कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण

Submitted by कुमार१ on 7 December, 2020 - 07:30

या विषयाचे आधीचे संदर्भ :

१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)

२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)

३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य (https://www.maayboli.com/node/75809)

४. ( पूरक विषय) : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन (https://www.maayboli.com/node/76797) )

मागील चर्चेत आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
………………………………………..

करोना सार्स-२ या दुष्ट विषाणूने मानवजातीवर हल्ला केल्याला आता एक वर्ष झाले. त्यातून उदभवला कोविड१९ हा आजार. त्याची साथ आली आणि तिची व्याप्ती वाढत ती महासाथ झाली. त्यातून खूप लोक आजारी पडले. काहींचा आजार सौम्य राहिला तर काहींचा गंभीर होऊन ते मृत्युमुखी देखील पडले. महासाथ आटोक्यात आणण्यासाठी जगातील बहुतेक देशांना टाळेबंदीसारखे कठोर उपाय अमलात आणावे लागले. त्यातून अर्थव्यवस्थेची प्रचंड हानी झाली. अनेकांचे रोजगार बुडाल्याने सामाजिक मनस्वास्थ्य हरवले. पुढे काही देशांत आजाराचे प्रमाण कमी झाले आणि आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले. पण अन्य काहींत प्रमाण पुन्हा एकदा वाढल्याने ‘दुसरी लाट’ निर्माण झाली. या आजाराच्या वर्षपूर्ती निमित्ताने गेल्या वर्षातील त्यासंबंधीच्या ठळक घडामोडींचा हा मागोवा :

डिसेंबर 2019 :
चीनच्या वुहान प्रांतात न्युमोनिया या आजाराचे काही रुग्ण आढळले आणि त्याचे कारण अज्ञात होते.
* 31 डिसेंबरला या नव्या आजाराची WHOच्या दप्तरी नोंद झाली. करोना-सार्स २ हा विषाणू तर कोविड-१९ हा त्याचा आजार, अशी अधिकृत नावे दिली गेली.

जानेवारी 2020 :
* या आजाराचे RT-PCR या चाचणीने निदान झालेला पहिला रुग्ण अमेरिकेत आढळला.
* हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो हे स्पष्ट झाले.
* WHOने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली.

फेब्रुवारी :
बहुतेक देशात आंतरराष्ट्रीय विमानसेवांवर निर्बंध. परदेशातून आलेल्या व्यक्तीस 14 दिवसांचे विलगीकरण लागू.

मार्च :

* 11 मार्च रोजी WHO कडून कोविडची महासाथ जाहीर.
* HCQ या पारंपरिक औषधाचा वापर सुरू.
* संसर्ग साखळी रोखण्यासाठी बऱ्याच देशात टाळेबंदी जाहीर.
* भारतीय रेल्वेच्या १६७ वर्षांच्या इतिहासात (संप वगळता) प्रथमच प्रवासी सेवा काही काळ पूर्ण बंद.

एप्रिल-मे :

* Remdesivir औषधाला तातडीच्या उपचारासाठी मान्यता.
* रोगविरोधी लसनिर्मितीचे सूतोवाच.
* अमेरिकेतील मृत्यूंची संख्या एक लाखांवर पोचली

जुलै :
हा आजार हवेतील सूक्ष्मकणांच्याद्वाराही पसरत असल्याचे WHOचे निवेदन. तसेच बाधित पण लक्षणविरहीत लोकांकडूनही त्याचा प्रसार होत असल्याचे निवेदन.

ऑगस्ट :
बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातून काढलेल्या रक्तद्रवाच्या उपचारास मान्यता.

सप्टेंबर :
जागतिक कोविडमृत्यूंचा आकडा १० लाखांवर पोचला.

ऑक्टोबर
:
* Remdesivir ला अमेरिकी औषध प्रशासनाकडून अधिकृत औषधाची मान्यता (पण पुढे याबाबत WHOने नकारात्मक शेरा दिला).
• भारतात कोविडमृत्यूंचा आकडा १ लाखावर पोचला.

नोव्हेंबर : दुहेरी अँटीबॉडी उपचारास तातडीच्या वापरासाठी मान्यता.

डिसेंबर २०२० :
• काही लसी प्रयोगसिद्ध होऊन मान्यताप्राप्त. वितरणास तयार. चीनमध्ये लाखो लोकांना त्यांची लस दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध. रशियाने पण सुरवात केली. इंग्लंड ८ डिसेंबरला लसीकरण सुरु करण्याच्या तयारीत.
• आज अखेरीस या आजारावर निर्विवाद असे प्रयोगसिद्ध रामबाण औषध उपलब्ध नाही. त्यामुळे रोगप्रतिबंधावर अधिक लक्ष केंद्रित.
...............

समाजात या निव्वळ नैसर्गिक आजारातून पुरेशी सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे लसीकरणाची कल्पना पुढे आली. वर उल्लेख केल्याप्रमाणे संबंधित लस नव्याने निर्माण करून त्याचे काहीसे घाईतच प्रयोग केले गेलेत. लसीच्या अनेक उत्पादनांपैकी काही आता प्रयोगसिद्ध होऊन वापरासाठी तयार आहेत. लस देताना अर्थातच सामाजिक प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. ती सर्व नागरिकांना द्यायची की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. RNA तंत्रज्ञानावर आधारित लसी या नव्यानेच निर्माण केलेल्या आहेत. त्यांची उपयुक्तता आणि दुष्परिणाम अनुभवातून समजतील. लसीकरणातून महासाथ कशी आटोक्यात येते हे यथावकाश समजेल. आपण तसे स्वप्न बघावे अशी WHOने इच्छा व्यक्त केली आहे !

लसीसंबंधी आणि संबंधित घडामोडीबाबाबत चर्चा करण्यासाठी हा नवा धागा.
एव्हाना या आजारावर या धाग्यासह ५ धागे निर्माण झालेले आहेत. आता हा आजार लवकरात लवकर सामान्य होऊन आटोक्यात येवो ही इच्छा. जेव्हा तो सामान्य सर्दीपडशाप्रमाणे समाजात दखलपात्र राहणार नाही, तेव्हा अशा चर्चाधाग्यांचे प्रयोजनही संपेल. तसे लवकरात लवकर होवो आणि हे सर्व धागे इ-रद्दीत जावोत हीच आंतरिक इच्छा !
.............................................................................
चित्र जालावरुन साभार !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला इथे सरकार म्हणजे सरकारी कार्यालय आहे जे कोव्हीड पॉझिटिव्ह रुग्ण डिटेल्स ठेवतात. म्हणजे लक्ष नको देऊ देत, अगदी खाजगी दवाखान्यात जे उपचार घेत आहेत त्यांना नाही पण जे घरी विलगिकरणात आहेत त्यांना किमान फोन करून चौकशी तरी करावी जी आधी करायचे (मैत्रिणीचा अनुभव) म्हणजे लोकांना थोडे गांभीर्य असेल अन किमान विलगिकरणाचे पंधरा दिवस घरीच राहतील

VB,
तुमच्यासारख्या काही केसेस जानेवारीत नक्की असणार.
पण तरी काही शंका आहेत.
कोविद फक्त 15 मिनिटांच्या exposure मुळे होतो. हा अतिशय फास्ट पसरणारा व्हायरस आहे. म्हणूनच तो चायनाहून फार वेगाने जगभर पसरला.
त्यामुळे नोव्हेंबर ते मिड मार्च इतका मोठा ब्रेक त्याने कसा घेतला? त्याकाळात का पसरला नाही? शेतकरी आंदोलन हे तर fertile ground होतं पण तिथे काहीच घडलं नाही मग अचानक आता काय झालं!
एप्रिल मे जून मध्ये महाराष्ट्रात कडक टाळेबंदी होती तरीही करोना झपाट्याने पसरत होता . पण नोव्हेंबर-मार्च मध्ये सगळं ओपन असताना करोना आटोक्यात राहिला. ही काय जादू होती?

सनव, कुमार सर सांगितलच पण माझ्या माहितीप्रमाणे या साथींच्या प्रसाराची कर्व्ह अशीच असते. जिथे जिथे सेकंड वेव्ह आली आहे तिथे तिथे काही महिने एकदम बॅक टू नॉर्मल असल्यासारखे गेले आहेत उदा. युरोप. It's an amalgamation of many reasons that causes the second wave - mutation of the virus to a more infectious form, people not following the measures, and in general increased exposure due to opening up. आत्ता या तीनही गोष्टी घडल्या आहेत. एकदा आकडे वाढू लागले की ते exponentially वाढतात जर काहीच उपाय केले नाहीत तर. जे आपल्याला दिसत आहेच. शिवाय कोणतेही उपाय केले तरी त्याचा परीणाम दिसायला काही कालावधी लागतोच.
सरकारने आकडे देताना जर टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये symptomatic किती आणि asymptomatic किती असा breakdown दिला तर तो रेशो 15% /85% असा आहे का? आणि जर तो नसेल तर मग आपण सगळे asymptomatic रूग्ण ओळखलेलेच नाहीत जे आजार पसरवू शकतात.
सहसा या आजारांची सेकंड वेव्ह येतेच. आपल्या सुदैवाने कोरोना अधिक infectious झाला असेल पण अधिक deadly नाही झालेला त्यामुळे मृत्यू दर बराच आटोक्यात आहे. शिवाय लस आणि इतर वैद्यकीय सोयी आता उपलब्ध आहेत. जितके नियम पाळले जातील आणि अनावश्यक गर्दी टाळली जाईल तितका फायदा दिसून येईल. शिवाय लसीकरण हा एक मोठा भाग राहील साथ आटोक्यात आणण्यासाठी.

जिज्ञासा +१
गूगल कृपेनें,स्पॅनिश फ्लू संदर्भातही अशीच माहिती वाचनात आली आहे.

सूचना, अनुभवांची देवाण-घेवाण आणि पूरक माहिती याबद्दल वरील सर्व प्रतिसादकांचे मी आभार मानतो.
दुसऱ्या-तिसऱ्या लाटेसंदर्भात देश-विदेशात अनेक तर्कवितर्क आहेत. योग्य संदर्भ मिळाल्यास काही लिहीन.
सर्वसाधारण मुद्दे वर जिज्ञासा यांनी लिहिलेच आहेत.

एफिकसी कशी मोजतात याबद्दल नंतर लिहीन. >>> जरूर लिहा, उपयुक्त आहे.

भारतातील दुसरी लाट : उहापोह

भारताच्या सामाजिक आरोग्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष के एस रेड्डी यांची अभ्यासपूर्ण मुलाखत येथे आहे:
https://www.indiaspend.com/covid-19/mistaken-notion-of-herd-immunity-led...

त्यातील ठळक मुद्दे :
१.फेब्रुवारीपासून अचानक रूग्ण संख्येत वाढ होण्यामागे लोकांची बेफिकीर वृत्ती, मोठ्या समूहात बिनधास्त वावरणे आणि प्रशासनाची तुलनात्मक ढिलाई ही कारणे आहेत.

२. ‘आपल्या भारतीयांना सामूहिक प्रतिकारशक्ती प्राप्त झाली आहे’ हा मोठा गैरसमज पसरवला गेला. ती अजूनही आलेली नाही. या मुद्द्याला ‘निर्वाण’ असे अजिबात समजू नये ! नक्की किती लोकांना संरक्षित केले म्हणजे ती मिळेल, याचा अभ्यास अद्याप अपूर्णच आहे.

३. दरम्यान विषाणूने अनेक जनुकीय बदल केले. तसे बदललेले विषाणू देश-विदेशात पसरले. त्याचबरोबर लोकांचाही परदेश प्रवास तुलनेने वाढला. अर्थात बदललेल्या विषाणूंचा जनुकीय अभ्यास अद्याप चालू आहे.

…..पुढे चालू....

४. सध्याचा रोगप्रसार भारताच्या पश्‍चिम व दक्षिण भागात जास्त होतोय याची कारणे
म्हणजे तिथले अधिक शहरीकरण व औद्योगिकरण, लोकसंख्येची दाट घनता असलेली शहरे आणि लोकांचा राज्यांतर्गत व आंतरराज्य भरपूर प्रवास.

५. साथ नियंत्रणात आणण्याचा लसीकरण हा एकमेव उपाय अजिबात नाही. त्याच्या जोडीला त्रिसूत्री आणि शिस्त दीर्घकाळ हवी. इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे इतरांना होणारा रोगप्रसार थांबेल की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही.
(यासंदर्भात अमेरिकेतील एका नव्या संशोधनासंबंधी मी इथे एक प्रतिसाद दिलेला आहे : Submitted by कुमार१ on 27 March, 2021 - 21:09 )

वरील मुलाखतीदरम्यान श्री. रेड्डी यांनी क्रिकेटची उपमा देऊन छान समजावले आहे. ते म्हणतात, “कोविडशी सामना करताना आपण भारतीय टी-ट्वेंटी सामन्याप्रमाणे वागून मोकळे झालेलो आहोत ! ते बिलकुल चूक आहे. जसे कसोटीमध्ये चिवटपणे मैदानावर टिकून राहायचे असते तसा लढा आपल्याला द्यायचा आहे. हा एक मोठा दीर्घकालीन कसोटी सामनाच आहे.

>>> “कोविडशी सामना करताना आपण भारतीय टी-ट्वेंटी सामन्याप्रमाणे वागून मोकळे झालेलो आहोत ! ते बिलकुल चूक आहे. >>> +७८६
पटेश.

आताच एक news वाचली, त्यानुसार येथील मिनेसोटा राज्यात आठ लाख पूर्ण vaccination झालेल्या लोकांमधील ८९ लोकांना covid ची लागण झाली. Vaccine घेऊन कविड झालेल्यांचे प्रमाण हे १ टक्के पेक्षाही कमी आहे.
फक्त त्याच्या बातम्या जास्त येत असल्यामुळे भिती पसरत आहे.

Pages