हात, जंतू, पाणी आणि साबण

Submitted by कुमार१ on 15 March, 2020 - 22:46

‘करोना’च्या जागतिक साथीमुळे वैयक्तिक स्वच्छतेबाबत बरीच चर्चा सर्वत्र होत आहे. रोगप्रसार कमी होण्याचे दृष्टीने त्याचे महत्व नक्कीच आहे. क्षणभर आपण ही साथ बाजूला ठेवू. कुठलाही संसर्गजन्य रोगप्रसार टाळण्याचे दृष्टीने वैयक्तिक स्वच्छता ही कायम खूप महत्वाची आहे. त्यातील एकाच महत्वाच्या पैलूकडे या लेखाद्वारे लक्ष वेधत आहे आणि तो म्हणजे आपल्या हातांची स्वच्छता.

आपले हात शास्त्रीयदृष्ट्या स्वच्छ कसे करावेत यावर काही मूलभूत माहिती देत आहे. वरवर पाहता हा विषय सामान्यज्ञान किंवा शालेय पातळीवरचा वाटेल. पण वास्तव तसे नाही. काही अपवाद वगळता बहुसंख्य लोक ही क्रिया उरकून टाकल्यासारखी करतात. हात धुण्याची महत्वाची कृती ही कायम व्यवस्थित व्हावी या उद्देशाने काही सूचना करतो. आपणही आपापले अनुभव लिहा. ही चर्चा सर्वांसाठी आरोग्यदायी व्हावी ही इच्छा.
..........

१. हात धुण्यासाठीचे पाणी स्वच्छ आणि वाहते असावे. ते गार किंवा गरम याने फरक पडत नाही. फक्त हात जर तेलकट असतील तर गरम असल्याचा फायदा होतो.
२. धुण्याची क्रिया किमान २० सेकंद झाली पाहिजे. जरा आजूबाजूस निरीक्षण केल्यास असे दिसेल, की बरेच लोक हे काम ३-४ सेकंदात उरकतात, अगदी पाटी टाकल्यासारखे.

३. हात धुताना ते खरखरून घासले पाहिजेत.
४. बहुतेक लोक फक्त हाताचा तळवा वरवर धुतात. हात नीट धुताना तळहाताची खालची बाजू आणि हातांची मागची बाजू ही देखील नीट धुतली पाहिजे.

५. साबणाचा वापर : हा या प्रक्रियेतील कळीचा मुद्दा आहे. आता साबणाच्या वापराने काय फायदे होतात ते पाहू.

इथे एक मुद्दा स्पष्ट करतो. साबणाचा एक गुणधर्म म्हणजे तो surfactant असतो. आपण हातांनी विविध कामे करताना त्यांच्यावर कमी अधिक प्रमाणात मेदाचा थर जमा होतो. नुसत्या पाण्याने हात धुताना हा थर सहज निघून जात नाही. याचे कारण म्हणजे पाणी आणि मेद ही दोन एकमेकात न मिसळणारी माध्यमे आहेत. त्या दोघांच्या संपर्कात साबण सोडला की मग मात्र ‘इमल्शन’ तयार होते आणि परिणामी त्वचेवरील मेदाचा थर पाण्याबरोबर छान निघून जातो. आता हाताला लागून आलेले जीवजंतू आणि साबण यांचा संबंध पाहू. करोना आणि अन्य काही जंतू यांच्या पेशीभोवती मेदाचे आवरण असते. जेव्हा आपण साबणाने हात धुतो त्यावेळेस हे आवरण तोडले जाते. साबणाचा वापर करीत हात खसाखसा चोळले की हातावरचे काही जंतू फुटून जातात. त्वचेला साबण लावल्याने ती निसरडी होते आणि त्यामुळे तिथले जंतू पाण्याबरोबर वाहून जातात. साबणवापराचे असे हे फायदे आहेत.

६. आता कुठल्या प्रकारचा साबण वापरावा, हा पुढचा मुद्दा. साबणाचे साधारणपणे उपलब्ध असलेले दोन प्रकार म्हणजे वडी आणि द्रवसाबण. हे दोन्ही प्रकार वापरून काही संशोधन अभ्यास झालेले आहेत. त्याबद्दल आता पाहू.
आपल्याकडे वडीचा वापर खूप होतो. अनेक जण लागोपाठ एकच वडी वापरतात तेव्हा ती सतत ओली राहते. त्यामुळे तिच्यावर धुणाऱ्याच्या हातातून आलेले जंतू राहू शकतात. मात्र हे जंतू पुढील हात धुणाऱ्याला ‘हस्तांतरित’ होत नाहीत असे आढळले आहे. त्यामुळे वडीबद्दल अकारण गैरसमज नको. फक्त एक काळजी सर्वांनी घ्यावी. एखाद्याने हात धुतल्यावर ती वडी पुरेशी कोरडी व्हावी. मग दुसऱ्याने तिचा वापर करावा. आपण वडीला हात लावण्यापूर्वी जर ती बुळबुळीत दिसली तर ती आधी पाण्याखाली धुवावी आणि मगच वापरावी.

द्रवसाबणाच्या वापराने अर्थातच वडीच्या तोट्यापासून सुटका होते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी त्याचा वापर प्राधान्याने व्हावा.

७. हात धुवायला साबण की सॅनिटायझर , हा सध्याचा बहुचर्चित मुद्दा आहे. सॅनिटायझरमध्ये दोन प्रकार असतात – अल्कोहोलयुक्त आणि विरहित. अल्कोहोलयुक्त प्रकाराला जंतुनाशक गुणधर्म आहे. त्यासाठी त्यातील अल्कोहोलचे प्रमाण कमीत कमी ६२% असणे गरजेचे आहे.

सर्वसाधारण जनतेसाठी साबणाने नीट हात धुणे हे पुरेसे आणि योग्य आहे. संसर्गजन्य रुग्णाशी जे लोक थेट संबंधित आहेत त्यांच्यासाठी सॅनिटायझरची शिफारस केली आहे. तसेच ज्या परिस्थितीत वाहते पाणी, साबण आणि हात धुण्याची जागा उपलब्ध नसतात, त्या वेळीही ते वापरावे.

८. हात धुऊन झाल्यावर ते कशाने पुसावेत? हाही एक महत्वाचा मुद्दा.

धुतलेले हात कोरडे करण्यासाठी दोन पर्याय आहेत – कापड व कागदी रुमाल. घरगुती वापरासाठी कापड योग्य वाटते. असे हात पुसायचे कापड रोज स्व‍च्छ धुवून उन्हात वाळवलेले असावे. ही काळजी बऱ्याच घरांत घेतली जात नाही.
कागदी रुमालाने हात कोरडे करण्यात अजून एक फायदा आहे. कागद त्वचेवर अगदी घासून फिरवता येतो आणि त्यामुळे पूर्ण कोरडा होतो. घासण्याच्या क्रियेने हातावरील उरलेसुरले जंतू निघून जातात. हे पाहता सार्वजनिक ठिकाणी कागदी रुमालाचा वापर योग्य वाटतो.

सारांश: हात कशानेही पुसले तरी ते अगदी कोरडे करणे महत्वाचे.

९. कोणत्या परिस्थितीत हात नीट धुणे अत्यावश्यक आहे? शौचालयातून बाहेर आल्यावर, स्वयंपाक करण्यापूर्वी आणि जेवणापूर्वी हात धुणे या मूलभूत गोष्टी आपण जाणतो आणि पाळतो. या व्यतिरिक्त काही मुद्द्यांचा उल्लेख आवश्यक वाटतो.

a. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णास भेटण्याआधी आणि नंतर.
b. बाळांचे लंगोट बदलल्यानंतर
c. आपल्या तोंडापुढे हात धरून शिंकल्या वा खोकल्यानंतर
d. पाळीव प्राण्यांना स्पर्श केल्यानंतर
e. कचरा हाताळल्यानंतर.

जेवणापूर्वी हात धुण्याची सवय बहुतेक घरांत बहुतांश वेळा पाळली जाते. परंतु सार्वजनिक ठिकाणी मात्र बरेच लोक याचा आळस करताना दिसतात. जरा मंगल कार्यालये, उपाहारगृहे आणि प्रवासातील निरीक्षण करून पाहा. हे चित्र बिलकूल समाधानकारक नाही. बफेसाठी रांग लावण्यापूर्वी हात धुवून येणारे लोक अत्यल्प आहेत. काहींना या कृतीचा जाम आळस आहे तर काहींना त्यात कमीपणाही वाटतो ! “इथे काय चमच्यानेच तर खायचे आहे”, असा युक्तिवाद करणारेही आढळतात. पण जेवताना रोटी तोडणे आणि लिंबू पिळणे ही कामे तरी आपण हातानेच करतो, याचा त्यांना विसर पडतो.
प्रवासातील खाण्यादरम्यान तर हातांची स्वच्छंता हा विषयच अनेकांनी धाब्यावर बसवलेला दिसतो. यामध्ये जाणीवपूर्वक सुधारणा व्हायला हवी.

१०. सध्याच्या युगात आपण दिवसभर अनेकवेळा मोबाईल आणि कम्प्युटर हाताळतो. त्यामुळे मोबाईलचा पडदा आणि कम्प्युटरचा कीबोर्ड यांच्यावरही अगणित जंतू जमा होतात. या उपकरणांची योग्य ती स्व‍च्छता नियमित करावी. त्यात हलगर्जीपणा करू नये.

“हातांची नियमित स्व‍च्छता राखल्यास संसर्गजन्य रोग पसरणारच नाहीत का?” असा युक्तिवाद कधीकधी केला जातो. कुठल्याही रोगाचा १००% प्रतिबंध शक्य नाही हे बरोबर. परंतु काही मूलभूत स्वच्छता पाळल्यास रोगप्रसार रोखला जातो हे निःसंशय. म्हणूनच सामाजिक आरोग्याचे दृष्टीकोणातून हातांची स्व‍च्छता हा विषय अत्यंत महत्वाचा आहे.
…….

समाजात काही भीषण रोगांची साथ आल्यानंतर वैयक्तिक स्व‍च्छतेचे मुद्दे खूप चर्चिले जातात. कालांतराने आपल्याला या सगळ्याचा विसर पडतो. व्यवस्थित हात धुण्याची सवय ही खरे तर कायमस्वरूपीच हवी. ही साधी गोष्ट वारंवार सांगायची आणि चर्चेला घ्यायची वेळ यायला नको. दरवर्षी १५ ऑक्टोबर हा ‘जागतिक हातस्वच्छता दिवस’ म्हणून पाळला जातो. वास्तविक असा ‘दिन’ ठेवण्याची वेळ यावी हे खेदजनक आहे. सध्याच्या जागतिक साथीच्या निमित्ताने जगातील सर्वच नागरिक ही आरोग्यविषयक मूलभूत गोष्ट कायम आचरणात आणतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.
*********************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरवर बघायला गेलं तर हात धुणे गोष्ट छोटी आहे पण खरंच आपण किती वेळा आणि कशा प्रकारे हात धुतो ते महत्वाचं आहे. छान लेख.

सारखे हात धुणे ओसीडी मधे मोडते.

ओसीडी मध्ये आता हात धुतल्यावर परत ५-१० मिनिटांनी धूवावेसे वाटणे आहे आणि तो धुतला नाही तर रुग्णाला मानसिक तणाव येतो.
हा तणाव दूर करण्यासाठी त्याला परत परत हात धुणे आवश्यक होते. मग तो अगदी हातावर हात धरून बसला असला तरी.

आपल्याला हा रोग आहे हेही त्याला माहिती असते पण हात धुतले नाहीत तर येणारी अस्वस्थता टाळण्यासाठी बिचारा परत परत हात धुत राहतो इतके कि त्याचा त्याच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होऊ लागतो.

आणि सामान्य माणसाने परत परत हात धुतले तरी त्याला ओसीडी होणार नाही.

ओसीडी मध्ये मेंदूत केमिकल लोच्या असतो आणि तो औषधाशिवाय ठीक होत नाही.

डॉ कुमार

अतिशय उचित वेळेस उचित लेख उत्तम तर्हेने लिहिला आहे

आपले मनापासून अभिनंदन

प्रकाश, सहमत.

डॉ, सुबोध , धन्यवाद.
तुमचेही करोनाच्या समयोचित लेखाबद्दल अभिनंदन.

हस्तप्रक्षालन जिव्हाळ्याचा विषय ! तुम्ही नेटके लिहिले आहे.

२-३ सेकंदात हात धुणे आटोपणारे फार मोठ्या प्रमाणात आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री काजोल एका NGO च्या माध्यमातून हात कसे धुवावे याबद्दल शाळकरी मुलांमध्ये जनजागृती करते. पुन्हा पुन्हा प्रात्यक्षिक करून दाखवत ही मुले अन्य लोकांना 'हात धुणे' शिकवतात !

सतत डोळे, नाक आणि तोंडात (स्वतःच्या) बोट घालायची सवय असलेल्या सहकाऱ्यांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला की मी बिथरतो Happy त्यामुळे थोडक्यात सांगायचे तर :-
IMG_2138.jpg

डॉक्टर, अगदी नेहमीच्या गोष्टीची छान शास्त्रीय माहिती.
साबणाची माहिती उपयुक्त. एक विचारतो.
काही साबण कंपन्या ‘जंतूनाशक साबण’ अशी जाहिरात करतात ते कितपत बरोबर असते?.

सुंदर लेख... आपल्याकडे बेसिक हायजीन खूप दुर्लक्षित आहे.
अल्कोहोल IPA % ६० - ९५ असे वाचल्याचे आठवते. घरी sanitizer बनविण्याच्या बाबत पुढील व्हिडोओत हे प्रमाण ८०-९५ % सांगितले.
https://youtu.be/O3IFhDeckiA
एका लेखात अल्कोहोल आणि अलोवेरा २:१ प्रमाण असावे असे वाचले.
आता अल्कोहोल ६०% म्हणजे ६०% अल्कोहोल व ४०% अलोवेरा का ६०% IPA ?
व्हिडोओत IPA 80-95% आहे.

साद,
चांगला प्रश्न.
कुठलाही साबण “रासायनिक दृष्ट्‍या” जंतूनाशक नाही . वर लेखात लिहिल्याप्रमाणे तो हातावरचे जंतू ‘निघून जायला’ मदत करतो.
द सा,
तुमचा मुद्दा जरा वेळाने सविस्तर घेतो.
धन्यवाद !

IPA फक्त नाव झाले.
ते तुम्हाला किती concentration चे हवे ते specify करून घ्यावे. Laboratory grade IPA ९९.९% पर्यंत असू शकते.

द सा,
अल्कोहोलचे जंतुनाशक प्रमाण हा जरा घोळदार विषय आहे. माझ्याकडील वैद्यकीय संदर्भानुसार ते कमीत कमी ६२% असे आहे. पण....
यावर अनेक मतांतरे आढळतील.

मुळात आपण अल्कोहोल जंतुनाशक म्हणून कसे काम करते ते पाहू.

जंतूपेशीमध्ये काही प्रथिने असतात. त्यावर योग्य प्रमाणांत अल्कोहोल टाकल्यास त्यांचे विघटन (denaturation) होते. परिणामी जंतू मरतो. आता ही प्रक्रिया नीट होण्यास अल्कोहोल आणि पाणी हे दोन्ही सुयोग्य प्रमाणात लागतात. आपण जर अल्कोहोलचे प्रमाण ८०%चे पुढे उगाच वाढवत बसलो तर मग ही प्रक्रिया नीट होत नाही. मग जंतुनाशक गुणधर्म कमी होतो.

म्हणून माझ्या मते ...
अल्कोहोलचे प्रमाण ६० – ७०% या प्रमाणात असावे.

...रसायनतज्ञांनी अधिक भाष्य करावे.

नेहमीप्रमाणे छान लेख डॉक Happy

सॅनिटायझर बाजारातुन सगळेच संपलेत वाट्टे. एकाही ब्रँडेड कंपनिचे हँड सॅनिटायझर बाजारात मिळत नाहीये. मी आत्ताच एक छोटीसी बॉट्ल आणली १५० रुपयांचे , कंपनीचे नाव ओळखिचे नाही, अल्कोहल पण फक्त ५४% आहे. दुकानदार म्हणाला मॅडम आहे ते घ्या नाहीतर संध्याकाळपर्यंत हे पण संपेल. म्हणुन मग नाईलाजास्तवे घेतले. मी नेहमी डेटॉलचे घेते पण आता जुनी बॉटल संपत आलीये . एकाने तर सांगीतले की जर सॅनिटायझर नाही मिळाले तर सर्जीकल स्पिरीट वापरा तेही सॅनिटायझरचेच काम करेल. एकुण काय तर सगळा गोंधळ करुन ठेवलाय लोकांनी

व्ही बी, धन्यवाद
माझ्या मते तुम्ही साबण आणि पाण्याने व्यवस्थित धुणे यावर भिस्त ठेवा.
Bw

आमच्या इथे मेडिकल मधून गायब झाले आहेत.किराणा दुकानात 2 मिळाले.त्यातला एक ऑफिस हाऊसकिपिंग च्या बाईंना घरी वापरायला दिला.
घरातल्या घरात पाणी साबण आहेच.आणि या सर्व स्केअर मुळे एकंदरच बाहेर कुठे जाण्याचा उजेड आहे.त्यामुळे मिळालीय ती छोटी बाटली पुरवून वापरू लागेल तेव्हा.

मग ५४% वाल्याने तूर्त भागवून घ्या.>>>

डॉक्टर , तुम्हाला थोड्यावेळाने काही मंडळी ४२.८% उपयुक्त आहे का विचारतील! Wink

Pages