चैत्र चिल्लीका-

Submitted by उमेश वैद्य on 15 April, 2011 - 05:10

चैत्र चिल्लीका-

लहडेल पुष्पांनी निदसुरा कुंज
नवल गात्रात भरेल चैत्र फ़ुंज
रसनेला फ़ुटेल वाचा
स्पर्श बोलेल भाषा
येई उधाण गंधांच्या कोशा
वाजे सृष्टीचा पायरव
सुरू होईल पाना फ़ुलात
मधुशोध गुंजारव .....

अवकाशी कूजन ध्वनींची दाटी
पक्षी उडती प्रणय नदीचे काठी
पाण्यास येई सुगंध
नजरेचा उडे मिलींद
रानी भुंग्यांचा वैखर
सुरू होईल पाना फ़ुलात
मधुशोध गुंजारव .....

येई फ़ांदीवर पोपटी लव
अनंत रंगांचे तरू वैभव
लुटण्यास त्या सुटेल
मादक उष्ण सलील
सांडेल मोहराची कुसर
सुरू होईल पाना फ़ुलात
मधुशोध गुंजारव .....

अधीर किती शोधीती विरहिणी
तृप्त रसाची ती पुष्करणी
मिळता घालीती उडी
यथेच्च न्हाती आवडी
प्रणयी अवघ्याचा विसर
सुरू होईल पाना फ़ुलात
मधुशोध गुंजारव .....

उमेश वैद्य २०११

गुलमोहर: 
शब्दखुणा: