि कोपर्यात | दिसे कोणी गात | पूर्ण तो भावात | बुडालेला ||
असोनी आंधळा | भक्तिचा तो मळा | दिसे की फुलला | परिपूर्ण ||
होवोनी तल्लीन | गातसे भजन | पूर्ण एकतान | वांछाहीन ||
तोचि की एकला | दिठीवान भला | येर तो आंधळा | जन वाटे ||
निरोप घेऊ नकोस माझा
तु मला फसवून जा.
श्वास श्वासातुनी गुंतला
तो जरा उसवून जा.
वाहत्या त्या निर्झरांची
धार तु बुजवून जा.
अन उपाशी पाखरांना
ठार तु मारुन जा.
ओ़ंजळीतल्या मोगर्याला
क्रूर तु उधळून जा.
आठवांचे मोरपीस ते
मातीत तु गाडून जा.
रात्रीचे चांदणे उशाला
तु तसा विझवून जा.
जमेल का तुज असा कुस्करा?
हाय तु सांगून जा.
मी अजूनी नादात गाते
सूर तु मिटवून जा.
विष कि अमृत प्याला
तु मला देऊन जा...
अंतरी कोष उलगडे पिसत गाभारा
घुसळुन येई वर अमृत शब्दपसारा
शिशिरात चांदणे नीलय मोरपिसारा
मन पिसाट रंगी उधळित सुटला वारा
पायात पाखरे ओढ परी मातीची
मेघात जलाशय दिशा मूढ पवनाची
हे सांभ पहाडा थोपव ग्रह फिरणारा
ने मजसी परतुन पान्हवीत वसुधारा
ओहळेल ओघळ धरा नीर खेळेल
उसवेल गंधमय स्पर्श; स्वर्ग उमलेल
यातना तृणातिल; अंकुर नव; निववेल
भिजतील शिवारे चर अवघा सुखवेल
हे जीवन नाही माझे एकल नाणे
मन पिसे; झरावे दाहि दिशांवर गाणे
मज एक दिलासा ओंजळ भरुनी द्यावा
उद्विग्न उसासा; मज सरणात विझावा
मला आवडतात
असण्याच्या शक्यतांवर झुलणार्या कविता,
कैक perspect घेउन भुलवणार्या.
कोडं सोडवताना कशा मुंग्या येतात,
तशाच झिणझिण्या यायला हव्यात,
कविता वाचून.
त्यातच खरं गम्य भेटून न भेटल्याचं.
अपुर्णतेची हुरहुर पुर्णत्व शोधुनही.
म्हणुनच आवडतो,
ग्रेस, कोलटकर वा चित्रे,
अन् म्हणुनच सारंग, नेमाडे,
वा तोही !
----------अमरा.
वळीवाची चाहुल,
तो जीवघेणा उकाडा,
गाडीच्या टपावरचा तो आवाज
आणि गारांचा आभास
खिडकीतून मारा करणारे ते टपोरे थेंब
जशी बेसावध क्षणी तू मारलेली मिठी
कधीतरी मागुन येवुन अलगद्पणे गळ्यात टाकलेले हात
मुलगी असुन कसा ग पाऊस नाही आवडत तुला
म्हणुन उगाचच हाताला धरुन तुझं ते बाहेर ओढणं
खर सांगु तुझ्यासारख नाही रे जमल कधी
पावसाच्या धारात डोळ्यातल्या पाण्याची सरमिसळ करायला
मला बरसायलाच आवडल संततधारेसारख
तू मात्र त्या वळीवत सुद्धा मिसळुन गेलास
मला मृदगंधाचा ध्यास लावुन
नसतेस जवळ तू तेव्हा जीवाचे राण होते...
चाहूळ तुझी लगतच त्या राणात प्राण येते...
नाही तू दिसलीस तर होतो निर्जीव माझा डोळा...
कारण,..लागलाय माझ्या मनाला तुझ्याच प्रेमाचा लळा...
मी कधी तुला सांगत नसलो तरी...
भरल्या आहेत फ्क्त तुझ्याच आठवणी माझ्या ऊरी...
नाही मी विसरू श्क्त विरहाचे ते क्षण...
आता माझ्या सोबतीला आहे.....फक्त तुझीच आठवण.....!!!!
तूझ्या कपाळावर रेंगाळणार्या
अल्लड, अवखळ...
किंचीत खोडसाळ बटा,
थेट आतवर वेध घेणारे उत्कट डोळे,
आणि...
ओठावरचे मिश्किल हसू...!!
अलिकडे मात्र उन्मुक्त बटांनाही,
वारंवार सावरायला लागली आहेस तू...
डोळ्यातली उत्कटता आर्त होतेय आजकाल
तू काही बोलत नाहीस...
ओठावर मात्र अजूनही तेच मिश्किल हास्य...
त्या बंद ओठाआड मात्र,
कधी पोहोचताच येत नाही बघ...
सगळं आर्त, त्या मिश्किल हास्यात बेमालूम लपवतेस तू !
कधी जमणार ? तुझ्या मनात डोकावणं....
आणि ते म्हणतात...
व्वा, केवढी लाघवी पोर आहे !
विशाल...
जख्ख असा म्हातारा
झाडाखाली गाडी लावून
वाट बघत बसतोय गिर्हाईकाची
ठेवतोय कसले कसले रंग
ढकलगाडीवर....
गुलाल ,रांगोळ्या ,उटणे ,उदबत्त्यांचे पुडे ,
हेयर पिन्स ,बांगड्या,फुगे
जे हवे ते ,जे लागेल ते
आकर्षित करतोय बायका -मुलांना
कुणालाही ....
त्याला वाढवायचाय धंदा भरपूर ....!!
स्वप्ने बघतोय श्रीमंत होण्याचे
हातावरच्या फुगलेल्या निळ्या शिरा
वाटतात भीतीदायक...!!
वय सरकल्याच्या खुणा
शरीरावर ठाण मांडून ....
तरी स्वप्नाची हाव
लंपटपणे जिवंत ठेवतेय त्याला
काहीतरी करून दाखवायची हिमंत
अजून तेवतेय त्याच्या मनात
वाट बघत बसलाय गिर्हाईकाची
तो आशाळभूतपणे