कळत नाही..

Submitted by मुग्धमानसी on 18 December, 2013 - 05:36

काय उरतंय कळत नाही
वाहत नाही, गळत नाही
राख झालं रान सगळं...
नेमकं काय जे जळत नाही?

आतून आतून उगवलेला
वेल पोचतो मेघांपार
तरी त्याला मुळांमधला
तिढा काही टळत नाही

छान जमून आलंय सगळं
सूर आहे साथ आहे
काही केल्या शब्द तरीपण
ओठांपाशी वळत नाही

मातीच्या मडक्यातून माझे
मीच कोंडले नभ थोडे
तरिही त्याचे अवकाशाचे
भान जराही ढळत नाही

तुला पाहूनी असेच होते
नित्य अचंभित मन माझे
मला छळे जो माध्यान्हीचा
सूर्य तुला का छळत नाही?

खरंच मला कळत नाही...

माझ्या पायांखालची वाट
भिजून चिंब होते ओली
चालतोस तू असा कसा की..
पाय जराही मळत नाही?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

छान!

व्व्व्वाह !!!!!!! कडवं अन् कडवं थेट हृदयात पोचलं! गझलगुण तर ठासून भरले आहेत ; पण हा रूपबंध अधिकच वेड लावणारा ! फार्फार आवडली !!

स्वतंत्र सुट्या सुरेख कडव्यांचे एकत्रीकरण वाटले. एक सलग फ्लो (मला) नाही दिसला.
प्रत्येक चार ओळी मात्र आवडल्या...