वाट चुकलंय माझं गाव!

Submitted by मुग्धमानसी on 11 February, 2014 - 05:20

कैच्याकै उगाचच.... काहिसुद्धा कारण नाही!
आत्ता तर खिडकीबाहेर जरासुद्धा पाऊस नाही!
मस्त कोवळं पडलंय उन,
तेही उबदार खिडकीतून...
तुकड्या तुकड्यात हलतंय पान
काही नवं, बरंच जून...
दूर दूर सुद्धा कुणी आर्त वगैरे आळवत नाही
उगीच जवळ बसून कुणी हळवं-बिळवं बोलत नाही
तरिसुद्धा कहितरी
बिनसलेलं आहे राव
कळत नाही नक्की कुठे
वाट चुकलंय माझं गाव!

किबॉर्डाच्या कडकडाटात गहिवरून काय येतंय...
एसीहूनही गार माझं, मन निपचित होऊन जातंय...
ओळख नाही, पाळख नाही तरी रांग लावून
पाहुण्यासारखं एकेक दु:ख मला ’पहायला’ येतंय
हे काही खरं नाही
असं होणं बरं नाही
गूढ डोह असेन मी पण
पाणवठ्याचं तळं नाही!

आत्ता या क्षणी इथलं वरचं छप्पर उडून जावं
आणि आकाशातून थेट इंद्रधनुष्य अवतरावं
एकट्या मलाच उचलून त्यानं असं सहज वर वर न्यावं
मी जाताना सगळ्या स्टाफनं माना वळवत पहात रहावं!

सीतेनं सांडले अलंकार तसे सांडत जाईन मी माझं असणं...
’त्या’च्यापाशी पोहोचेल माझं... माझ्यापाशी काहिच नसणं!
सरतेशेवटी एकदा मला
विसरायचंय माझं नाव...
कळत नाही नक्की कुठे
वाट चुकलंय माझं गाव!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही, कसलं मस्त लिहील आहे....

अस वाटल कि पाडगावकरांचीच कविता वाचतेय... खूप छान...:)

’त्या’च्यापाशी पोहोचेल माझं... माझ्यापाशी काहिच नसणं!...........अहाहा......मस्तच !!

ओळख नाही, पाळख नाही तरी रांग लावून
पाहुण्यासारखं एकेक दु:ख मला ’पहायला’ येतंय......... हे भारीये!
मुमा..... अप्रतीम लिहितेस तू!

> सीतेनं सांडले अलंकार तसे सांडत जाईन मी माझं असणं...
>>>
हो हे कोट करायचं राहिलं होतं! Happy
जेंव्हा जेंव्हा धागा वर येतोय तेंव्हा तेंव्हा पुन्हा वाचतेय Happy

Happy