कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण

Submitted by हेमंतकुमार on 7 December, 2020 - 07:30

या विषयाचे आधीचे संदर्भ :

१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)

२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)

३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य (https://www.maayboli.com/node/75809)

४. ( पूरक विषय) : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन (https://www.maayboli.com/node/76797) )

मागील चर्चेत आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
………………………………………..

करोना सार्स-२ या दुष्ट विषाणूने मानवजातीवर हल्ला केल्याला आता एक वर्ष झाले. त्यातून उदभवला कोविड१९ हा आजार. त्याची साथ आली आणि तिची व्याप्ती वाढत ती महासाथ झाली. त्यातून खूप लोक आजारी पडले. काहींचा आजार सौम्य राहिला तर काहींचा गंभीर होऊन ते मृत्युमुखी देखील पडले. महासाथ आटोक्यात आणण्यासाठी जगातील बहुतेक देशांना टाळेबंदीसारखे कठोर उपाय अमलात आणावे लागले. त्यातून अर्थव्यवस्थेची प्रचंड हानी झाली. अनेकांचे रोजगार बुडाल्याने सामाजिक मनस्वास्थ्य हरवले. पुढे काही देशांत आजाराचे प्रमाण कमी झाले आणि आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले. पण अन्य काहींत प्रमाण पुन्हा एकदा वाढल्याने ‘दुसरी लाट’ निर्माण झाली. या आजाराच्या वर्षपूर्ती निमित्ताने गेल्या वर्षातील त्यासंबंधीच्या ठळक घडामोडींचा हा मागोवा :

डिसेंबर 2019 :
चीनच्या वुहान प्रांतात न्युमोनिया या आजाराचे काही रुग्ण आढळले आणि त्याचे कारण अज्ञात होते.
* 31 डिसेंबरला या नव्या आजाराची WHOच्या दप्तरी नोंद झाली. करोना-सार्स २ हा विषाणू तर कोविड-१९ हा त्याचा आजार, अशी अधिकृत नावे दिली गेली.

जानेवारी 2020 :
* या आजाराचे RT-PCR या चाचणीने निदान झालेला पहिला रुग्ण अमेरिकेत आढळला.
* हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो हे स्पष्ट झाले.
* WHOने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली.

फेब्रुवारी :
बहुतेक देशात आंतरराष्ट्रीय विमानसेवांवर निर्बंध. परदेशातून आलेल्या व्यक्तीस 14 दिवसांचे विलगीकरण लागू.

मार्च :

* 11 मार्च रोजी WHO कडून कोविडची महासाथ जाहीर.
* HCQ या पारंपरिक औषधाचा वापर सुरू.
* संसर्ग साखळी रोखण्यासाठी बऱ्याच देशात टाळेबंदी जाहीर.
* भारतीय रेल्वेच्या १६७ वर्षांच्या इतिहासात (संप वगळता) प्रथमच प्रवासी सेवा काही काळ पूर्ण बंद.

एप्रिल-मे :

* Remdesivir औषधाला तातडीच्या उपचारासाठी मान्यता.
* रोगविरोधी लसनिर्मितीचे सूतोवाच.
* अमेरिकेतील मृत्यूंची संख्या एक लाखांवर पोचली

जुलै :
हा आजार हवेतील सूक्ष्मकणांच्याद्वाराही पसरत असल्याचे WHOचे निवेदन. तसेच बाधित पण लक्षणविरहीत लोकांकडूनही त्याचा प्रसार होत असल्याचे निवेदन.

ऑगस्ट :
बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातून काढलेल्या रक्तद्रवाच्या उपचारास मान्यता.

सप्टेंबर :
जागतिक कोविडमृत्यूंचा आकडा १० लाखांवर पोचला.

ऑक्टोबर
:
* Remdesivir ला अमेरिकी औषध प्रशासनाकडून अधिकृत औषधाची मान्यता (पण पुढे याबाबत WHOने नकारात्मक शेरा दिला).
• भारतात कोविडमृत्यूंचा आकडा १ लाखावर पोचला.

नोव्हेंबर : दुहेरी अँटीबॉडी उपचारास तातडीच्या वापरासाठी मान्यता.

डिसेंबर २०२० :
• काही लसी प्रयोगसिद्ध होऊन मान्यताप्राप्त. वितरणास तयार. चीनमध्ये लाखो लोकांना त्यांची लस दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध. रशियाने पण सुरवात केली. इंग्लंड ८ डिसेंबरला लसीकरण सुरु करण्याच्या तयारीत.
• आज अखेरीस या आजारावर निर्विवाद असे प्रयोगसिद्ध रामबाण औषध उपलब्ध नाही. त्यामुळे रोगप्रतिबंधावर अधिक लक्ष केंद्रित.
...............

समाजात या निव्वळ नैसर्गिक आजारातून पुरेशी सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे लसीकरणाची कल्पना पुढे आली. वर उल्लेख केल्याप्रमाणे संबंधित लस नव्याने निर्माण करून त्याचे काहीसे घाईतच प्रयोग केले गेलेत. लसीच्या अनेक उत्पादनांपैकी काही आता प्रयोगसिद्ध होऊन वापरासाठी तयार आहेत. लस देताना अर्थातच सामाजिक प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. ती सर्व नागरिकांना द्यायची की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. RNA तंत्रज्ञानावर आधारित लसी या नव्यानेच निर्माण केलेल्या आहेत. त्यांची उपयुक्तता आणि दुष्परिणाम अनुभवातून समजतील. लसीकरणातून महासाथ कशी आटोक्यात येते हे यथावकाश समजेल. आपण तसे स्वप्न बघावे अशी WHOने इच्छा व्यक्त केली आहे !

लसीसंबंधी आणि संबंधित घडामोडीबाबाबत चर्चा करण्यासाठी हा नवा धागा.
एव्हाना या आजारावर या धाग्यासह ५ धागे निर्माण झालेले आहेत. आता हा आजार लवकरात लवकर सामान्य होऊन आटोक्यात येवो ही इच्छा. जेव्हा तो सामान्य सर्दीपडशाप्रमाणे समाजात दखलपात्र राहणार नाही, तेव्हा अशा चर्चाधाग्यांचे प्रयोजनही संपेल. तसे लवकरात लवकर होवो आणि हे सर्व धागे इ-रद्दीत जावोत हीच आंतरिक इच्छा !
.............................................................................
चित्र जालावरुन साभार !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाच्या दुसर्या टप्प्यात 1 मार्चपासून ज्येष्ठ नागरीकांसाठी लसीकरण सुरू झाले. त्यात 3 मार्चला माझ्या आई (66 वर्षे) व बाबांनी (71 वर्षे) लस घेतली. लसीकरणावेळी दोघांनाही काहीच त्रास जाणवला नाही, वा मग नित्यक्रमात काहीही अडथळा आला नाही. दुसर्या दिवशी आईला लस दिलेल्या जागी एक-दोन तास हलकेसे दुखत होत, नंतर आपोआपच बंद झालं. त्यामुळे औषध घ्यायची गरज भासली नाही.

माहितीसाठी
cowin.gov.in ह्या संकेतस्थळावर आपला मोबाईल क्रमांक वापरून नावनोंदणी करावी लागते. प्रत्येक वेळी लॉग इन करतांना नव्याने OTP येत असल्याने पासवर्डची भानगड नाही. एका खात्यावर जास्तीत जास्त 4 व्यक्तींची नोंदणी करता येते, संबधीत व्यक्तींचे आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसंस, वोटरकार्ड, पासपोर्ट, पेंशन पासबूक वा NPR कार्ड ह्यापैकी कोणतेही ओळखपत्र लागते आणि मग तेच लसीकरण केंद्रावरही न्यायचे असते (मी नावनोंदणी करतांना आईचे पॅनकार्ड तर बाबांचे आधारकार्ड वापरले होते तर लसीकरणकेंद्रावर पडताळणीसाठी अनुक्रमे तीच कार्डे दाखवावी लागली). नावनोंदणी झाल्यावर आपल्या जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांची यादी झळकते. सर्वच सरकारी व काही खाजगी केंद्रांवर लस मोफत दिली जाते तर ईतर खाजगी केंद्रांवर प्रती डोज रू. 250 आकारले जातात. त्यामुळे यादीतील केंद्राच्या नावासमोर मोफत वा सशुल्क असे ठळकपणे दर्शवले असते. त्यातून आपल्या सोयीचे केंद्र, दिवस व वेळ निवडू शकतो.

सर्वच केद्रांवर ज्यांना दुसरा डोज घ्यायचा आहे त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते. त्यामुळे तुम्ही दुपारच्या सत्रातील वेळ निवडली तरी सकाळी 11 वाजताच जावे. अनेकदा दुपारच्या सत्रात लसींचा साठा संपला किंवा पडताळणीदरम्यान सर्वर डाऊन आहे अशी कारणे सांगून परत पाठवतात. ह्यामुळे तुम्ही नोंदणी करून वेळ घेतली असली तरी बर्याचदा दुसर्या दिवशी यायला सांगतात. लसीकरणावेळी आधी आपली पडताळणी होते, मगच लस दिली जाते. तसेच एखाद्या व्यक्तीस क्वचित प्रसंगी लसीमुळे reaction येऊ शकते म्हणून सर्वांना अर्धा तास निरीक्षणासाठी थांबवतात. त्यादरम्यान काहीही न झाल्यास घरी जाण्याची मुभा असते.

बर्याच ठिकाणी (नागपूरला) तुम्ही ऑनलाईन नाव नोंदवले असले तरी आदल्याच दिवशी सकाळी केंद्रावर जाऊन परत ऑफलाईनही नोंदणी करून ऑनलाईन नोंदणी केलेल्या दिवसाचे टोकनही आणावे लागते. बहुतेक केंद्रावर दिवसभरातील दोन्ही सत्रे मिळून सरासरी 100 लसींचाच साठा असतो. पहीला डोज घेतल्यावर 28 दिवसांनी दुसरा डोज घ्यावा लागतो, तथापि त्यासाठी परत नावनोंदणी वा टोकन घ्यायची गरज नसते. पहीला डोज घेतलेल्या केंद्रावर ओळखपत्र घेवून थेट जाता येते, पण तेच सकाळच्याच सत्रात जाणे ईष्ट आहे. तसे तर दुसरा डोज कोणत्याही केंद्रात घेता येतो पण काही केंद्रात Covaxin तर काही ठिकाणी Covishield देत असल्याने पहीला डोज घेतलेल्या ठिकाणीच जाणे योग्य आहे. कारण तुमचा पहीला डोज Covaxin चा असेल तर दुसराही तोच घ्यावा लागतो, अदलाबदल चालत नाही.

सध्यातरी 60 वर्षावरील सर्वच व्यक्तींसाठी लसीकरण सुरू झाले असले (त्यांना सहव्याधी असो वा नसो) तरी 45 ते 59 ह्या वयोगटातील व्यक्तींना मधुमेह, उच्चरक्तदाब ह्यासारख्या सहव्याधी असतील (नावनोंदणी करतांना 45 ते 59 दरम्यान वय असल्यास लगेच 20 सहव्याधींची यादी झळकते) तर त्यांनाही लस घेता येते.
ह्यासाठी संकेतस्थळावर दिलेल्या ठरावीक फॉर्मेटमधीलच वैद्यकीय दाखल्याची प्रत डाऊनलोड करून त्यांना सहव्याधी (यादीत दिलेल्या 20 सहव्याधींपैकीच) असल्याचे MBBS वा त्यावरच्या डॉक्टरांच्या सही व शिक्क्यानिशी प्रमाणित करून लसीकरण केंद्रावर न्यावे लागते.

झ दा,

1. कोणत्याही विषाणूंचे एवढ्या कमी वेळात इतक्या वेळा म्युटेट होणे नॉर्मल आहे का?

>>> या विषाणूंचे महिन्याला २ बदल मागच्या वर्षीपासून च चालू आहेत. अस्तित्वासाठी सतत बदलत राहणे हे स्वाभाविक असते.
..
2. जर तो इतक्या वेळा बदलत आहे आणि पूढे पण बदलत राहिला तर त्याची तीव्रता कमी होईल की वाढेल?

>>> काही काळ वाढू शकते पण सर्वच बदल घातक नसतात; थोडेच असतात.
कालांतराने तो आपला 'मित्र' होतो पण कधी ते सांगता येत नाही.
...
3. असाच बदलत राहिला तर ज्या Assumptions वर सध्याच्या लसी बनवल्या आहेत त्या काम करतील का त्या पण बदलाव्या लागतील?
>>>

लसीत काही प्रमाणात बदल करणे चालू झालंय. हे RNA तंत्राच्या लसीत सोपे जाते.

gandhi land.jpg

सजीवामध्ये बेसिक जेनेटिक मटेरियल 2 प्रकारचे असतात , एकाला DNA म्हणतात , एकाला RNA म्हणतात , माणसाच्या पेशीत दोन्ही असतात , पण गुणधर्म कोड करणारा सेंट्रल जिनोम DNA चा असतो

व्हायरस मात्र दोन प्रकारचे असतात , काही DNA वाले असतात , काही फक्त RNA असणारे असतात, चित्रात बघितले की समजेल , RNA सिंगल धाग्याचे असतात आणि DNA डबल धाग्याचा पीळ असलेले असतात
सिंगल धागे अन्स्टेबल असतात , ते कधीही तुटतात , पुन्हा जोडतात , कधी मधलाच थोडा पार्ट डबल होतो , मग सगळा सिक्वेन्स बदलतो , म्हणजे की बोर्डवर कंट्रोल सी ऐवजी कंट्रोल व्ही दाबले तर पुढची प्रोसेस बदलून जाईल
म्युटेशन झाले की असाच सिक्वेन्स बदलतो व मग व्हायरसच्या प्रॉपर्टी बदलतात

सगळ्या म्युटेशन मुळे व्हायरस स्ट्रॉंग होतात असे नाही , हजारो बदल निरर्थक असतात , काहीमुळे व्हायरस कमजोरही होतात , पण ज्या म्युटेशन मुळे व्हायरस जास्त स्ट्रॉंग होतात , ते मग औषधाला रजिस्टंट होतात ,
कोविड हा RNA व्हायरस आहे

छान माहिती blackcat भाऊ.

काहीमुळे व्हायरस कमजोरही होतात , पण ज्या म्युटेशन मुळे व्हायरस जास्त स्ट्रॉंग होतात
बातम्यांमध्ये वाचतो की अमरावती आणि वर्धा मध्ये सापडलेला स्ट्रेन हा जास्त संसर्गजन्य आहे. म्हणजे तिथे झालेल्या बदलांमुळे वायरस जास्त स्ट्रॉंग झाला आहे असे म्हणता येईल का?
Hypothetical Situation अशी असू शकते का की वायरस बदलत बदलत इतका बलवान झाला की कोणत्याच लसीला दाद देत नाही?
जसे बॅक्टरीया मध्ये Drug Resistant TB सारखे आजार आहेत. तसे पुढे कोरोना चे होणार नाही ना?

माणसाच्या शरीरात काही पेशीत समजा म्युटेशन झाले , मग त्या विचित्र वागू लागल्या , त्यांची वाढही अमर्यादित होऊ लागली

की मग त्यांची एक कॉलनी होते , त्या गाठीलाच आपण कँसर म्हणतो

गतवर्षी लिहिल्याप्रमाणे यंदाही कोविडचे चढउतार राहणार.
…..
मानवी संसर्गजन्य आजारांच्या इतिहासात समूळ नाश झालेला एकमेव आजार म्हणजे देवी. तो नष्ट होण्यामागे दोन कारणे होती:

१. माणूस सोडून अन्य प्राण्यांत देवीच्या जंतूंचा
साठा (reservoir) नसणे.
२. प्रभावी लसीकरण

कोविडच्या बाबतीत वटवाघळात साठा असणे ही कटकटीची बाब आहे. लसीकरण सध्या प्रायोगिक अवस्थेत आहे.

म्हणून….

समूळ नाश होणे कठीणच.
आजार सौम्य करणे व साथ नियंत्रणात आणणे हे ध्येय.

कोविड उपचार : नवे संशोधन

सध्या कोविडवरील उपचारांसाठी ज्या अँटीबॉडीज विकसित झाल्या आहेत त्या इंजेक्शनद्वारे द्याव्या लागतात आणि त्यांचे उत्पादन खूप खर्चिक आहे. त्याला पर्याय म्हणून नाकातून फवाऱ्याद्वारा द्यायच्या सूक्ष्म अँटीबॉडीज(nanobodies) आता विकसित होत आहेत.

त्यांचे काही फायदे :
१. त्या जिवाणू वा यीस्टमध्ये तयार करतात.
२. त्या टिकाऊ असतात व साध्या तापमानातही त्यांची साठवण चांगली होते
३. हे औषध रुग्ण स्वतः घरच्या घरी घेऊ शकतो.

जेव्हा एखादी व्यक्ती चाचणीद्वारा कोविड-पॉझिटिव्ह निघते तेव्हा लगेचच हा फवारा चालू केल्यास आजार फोफावत नाही.

सदर संशोधनाचे प्रमुख अमेरिकास्थित डॉ. आशिश मंगलिक आहेत.
त्यांच्या संशोधनास शुभेच्छा !
(https://science.sciencemag.org/content/370/6523/1473)

>>> आजार सौम्य करणे व साथ नियंत्रणात आणणे हे ध्येय. >>> +७८६

नागपूर शहरात लॉकडाउनची घोषणा:
https://www.loksatta.com/nagpur-news/nitin-raut-lockdown-in-nagpur-city-...
पुन्हा येरे माझ्या मागल्या ... बरे नव्हे.

माणूस सोडून अन्य प्राण्यांत देवीच्या जंतूंचा साठा (reservoir) नसणे. >> देवीचे जंतू गायीच्या सडांमध्ये असतात ना? त्यामुळेच तर एड्वर्ड जेन्नर ला त्यावरची लस शोधण्याची प्रेरणा मिळाली. त्याच्या घरी दूध घालणार्‍या मुलांना देवी हा रोग होत नसे कारण गायींचे दूध काढताना काही प्रमाणात संसर्ग त्यांना आधीच झालेला असे आणि त्यामुळे त्यांच्या शरीरात देवी च्या जंतूंशी लढण्याची प्रतिकार शक्ती आलेली असे. अशी काहीतरी गोष्ट वाचलेली आठवते.

सोहा,

शंका चांगली आहे.
दोन साम्य वाटणाऱ्या आजारांत गोंधळ होऊ शकतो- कसा ते पहा :

१. Smallpox = देवी. हा रोग माणसाला होत असे. याचा animal reservoir नसतो.
(Smallpox only naturally infects humans and does not exist in a carrier state.)

२. Cowpox = हा रोग गाईंच्या सडांना होतो. इथून तो माणसात येऊ शकतो.
गवळी, जेन्नरची कथा यासंदर्भात आहे.

वरील दोन्ही विषाणू Orthopox या गटातीलच असले तरी संबंधित आजारांमध्ये फरक आहे..

उदय,
छान दुवा.
सर्वांना धन्यवाद आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा !

डॉक्टर, एका मायबोलीकराने आपल्या कोव्हिड अनुभवाबद्दल लिहिले आहे.
https://www.maayboli.com/node/78345

एका प्रतिसादातल्या "स्ट मध्ये काही काउंट्स पाहिले जातात.,.......
होय अतुल. १-३५ असतात. कितव्या राऊंड ला आपल्या शरिरात कोराना आढळला तो राऊंड म्हणजे काउंट्स . माझा १४ होता. यामध्ये जसे काउंटस वाढतात तसा धोका कमी कमी होत जातो. ३५ नंतर रिझल्ट not detected येतो. लोक याचा बरोबर उलट अर्थ घेतात. हे परसे्न्ट्स आहेत वगैरे वगैरे.... वाढले की धोका वाढतो अशीही चुकीची माहिती आम्हाला मिळाली होती. " या वाक्यावर अधिक प्रकाश टाकाल का?

भरत,
ती Ct value असते.
त्याचे निष्कर्ष वादग्रस्त आहेत ; पुरेसे सिद्ध नाहीत.

यावर मी एक सविस्तर प्र लिहिला असावा.
शोधतो.

भरत,
सापडला :

करोनाच्या रिपोर्टमध्ये Ct value हा काय प्रकार असतो?

जेव्हा RT-PCR निष्कर्ष + असतो तेव्हा काही प्रयोगशाळा रिपोर्टमध्ये Ct चा उल्लेख करतात.
Ct = threshold cycle value.

हा आकडा जेवढा कमी, तेवढे विषाणूच्या जनुकाचे प्रमाण अधिक
असे ते गणित आहे.
पण, त्याला महत्व देऊ नये कारण...

१. हा आकडा चाचणीसाठी वापरल्या गेलेल्या किटनुसार बदलतो. त्यामुळे अमुक एक आकडा निदानात उपयुक्त असे म्हणता येत नाही.
२. हे गणित करताना त्यात काही अंगभूत त्रुटी आहेत.

३. या प्रकाराचे प्रमाणीकरण झालेले नाही.
४. या संदर्भात जी काही ढकलपत्रे फिरताहेत त्यांकडे सरळ दुर्लक्ष करा. चाचणी +/- इतकी माहिती सामान्यांसाठी पुरे आहे.

आमच्या भागातील लोकप्रतिनिधीने एका संस्थेसोबत सध्याच्या काही विषयांबद्दल एक वेबिनार घेतला होता. त्यात डॉ जेकब थॉमस यांनी कोहिड आणि लस याबद्दल सांगितलेली माहिती खूप उपयुक्त आणि समजायला सोपी वाटली.
डॉ कुमार आणि ब्लॅक कॅट यांनीही यातले अनेक मुद्दे मायबोलीवर मांडले आहेतच. पण वर्षभरात काय काय वाचलं ते सगळंच लक्षात नाही.
तुमची हरकत नसेल तर त्या वेबिनारची लिंक देतो.

https://www.youtube.com/watch?v=13965IeShSE
नवव्या मिनिटापासून डॉ थॉमस बोलताहेत. त्यांच्यानंतर मुंबैतल्या दहिसर जंबो कोव्हिड सेंटरचे इन चार्ज असलेले डॉक्टर बोलले आहेत.

डॉक्टर आपले मत आवडले. मलाही असेच उत्तर मिळाले होते.
त्याला महत्व देऊ नये. - हे विशेष...कारण माझा नवरा २६ CT value आणि मी १४ CT value असुनही वेगळी अशी काही लक्षण दिसेनात. तसही सगळा प्रतिकारशक्ती चा खेळ आहे.

भरत, उपयुक्त चित्रफित.
सिद्धी, धन्यवाद.
.....
माझी या विषयावरील टिपणे सुद्धा इतकी झाली आहेत, की जुने काही शोधायचं म्हटलं की खूपच कष्ट घ्यावे लागत आहेत.
आजाराने सर्वच बाबतीत दमवले आहे Bw

कोविड रुग्णांच्या रक्तचाचण्यापैकी एका चाचणीसंबंधी व्यक्तिगत संपर्कातून विचारणा झाल्याने त्याबद्दल लिहितो.

या चाचणीचे नाव सीआरपी असे आहे. हे एक प्रथिन असून ते आपल्या यकृत व रक्तवाहिन्यांच्या आवरणात तयार होते. जेव्हा शरीरात कोणत्याही कारणाने दाहप्रक्रिया होते तेव्हा त्याच्या रक्त पातळीत बऱ्यापैकी वाढ होते ( अगदी शंभर किंवा त्याहून अधिक पटीपर्यंत देखील).

समजा एखाद्याला जंतुसंसर्ग झाला आणि त्याचे सीआरपी वाढलेले दिसले. आता त्या रुग्णावर उपचार सुरू केले जातात. पुढे काही दिवसांनी सीआरपीची पुन्हा मोजणी केली जाते. जर शरीरातील दाह कमी होत असेल तर ही पातळी सुद्धा कमी झालेली दिसते.

अशा तऱ्हेने नियमित अंतराने ही पातळी मोजल्यास त्याचा रूग्णाच्या उपचारांसाठी चांगला उपयोग होतो.

घरातील ७१ वर्षांची व्यक्ती. नेफ्रोपथी ची पेशंट. व्यवस्थित पथ्यामुळे creatinin पातळी १.६ साधारण असते. उच्च रक्तदाब आणि आर्थ्रायटीस आहे. त्यांना लस घ्यायची आहे. पण २७ मार्चपासून पुढे सात दिवसांसाठी परगावी जावे लागणार आहे. रेल्वेतिकीट बुक केले आहे. तर त्यांनी येत्या एक दोन दिवसांत लस घ्यावी का? न घेतली तर प्रवासात कायदेशीर अडथळे येऊन मज्जाव होण्याची कितपत शक्यता?

Pages