मन

Submitted by मुग्धमानसी on 13 February, 2014 - 01:19

मन... मन... मन...
दोनच अक्षरांत सामावलेलं अनंत, अखंड, अफाट गगन!

कधी ते असतं स्वच्छ निळं, तान्ह्या बाळकृष्णासारखं निरागस
तर कधी असतं धुरकट पांढरं, मिष्कील आणि राजस!

कधी असतं मळभलेलं.... गुदमरणारं, गहिवरणारं...
आणि केंव्हा न सांगताच घनघोर धोधो कोसळणारं!

मन फार उनाड असतं, चंदनाचं झाड असतं,
कधी असतं गुणी बाळ, कधी मोठं द्वाड असतं.
मन मनोहरी गंधांचं,
कधी विषारी नागांचं
विरळ सावली, विरळ उन्हही
कधी निवारा, कधी तापही
मनाच्या पंखांना मनाचाच पिंजरा,
डोक्यातल्या द्वंद्वाला मनाचा आसरा

मन काही बोलत असतं, सतत काही सांगत असतं,
जगाच्या कलकलाटात बावचळून बिचारं...
फक्त आपलं थोडसं लक्ष मागत असतं...!
मनाचे लाड, मनाचे हट्ट,
कधी सोडावं सैल, कधी करावं घट्ट...
मनाचं मनाशी करावं कबूल
मनाला ज्याची पडते भूल...
त्याच्याशी मनाचा मांडावा डाव
मनावर कोरावे त्याचेच नाव!

मनाला फुटतात धुमारे, कधी आठवणींचे उमाळे...
कधी असतं वाहती नदी, कधी खोल गूढ तळे!

मनाला ठावूक असतं... आपल्या आतलं आपलं जग
मनाने मनात आणलं तर, सहज जिरेल आपली रग!
सगळी स्मरणे गाडलेली, सगळी नाती तोडलेली,
काही क्षण विसरलेले, काही पाऊल घसरलेले,
काही स्वप्ने विटलेली, आतल्या आत मिटलेली,
काही आशा सुकलेल्या, काही अपेक्षा भंगलेल्या...
काही अश्रू वाहिलेले, काही तुंबून राहीलेले...
काही वाटा चुकलेल्या, काही संधी हुकलेल्या...
मन सगळंच ठेवतं जपून.... आपल्याच आत खोल खोल
म्हणून वर वर असेल कोरडं, तरी आतून असतेच ओल!

मन तसं शहाणं असतं,
शेवटी तुमचं माझं असतं
कितीही झालं तरी त्याचं
आपल्याशीच नातं असतं!
त्याला कधी गोंजारावं, ’काय खुपतंय’ विचारावं,
बिथरलं तर थोपटावं अन् कुशीत घेऊन जोजवावं.
’all is well' म्हणत त्याला हळूवार निजवावं!
अंगाई होऊन आपणच कधी आपल्याच मनाला गुणगुणावं!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही....

वा, सुरेखच ...

मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥१॥
मनें प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली । मनें इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥ध्रु.॥
मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य । प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगति ॥२॥
साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात । नाहीं नाहीं आनुदैवत । तुका म्हणे दुसरें ॥३॥ २९१ -गाथा ||

Happy