पाण्याशी..
(जुनीच कविता)
एकटा एक माड
पाण्याशी झुकलेला
पाणी पितोय जसा
चालून थकलेला
एकटी एक नाव
पाण्यावर डोलणारी
कोवळीशी पोर जशी
आईशी बोलणारी
पुनवेचा चांदही
पाण्यात उतरलेला
चमकत्या मासोळीला
तारकाच मानलेला
एकटा एक मीही
पाण्याशी थांबलेला
खोल खोल पाण्यात
माझाच शोध चाललेला
--गिरीराज