भेट

Submitted by मुग्धमानसी on 14 January, 2014 - 02:45

सखे कुणाला नकोच सांगू कधीच पण हे असेच झाले
पुन्हा एकदा मला भेटताना मी दचकून चक्क उडाले!!!

दिवस असे की घरात माझ्या मलाच झाले अनोळखी मी
मला पाहूनी माझे डोळे हसले, म्हटले - ’अतिथि आले!’

झुळूक उष्णशी अंगावरूनी अशी लहरली... शहारले मी...
कसे तिच्या श्वासांस कळावे तिच्यात मी नखशिखांत न्हाले!

कुठे जरासे धडधडणारे थडथडते ते बघूदे तरी...
म्हणून गेले जरा खोल अन् ह्रदयाला मी डिवचून आले...!

तिथे कुठेसे कोपर्‍यात ते जीर्ण फाटके तुकडे होते
मला पाहूनी स्वप्ने माझी रुसली, मीही कातर झाले...

जिथे तिथे साठून धुळीचा ठसका जाब विचारित होता
धूळ नव्हे ती राख... अपेक्षांची तीही मी झटकून आले.

मलाच नव्हते माहीत की मी आहे इतुकी खोल खोल गं
आता माझ्या आत-आतल्या मला बघून मी अवाक झाले!

कितीक नावे त्या भिंतींवर कितीक गाणी गुणगुणणारी
किती फुल्या खोडल्यात मी अन् कितीक चाली बदलून आले...

अता मला भेटलाच तो तर म्हणेल का की ’आवडले मी...?’
नसो तिचे चाहते कुणी पण तिला मीच कडकडून आले!

अधे मधे फिरकले पाहीजे इथे... कशी मी गहाळ इतुकी?
उपेक्षुनी एवढे मला मी, कसे म्हणू की जगून झाले?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर!

थेट आत आत भिडणारी.....................आणि भावणारी......

अधे मधे फिरकले पाहीजे इथे... कशी मी गहाळ इतुकी?
उपेक्षुनी एवढे मला मी, कसे म्हणू की जगून झाले?

व्वा ...

छान कविता.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
लयीत लिहिली असावी असे जाणवले. तसे असल्यास काही ठिकाणी लय नीटशी सापडली नाही.
त्यात बदल्/सुधारणा केल्यास कविता अधिक प्रभावी होऊ शकेल असे वैम.

मलाच नव्हते माहीत की मी आहे इतुकी खोल खोल गं
आता माझ्या आत-आतल्या मला बघून मी अवाक झाले! >> ओहोहो कमाल !