कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण

Submitted by कुमार१ on 7 December, 2020 - 07:30

या विषयाचे आधीचे संदर्भ :

१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)

२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)

३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य (https://www.maayboli.com/node/75809)

४. ( पूरक विषय) : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन (https://www.maayboli.com/node/76797) )

मागील चर्चेत आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
………………………………………..

करोना सार्स-२ या दुष्ट विषाणूने मानवजातीवर हल्ला केल्याला आता एक वर्ष झाले. त्यातून उदभवला कोविड१९ हा आजार. त्याची साथ आली आणि तिची व्याप्ती वाढत ती महासाथ झाली. त्यातून खूप लोक आजारी पडले. काहींचा आजार सौम्य राहिला तर काहींचा गंभीर होऊन ते मृत्युमुखी देखील पडले. महासाथ आटोक्यात आणण्यासाठी जगातील बहुतेक देशांना टाळेबंदीसारखे कठोर उपाय अमलात आणावे लागले. त्यातून अर्थव्यवस्थेची प्रचंड हानी झाली. अनेकांचे रोजगार बुडाल्याने सामाजिक मनस्वास्थ्य हरवले. पुढे काही देशांत आजाराचे प्रमाण कमी झाले आणि आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले. पण अन्य काहींत प्रमाण पुन्हा एकदा वाढल्याने ‘दुसरी लाट’ निर्माण झाली. या आजाराच्या वर्षपूर्ती निमित्ताने गेल्या वर्षातील त्यासंबंधीच्या ठळक घडामोडींचा हा मागोवा :

डिसेंबर 2019 :
चीनच्या वुहान प्रांतात न्युमोनिया या आजाराचे काही रुग्ण आढळले आणि त्याचे कारण अज्ञात होते.
* 31 डिसेंबरला या नव्या आजाराची WHOच्या दप्तरी नोंद झाली. करोना-सार्स २ हा विषाणू तर कोविड-१९ हा त्याचा आजार, अशी अधिकृत नावे दिली गेली.

जानेवारी 2020 :
* या आजाराचे RT-PCR या चाचणीने निदान झालेला पहिला रुग्ण अमेरिकेत आढळला.
* हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो हे स्पष्ट झाले.
* WHOने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली.

फेब्रुवारी :
बहुतेक देशात आंतरराष्ट्रीय विमानसेवांवर निर्बंध. परदेशातून आलेल्या व्यक्तीस 14 दिवसांचे विलगीकरण लागू.

मार्च :

* 11 मार्च रोजी WHO कडून कोविडची महासाथ जाहीर.
* HCQ या पारंपरिक औषधाचा वापर सुरू.
* संसर्ग साखळी रोखण्यासाठी बऱ्याच देशात टाळेबंदी जाहीर.
* भारतीय रेल्वेच्या १६७ वर्षांच्या इतिहासात (संप वगळता) प्रथमच प्रवासी सेवा काही काळ पूर्ण बंद.

एप्रिल-मे :

* Remdesivir औषधाला तातडीच्या उपचारासाठी मान्यता.
* रोगविरोधी लसनिर्मितीचे सूतोवाच.
* अमेरिकेतील मृत्यूंची संख्या एक लाखांवर पोचली

जुलै :
हा आजार हवेतील सूक्ष्मकणांच्याद्वाराही पसरत असल्याचे WHOचे निवेदन. तसेच बाधित पण लक्षणविरहीत लोकांकडूनही त्याचा प्रसार होत असल्याचे निवेदन.

ऑगस्ट :
बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातून काढलेल्या रक्तद्रवाच्या उपचारास मान्यता.

सप्टेंबर :
जागतिक कोविडमृत्यूंचा आकडा १० लाखांवर पोचला.

ऑक्टोबर
:
* Remdesivir ला अमेरिकी औषध प्रशासनाकडून अधिकृत औषधाची मान्यता (पण पुढे याबाबत WHOने नकारात्मक शेरा दिला).
• भारतात कोविडमृत्यूंचा आकडा १ लाखावर पोचला.

नोव्हेंबर : दुहेरी अँटीबॉडी उपचारास तातडीच्या वापरासाठी मान्यता.

डिसेंबर २०२० :
• काही लसी प्रयोगसिद्ध होऊन मान्यताप्राप्त. वितरणास तयार. चीनमध्ये लाखो लोकांना त्यांची लस दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध. रशियाने पण सुरवात केली. इंग्लंड ८ डिसेंबरला लसीकरण सुरु करण्याच्या तयारीत.
• आज अखेरीस या आजारावर निर्विवाद असे प्रयोगसिद्ध रामबाण औषध उपलब्ध नाही. त्यामुळे रोगप्रतिबंधावर अधिक लक्ष केंद्रित.
...............

समाजात या निव्वळ नैसर्गिक आजारातून पुरेशी सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे लसीकरणाची कल्पना पुढे आली. वर उल्लेख केल्याप्रमाणे संबंधित लस नव्याने निर्माण करून त्याचे काहीसे घाईतच प्रयोग केले गेलेत. लसीच्या अनेक उत्पादनांपैकी काही आता प्रयोगसिद्ध होऊन वापरासाठी तयार आहेत. लस देताना अर्थातच सामाजिक प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. ती सर्व नागरिकांना द्यायची की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. RNA तंत्रज्ञानावर आधारित लसी या नव्यानेच निर्माण केलेल्या आहेत. त्यांची उपयुक्तता आणि दुष्परिणाम अनुभवातून समजतील. लसीकरणातून महासाथ कशी आटोक्यात येते हे यथावकाश समजेल. आपण तसे स्वप्न बघावे अशी WHOने इच्छा व्यक्त केली आहे !

लसीसंबंधी आणि संबंधित घडामोडीबाबाबत चर्चा करण्यासाठी हा नवा धागा.
एव्हाना या आजारावर या धाग्यासह ५ धागे निर्माण झालेले आहेत. आता हा आजार लवकरात लवकर सामान्य होऊन आटोक्यात येवो ही इच्छा. जेव्हा तो सामान्य सर्दीपडशाप्रमाणे समाजात दखलपात्र राहणार नाही, तेव्हा अशा चर्चाधाग्यांचे प्रयोजनही संपेल. तसे लवकरात लवकर होवो आणि हे सर्व धागे इ-रद्दीत जावोत हीच आंतरिक इच्छा !
.............................................................................
चित्र जालावरुन साभार !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच बातमी वाचली की कोव्हीशिल्ड च्या दुसऱ्या डोसचे अंतर २८ दिवसावरून वाढवून ४५ - ६० दिवस करायचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत, कोवाक्सिन चे मात्र २८ दिवसच आहे

गेल्या दोन वर्षात वैद्यकीय कारणांसाठी पीपीइ संच, एन 95 मास्क इत्यादींच्या भरपूर वापरामुळे वैद्यकीय प्लास्टिक कचऱ्याची निर्मिती खूप झालीय. त्याची योग्य विल्हेवाट ही पण एक मोठी समस्या आहे. पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेने या कचऱ्याचे विघटन आणि पुनर्वापर यादृष्टीने एक चांगले तंत्रज्ञान शोधले आहे.

बातमी इथे
https://epaper.esakal.com/FlashClient/Client_Panel.aspx#currPage=3

अभिनंदन !

माझ्या आईबाबांचे कोविड वॅक्सिनेशन करायचे आहे . आई ८० + आणि बाबा ८५+ . ठाण्यात कुठल्या हॉस्पिटला करता येइल ? ते दोघेच रहातात.

१ एप्रिलपासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व भारतीयांना मिळणार करोनाची लस
केंद्रीय मंत्रीमंडळाचा मोठा निर्णय
https://www.loksatta.com/desh-videsh-news/cabinet-approves-vaccination-f...

>>स्वतः कसे करणार ?

चार दिवस टोचायला सिस्टर अन डॉकटरला 4 दिवसाची नोकरी देणार ?

सुया दिसपोज कशा करणार ?

कुणी रिएक्शन येऊन कम्पणीत पडला तर ?>>> टाटा मोटर्स, रिलायन्स या सारख्या अने क कॊर्पोरेट्समदध्ये स्वत:च्या वैद्यकिय सुवि धा, राउंड द क्लॊक आहेत.. स्वत:चे डॊ क्टर्स आहेत..... या सॊफ्ट वेअर सार ख्या कंपन्या नाहीत...... रिलायन्स ने ऒलरेडी व्हॊलंटियर केलेअआहे... मी विचार करून लिहिले आहे

माझ्या आईबाबांचे कोविड वॅक्सिनेशन करायचे आहे . आई ८० + आणि बाबा ८५+ . ठाण्यात कुठल्या हॉस्पिटला करता येइल ?

आजच एका नातेवाइकानी 'kAUSHALYA medical Foundation Trust Hospital' इथे वॅक्सिनेशन केले. अतिशय उत्तम सेवा होती म्हणे. Each senior citizen had an attandant.

लसीकरण केंद्रात भरपूर मनुष्यबळ लागते. मी बाबांना घेऊन गेलो तिथला अनुभव.
बाहेर आलेल्या लोकांना टोकन देऊन बसवायला आणि आत सोडायला सेक्युरिटी. लोकांचे शंकानिरसन करायला , भांडणार्‍यांना समजवायला व्हॉल्युन्टीअर.
मग आलेल्या व्यक्तीचे डिटेल्स सिस्टममध्ये अपडेट करणारा.
पेमेंट घेणारा.
इथेही आणखी एक सेक्युरिटी लोकांना क्रमाने सोडायला. येणारे लोक ज्येष्ठ नागरिक असल्याने प्रत्येक थांब्याला बसायची व्यवस्था . व्हीलचेअर्स सुद्धा.
सुई टोचायच्या खोलीत साताठ जण होते. टोचणार्‍या प्रत्येकी दोघांच्या दोन टीम्स. ज्ये ना खोलीबाहेरून टेबलपर्यंत नेणारी आणि पुन्हा बाहेर आणून सोडणारी नर्स. लस दिल्यावर काय काय काळजी घ्यायची हे सांगायला एक. असे सहा जण प्रत्येक खोलीसाठी.
लस टोचून घेतलेल्यांना ऑब्झर्वेशन साठी म्हणून अर्धा तास थांबवून ठेवतात. तिथपर्यंत सोडायला एक व्यक्ती.
तिथे अर्धा तास झाल्यावर त्यांचे आधार कार्ड + स्लिप देऊन जा म्हणून सांगायला दोन व्यक्ती.
. याशिवाय कोणाला काही त्रास झाला तर त्याला अटेंड करायला डॉक्टर आणि त्यासाठी वेगळी जागा.
इतक्या लोकांमुळे डेटा अपडेट करण्यापासून ते ऑब्झर्वेशन रूमपर्यंतचा आमचा प्रवास पटापट झाला.

साठच्या खालच्या लोकांसाठी इतकी व्यवस्था लागणार नाही.

ऑफिसेस मध्ये रक्तदान कॅम्प होतातच.तसेच एखाद्या मोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटल च्या स्टाफ ला घेऊन लसीकरण कॅम्प पण करता येतील.(असे वाटते)

वरील सर्वांची माहिती उपयुक्त. धन्यवाद
.................

लसीचा दुसरा डोस झाल्यानंतर दोन आठवड्यांनी संबंधित व्यक्ती ‘पूर्ण लसवंत’ होते. अशा व्यक्तींनी त्यानंतर काय करावे/ करू नये यासंबंधी उपयुक्त सूचना इथे आहेत :
https://www.cdc.gov/coronavirus/2019-ncov/vaccines/fully-vaccinated.html

त्यातील मोकळीक वाटावी अशी एक गोष्ट आहे:

पूर्ण लसीकरण झालेल्या संबंधित व्यक्ती एखाद्या खोलीत एकत्रित मास्कविना भेटू शकतात !

डॉक्टर , फायझर आणि मॉडर्नाच्या लसींची परिणामकारकता ९५% इतकी आहे. सिरम आणि भारत बायोटेकच्या लसींची परिणामकारकता ७० ते ८०% इतकी आहे. भारतात पूर्ण लसी करण झालेल्या व्यक्ती एका खोलीत मास्कशिवाय भेटण्यात अजिबात धोका नाही का?

(सध्या लसीकरण न झालेले लोकही खोलीत शिरले की मास्कशिवाय भेटतात हा भाग वेगळा)

भरत,
मला वाटतं की शेवटी मर्यादित व्यक्तींनीच खोलीच्या आकारानुसार एकत्र जमावे हे जास्त बरे.

मध्यंतरी, बहुतेक २०१३-१४ मध्ये, Hepatitis B च्या लसीकरणाची मोहीम आली होती हैद्राबादमध्ये.
आमच्या घराजवळपास चार पाच ठिकाणी, कुठे मैदानात तंबू घालून तर कुठे कम्युनिटी हॉल, क्लब हाऊस मध्ये आठ दहा जणांचा चमू येऊन ( बहुतेक दोन नर्स, एक डॉक्टर आणि इतर स्वयंसेवक) लसीकरण केल्या गेले, दोन टप्प्यात. त्यात ही घेतल्यावर थोडावेळ बसायला सांगायचे, काही प्रतिक्रिया येऊ शकते हे सांगायचे.

या लसीच्या खूप चाचण्या झाल्या असतील आधी खुप लसिकरण झाले असेल आणि अशा रीतीने लसीकरण करण्यास हरकत नाही हे सिद्ध झाले असावे.

कोव्हिड लसी या एकतर खूप कमी वेळात बनवल्या गेल्या आणि घेतल्यावर त्यांचा लगेच काय परिणाम होऊ शकतो याच्या पुरेशा चाचण्या नसल्याने त्या रुग्णालयात/जिथे तातडीची ओरोग्यसेवा उपलब्ध आहे तिथे देण्यात याव्यात असा निर्णय घेतला असावा. कदाचित पुढे लसीकरणानंतर लगेच उद्भवणाऱ्या कॉम्प्लिकेशन्सचे प्रमाण नगण्य आहे असे दिसून आल्यास याचे लसीकरण सुद्धा वरीलप्रमाणे मोहिमेद्वारे होईल. लसीकरण केंद्रात एक/दोन अम्ब्युलन्स तैनात असावी वगैरे नियम करून.

लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही बराच काळ बाहेर वावरताना मुखपट्टी वापरायची आहे. यासंदर्भात व्यक्तिगत संपर्कातून काही प्रश्न आले. ते महत्त्वाचे असल्याने हे स्पष्टीकरण.

कुठलीही लस परिपूर्ण नसते. त्यामुळे स्वतः लसवंत झाले तरीही संबंधित रोगजंतूचा संसर्ग होऊ शकतो. परंतु त्या परिस्थितीत लसीकरण झाल्याचे स्वतःला प्रत्यक्ष व इतरांना अप्रत्यक्ष फायदे असे मिळतात :

१. लस घेतलेल्या व्यक्तीस तो संसर्ग जर झालाच तरी त्याचा परिणाम अगदी सौम्य असतो. तिच्या शरीरात विषाणूची घनता व आक्रमकता खूप कमी राहते.
२. वरील व्यक्तीद्वारा ते विषाणू पसरवण्याची शक्यता राहते, पण तिचे प्रमाण खूप कमी असते.

३. आता अशी व्यक्ती जरी बिगरलसीकरण व्यक्तीच्या संपर्कात आली तरी दुसऱ्या व्यक्तीस रोगप्रसार व्हायची शक्यता खूप कमी होते. जरी तो झाला तरी विषाणू घनता कमी असल्याने तो सौम्य राहतो.

४. मुखपट्टी वापरल्याने वरील २ व ३ ला बळकटी मिळते.

…पुढे चालू....

लसीची परिणामकारकता मोजण्याचे दोन निकष असतात :

१. लस घेतलेल्या व्यक्तीस आजार झाला किंवा नाही ? झाल्यास तो सौम्य होता की नाही ? आणि
२. लस घेतलेल्या व्यक्तीद्वारा इतरांना रोगप्रसार झाला अथवा नाही ?

हे अभ्यास किचकट असतात आणि दीर्घ काळानेच त्याचे खरे उत्तर मिळते.

प्रसिद्ध गायक महेश काळे यांनी फायझर लसीचे २ डोस घेतल्यानंतरही ते कोरोना पॉसिटीव्ह आढळले.
ते, त्यांचे वडील आणि त्यांचे भाऊ हे तिघेही कोरोना पॉसिटीव्ह आहेत.
ते यू,एस वरून पुण्यात आले आणि इकडे येऊन त्यांना कोरोना झाला.
त्यांच्या अधिकृत फेसबुक पेज वरून त्यांनी ही माहिती दिली.

दोन डोस घेतल्यानंतर मध्ये काही काळ जावा लागत असेल.
शिवाय वर कुमार यांनी लिहीलं आहे की लस घेतल्यावरही करोना झाला तर त्याची तीव्रता कमी आणि त्याने इतरांना संसर्ग करण्याची शक्ती आणि प्रमाण कमी होते. हा लस घेण्याचा फायदा.
(संदर्भ : कुमार यांचा २४ तारीख ११:९ चा प्रतिसाद.)

चांगली माहिती, मुद्दे आणि चर्चा
लसवंत हा शब्द विशेष आवडला आहे Happy
(अवांतर : लसीकरण केंद्राला लसवंती म्हणावे काय? रसवंती सारखे )

महेश काळे यांनी फायझर लसीचे २ डोस घेतल्यानंतरही ते कोरोना पॉसिटीव्ह आढळले.

>>>>
यानिमित्ताने कोविडपर्वातील एक नवा अध्याय उलगडला आहे. विषाणूच्या नव्या अवतारांनी लसीच्या परिणामकारकतेवर काही प्रमाणात मात केलेली आहे.

यासंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्येष्ठ वैज्ञानिकांच्या घमासान चर्चा वैद्यकविश्वात चालू आहेत (https://jamanetwork.com/journals/jama/fullarticle/2777785) त्यातले महत्त्वाचे मुद्दे लिहीतो :

१. बी.१.३५१ (दक्षिण आफ्रिका) या नव्या प्रकाराशी फायझरचे दोन डोस घेऊन झालेल्या लोकांच्या रक्तद्रवाची प्रक्रिया प्रयोगशाळेत घडवली गेली. तेव्हा असे दिसले, की हे द्रव पूर्वीच्या विषाणूच्या तुलनेत फक्त एक तृतीयांशच उपयुक्त आहेत. म्हणजेच, नव्या विषाणू प्रकाराने सद्य लसीचा प्रभाव दोन-तृतीयांशने कमी केला.

२. अमेरिकेत फायझरचे दोन डोस घेऊन पूर्ण लसीकरण झालेल्या काही लोकांना करोना संसर्ग झाला आणि त्यातल्या काहींना रुग्णालयात दाखल व्हावे लागले.

…पुढे चालू....

३. फायझरने आता दोन डोस झालेल्या व्यक्तींना तिसरा डोस देऊन पहावे असे ठरवले आहे. त्याचे प्रयोग फेब्रुवारीतच सुरू झालेत.

४. सद्य लसी या अजूनही विषाणूला भारी आहेत असे तज्ञ म्हणताहेत. पण बहुतेक मोठ्या कंपन्यांनी लसीमधील बदल सुरू केलेले दिसतात.

५. शेवटी सतत बदल करत राहण्याऐवजी एकच सर्वसमावेशक (युनिव्हर्सल) लस करता येईल का, यावर उहापोह चालू आहे.

शेवटी सतत बदल करत राहण्याऐवजी एकच सर्वसमावेशक (युनिव्हर्सल) लस करता येईल का, यावर उहापोह चालू आहे. >> मला तरी वाटतं की अशी एकच सर्वसमावेशक लस येत्या काळात येणं कठिण आहे. बहुतेक सर्व industries आता आपली products लोकांना एका फटक्यात विकण्याऐवजी तीच products विकण्यासाठी subscription model वापरताना दिसतात. हीच लाट (trend) आता Pharma Industry मधे येऊ पाहतो आहे असं मला वाटतं. त्यामुळे आपण जसं Netflix/ Amazon साठी दर महीन्याला subscription fee भरून त्यांची सेवा वापरतो. तसेच ह्या Pharma कम्पन्यांना दरवर्षी पैसे देऊन नविन लस टोचून घ्यावी लागणार असे वाटते आहे.
आता ह्या सगळ्याला घाबरून आपण आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवायचे आणि स्वतःला घरात कोंडून घ्यायचे की नाही? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतः विचार करून सोडवावा. राजकीय नेते सर्वच industries कडून पैसा कसा उकळता येईल ह्याचे मार्ग शोधत असतात. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला/ मतांना विशेष किंमत न दिलेलीच बरी.

कुमारसर,
विषाणूचा नवा अवतार आणि लशीची उपयुक्तता याबद्दल चांगली माहिती देत आहात. धन्यवाद.
रविवारी नवर्‍याचा फायझरचा पहिला डोस झाला. मला आज मिळेल. एप्रिलच्या मध्यावर दुसरा डोस. मात्र विषाणूचे बदलणारे स्वरुप बघता एकंदरीत फायझर लशीचे दोन्ही डोस घेतल्यावरही मास्क, सोशल डिस्टन्स वगैरे काळजी घेत रहाणे गरजेचे असे दिसतेय.

होय, मूलभूत त्रिसूत्री आवश्यकच.

लसींच्या जोडीने उपचारांवरही संशोधन सातत्याने चालू आहे. त्यापैकी नवीन घडामोडी म्हणजे १० फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या औषध प्रशासनाने bamlanivimab and etesevimab (Antibodies) या औषधांच्या संयुक्त वापराला आपत्कालीन वापराची परवानगी दिली.
सौम्य ते मध्यम आजार असलेल्या रुग्णांना हे दिल्यास आजार रोखला जातो.

या व्यतिरिक्त खालील औषधे सौम्य ते माध्यम आजारासाठी बऱ्यापैकी उपयुक्त आहेत असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे :
• baricitinib ((दाहप्रतिबंधक)
• Monlupiravir : हे औषध तोंडाने घ्यायची गोळी असून त्याचे सध्या दुसऱ्या टप्प्यातील रुग्णप्रयोग काही ठिकाणी चालू आहेत. ते औषध शरीरात गेल्यानंतर करोना विषाणूचे पुनरुत्पादन थांबवते.
अधिक अभ्यासांती चित्र स्पष्ट होईल. तोंडाने घ्यायची गोळी हा तिचा महत्त्वाचा फायदा राहील.

रुग्णालयात दाखल असल्यास खालील उपयुक्त आहेत:
dexamethasone (दाहप्रतिबंधक)
remdesivir (विषाणूविरोधक)..

सर्वच industries कडून पैसा कसा उकळता येईल ह्याचे मार्ग शोधत असतात.

असे काही नाही

मग पोलिओ , स्मॉल पोक्स कसे गेले ?

न्यूज चॅनेल्सचा कल नेहमीच खळबळजनक बातम्या देण्याकडे असतो. कोरोना बाबतीत तर मुद्दामहून भीतीदायक वातावरण निर्माण करतात की काय असेच वाटते. आजच्या बातमीनुसार महाराष्ट्रातला नवीन स्ट्रेन हा रोगप्रतिकार शक्तीवर आघात करणारा आहे आणि दुप्पट वेगाने पसरतो. ह्यालाच "Double Mutant" असे नाव दिले आहे. परत तोच प्रश्न, ह्या मध्ये किती तथ्य आहे?

Pages