धंद्याची स्वप्ने बघणारा ..!![नवीन]

Submitted by प्रकाश१११ on 13 April, 2011 - 23:24

जख्ख असा म्हातारा
झाडाखाली गाडी लावून
वाट बघत बसतोय गिर्‍हाईकाची
ठेवतोय कसले कसले रंग
ढकलगाडीवर....
गुलाल ,रांगोळ्या ,उटणे ,उदबत्त्यांचे पुडे ,
हेयर पिन्स ,बांगड्या,फुगे
जे हवे ते ,जे लागेल ते
आकर्षित करतोय बायका -मुलांना
कुणालाही ....
त्याला वाढवायचाय धंदा भरपूर ....!!

स्वप्ने बघतोय श्रीमंत होण्याचे
हातावरच्या फुगलेल्या निळ्या शिरा
वाटतात भीतीदायक...!!
वय सरकल्याच्या खुणा
शरीरावर ठाण मांडून ....
तरी स्वप्नाची हाव
लंपटपणे जिवंत ठेवतेय त्याला
काहीतरी करून दाखवायची हिमंत
अजून तेवतेय त्याच्या मनात

वाट बघत बसलाय गिर्‍हाईकाची
तो आशाळभूतपणे
कोणीतरी येईल नि काहीतरी घेईल
लुकलुकून जातात
त्याचे गढूळ डोळे
कोणी येतोय असे वाटले की
एक स्वप्न फुलून जातंय डोळ्यात
इंद्रधनुष्य बहरून जातेय
मनाच्या आभाळात
अन गिर्‍हाईक निघून जातेय
त्याच्या स्वप्नाना चुरगळून
चोळामोळा करून ठोकरून ....
ढग जमा होतात
कभिन्न त्याच्या मनात
थरथरून जातंय त्याचे मन
भिजलेल्या मांजरासारखे
नि लोंबत राहते केवीलपण ....!!

दिवस जातात हरवून
मग दाट अंधार होत जातो
शरीर उसवून जातो
म्हातारा घशाखाली काहीतरी ढकलीत
अधाशीपणे पाणी ढोशीत
एक बारीकशी कळ
त्याला जमिनीवर लवंडून देते
पोटाशी पाय घेत.....

म्हातारा हरवून जातोय घरघरीच्या
घनघोर स्वप्नात
मुठीत रोटीचा एखादा तुकडा
राहून जातो तसाच
नि स्वप्नाची हावरट हाव हरवून जाते ..
न मिटनार्या अंधारात ....!!

गुलमोहर: 

चांगला प्रयत्न आहे. आशय चांगला आहे. चित्रण पण सुरेख आहे..

फक्त कवितेच्या स्वरूपात मांडताना थोडा सफाईदारपणा आवश्यक आहे. मुक्तक, छंदमुक्त किंवा स्फुटकाव्य या प्रकारात मोडणा-या निबंधात्मक कवितांची मांडणीही अशी असावी कि जेणेकरून कवितावाचनाच्या वेळी वाचणा-याला सोपे जावे..

कविता लिहून झाल्यावर वाचून पहात जा.. पुलेशु

सर्वांचे मनापासून आभार - दिवाळी दरम्यानची ही हकीगत आहे. खरोखरच एक म्हातारा मनुष्य सकाळी सकाळी एका कोपर्यात झाडाखाली अशी गाडी लावून वर वर्णन केलेल्या वस्तू नेटकेपणाने लावीत होता

खूप वय झालेला हा माणूस आपल्या कंपित हातानी हे सर्व करीत होता. कोठला कोण कुणास ठाऊक .माझ्या सकाळी फिरण्याच्या रस्त्यावरचे हे दृश्य आहे. आणि एके दिवशी हा माणूस गाडीजवळ संपून गेलेला दिसला

हे सर्व डोक्यात बसले होते. काल शब्दांकित झाले. बघुया दुरुस्ती कशी करावी ते.

ढग जमा होतात
कभिन्न त्याच्या मनात
थरथरून जातंय त्याचे मन
भिजलेल्या मांजरासारखे
नि लोंबत राहते केवीलपण ....!!

.... सूंदर