कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण

Submitted by कुमार१ on 7 December, 2020 - 07:30

या विषयाचे आधीचे संदर्भ :

१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)

२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)

३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य (https://www.maayboli.com/node/75809)

४. ( पूरक विषय) : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन (https://www.maayboli.com/node/76797) )

मागील चर्चेत आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
………………………………………..

करोना सार्स-२ या दुष्ट विषाणूने मानवजातीवर हल्ला केल्याला आता एक वर्ष झाले. त्यातून उदभवला कोविड१९ हा आजार. त्याची साथ आली आणि तिची व्याप्ती वाढत ती महासाथ झाली. त्यातून खूप लोक आजारी पडले. काहींचा आजार सौम्य राहिला तर काहींचा गंभीर होऊन ते मृत्युमुखी देखील पडले. महासाथ आटोक्यात आणण्यासाठी जगातील बहुतेक देशांना टाळेबंदीसारखे कठोर उपाय अमलात आणावे लागले. त्यातून अर्थव्यवस्थेची प्रचंड हानी झाली. अनेकांचे रोजगार बुडाल्याने सामाजिक मनस्वास्थ्य हरवले. पुढे काही देशांत आजाराचे प्रमाण कमी झाले आणि आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले. पण अन्य काहींत प्रमाण पुन्हा एकदा वाढल्याने ‘दुसरी लाट’ निर्माण झाली. या आजाराच्या वर्षपूर्ती निमित्ताने गेल्या वर्षातील त्यासंबंधीच्या ठळक घडामोडींचा हा मागोवा :

डिसेंबर 2019 :
चीनच्या वुहान प्रांतात न्युमोनिया या आजाराचे काही रुग्ण आढळले आणि त्याचे कारण अज्ञात होते.
* 31 डिसेंबरला या नव्या आजाराची WHOच्या दप्तरी नोंद झाली. करोना-सार्स २ हा विषाणू तर कोविड-१९ हा त्याचा आजार, अशी अधिकृत नावे दिली गेली.

जानेवारी 2020 :
* या आजाराचे RT-PCR या चाचणीने निदान झालेला पहिला रुग्ण अमेरिकेत आढळला.
* हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो हे स्पष्ट झाले.
* WHOने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली.

फेब्रुवारी :
बहुतेक देशात आंतरराष्ट्रीय विमानसेवांवर निर्बंध. परदेशातून आलेल्या व्यक्तीस 14 दिवसांचे विलगीकरण लागू.

मार्च :

* 11 मार्च रोजी WHO कडून कोविडची महासाथ जाहीर.
* HCQ या पारंपरिक औषधाचा वापर सुरू.
* संसर्ग साखळी रोखण्यासाठी बऱ्याच देशात टाळेबंदी जाहीर.
* भारतीय रेल्वेच्या १६७ वर्षांच्या इतिहासात (संप वगळता) प्रथमच प्रवासी सेवा काही काळ पूर्ण बंद.

एप्रिल-मे :

* Remdesivir औषधाला तातडीच्या उपचारासाठी मान्यता.
* रोगविरोधी लसनिर्मितीचे सूतोवाच.
* अमेरिकेतील मृत्यूंची संख्या एक लाखांवर पोचली

जुलै :
हा आजार हवेतील सूक्ष्मकणांच्याद्वाराही पसरत असल्याचे WHOचे निवेदन. तसेच बाधित पण लक्षणविरहीत लोकांकडूनही त्याचा प्रसार होत असल्याचे निवेदन.

ऑगस्ट :
बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातून काढलेल्या रक्तद्रवाच्या उपचारास मान्यता.

सप्टेंबर :
जागतिक कोविडमृत्यूंचा आकडा १० लाखांवर पोचला.

ऑक्टोबर
:
* Remdesivir ला अमेरिकी औषध प्रशासनाकडून अधिकृत औषधाची मान्यता (पण पुढे याबाबत WHOने नकारात्मक शेरा दिला).
• भारतात कोविडमृत्यूंचा आकडा १ लाखावर पोचला.

नोव्हेंबर : दुहेरी अँटीबॉडी उपचारास तातडीच्या वापरासाठी मान्यता.

डिसेंबर २०२० :
• काही लसी प्रयोगसिद्ध होऊन मान्यताप्राप्त. वितरणास तयार. चीनमध्ये लाखो लोकांना त्यांची लस दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध. रशियाने पण सुरवात केली. इंग्लंड ८ डिसेंबरला लसीकरण सुरु करण्याच्या तयारीत.
• आज अखेरीस या आजारावर निर्विवाद असे प्रयोगसिद्ध रामबाण औषध उपलब्ध नाही. त्यामुळे रोगप्रतिबंधावर अधिक लक्ष केंद्रित.
...............

समाजात या निव्वळ नैसर्गिक आजारातून पुरेशी सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे लसीकरणाची कल्पना पुढे आली. वर उल्लेख केल्याप्रमाणे संबंधित लस नव्याने निर्माण करून त्याचे काहीसे घाईतच प्रयोग केले गेलेत. लसीच्या अनेक उत्पादनांपैकी काही आता प्रयोगसिद्ध होऊन वापरासाठी तयार आहेत. लस देताना अर्थातच सामाजिक प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. ती सर्व नागरिकांना द्यायची की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. RNA तंत्रज्ञानावर आधारित लसी या नव्यानेच निर्माण केलेल्या आहेत. त्यांची उपयुक्तता आणि दुष्परिणाम अनुभवातून समजतील. लसीकरणातून महासाथ कशी आटोक्यात येते हे यथावकाश समजेल. आपण तसे स्वप्न बघावे अशी WHOने इच्छा व्यक्त केली आहे !

लसीसंबंधी आणि संबंधित घडामोडीबाबाबत चर्चा करण्यासाठी हा नवा धागा.
एव्हाना या आजारावर या धाग्यासह ५ धागे निर्माण झालेले आहेत. आता हा आजार लवकरात लवकर सामान्य होऊन आटोक्यात येवो ही इच्छा. जेव्हा तो सामान्य सर्दीपडशाप्रमाणे समाजात दखलपात्र राहणार नाही, तेव्हा अशा चर्चाधाग्यांचे प्रयोजनही संपेल. तसे लवकरात लवकर होवो आणि हे सर्व धागे इ-रद्दीत जावोत हीच आंतरिक इच्छा !
.............................................................................
चित्र जालावरुन साभार !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हीरा,
हरकत नाही; तरी पण फिजिशियनचा सल्ला घ्या.
काहींना सांधेदुखीसह सौम्य कोविड होऊ शकतो.

सरकारी फॉर्म आहे
त्यावर 20 कलमे आहेत , 20 रोग आहेत
जो रोग आहे त्याला टिक करून तुमच्या डॉकटरचा सही शिक्का लागतो

Screenshot_2021-03-15-22-24-38-481_cn.wps_.moffice_eng.png

पण तुमचे दोन्ही रोग ह्या यादीत दिसतात का पहा,

पण वय 71 असेल तर मला वाटते नुसते आधार कार्डवर भागेल, हे सर्टीफिकेट लागणार नाही, तरी कन्फर्म करा

ज्यांचे वय कमी आहे व हे 20 कलम लागू होतात , त्यांना सर्टीफिकेट लागते

६०+ वयाच्या व्यक्तींना नाही लागत हे सर्टीफिकेट.
हे सर्टिफिकेट ४५ ते ६० वर्षे वयाच्या व्यक्तींना लागते. त्यात या व्यक्तीस कुठला आजार आहे हे टिक करावे लागते. तो आजार आहे म्हणुन ही व्यक्ती ६० पेक्षा कमी वय असले तरी लस घेण्यास पात्र आहे या करता.

हे आजार आहेत, ते आटोक्यात आहेत तरी लस् देण्यास हरकत नाही या करता नाही.

उपयुक्त पूरक माहितीबद्दल वरील सर्वांचे आभार.
.......
दीर्घकालीन कोविड
काही रुग्णांच्या बाबतीत कोविड झाल्यानंतर तब्बल एक वर्ष उलटले तरी अद्याप ते तंदुरुस्त नसल्याचे दिसते. अशांमध्ये प्रामुख्याने खालील त्रास दिसतात :

• शीण/दमणूक
• धाप लागणे
• वैचारिक धूसरता/ गोंधळ
• निद्रानाश
• नैराश्य
• हृदय किंवा फुप्फुसविकाराची काही लक्षणे.

हा आजार काहींत दीर्घकालीन का राहतो यावर संशोधन चालू आहे. दीर्घकालीन रुग्णांमध्ये खालील शक्यता असू शकतील :

१. विषाणू शरीरात राहतो परंतु तो चाचणीद्वारा सापडण्याइतका नसतो. मात्र तो इजा करीत राहतो
२. विषाणूच्या हल्ल्यादरम्यान शरीराची प्रतिकार यंत्रणा प्रमाणाबाहेर चेतवली जाते. पुढे ती पूर्वपदावर येतच नाही >>>> इजा
३. टिकून राहिलेले विषाणू नंतर रक्तवाहिन्यांवर हल्ला करतात >>> गुठळ्या >>> इन्द्रियाना इजा.

वय ४५ च्या आतल्या व्यक्तीना पण आजकाल बीपी, शुगर किंवा हृद्याशी संबधीत आजार असतात.
अशा लोकांना कोवीड लस मिळु शकते आहे का ? डॉक्टर सर्टीफीकेट दिले तर ?
गेल्या वर्षी कोवीड होउन गेला तेव्हा बराच सिरीअस होता. हॉस्पिटलायजेशन, रेमडेसिवीर चा डोस घ्यावा लगला अशा लोकांना आता आलेली लस मिळु शकेल का.? वय ४५ च्या आत आहे.
कोवीड होउन गेला की शरीरात असलेल्या अँटीबॉडीज किती महिने संरक्षण देउ शकतात ?

कोवीड होउन गेला की शरीरात असलेल्या अँटीबॉडीज किती महिने संरक्षण देउ शकतात ?
>>>>
सुमारे आठ महिने असे सर्वसाधारण उत्तर आहे.
परंतु, आजाराच्या तीव्रता आणि कालावधीनुसार यात फरक पडू शकतो.

स्मिता,

इथल्या वृत्तानुसार (https://zeenews.india.com/india/people-with-these-health-conditions-will...) सध्या १ मार्च पासून भारतात लसीकरणाचा तिसरा टप्पा चालू झाला आहे. त्यात ठराविक 20 पैकी आजार असलेल्यांना प्राधान्य आहे.

45 वयाच्या आतील सामान्य लोकांसाठी पाचवा टप्पा आहे असे दिसते. ज्या भागांमध्ये कोविड पुन्हा तीव्र झाला आहे तिथले प्रशासन लस १८ वर्षावरील सर्वांना मिळण्यासाठी केंद्राला विनंती करणार आहे, असेही वाचनात आले.

माझ्या नवऱ्याने vaccination घेऊन १४ दिवस झाले ६ मार्च ला तेव्हा पासून त्याला खूप झोप येणे, घसा दुखणे, सुखा खोकला येणे असं चालू झालं हे सगळं पहिल्या डोस मुळे झालं असेल का?
म्हणजे vaccination मुळे COVID होऊ शकतो का?

सध्या ज्या लसी लोकांना दिल्या जात आहेत त्यामध्ये करोनाचा जिवंत विषाणू वापरलेला नाही. त्यामुळे लस टोचल्यानंतर त्यामुळे संबंधित आजार होत नाही.

लस दिल्यानंतर शरीरप्रतिकार यंत्रणा कामाला लागते. त्याचाच परिणाम म्हणून ताप आणि अन्य काही सौम्य लक्षणे ( घसा दुखणे, सांधे दुखणे इत्यादी) दिसू शकतात. ती अल्पकालीन राहतील. त्याने घाबरून जायचे कारण नाही

Thank you for the quick reply
आम्हाला डॉक्टर ने Covid टेस्ट करायला सांगितली आहे म्हुणुन थोडा टेन्शन आलं
अच्छा म्हणजे आधी विषाणू सोडतात आणि नंतर त्याचा औषध देतात का सेकंड डोस मध्ये?

कुमार१ , धन्यवाद..पुण्यात सगळ्यांना लवकर लस मिळो असे वाटते.
कोवीड लसीकरण युद्धपातळीवर राबवण्यात काय काय अडचणी आहे. ?
जस्तीत जास्त हॉस्पिटल्स ना परमिशन दिली तर लसीकरण वेग वाढेल ना.
लसींचे उत्पादन करायला मर्यादा असते का ?

सुमारे आठ महिने असे सर्वसाधारण उत्तर आहे.
परंतु, आजाराच्या तीव्रता आणि कालावधीनुसार यात फरक पडू शकतो. >
ऑक्टोबर २०२० महिन्यात कोवीड झाला होता तो बर्‍यापैकी तीव्र होता. सी टी स्कॅन मधे स्कोअर १० आला होता. म्हणजे मेडीयम असे डॉकटरांनी सांगितले.रेमीडीसिवीर घ्यावी लागली होती. तर आता अजुन ८ महिने म्हणजे मे महिन्या पर्यंत संरक्षण मिळेल असे गृहीत धरावे का ?
मास्क, सॅनिटायजर हे चालु आहेच.
पण लस लवकरात लवकर घ्यावी अशी इच्छा आहे.

डोडो, नाही.
गैरसमज नको.

दोन्ही डोसमध्ये या विषाणूचे प्रथिन एनकोड करणारे तंत्र असते. यात जनुकीय अभियांत्रिकीचा वापर केलेला असतो.
२ डोस देण्याचे कारण म्हणजे फक्त एकाने पुरेशी प्रतिकारशक्ती निर्माण होत नाही.

(परदेशात अन्य काही लसी विकसित होत आहेत, ज्यांचा एक डोस पुरेसा असणार आहे).

स्मिता,
तर आता अजुन ८ महिने म्हणजे मे महिन्या पर्यंत संरक्षण मिळेल असे गृहीत धरावे का ? >>>
साधारण तुम्ही आजारातून लक्षणविरहित झाल्यानंतर ६-८ महिने पकडा.

या प्रश्नाचा पाठपुरावा अजून १-२ वर्षे केल्यावरच समाधानकारक उत्तर मिळेल. सध्या टप्प्याटप्प्याने संशोधन पुढे येत आहे.

दोन्ही डोसमध्ये या विषाणूचे प्रथिन एनकोड करणारे तंत्र असते. यात जनुकीय अभियांत्रिकीचा वापर केलेला असतो.
२ डोस देण्याचे कारण म्हणजे फक्त एकाने पुरेशी प्रतिकारशक्ती निर्माण होत नाही.

(परदेशात अन्य काही लसी विकसित होत आहेत, ज्यांचा एक डोस पुरेसा असणार आहे).>>>Thank you for clarification

* माझ्या नवऱ्याने vaccination घेऊन १४ दिवस झाले ६ मार्च ला तेव्हा पासून त्याला खूप झोप येणे, घसा दुखणे, सुखा खोकला येणे असं चालू झालं हे सगळं पहिल्या डोस मुळे झालं असेल का?
>>>

यासंबंधी मला समाजात अनेक गैरसमज पसरलेले दिसले. म्हणून काही खुलासा करतो.
एक उदाहरण घेऊ.

१. समजा, आज एखाद्याला करोनासंसर्ग झाला. अर्थातच त्याची लक्षणे दिसायला काही दिवस जातात. त्यामुळे त्याला असा संसर्ग झालाय हे कळतच नाही; तो स्वतःला निरोगी समजतो.

२. म्हणून त्याने लस घेतली. तिचा रोगप्रतिबंधक परिणाम शरीरात घडायला काही आठवडे जावे लागतात.
३. यादरम्यान शरीरात लस घेण्याआधीच शिरलेल्या विषाणूमुळे आता आजार होऊ लागतो. म्हणजेच, आता दिसणारी लक्षणे ही नैसर्गिक जंतुसंसर्गामुळे आलेली असतात; त्याचा लसीशी संबंध नसतो.

४. समजा लस घेतल्यानंतर तिची रिॲक्शन आली. जर ती फक्त इंजेक्शनच्या ठिकाणापुरतीच सूज वगैरे असेल तर ती एक दोन दिवसात जाते. मात्र जर का त्याला डोकेदुखी, स्नायूदुखी, थंडीताप असे काही होऊ लागले, तर अशा वेळेस कोविड-चाचणी केल्यावरच या प्रश्नाची उकल होते. (The only way to tell the difference between symptoms from a vaccine reaction from symptoms of COVID-19 is to be tested).

५. समजा,
चाचणी निष्कर्ष सकारात्मक आला तर हा नैसर्गिक आजार आहे.
पण जर तो नकारात्मक आला, तर संबंधित लक्षणे ही लसीची तीव्र प्रतिक्रिया असू शकते. अर्थातच डॉक्टर सारासार विचार करून ते ठरवतील.

लसींचे उत्पादन करायला मर्यादा असते का ?
>>>
RNA तंत्रावर आधारित (म्हणजे फायझर व मोडर्ना) लसींचे उत्पादन वेगाने मोठ्या प्रमाणावर करता येते. सध्या या प्रगत देशांत देत आहेत.

भारतातील लसींचे तंत्रज्ञान काहीसे वेगळे आहे. या उत्पादनाला वरील लसींच्या तुलनेत वेळ लागतो.

Got your point म्हणजे लस घेणे हे गरजेचे आहे आणि safe पण आहे
तुमच्या ४ नंबर च्या मुद्दया नुसार, लस घेतल्यावर लक्षण आली आणि टेस्ट पॉसिटीव्ह आली तर पूर्ण औषधाचा कोर्से करावा लागेल right

सध्या या प्रगत देशांत देत आहेत.>>>
मी फायझरची पहिली लस घेतली . काहीही त्रास झाला नाही. मला दुसऱ्या वेळी त्रास होण्याची शक्यता आहे का ?? किती दिवसांपर्यंत होऊ शकतो. त्रास झाला नाही म्हणून प्रशक्ती होती असे समजता येईल का ,की हे रँडम आहे. कुटुंबातील एकाने (तरुण) जॉन्सन अँड जॉन्सन ची घेतली तर दुष्परिणाम झाले , ताप अंगदुखी वगैरे. ही लस एकच देत आहेत.
ही सोबत आलेली fact sheet.. कदाचित कुणाचे शंकानिरसन होईल म्हणून जोडत आहे. तसं हे तुम्ही आधी स्पष्ट केलंही असेल. Screenshot_20210316-104011_Gallery.jpgScreenshot_20210316-103957_Gallery.jpg

अस्मिता,
. मला दुसऱ्या वेळी त्रास होण्याची शक्यता आहे का ??

तसे समजू नये ! जानेवारी 2021 अखेरची अमेरिकेतली फायजर लसीबद्दलची माहिती अशी आहे :
ज्यांना त्रास झाला तो अधिकतर दुसऱ्या डोस नंतरच झाला. त्यामध्ये थकवा, डोके व स्नायू दुखी हे होते. सुमारे पंचवीस टक्के लोकांना थंडी वाजून तापही आला.

माहितीपत्रक छान, धन्यवाद !

Pages