कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण

Submitted by कुमार१ on 7 December, 2020 - 07:30

या विषयाचे आधीचे संदर्भ :

१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)

२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)

३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य (https://www.maayboli.com/node/75809)

४. ( पूरक विषय) : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन (https://www.maayboli.com/node/76797) )

मागील चर्चेत आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
………………………………………..

करोना सार्स-२ या दुष्ट विषाणूने मानवजातीवर हल्ला केल्याला आता एक वर्ष झाले. त्यातून उदभवला कोविड१९ हा आजार. त्याची साथ आली आणि तिची व्याप्ती वाढत ती महासाथ झाली. त्यातून खूप लोक आजारी पडले. काहींचा आजार सौम्य राहिला तर काहींचा गंभीर होऊन ते मृत्युमुखी देखील पडले. महासाथ आटोक्यात आणण्यासाठी जगातील बहुतेक देशांना टाळेबंदीसारखे कठोर उपाय अमलात आणावे लागले. त्यातून अर्थव्यवस्थेची प्रचंड हानी झाली. अनेकांचे रोजगार बुडाल्याने सामाजिक मनस्वास्थ्य हरवले. पुढे काही देशांत आजाराचे प्रमाण कमी झाले आणि आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले. पण अन्य काहींत प्रमाण पुन्हा एकदा वाढल्याने ‘दुसरी लाट’ निर्माण झाली. या आजाराच्या वर्षपूर्ती निमित्ताने गेल्या वर्षातील त्यासंबंधीच्या ठळक घडामोडींचा हा मागोवा :

डिसेंबर 2019 :
चीनच्या वुहान प्रांतात न्युमोनिया या आजाराचे काही रुग्ण आढळले आणि त्याचे कारण अज्ञात होते.
* 31 डिसेंबरला या नव्या आजाराची WHOच्या दप्तरी नोंद झाली. करोना-सार्स २ हा विषाणू तर कोविड-१९ हा त्याचा आजार, अशी अधिकृत नावे दिली गेली.

जानेवारी 2020 :
* या आजाराचे RT-PCR या चाचणीने निदान झालेला पहिला रुग्ण अमेरिकेत आढळला.
* हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो हे स्पष्ट झाले.
* WHOने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली.

फेब्रुवारी :
बहुतेक देशात आंतरराष्ट्रीय विमानसेवांवर निर्बंध. परदेशातून आलेल्या व्यक्तीस 14 दिवसांचे विलगीकरण लागू.

मार्च :

* 11 मार्च रोजी WHO कडून कोविडची महासाथ जाहीर.
* HCQ या पारंपरिक औषधाचा वापर सुरू.
* संसर्ग साखळी रोखण्यासाठी बऱ्याच देशात टाळेबंदी जाहीर.
* भारतीय रेल्वेच्या १६७ वर्षांच्या इतिहासात (संप वगळता) प्रथमच प्रवासी सेवा काही काळ पूर्ण बंद.

एप्रिल-मे :

* Remdesivir औषधाला तातडीच्या उपचारासाठी मान्यता.
* रोगविरोधी लसनिर्मितीचे सूतोवाच.
* अमेरिकेतील मृत्यूंची संख्या एक लाखांवर पोचली

जुलै :
हा आजार हवेतील सूक्ष्मकणांच्याद्वाराही पसरत असल्याचे WHOचे निवेदन. तसेच बाधित पण लक्षणविरहीत लोकांकडूनही त्याचा प्रसार होत असल्याचे निवेदन.

ऑगस्ट :
बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातून काढलेल्या रक्तद्रवाच्या उपचारास मान्यता.

सप्टेंबर :
जागतिक कोविडमृत्यूंचा आकडा १० लाखांवर पोचला.

ऑक्टोबर
:
* Remdesivir ला अमेरिकी औषध प्रशासनाकडून अधिकृत औषधाची मान्यता (पण पुढे याबाबत WHOने नकारात्मक शेरा दिला).
• भारतात कोविडमृत्यूंचा आकडा १ लाखावर पोचला.

नोव्हेंबर : दुहेरी अँटीबॉडी उपचारास तातडीच्या वापरासाठी मान्यता.

डिसेंबर २०२० :
• काही लसी प्रयोगसिद्ध होऊन मान्यताप्राप्त. वितरणास तयार. चीनमध्ये लाखो लोकांना त्यांची लस दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध. रशियाने पण सुरवात केली. इंग्लंड ८ डिसेंबरला लसीकरण सुरु करण्याच्या तयारीत.
• आज अखेरीस या आजारावर निर्विवाद असे प्रयोगसिद्ध रामबाण औषध उपलब्ध नाही. त्यामुळे रोगप्रतिबंधावर अधिक लक्ष केंद्रित.
...............

समाजात या निव्वळ नैसर्गिक आजारातून पुरेशी सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे लसीकरणाची कल्पना पुढे आली. वर उल्लेख केल्याप्रमाणे संबंधित लस नव्याने निर्माण करून त्याचे काहीसे घाईतच प्रयोग केले गेलेत. लसीच्या अनेक उत्पादनांपैकी काही आता प्रयोगसिद्ध होऊन वापरासाठी तयार आहेत. लस देताना अर्थातच सामाजिक प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. ती सर्व नागरिकांना द्यायची की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. RNA तंत्रज्ञानावर आधारित लसी या नव्यानेच निर्माण केलेल्या आहेत. त्यांची उपयुक्तता आणि दुष्परिणाम अनुभवातून समजतील. लसीकरणातून महासाथ कशी आटोक्यात येते हे यथावकाश समजेल. आपण तसे स्वप्न बघावे अशी WHOने इच्छा व्यक्त केली आहे !

लसीसंबंधी आणि संबंधित घडामोडीबाबाबत चर्चा करण्यासाठी हा नवा धागा.
एव्हाना या आजारावर या धाग्यासह ५ धागे निर्माण झालेले आहेत. आता हा आजार लवकरात लवकर सामान्य होऊन आटोक्यात येवो ही इच्छा. जेव्हा तो सामान्य सर्दीपडशाप्रमाणे समाजात दखलपात्र राहणार नाही, तेव्हा अशा चर्चाधाग्यांचे प्रयोजनही संपेल. तसे लवकरात लवकर होवो आणि हे सर्व धागे इ-रद्दीत जावोत हीच आंतरिक इच्छा !
.............................................................................
चित्र जालावरुन साभार !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण साबणाने वस्तू पुसून घेत असते. पण दीड-दोन पोती वाणसामान पुसत बसणं फार कटकटीचं आहे. शिवाय इतरही वेळी किरकोळ काही आणलं की स्वच्छ करायला बरं पडेल.
बघते मी ६२% + अल्कोहोल असलेलं सॅनिटायझर. मोठा कंटेनर आणणार. धन्यवाद डॉक्टर.

प्रज्ञा९, तुम्हाला एवढी काळजी घ्यायचीच असेल तर इतक्या सगळ्या सामनावर सॅनिटाइझर लावण्यापेक्षा, वाण्याचे समान तीन दिवस आधी आणणे आणि वेगळे ठेवणे, मग वापरायला काढणे असे करता येईल. जर काही सामान ताबडतोब लागले तर तेवढे फक्त सॅनिटाईझ करता येईल.

प्रज्ञा,
छोट्या छोट्या गोष्टी सॅनिटायझर ने पुसून मोठ्या नुसत्या २ दिवस गॅलरीत कडक उन्हात ठेवूनही भागेल.
सर्व किराणा पुसण्यात वेळ आणि सॅनिटायझर चा खर्च दोन्ही बरेच असेल.

सगळ्या सूचना मनात नोंदवून ठेवल्या आहेत. आज तरी सोडिअम हायपोक्लोराईड डायल्यूट फवारले. इथेनॉल पण चालणार आहे, ते मिळवायची सोय झाली आहे.
आभार पुन्हा एकदा.

नव्या वाचकांसाठी एक सूचना.

कोविडसंबंधी हा धागा लसीकरण आणि भावी उपचार- संशोधन या हेतूने काढला आहे. याआधीच्या सर्व भागांचे दुवे या लेखाच्या सुरुवातीस दिलेले आहेत. त्या जुन्या धाग्यांमध्ये या विषयाचे साबण, निर्जंतुकीकरण इत्यादी उपविषय बरेच चर्चिले गेले आहेत.

तेव्हा या संदर्भात ज्यांना काही शंका असतील त्यांनी आधी ती जुनी चर्चा नजरेखालून घालावी. तरीही काही अजून शंका असतील तर त्या संबंधित धाग्यांवर विचारल्यास बरे होईल.
धन्यवाद !

छान आढावा.
तुम्ही ज्या पद्धतीने ह्या वर्षी कोविड संबंधित धागे काढून सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत त्याला तोड नाही. कारण बऱ्याच जणांना त्याचा मानसिक आधार वाटला. कधी कधी तेच तेच प्रश्न ( मी सुद्धा ) किती जणांनी विचारले पण तुम्ही संयतपणे समजावलेत. शिवाय ज्या गोष्टी सोशल मिडियावर एक डॉक्टर म्हणून अडचणीत आणू शकतात त्या पण तुम्ही लीलया सांभाळता तेही कुणाला न दुखावता न कंटाळता ... प्रत्येकाला प्रतिसाद देता.... हे किती कठीण वर्ष होतं ह्यात फारच कमी गोष्टींंची विश्वासार्हता वाटायची , त्यात तुमचे लेख ,उत्तरे आणि वेळोवेळी अपडेट केलेली योग्य माहिती याचा फार उपयोग झाला.मनःपूर्वक आभार आणि...
ह्या सगळ्याबद्दल दंडवत !
हा माझा कृतज्ञता आढावा हं Happy
आता नीट वाचते.

ही लस घ्यावी, न घ्यावी बद्दल काय मत आहे. मी तरी ही लस घ्यायची नाही असे सध्या ठरवले आहे. पुरेशी काळजी व लोकसंपर्क टाळला तर करोनाची लागण होत नाही हे जर खरे असेल तर हेच केलेले उत्तम हेमावैम.

होय, असते. भविष्यात जर काही विपरीत झाले तर त्यांना चौकशीस सामोरे जावे लागते.>>>>

ती चौकशी होईल पण विपरीत परिणाम उलट करता येतीलच असे नाही ना? जी हानी होईल ती कायम राहणार. मृत्यू झाला तर सगळेच संपले.

अस्मिता,
गेले वर्षभर आपण सर्वजण या नव्या आजारामुळे त्रस्त आहोत. अशा परिस्थितीत तुम्ही सर्व वाचकांनी चांगले प्रश्न विचारून आणि उत्तम चर्चा घडवून छान सहकार्य केलेले आहे. त्यामुळेच या विषयावर खोलात वाचन करण्याची स्फूर्ती मिळाली आणि माझ्याही ज्ञानात भर पडत गेली. इथल्या चर्चेचा व्यक्तिगत विकासासाठी खूपच फायदा झाला.

साधना,
समाजातील सर्वांनी लस घेण्याची काही गरज नाही असे माझे मत आहे. लसीकरण सुरुवात अधिक धोका असलेल्या गटापासून सुरुवात होईलच. ठराविक प्रमाणात समाजाचे लसीकरण झाले, की तोपर्यंत साथीचे प्रमाण कमी होऊ लागणार आहे आणि न घेतलेल्या लोकांनाही अप्रत्यक्ष फायदा होईल.
आपल्याकडे आयसीएमआर नेही तसे स्पष्ट केलेले आहे. तेव्हा अन्य दीर्घकालीन आजार नसलेल्यांनी आपापल्या मताशी ठाम रहावे.
तुमचा दुसरा प्रश्न महत्त्वाचा असल्याने स्वतंत्र प्रतिसादात हाताळतो.

साधना,
जगात आतापर्यंत तयार झालेल्या लसिंमध्ये कुठलीही लस 100% सुरक्षित नाही. गेली पन्नास वर्षे ज्या लसी बालकांना नियमित दिल्या जात आहेत, त्यांच्यापासूनही अल्पप्रमाणात कधी ना कधी धोके उद्भवलेले होतेच.

आता सध्याच्या लसीला जी आपात्कालीन मान्यता दिली गेली यातील तत्त्व समजून घेऊ. पश्चिमी देशांमध्ये साथ फोफावतेच आहे आणि दिवसागणिक होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय आणि काही ठिकाणी तर भयावह आहे .
आता जेव्हा समितीपुढे हा प्रश्न येतो तेव्हा तिला दोन बाजू तराजूत तोलाव्या लागतात. एका बाजूला दररोज डोळ्यासमोर दिसणारे खूप मृत्यू, तर दुसर्‍या बाजूला या लसीमुळे होऊ शकणाऱ्या धोक्यांचे अत्यल्प प्रमाण ( उदाहरणार्थ, दहा हजारात दोघांना ऍलर्जिक प्रक्रिया झाली, क्वचित प्रसंगी १० लाखात एखादा मृत्यूदेखील होऊ शकतो).

कुठल्याही उत्पादकाने किंवा विज्ञानाने हा धोका नाकारलेला नाही. आता आज ही दोन्ही पारडी बघितली असता जबाबदार समितीला “आत्ताचे होणारे मृत्यु पहिले थांबले पाहिजेत”, याच मुद्द्याला प्राधान्य द्यावे लागते आणि दुसऱ्या पारड्याकडे काहीसे दुर्लक्ष करावे लागते. त्याला नाईलाज असतो.

म्हणूनच तीव्र अलर्जी असणाऱ्यांनी लस घेऊ नये, या सूचनांसह तिकडे लसीकरण चालू झालेले आहे.

सर, भारतात महासाथ संपल्यासारखेच वाटते आहे. लागण झालेल्या व मृतांची आकडेवारी कमी होत आहे. जनजीवन नवीन वर्षात सुरळीत होईल असे वाटते, बरोबर काय? पण एका देशात पँडेमिक संपली असे जाहीर करता येते का? का भारताशी ज्या ज्या देशातून ये-जा चालू आहे तिथेही आकडेवारी कमी होणे गरजेचे आहे?
अमेरिकेत मात्र अजून एप्रिल पर्यंत प्रोजेक्शनस वाढीचीच आहेत.

सिमंतीनी,
भारताशी ज्या ज्या देशातून ये-जा चालू आहे तिथेही आकडेवारी कमी होणे गरजेचे आहे? >>>

अर्थात ते गरजेचे आहे !
मध्यंतरी अमेरिकेत ५ आठवड्यांची टाळेबंदी राष्ट्रीय पातळीवर ठेवायची का याबद्दलची काही चर्चा वाचनात आली .तेव्हा काही तज्ञ म्हणाले, की फक्त एका देशात बंदी करून उपयोग होत नाही. जर हवाई वाहतूक सुरू राहणार असेल, तर मग रोगाची देवाणघेवाण होतेच. एकाच वेळी टाळेबंदी जागतिक केली तरच फायदा होतो ( अर्थात अर्थव्यवस्थेची किंमत देऊन).
तेव्हा एक देश मुक्त झाला म्हणजे बाकीच्यानी निश्वास टाकावा असे म्हणता येणार नाही.

कुठलाही ( विशेषतः ओक्युपेशनल) हझर्ड 4 मार्गानि हाताळला जातो

1. पर्सनल प्रोटेक्शन - उदा फेस शिल्ड , मास्क
2. एनवारमेंटल - उदा स्वछता राखणे , हवेशीर खिडक्या
3. इंजिनियरिंगमध्ये बदल - लिफ्ट बंद ठेवून जिना वापरणे
4. लीगल मार्ग - विमान बंदी , मास्क नसल्यास दंड करणे

हे चारही एकत्र करावे लागतात

कोविड संदर्भात वरील एकेक उदाहरणे दिली आहेत

अमेरिका व कॅनडात फायझरच्या लसीने लसीकरण सुरू. अमेरिकेतील पहिला डोस लिंडसे या नर्सबाईंना तर कॅनडातील पहिला एका सामाजिक कार्यकर्तीला देण्यात आला.

https://www.businesstoday.in/current/world/victory-day-for-science-us-ca...

फायझर लसीच्या साठवणुकीसाठी उणे ७० तापमान लागते आणि त्यासाठी ‘कोरडा बर्फ’ खूप प्रमाणात लागतो. ही एक वेगळी जोखीम असते. हा बर्फ कार्बनडायऑकसाइड वायू घट्ट करून तयार होतो. याचा मोठा साठा करता येत नाही कारण तो काही दिवसांतच पुन्हा वायुरूप होतो.

त्याची हाताळणी करणाऱ्यांना खूप काळजी घ्यावी लागते- एक प्रकारचे वेगळे “पीपीइ’ घालावे लागते. तो नाकाद्वारे हुंगला गेल्यास त्रास होतो. त्याची विमानातून वाहतूक ही पण एक जोखीम असते.

सध्या असा बर्फनिर्मिती करणाऱ्या उद्योगांवरही एकदम मोठा पुरवठ्याचा ताण आलेला आहे.

आजच हि नवीन बातमी - भारतात लसीकरणासाठी लोकांनी Co-WIN या App वर सेल्फ रजिस्टर करायचे आहे. ते App काही सापडले नाही प्ले स्टोर वर
बातमीचा दुवा - https://www.thebetterindia.com/244808/self-register-for-covid-19-vaccine...

एमक्युर ची मुंबई मधली सिस्टर कंपनी सध्या ट्रायल्स करते आहे ना?
परवा व्हॉट्सअप वर एकीने लिंक पाठवली होती.उत्सुक स्वयंसेवक नाव नोंदवू शकतात.
https://m.economictimes.com/industry/healthcare/biotech/pharmaceuticals/...

ठराविक प्रमाणात समाजाचे लसीकरण झाले, की तोपर्यंत साथीचे प्रमाण कमी होऊ लागणार आहे आणि न घेतलेल्या लोकांनाही अप्रत्यक्ष फायदा होईल. >> म्हणजे काय? न घेतलेल्या लोकांनाही अप्रत्यक्ष फायदा कसा होईल? याबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल.
मी तर वाचले होते की लसी मुळे फक्त आजाराची लक्षणे जाणवणे कमी होईल, पण लस घेतलेला माणूसही आजार पसरवू शकेल.

सोहा,
चांगला प्रश्न.

सध्या कोणाही बाधितापासून (अगदी लक्षणविरहित देखील) अन्य कोणालाही रोगाचा प्रसार चालू आहे.

समजा, लसीकरण चालू केले >>काही काळाने (लगेच नाही) लस दिलेल्या लोकांना या आजारापासून संरक्षण मिळते. >> त्यामुळे त्यांना नव्याने आजार होत नाही . >> म्हणून ते दुसऱ्याला पसरवण्याचा प्रश्न उद्भवत नाही .>>म्हणजेच साथ आटोक्यात येते. >> लस न घेतलेल्या लोकांनाही भविष्यात अप्रत्यक्ष फायदा मिळतो.

सध्याच्या आजाराच्या बाबतीत साधारण 60 टक्के लोकांचे लसीकरण केले तर संपूर्ण समाजाला संरक्षण मिळेल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

आयुर्वेद व होमिओपॅथी डॉक्टरनी कोविड बरा करतो अशा जाहिराती करू नयेत असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
https://www.barandbench.com/news/ayush-doctors-cannot-prescribe-advertis...

अमेरिकेत फायझरच्या मागोमाग आपात्कालीन मान्यता मिळालेली ही दुसरी लस :

moderna_covid_vaccine_800x450.jpg

या खेपेस मात्र २०- ० असे होकारात्मक मतदान झालेले आहे.

UK पाठोपाठ आता दक्षिण आफ्रिकेत पण वायरसचा नवीन स्ट्रेन सापडला. आशेचा नवनवीन स्ट्रेन सापडत राहिले तर प्रत्येक वेळी लाशीला upgrade करत राहावे लागणार का? हे इतर आजारा बाबत घडले आहे का की एका वर्षातच एवढे mutations?

Pages