हिशोब

Submitted by मुग्धमानसी on 20 December, 2013 - 04:50

मी जन्माला येता येता
एक करामत करून बसले
टाहो फोडून रडण्याआधी
उगाच गाली हळूच हसले

कितीक मोठा गोंधळ तेंव्हा
देव-ऋषींच्या दारी झाला
गर्भवास सोसूनही सगळा
कसा जीव आनंदी उरला?

विज्ञानाला अन् शास्त्रांना
फार खटकले माझे हसणे
कुणी औषधे, कुणी अंगारे,
कुणी सुचवले वैद्य गाठणे

कोणालाही तेंव्हासुद्धा
सुचले नाही... कमाल आहे!
विचारले जर मलाच असते
म्हटले असते, ’धमाल आहे!’

विस्मरणाचा मंत्र मला तो
देणे राहून गेले होते
घाई घाईत गेल्या जन्मी
सगळे ठेऊन मेले होते

आता उरलेल्या श्वासांचा
हिशोब माझा तयार होता
कुठवर आले, कुठून पुढे
जायचे, तो रस्ता ठाऊक होता.

होय हासले मी... कारण की...
मला ठाऊके हि मी नाही!
या जन्माला ’हिशोब चुकला’
याहून परते कारण नाही!

शेवटची ही गणिते काही
अचूक तीही सुटल्यावरती
हिशोब सगळा जन्मांतरीचा
जुळेल जगूनी झाल्यावरती

आता जगणे उलगडले मज
म्हणून हसले... उगाच नाही!
तेंव्हापासून आता थोडे
विस्मरते, पण सगळे नाही!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कल्पना आणि फ्लो आवडला.

कुणी औषधे, कुणी अंगारे

हिशोब सगळा जन्मांतरीचा
>>>

ह्या दोन ओळींत लय बिघडली आहे जी त्रुटी सहज दूर करता येईल

मस्त.

छान कल्पना आणि मांडणी. पादाकुलक वृत्ताची सहज लय बर्‍याच ओळींत साधली आहे. काही ओळींत लय/मात्रा सुधारल्या तर आणखी परिपूर्ण होईल.
पण विचार एकदम फ्रेश आहे, आत्ता आहे तशीही आवडलीच आहे.

छान कल्पना आणि मांडणी. पादाकुलक वृत्ताची सहज लय बर्‍याच ओळींत साधली आहे. काही ओळींत लय/मात्रा सुधारल्या तर आणखी परिपूर्ण होईल.>>+१