कविता

जादू...!

Submitted by Girish Kulkarni on 19 April, 2011 - 00:52

*********************************
*********************************

"माझ्यासाठी मुलगा शोध आता..."
लग्न म्हणजे अतिक्रमण म्हणणारी जुनी मैत्रीण
अचानक
"मोकळा गळा खुपतो रे ..."
इतकं म्हणण्यापर्यंत आलेली.....
कधी मोकळा गळा खुपतो...
कधी गळ्यात असलेलं खुपतं...
नसलेलं हवं असणं अन..
असलेल्यासाठीचे होकार-नकार...
अर्जिताचे गर्भार भ्रम पोसणारी वर्तुळे
त्या भ्रमाच्या पेटार्‍यांतल्या अस्थिर बाहुल्या
हीच जर त्यातली अतर्क्य जादु म्हणायची
तर------------------------------------

.....
.....
......

हा कोण जादुगार आहे ????

*********************************

गुलमोहर: 

प्रणयगीत

Submitted by UlhasBhide on 19 April, 2011 - 00:18

प्रणयगीत

आवेगे तू मिठीत घेता अंग अंग थरथरले
मीपण माझे, माझ्या नकळत मला सोडुनी गेले

अधीर तालातील स्पंदने श्वासही नादावले
शृंगाराच्या लय-सूरांनी गात्र गात्र मोहरले

आलापी, मुरक्या अन् ताना धुंद सुरावळ डोले
ते शब्दातित गीत उभयतां नि:शब्दें गायीले

अजून गुंजारवे तयाच्या तन मन हे हुळहूळे
अजून झुलती मनात माझ्या स्वर्गसुखाचे झूले

..... उल्हास भिडे (१९-४-२०११)

गुलमोहर: 

उगाचच ............

Submitted by सुनिल जोग on 18 April, 2011 - 23:52

मला माहितीय...
माझी नजर तुला टाळतीय
अन...
तुझी नजर मला टाळतीय
पण...
मन काही आवरत नाही
आणि
मी चोरून तुझ्याकडे पहातो
तूही माझ्याकडे पहातेस..
चोरूनच..

दोघेही आपण
पुन्हा न पाहील्याचा बहाणा करतो
उगाचच..
मला माहितीय
अन...
तुलाही हे माहितीय

गुलमोहर: 

शेतकरी गीत: शेतात आंतरपीक आपण करू

Submitted by पाषाणभेद on 18 April, 2011 - 17:00

शेतकरी गीत: शेतात आंतरपीक आपण करू

अगं ए पारू; होवूया आपण आता सुरू
हाती येईल आपल्या पैका
चल शेतात आंतरपीक आपण करू ||धृ||

पावरबाज मंतार आंतरपिकाचा
अनुभव आहे मोठ्या लोकांचा
तोंडं बोलती त्यांची वाचा
काय सांगू, कसं सांगू
मी आता कसा ग धिर धरू
चल शेतात आंतरपीक आपण करू ||१||

आसं नको बघू लई खाली वाकून
पिक नको उघडं करू, ठेव झाकून
पक्षी अन किडे, वारं-वावधान
पिक ठेव त्यापासून राखून
नायतर म्हनायची टोळधाड कशी मी आवरू?
चल शेतात आंतरपीक आपण करू ||२||

लावू उस मका केळी अन ज्वारी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

उरले सुरले लुटायचेय..

Submitted by Kiran.. on 18 April, 2011 - 14:38

पेटवू आम्ही रात्री काळ्या
दिवसा सूर्य गिळायचेय
पुन्हा आम्हाला संधी द्या ना
उरले सुरले लुटायचेय..

घास तोंडचा काढून नेऊ
पाणी देखील वळायचेय
मेले सारे मरू देत हो
मेल्यावरही छळायचेय..

रापून गेली काळी माई
पाण्यावाचून जळायचेय
कोण लटकते झाडावरती
आम्हा काय करायचेय

उघड्या झाल्या आयाबहिणी
बारमधुनी रमायचेय
नाचनाचवू खडी पाखरं
अब्रू विकून निजायचेय

कमरेखालचे डोक्यावरती
नेसून वनी फिरायचेय
पुन्हा एकदा संधी द्या हो
राज्यच सारे विकायचेय

- किरण

गुलमोहर: 

मुक्तक (२)

Submitted by निशिकांत on 18 April, 2011 - 05:14

मी निपुत्रिक सांजवेळी कैक आले सोयरे
पापण्या भिजल्या न त्यांच्या, फक्त सुतकी चेहरे
आज वांझोटीस पान्हा संपदेच्या कारणे
जाणती देवा गिधाडे फक्त अपुली सोय रे!
---------------------------------------------------------------

लावतांना मौंज त्याची मीच होते शिकवले
मोह टाळा, ज्ञान मिळवा, पूर्ण होते ठसवले
सोडले संस्कार, शिकवण, जाहला माथेफिरू
आज त्याने राजकारण क्षेत्र आहे निवडले
----------------------------------------------------------------

मागणा-यांना मिळे तो न्याय का असतो कधी ?
जो गुन्हा करतो तयाचा पाय का फसतो कधी ?
मुक्त आत्मा तोच असतो पारडे जो झुकवतो

गुलमोहर: 

प्रतिमे...!

Submitted by चैतन्य दीक्षित on 18 April, 2011 - 04:26

प्रतिमे, तुजला एक विनंती,
रहा सदा चांगली,
मला तोलणार्‍यांची दृष्टी,
तुझ्यावरी लागली ।

म्हणायचो मी,
प्रतिमा बितिमा खोटे सारे,
आतिल माणुस खरा...
कळेचना पण, कुठून आला
ह्या चेहर्‍यावर चरा...!

दुभंगलो मी, कळले जेव्हा,
मला कसे पाहती-
- लोक हे, अन् त्यांच्या पद्धती,
जे श्रेयस्कर त्यांना, तितुके
सोयिस्कर बघती ।

"अशा जगाची कशास पर्वा?
जगेन माझ्यापरी",
विचार केला असा कितीदा
जमले नाही तरी.

जगतो मी कोणासाठी?
हा प्रश्न लांबचा फार..
अंतर आता थकले सोसुन
प्रतिमेवरचे वार !

ओळखूच ना शकलो तुजला,
इतकी तू भिनलेली-
-अंतरात या,
प्रतिमे माझी ओळख तू बनलेली !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

स्वभाव

Submitted by विशाल कुलकर्णी on 18 April, 2011 - 03:09

केव्हाची उभी होती ती...
हाताची ओंजळ अगदी घट्ट बंद करून
दोन-तीन हेलपाटे झाल्यावर...
कंटाळलेला वारा नकळत थबकला तिच्यापाशी
"काय लपवते आहेस एवढी? अगदी माझ्यापासूनही?"
"ठिणगी आहे..., नव्या क्रांतीची!
तु विझवशील एकाच फुंकरीत, म्हणून लपवतेय.......!"

तसा वारा खुदकन हसला...
"वेडीच आहेस....
अगं ठिणगी आहे ती !
तिला विझवण्याचे सामर्थ्य कुणातच नाही. "

आणि...
वार्‍याचा तर..., तो स्वभावच नाही !

विशाल

गुलमोहर: 

आई...

Submitted by पल्ली on 18 April, 2011 - 02:41

आई....
आज खूप दिवसांनी तु माझ्या आठवणींत आलीयस...
काय करु गं!
आठवणींच्या पर्सनल साईटवर
लॉग इन व्हायला वेळच नव्हता.
वर्तमानातच बुडबुड्यागत उठणार्‍या अन
तशाच विरुन जाणार्‍या सोशल नेटवर्किंगवर होते ना!
तुला हे काहीच माहीत नाही?
तरिही खूप माणसं जोडलीस??
माझ्यासाठी अख्खं आयुष्य
प्राजक्तासारखं वेचलंस म्हणे?
पण मला नाही वेळ मिळत तुझी आठवण काढायला...
घर ऑफिस ह्याचं तंत्र सांभाळताना
माझ्या पिलासाठी सुद्धा वेळ नसतो मला
तर तुला कुठुन देऊ वेळ???
पण आज अशी स्वतःहुन आलीस, बरं वाटलं.
अंधारुन आलंय डोळ्यात.
पाणी सांडुन पसरलेल्या वॉटर कलरच्या
पुसट चित्रागत का गं दिसतेस?
आई, मी जरा झोपते..

गुलमोहर: 

तमाशातला राजा

Submitted by harish_dangat on 18 April, 2011 - 01:27

आयुष्य हाच तमाशा
जीवनाचा रंगमंच
सोंगातला राजा तो
सोंगातलाच प्रपंच

काढताच रंगीत कपडे
राजा येथे होतो भिकारी
ठेवताच शस्त्र खाली
सावज होतो शिकारी

सिंहासनी बसला तरी
आत आतडी रिकामी
आज्ञा देतो तो मोठ्या
पण बोलणे निकामी

या गावातून त्या गावाला
फिरतोचा आहे तांडा
म्हातारा झाला आता तो
काल होता तरणाबांडा

राणीही फिरतेच आहे
दागीण्यांचा भारी बाज
चिंध्यामधेच लपवीते
पडद्यामागे तिची लाज

मागतो आहे राजा
कोणापाशी उधार बिडी
सारे आयुष्यच त्याचे
झाले आहे सापशिडी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कविता