पल्स ऑक्सीमीटरचे गमभन

Submitted by कुमार१ on 22 September, 2020 - 23:52

कोविड महासाथीच्या निमित्ताने बऱ्याच सुशिक्षित कुटुंबांमध्ये पल्स ऑक्सीमीटर या उपकरणाचे आगमन झालेले आहे. या आजारात काही रुग्णांना श्वसन अवरोध होऊ शकतो. परिणामी शरीरपेशींना रक्ताद्वारे मिळणाऱ्या ऑक्सीजनचे प्रमाण बरेच कमी होऊ शकते. या परिस्थितीचा प्राथमिक अंदाज घरच्या घरी घेता यावा, या उद्देशाने या घरगुती उपकरणाचे उत्पादन केलेले आहे. सध्या त्याचा लाभ बरेच जण घेत आहेत. त्याचबरोबर अनेक सामाजिक आरोग्य सर्वेक्षणातही त्याचा चाळणी चाचणीसारखा वापर होत आहे. या उपकरणातून ऑक्सीजन संबंधीचे जे मापन दिसते त्याबद्दल सामान्यांत कुतूहल दिसून आले. “ ९८, ९५, ८८ इत्यादी आकड्यांचा नक्की अर्थ काय?” असेही प्रश्न अनेकांनी संपर्कातून विचारले. त्यातूनच हा लेख लिहिण्याची स्फूर्ती मिळाली.

यानिमित्ताने आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन, त्याचा ऑक्सिजनशी असलेला संबंध आणि यासंदर्भातील तांत्रिक मापने यांचा आढावा घेत आहे. हिमोग्लोबिनचे मूलभूत कार्य विशद करणारा लेख मी यापूर्वीच इथे लिहिलेला आहे.
(https://www.maayboli.com/node/64492 ).

शरीरातील प्रत्येक पेशीला कार्यरत राहण्यासाठी सतत ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा लागतो. आपण श्वसनाद्वारे जो अक्सिजन शरीरात घेतो तो हिमोग्लोबिन या प्रथिनाशी संयोग पावतो. हिमोग्लोबिन ऑक्सिजनचे वाहक आहे. त्याच्यामार्फत पुढे रोहिणीतील रक्तप्रवाहाद्वारे सर्व पेशींना ऑक्सिजन सोडला जातो. म्हणजेच रोहिणीतून जे रक्त वाहत असते, ते ऑक्सिजनने समृद्ध असते. सर्व पेशी हा ऑक्सिजन शोषून घेतात व नंतर त्यांच्या कार्याद्वारे कार्बन डाय-ऑक्साइड तयार करतात. हा वायू देखील पुन्हा हिमोग्लोबिनच्या माध्यमातून रक्तात शिरतो. आता हे रक्त नीला वाहिन्यांद्वारा छातीच्या दिशेने पाठवले जाते. अर्थातच नीलेमधल्या रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण बरेच कमी असते.

वर वर्णन केलेल्या दोन रक्तवाहिन्यांमधील जे हिमोग्लोबिन आहे त्याचे दोन प्रकार म्हणता येतील :
१. रोहिणीतल्या रक्तातले हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनसमृद्ध आहे तर,
२. नीलेतल्या रक्तातले हिमोग्लोबीन हे ऑक्सिजनन्यून आहे.
या दोन्हींचे तुलनात्मक प्रमाण काढणे हे पल्स ऑक्सीमीटर या तंत्राचे मूलभूत तत्त्व आहे.

आता पुढील लेखाची विभागणी अशी आहे:

१. उपकरणाची कार्यपद्धती
२. मापनांचा अर्थ
३. तंत्राचे उपयोग
४. मापनावर बाह्य घटकांचा परिणाम
५. मापनाच्या मर्यादा

कार्यपद्धती :
शरीरातील रोहिणीमधल्या रक्तप्रवाहातील एकूण हिमोग्लोबिनचा किती भाग ऑक्सिजनने व्यापलेला आहे हे जाणण्यासाठी या तंत्राचा वापर होतो. त्यासाठी शरीरातील रक्तप्रवाहाचे स्पंदन जाणवेल अशी जागा निवडली जाते. यामध्ये मुख्यत्वे हाताचे अथवा पायाचे बोट किंवा कानाच्या पाळीचा समावेश आहे.

PO fing.jpgPO-Ear-Probe.jpg

वरील आकृतीत दाखवल्याप्रमाणे शरीरावर ठरलेल्या जागी उपकरण लावले जाते. त्यामध्ये असलेल्या एलईडी यंत्रणेमधून प्रकाशाचे झोत शरीरात सोडले जातात. या प्रकाशामध्ये बऱ्याच तरंगलांबीच्या लहरी असतात. त्यातील दोन विशिष्ट लहरी हिमोग्लोबिनचे दोन प्रकार शोषून घेतात. त्यातून प्रकाशाचा काही भाग बाहेर सोडला जातो आणि तो उपकरणात मोजला जातो.

इथे दोन मुद्दे महत्त्वाचे ठरतात:
१. ऑक्सिजनसमृद्ध हिमोग्लोबिन मुख्यतः अवरक्त प्रकाश शोषते, तर
२. ऑक्सीजनन्यून हिमोग्लोबीन मुख्यतः लालरंगी प्रकाश शोषते.

या दोन्हींचे तुलनात्मक गणित उपकरणात होते आणि आपल्याला त्याच्या पडद्यावर SpO2 हे मापन दिसते. त्याचा अर्थ असा असतो :

S = saturation = संपृक्तता
p = peripheral ( हे बोटाच्या टोकावर मोजले जाते म्हणून peripheral).
O2 = oxygen
निरोगी व्यक्तीत (समुद्र सपाटीवरील ठिकाणी) याचे प्रमाण ९५ – ९९ % या दरम्यान असते. अति उंचीवरील ठिकाणी राहताना यात फरक पडतो.

ही मोजणी करण्यापूर्वी खालील मूलभूत काळजी घेणे आवश्यक ठरते :
१. तपासणी करावयाची व्यक्ती आरामात बसलेली हवी.
२. तपासणीचे बोट अगदी स्वच्छ असले पाहिजे तिथे धूळ वा मळ असता कामा नये. तसेच बोटाच्या नखाला नेलपॉलिश लावलेले नको. बोटांवर सूज नसावी.
३. व्यक्तीच्या शरीरावर प्रखर प्रकाश पडता कामा नये, कारण ही मोजणी ‘प्रकाशशोषण’ या तत्त्वावर होते.

बाह्य घटकांचा परिणाम
आरोग्यशास्त्रातील बऱ्याच घरगुती उपकरणांची अचूकता तशी मर्यादित असते. आजूबाजूच्या बाह्य घटकांचा त्याच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जरी रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य असले, तरीदेखील काही बाह्य घटकांमुळे या मापन पद्धतीत चूक होऊ शकते. परिणामी हे मापन विश्वासार्ह राहत नाही. असे काही घटक याप्रमाणे आहेत :

१. मापन चालू असताना व्यक्तीचा हात अस्थिर असणे
२. व्यक्तीच्या त्वचेचा रंग हा एक महत्त्वाचा घटक आहे. जर त्वचेचा रंग खूप काळा असेल तर त्याचा मापनावर बर्‍यापैकी परिणाम होतो. त्यामुळे विशिष्ट वंशाच्या लोकांसाठी उपकरणातील तांत्रिक प्रमाणीकरण बदलण्याची शिफारस आहे.
३. काही कारणामुळे व्यक्तीच्या रक्तातील कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण वाढलेले असणे.

तंत्राची उपयुक्तता
ज्या आजारांमध्ये रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते अशा प्रसंगी या मापनाचा उपयोग केला जातो. असे काही नेहमीचे आजार आणि परिस्थिती अशा आहेत :

१. प्रौढातील श्वसन अवरोध (ARDS). सध्याच्या कोविडमध्ये ही परिस्थिती उद्भवू शकते.
२. दमा अथवा दीर्घकालीन श्वसन-अडथळा
३. हृदयक्रिया तात्पुरती बंद पडल्यास (arrest)
४. काही प्रकारच्या झोपेच्या समस्या
५. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल रुग्णांमध्ये काही विशिष्ट शल्यक्रिया करताना.

मापनाच्या मर्यादा
एखाद्याचे मापन ९५ ते १०० टक्के दरम्यान आले याचा अर्थ इतकाच असतो, की श्वसनातून मिळालेला ऑक्सिजन रक्तप्रवाहात योग्य प्रमाणात मिसळला जात आहे. परंतु याचा अर्थ असा नाही, की शरीरातील सर्व पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळालेला आहे. ही तफावत का असते आणि कुठल्या प्रसंगात तिचे महत्त्व आहे ते आता पाहू.

१. समजा, आपण रक्तन्यूनतेच्या (anemia) रुग्णात हे मापन करीत आहोत आणि संबंधिताचे हिमोग्लोबिन बरेच कमी आहे. जर या व्यक्तीला कुठलाही श्‍वसन अवरोध नसेल तर संपृक्तता अगदी नॉर्मल ( कदाचित 100% सुद्धा) दाखवली जाईल. परंतु तिच्या रक्तात मुळात हिमोग्लोबिनच कमी असल्याने रक्तातील एकूण ऑक्सिजन वाहण्याचे प्रमाण कमीच राहील. परिणामी पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळणार नाही.

२. सध्या प्रदूषणामुळे वातावरणातील कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण बरेच वाढलेले असते. काही विशिष्ट व्यावसायिकांमध्ये (उदाहरणार्थ वाहतूक पोलीस) त्याचे प्रमाण लक्षणीय असू शकते. हिमोग्लोबिनचे जितके रेणू कार्बन मोनॉक्साईडशी संयोग पावतात, ते ऑक्सीजन स्वीकारू शकत नाहीत. परिणामी ते पेशींना ऑक्सिजन पुरवण्याचे दृष्टीने अकार्यक्षम ठरतात.

३. काही जनुकीय आजारांत संबंधित व्यक्तीत हिमोग्लोबिनची रचना बिघडलेली असते. त्याचाही त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

वरील सर्व परिस्थितीत या उपकरणाने दाखविलेल्या मापनाचे चिकित्सक विश्लेषण करावे लागते. मापनाचा आकडा जरी नॉर्मल दिसला तरी त्याचा अर्थ सर्व पेशींमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा असतोच असे नाही.

या उपकरणात SpO2 च्या जोडीला आपल्या नाडीचे प्रतिमिनिट ठोकेही दर्शविलेले असतात. काही उपकरणांत मध्यभागी PI % असाही एक निकष दाखवतात. त्याचा निरोगी अवस्थेतील पल्ला 0.02% - 20% या दरम्यान असते. हा निर्देशांक शरीराच्या टोकापर्यंत रक्तप्रवाह सुरळीत आहे असे दर्शवितो. त्याकडे सामान्य माणसाने लक्ष द्यायची गरज नाही.

तर असे हे घरगुती वापराचे सुटसुटीत उपकरण. एखाद्याला कुठलाही श्वसनाचा त्रास होत नसेल आणि इथले ऑक्सिजनचे मापन नॉर्मल दाखवत असेल, तर चिंता नसावी. मात्र SpO2 90% चे खाली दाखविल्यास अथवा श्‍वसनाचा काही त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक. सध्याच्या परिस्थितीत ज्येष्ठ नागरिक तसेच दीर्घकालीन आजार असलेल्यांनी हे उपकरण जरूर जवळ बाळगावे. त्याचा चाळणी चाचणी म्हणून अधूनमधून वापर ठीक आहे. मात्र चाळा म्हणून ऊठसूट मापन करणे टाळावे. मापनाचे आकड्यांत किरकोळ बदल झाल्यास अस्वस्थ होऊ नये. या उपकरणाची उपयुक्तता, अचूकता आणि मर्यादा लक्षात घेऊन त्याचा तारतम्याने वापर करावा.
*********************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपयुक्त लेख. धन्यवाद!
सध्या पल्सऑक्सिमीटर काही ठिकाणी अवाच्यासव्वा भावात विकले जात आहेत.

समयोचित लेख.
शक्य तिथे मराठी संज्ञा वापरूनही लेख बोजड झालेला नाही.

थर्मॉमीटर आणि शरीराच्या तापमानाबद्दल लिहिलंय का तुम्ही?

आरोग्यलेखन आवडीने वाचणाऱ्या वरील सर्व नियमित वाचकांचे आभार !

* थर्मॉमीटर आणि शरीराच्या तापमानाबद्दल लिहिलंय का तुम्ही?
>>>>>>
अद्याप लिहिलेले नाही.

अतिशय माहितीपूर्ण लेख. सोप्या भाषेत विशद केल्याबद्दल आपले धन्यवाद.

--------------------------------------
थोड्क्यात:

ऑक्सिमिटर, बोटाच्या एका बाजूने लालरंगी (Red) आणि अवरक्त (Infrared) प्रकाशकिरण टाकून बोटाच्या दुसऱ्या बाजूने ते किरण तो मोजतो. त्यावरून बोटातील रक्तात हे प्रकाशकिरण किती शोषले गेलेत हे मापून त्यावरून गणित करून रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण काढतो.
--------------------------------------

लेखामध्ये दोन प्रकारच्या प्रकाश किरणांसाठी मराठी शब्द वापरले आहेत. तिथे कंसात इंग्रजी प्रतिशब्द Red व Infrared लिहिल्यास हे किरण प्रकाशच्या वर्णपटात नेमके कोठे आहेत वाचकाला हे पट्कन कळेल.

electromagneticspectrum.jpg
(इमेज सौजन्य: वावे यांचा हा लेख)

इथे आपल्याला लक्षात येईल कि लाल प्रकाशाच्या अलीकडे अवरक्त किंवा इन्फ्रारेड असतो. त्याची तरंगलांबी जास्त व उर्जा कमी असते. हे किरण वर्णपटातील दृश्य प्रकाशकिरणांहून कमी उर्जेचे असल्याने शरीरास अपायकारक नसतात.
--------------------------------------

या निमित्ताने अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, सध्या सोशल मिडीयावर पल्स ऑक्सिमीटर विषयी गैरसमज पसरवणारा एक व्हिडिओ प्रसृत होत आहे. योगायोगाने तो कालच मला पाहायला मिळाला. हा व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने पल्स ऑक्सिमीटर मध्ये प्लास्टिक पेन धरून ऑक्सिजन रीडिंग घेतली आहेत. आणि पेनामध्ये सुद्धा ऑक्सिजन पातळी नॉर्मल आल्याचे दिसल्याने हे यंत्र किती खोटे व दिशाभूल करणारे आहे असा संदेश शेवटी दिला आहे.

सामान्य माणसाला (ज्यांना पल्स ऑक्सिमीटर कसे काम करते हे माहित नाही) यावर पट्कन विश्वास बसतो. मला सुद्धा क्षणभर तसेच वाटले होते. पण हा लेख वाचून कळले कि हे उपकरण प्रकाशकिरणे मोजून त्याआधारे कार्य करत असल्याने बोटाऐवजी पेन किंवा कोणतीही अर्धपारदर्शक वस्तू त्यात धरली तर उपकरणाला ते कळणार नाही व तो रीडिंग दाखवू शकतो. म्हणूनच ती वापरकर्त्याची जबाबदारी आहे.

अतुल
अभ्यासपूर्ण प्र आवडला.
धन्यवाद !

उत्तम माहिती , अभ्यासपूर्ण......
सर, माझी दोन आठ्वड्यातील रीडिंग्ज ९९ व ९९ आली. काय फ्रेइक्वेन्सीने चेक करावे?

अतुल, तो व्हिडिओ हा मूळात पल्स ऑक्सिमीटर हे चुकीचे रीडिंग दाखवते असा दावा करत नसून बाजारात नकली/ निकृष्ट दर्जाचे पल्स ऑक्सिमीटर सुद्धा मिळताहेत यासाठी होता.

जर पेनावर पल्स ऑक्सिमिटर ठेवले तर
१. त्याने पल्स रेट दाखवायला नको, तो शून्य येईल.
२. जर पल्स रेट शून्य येत असेल याचा अर्थ उपकरण योग्य ठिकाणी / योग्य प्रकारे लावले नाही तेव्हा SpO2 रीडिंग दाखवण्यात अर्थ नाही असा निष्कर्ष काढून रीडिंग दाखवण्या ऐवजी एरर कोड दाखवणे अपेक्षित आहे. ( आणि जरी मोजलेच तरी पेनात ऑक्सिजन हिमोग्लोबिन मधील प्रमाणात नसल्याने आणि ऑक्सिजनसमृध्द व ऑक्सिजनन्यून मध्ये फरक त्यात नसल्याने माणसाच्या शरीराच्या तुलनेच्या बरोबरीने रीडिंग दाखवणेही अपेक्षित नाही.)

तेव्हा जर एखादे पल्स ऑक्सिमीटर पेनावर ठेवून नॉर्मल रीडिंग आणि त्यातही पल्स रेट दाखवत असेल तर ते उपकरण नक्कीच खराब आहे असे समजण्यास हरकत नाही.

रेव्यू
तुमच्या प्रश्नाला एकच असे उत्तर नाही !
कुठलाही दीर्घकालीन आजार नसेल तर जितके कमी वेळा ते बघू तितके बरे.

एका तज्ञांनी सांगितलंय, “ स्वताच्या शरीराकडेच सूक्ष्मपणे बघा. एखादे लक्षण येऊ पाहतंय का ते पहा. उपकरणाचे स्थान दुय्यम राहू द्या.”

छान लेख.

<<< ही मोजणी करण्यापूर्वी खालील मूलभूत काळजी घेणे आवश्यक ठरते :
१. तपासणी करावयाची व्यक्ती आरामात बसलेली हवी.
२. तपासणीचे बोट अगदी स्वच्छ असले पाहिजे तिथे धूळ वा मळ असता कामा नये. तसेच बोटाच्या नखाला नेलपॉलिश लावलेले नको. बोटांवर सूज नसावी.
३. व्यक्तीच्या शरीरावर प्रखर प्रकाश पडता कामा नये, कारण ही मोजणी ‘प्रकाशशोषण’ या तत्त्वावर होते.>>> हल्ली जिकडे तीकडे प्ल्स रेट चेक करताना वरील तिनही मुद्दे दुर्लक्षीत होतात हे स्वानुभवाने कळलेय.
घरी येणारे पालीकेचे लोक असो वा हॉस्पीटल वाले, घाईत डोक्यावर गन शुट करतात अन बोट त्या ऑक्सीमिटरमधे धरायला सांगतात.
माझ्या घरापासुन मी ज्या हॉस्पीटलमध्ये जाते ते फार तर १० मिनीटांचे अंतर आहे. पण महीनाभर घराबाहेर पडली नसल्याने मला थोडा त्रास झाला, दमायला होत होते. हॉस्पीटलमध्ये गेल्यावर प्ल्स रिडींग जास्त आली तर मला हजार प्रश्न विचारत होते, म्हटले थोडा वेळ बसु दे मला मग घे परत रिडींग, तसे केल्यावर नॉर्मल आले. अन नेल पेंट तर मी नेहमी लावते आजवर कोणीच काही बोलले नाही, कदाचित त्यांनासुद्धा माहित नसावे की याने काही फरक पडतो.

मानव, हो अगदी योग्य मुद्दा Happy हि बाब माझ्या मनात आली होती. पण मी विचार केला कि हे उपकरण जर फक्त लाईट पार करून व त्यातील फरक मोजून रीडिंग घेत असेल तर त्याला मध्ये पेन आहे का बोट आहे याच्याशी देणेघेणे नाही असा माझा तर्क झाला. पेन हे पूर्ण पारदर्शी नसतेच. त्यातूनहि त्यात शाईने भरलेली रिफील असेल तर त्या एकंदर गोष्टीतून पार होणारे किरण हे, बोटातून पास होणाऱ्या किरणांइतकेच असतील तर रीडिंग तीच येणार नाहीत का? त्यामुळे SpO2 रीडिंग पेनाबाबत शून्य येणार नाही (जर माझी समजूत योग्य असेल तर). पण.....

>> या उपकरणात SpO2 च्या जोडीला आपल्या नाडीचे प्रतिमिनिट ठोकेही दर्शविलेले असतात

हे लेखातले वाक्य मात्र माझ्याकडून दुर्लक्षित झाले. नाडीचे प्रतिमिनिट ठोके त्याला केवळ लाईटमुळे कसे कळतात? यासाठी अन्य तंत्र वापरले असेल तर मात्र हो, पेन बाबत नाडीचे ठोके दिसणे म्हणजे मशीन सदोष किंवा फेक आहे म्हणता येईल.

नाडीचे प्रतिमिनिट ठोके त्याला केवळ लाईटमुळे कसे कळतात? >> हृदयाच्या ठोक्याबरोबर नाडी आणि छोट्या रक्तवाहिन्यांत रक्त जास्त प्रमाणात वाहते, आणि दोन ठोक्यांच्या मध्ये कमी प्रमाणात (जसे आपल्याला मनगटावर नाडीवर हात लावला की कळते. बोटावर स्पर्शाने ते जाणवत नसले तरी तिथेही हे ठोक्याबरोबर जास्त कमी प्रमाण सुरूच असते) या रक्ताच्या कमी जास्त प्रमाणाबरोबर त्यातून जाणारा अवरक्त प्रकाशही कमी जास्त होतो आणि त्यावरून पल्स रेट मोजला जातो.

>>कुठलाही दीर्घकालीन आजार नसेल तर जितके कमी वेळा ते बघू तितके बरे.>> मला कोणताही त्रास नाही.... माझे वैद्यकीय सल्लागार सुध्दा हेच म्हणाले

>> या रक्ताच्या कमी जास्त प्रमाणाबरोबर त्यातून जाणारा अवरक्त प्रकाशही कमी जास्त होतो आणि त्यावरून पल्स रेट मोजला जातो.

ओह्ह... भन्नाट आहे कि हे टेक्नोलॉजीच्या दृष्टीने विचार केला तर Proud

इतके हे यंत्र त्यांनी विविध अल्गोरिदम चिप्स टाकून स्मार्ट बनवले असेल तर त्याला पेन आणि बोट फरक सुद्धा कळायला हवा. तुमचा मुद्दा मला आता लक्षात आला. माझ्यकडे घरी हे नसल्याने प्रत्यक्ष प्रयोग करून पाहू शकलो नाही. पण हे नक्कीच इंटरेस्टिंग वाटत आहे. आज संध्याकाळीच जवळपासच्या मेडिकल मधून घेऊन येतो Happy

VB, योग्य मुद्दा.

मानव व अतुल,
छान चर्चा. तंत्रज्ञान अफलातून आहे खरे. त्याचबरोबर ते बाह्य घटकांना नको इतके संवेदनक्षम आहे. त्वचेच्या रंगाबद्दल मागच्या आठवड्यात ‘सकाळ’ मध्ये एक लेख होता. त्यात इंग्लंडमधील किस्सा होता.

तिथले उपकरण वापरून एका कृष्णवर्णीयाचे हे मापन सातत्याने केल्यावर एका संशोधकाला त्यातील मेख समजली. त्यांच्या मते या व्यक्तीत जो आकडा दाखवला जातोय तो तब्बल ९ % ने ‘जास्त’ आहे. अशी बरीच उपकरणे कॉकेशियन वंशाच्या गोऱ्या लोकांना ‘प्रमाण’ धरून बनवली जातात. म्हणून ती वापरून कृष्णवर्णीयाचे मापन केल्यास चुकीचे निष्कर्ष मिळतात.

@ atuldpatil
>>>>>
अलीकडे अवरक्त किंवा इन्फ्रारेड असतो. त्याची तरंगलांबी जास्त व उर्जा कमी असते.
>>>>
हे दोन्ही मुद्दे व्यस्त का असतात ते सांगणार का ?

धाग्याच्या विषयाला सोडून होईल. पण थोडक्यात सांगतो:

एका सेकंदात होणारी आवर्तने म्हणजे वारंवारता (frequency).
जास्त आवर्तने घडून यायला अर्थातच जास्त उर्जा लागेल. कमी आवर्तने असतील तर अर्थातच उर्जा कमी असेल.
याचाच अर्थ: उर्जा हि वारंवारतेच्या सम प्रमाणात असते.

सोपे उदाहरण: समजा आपण आपल्या हाताचा तळवा सतत डावीकडे-उजवीकडे-डावीकडे करत राहिलो तर एका सेकंदात जास्त वेळा हे करण्यासाठी साहजिकच आपल्याला जास्त उर्जा लावावी लागेल.

जितकी वारंवारता जास्त तितकी तरंगलांबी(wavelength) अर्थातच कमी असते (वरच्या आकृतीत डावीकडे जाल तसे वारंवारता वाढली आहे व तरंगलांबी कमी होत गेली आहे असे लक्षात येते)

म्हणूनच तरंगलांबीच्या संदर्भात वरील वाक्य होईल: उर्जा हि तरंगलांबीच्या व्यस्त प्रमाणात असते.

म्हणूनच: तरंगलांबी जास्त व उर्जा कमी (or vice versa)

Pages