कोविड १९ घडामोडी : समज, गैरसमज

Submitted by कुमार१ on 16 June, 2020 - 23:52

(शेवटचे संपादन : १४/७/२०२०)
........................

जानेवारी २०२० पासून कोविड१९ चे पडघम वाजू लागले. लवकरच त्याचा जागतिक प्रसार झाला. मार्चमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने या हजाराची महासाथ आल्याचे जाहीर केले. यास अनुसरून इथे (https://www.maayboli.com/node/73752) “हात, जंतू, पाणी आणि साबण" हा धागा काढला . त्यात मुख्यत्वे हातांच्या दैनंदिन स्वच्छतेवर भर होता. पुढे त्या धाग्यात कोविडवर अधिक चर्चा होत गेली. त्यातून आपल्यातील अनेकांनी खूप चांगले प्रश्न विचारले. त्या धाग्यावर हातांची स्वच्छता आणि आजाराची माहिती यांची बरीच सरमिसळ झाली आहे. म्हणून एक कल्पना मनात आली. त्या धाग्यात आणि मला अन्यत्र विचारलेल्या गेलेल्या या आजाराबद्दलच्या प्रश्नोत्तरांचे एक स्वतंत्र संकलन करावे. त्यासाठीच हा नवीन धागा काढत आहे. इथून पुढची कोविडची सर्व चर्चा इथे व्हावी, ही विनंती. एक प्रकारे हा धागा म्हणजे 'कोविडपर्वाचा' उत्तरार्ध असेल.

मला विचारल्या गेलेल्या प्रश्नांतून असे जाणवले की या आजाराचे बाबतीत समाजात बरेच गैरसमज पसरले आहेत. त्यांचे निराकरण करावे या उद्देशाने हा स्वतंत्र धागा काढत आहे. तो लेख स्वरूपात नसून लोकांकडून प्रत्यक्ष जे प्रश्न विचारले गेले त्यांची उत्तरे, या स्वरूपाचा आहे. अजून जसजसे लोकांचे प्रश्न वाढत जातील तशी या प्रश्नोत्तरांमध्ये भर घालता येईल. विविध प्रश्न शक्यतो प्रश्नकर्त्याच्या भाषेतच ठेवले आहेत.

नवीन वाचकांसाठी हे संकलन उपयुक्त ठरेल अशी आशा. सूचनांचे स्वागत !
........................................................
प्रश्न :

१. कोविडसाठी Antibodies चा उपाय पारंपारिक विषाणूनाशक औषधांपेक्षा भारी असतो का?

‘भारी’ असे नाही म्हणता येत; उपचारांच्या त्या दोन दिशा आहेत. सध्या सुमारे ५० प्रकारच्या करोनाविरोधी औषधांच्या चाचण्या चालू आहेत. ढोबळ मानाने त्यांचे असे वर्गीकरण करता येईल:
१. पारंपरिक रासायनिक औषधे ( HCQ इ.)
२. विषाणूविरोधी औषधे
३. अ‍ॅन्टिबॉडीज
४. मूळ पेशींचे उपचार.
या सर्वांचे रुग्णप्रयोग शास्त्रीय पद्धतीने चालू आहेत. त्यांचे दखलपात्र निष्कर्ष बाहेर यायला काही महिने जावे लागतील. काही रुग्णांना अ‍ॅन्टिबॉडीजच्या जोडीने विषाणूविरोधी औषधे देखील द्यावी लागतात.
पुरेसे निष्कर्ष हाती आल्याखेरीज अमुक एक उपचार ‘भारी’ आहे असे म्हणता येणार नाही.
…………………………………………………………………………………………………………..
२. कोविडसाठी बीसीजी लसीचे उपचार उपयुक्त आहेत का ?

बीसीजी लस आणि कोविड यांचा संबंध तपासण्यासाठी एप्रिलपासून अनेक रुग्णप्रयोग चालू झालेले आहेत. त्यांचे निष्कर्ष हाती यायला सुमारे ४ महिने तरी लागतील.
यानिमित्ताने बीसीजीबद्दल काही उपयुक्त माहिती:

१. ज्या देशांत ती बालपणी सर्वांना देतात, तिथे बालकांच्या श्वसनाच्या गंभीर आजारांचे प्रमाणात घट दिसली आहे.
२. मुळात ही लस जरी जीवाणूविरोधी असली तरी तिच्यात काही विषाणूविरोधी गुणधर्म आहेत.
३. या लसीचे देखील काही उपप्रकार आहेत. त्यानुसार तिचे गुणधर्मही बदलतात. याचाही पुरेसा अभ्यास व्हायचा आहे.
४. सध्यातरी करोना- 2 आणि बीसीजीचे उपचार यासंदर्भात पुरेसा विदा मिळालेला नाही
………………………………………………………………………………………………………………………………………….
. ड जीवनसत्व आणि कोविडची तीव्रता यांचा कितपत संबंध आहे ?
यासंबंधी आता जोरदार संशोधन आणि काथ्याकूट होत आहे त्यासंदर्भात काही रोचक मुद्दे असे आहेत:

१. आपल्या त्वचेत तयार होणारे ड आणि आपले राहण्याचे भौगोलिक स्थान यांचा घनिष्ट संबंध असतो. हे स्थान विषुववृत्तापासून जसजसे उत्तरेकडे वरवर जाते तसे ड कमी प्रमाणात तयार होते.
२. ज्या शहरांत हवेच्या प्रदूषणाचे प्रमाण खूप असते तिथे देखील शरीरात ड कमी तयार होते.
३. वरील दोन्ही घटक वुहान, तेहरान, मिलान, सिएटल, न्यूयॉर्क आणि लॉस एंजेलिस या शहरांना लागू होतात.

४. वाढत्या वयानुसार देखील त्वचेतील ड चे उत्पादन कमी होत जाते. बरेच जेष्ठ लोक आहारातून पुरेसे ड मिळेल याची काळजी घेत नाहीत. त्यामुळे त्यांना ड ची कमतरता होते.
५. तसेच दीर्घकाळ धूम्रपान केल्यास देखील ड ची कमतरता होते.

६. ड ची पातळी आणि श्वसनसंस्थेची रोगप्रतिकारशक्ती यांचा संबंध काही अभ्यासांत दिसला आहे.
..... जसे या विषयावर अधिक संशोधन होत राहील, तसा अधिकाधिक प्रकाश पडेल.
………………………………………………………………………………………………………………………..
४. गेल्या काही दिवसात “अमुक-तमुक रसायने खा आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवा”, या आशयाचे अनेक सल्ले ढकलपत्रांतून फिरवले गेले. त्यात किती तथ्य ?

या संदर्भात मला एका वैद्यकीय तज्ञांचे मत दखलपात्र वाटले. ते इथे लिहितो.
शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीसाठी लागणाऱ्या विविध घटकांपैकी जर कशाची खरोखर कमतरता असेल, तरच तो घटक बाहेरून देण्याने उपयोग होतो.
“ प्रतिकारशक्ती वाढवा (बूस्ट)” हे विधान मुळात अशास्त्रीय आहे. जर एखाद्या कमतरतेमुळे प्रतिकारशक्ती कमी झाली असेल, तर ती कमतरता बाहेरून घटक देऊन भरून काढली जाते. त्यामुळे कमी झालेली प्रतिकार शक्ती पूर्ववत (नॉर्मल) होते.
तेव्हा नागरिकांनी निव्वळ ढकलपत्रातील संदेश वाचून वैद्यकीय सल्याविना कुठलेही रसायन/ औषध घेण्यात मतलब नाही.

कोविड-प्रतिबंध आणि जीवनसत्वे:
१. क जीवनसत्व : औषधरूपात घेण्याची गरज नाही. रोजच्या आहारात लिंबू आणि मोसमानुसार पेरू, आवळा इत्यादी फळे व्यवस्थित खावीत.
२. ड जीवनसत्व : वयाच्या 50 ते 55 नंतर जर हाडांची दुखणे उद्भवली असतील तरच संबंधित डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधरूपात घ्यावे. उगाचच स्वतःच्या मनाने नाही.
……………………………………………………………………………………………………………………………………………….
. कोविड१९ साठी रक्तद्रव उपचार :
गेल्या काही दिवसात यावर खूप चर्चा होत आहे. म्हणून या बद्दलची काही शास्त्रीय माहिती :

१. या उपचारासाठी दात्याची निवड कशी करतात ?
खालील निकष पूर्ण करणारा दाता सुयोग्य असतो:

*वय १८ ते ५५ दरम्यान.
*१०१.३ अंश F च्यावर ताप येऊन तो तीन दिवस वा अधिक टिकलेला असणे.

*असा दाता स्वतः कोविडसाठी उपचार घेऊन नुकताच बरा झालेला असतो. त्यानंतर सुमारे १४ दिवस त्याला या आजाराची कुठलीही लक्षणे नसावी लागतात. त्याची प्रयोगशाळा चाचणी सलग दोनदा नकारात्मक यावी लागते.
*पहिले लक्षण आलेल्या दिवसानंतर एक महिन्याने त्याच्या रक्तातील IgG बॉडीजचे प्रमाण चांगले असते.

२. या उपचारात प्राप्तकर्त्या रुग्णास काही धोका असतो का ?
वरवर पाहता तसा नसतो पण, एक शक्यता राहते. जेव्हा आपण सध्याच्या करोनाविषाणू विरोधी antibodies दिल्या, तर कालांतराने या विषाणूच्या अन्य प्रकारापासून संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो.
…………………………………………………………………………………………………………………………………………………
६. कोविड होण्याचे प्रमाण आणि लिंगभेद यात तथ्य किती ?
या प्रश्नाचे उत्तर वंश आणि देशानुसार वेगवेगळे आहे. तरी काही निरीक्षणे लिहितो.
या विषाणूचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा लिंगभेद नाही. पण, हा आजार झाल्यानंतर तो गंभीर होण्याचे आणि त्यातून पुढे मृत्यूंचे प्रमाण काही देशांत पुरुषांत अधिक दिसून आले आहे.

याची कारणमीमांसा तशी रोचक आहे. अद्याप यावरील संशोधन चालू आहे. अंदाजे काही निष्कर्ष असे आहेत :
१. साधारणपणे स्त्रियांमध्ये रोग प्रतिकारशक्तीची कार्यक्षमता अधिक असते. यामागे स्त्रियांच्या शरीरातील इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या हॉर्मोन्सचा वाटा असतो. तसेच स्त्रीमध्ये दोन X गुणसूत्रे (XX) असल्याचाही या शक्तीला काही फायदा होतो. त्यामुळे शरीरात घुसलेल्या रोगजंतूंचा निचरा लवकर आणि चांगल्या प्रमाणात होतो.

२. बऱ्याच देशांत धूम्रपानाचे प्रमाण पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा अधिक आहे, हाही मुद्दा विचारात घ्यावा लागतो.
३. या विषयाची अजून एक बाजू. जागतिक महासाथीमुळे जे विपरीत मानसिक परिणाम होतात, ते मात्र स्त्रियांमध्ये अधिक तीव्र असतात.
………………………………………………………………………………………………………………………………………..
. कोविडसाठी (संसर्गातून) सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्याबाबत विशेष असं संशोधन जगात चालू आहे का?
होय, असे काही अभ्यास चालू आहेत.

१. अशा अभ्यासात बाधित लोकांपैकी किती मृत्यू पावतात याचे गुणोत्तर काढले जाते. ते देशानुसार भिन्न आहे.
२. एकदा बाधित झाल्यानंतर पुन्हा तोच संसर्ग होतो का हे आजमावले जाते. त्यासाठी माकडांवर काही प्रयोग झाले आहेत.
३. बऱ्या झालेल्या रुग्णांत विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडीज किती प्रमाणात निर्माण झाल्यात हेही मोजले जाते.
४. एकंदरीत करोना या विषाणू जमातीने शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती अल्पकालीन असावी, असा सध्याचा अंदाज आहे.
५. त्यामुळेच लस शोधणे महत्त्वाचे ठरेल.
…………………………………………………………………………………………………………………………………………………………….
८. घरगुती पातळीवर आपल्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी सगळ्यांनी मोजावी का?
प्रश्न चांगला आहे पण त्याचे उत्तर सरळ नाही ! बरेच उलट-सुलट मुद्दे विचारात घ्यावे लागतात.
१. रक्तातील ऑक्सिजनची पातळी अन्य श्वसनाच्या आजारात देखील कमी होऊ शकते. उदा. न्युमोनियाचे अन्य प्रकार, अन्य दीर्घकालीन श्वसनविकार .

२. घरगुती वापराच्या oximeter यंत्रांची अचूकता बरीच कमी असते. विशिष्ट ऑक्सिजन पातळीच्या खाली त्यांची उत्तरे विश्वासार्ह नसतात.
३. अशी मोजणी घरी करताना दक्षता घ्यावी लागते. हात पुरेसे गरम असावे लागतात तसेच संबंधित बोटाच्या नखाला नेलपॉलिश असलेले सुद्धा चालत नाही.
४. उठसूट घरगुती मोजणीमुळे विनाकारण भीतीचे प्रमाण वाढत जाते.
हे सर्व बघता या उपकरणाचा उठसूट सर्वांसाठी वापर सुचविलेला नाही.
…………………………………………………………………………………………………………………………………………………………
९. कोविडमुळे मृत्यू होण्याची कारणे काय आहेत ?

कोविडमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या जगभरात बरीच आहे. अशा काही मृतदेहांचे अभ्यासासाठी शवविच्छेदन केले जाते.
त्यातून मृत्यू होण्याची कारणे अभ्यासली जातात. आतापर्यंत विच्छेदनातून समजलेली तीन कारणे अशी आहेत:
१. विषाणूच्या थेट हल्ल्यामुळे झालेला शरीरपेशींचा नाश
२. अनेक रक्तवाहिन्यांमध्ये झालेल्या रक्तगुठळ्या
३. या विषाणूला रुग्णाच्या शरीराने दिलेला hyperimmune प्रतिसाद >>> अधिकाधिक पेशींचा नाश.
.......................................................................
१०. करोना २ ची लस खरेच लवकर उपलब्ध होईल का? ती घाईने बाजारात आणल्यास काही तोटे?

लसीचा मुद्दा उपस्थित केलाय हे छान झाले. सध्या या संदर्भात माध्यमांतून काही उलटसुलट आणि अर्धवट बातम्या आलेल्या आहेत. या निमित्ताने काही अधिकृत माहिती इथे देतो.
कुठलीही लस प्रत्यक्ष वापरात येण्यापूर्वी ती सुरक्षित आणि प्रभावी अशी सिद्ध व्हावी लागते. हे दीर्घकालीन काम असते. एखाद्या लसीवरील संशोधन परिपूर्ण व्हायला तब्बल वीस वर्षे जावी लागतात. आता सध्याच्या आजारावरील लस्सीबद्दल पाहू.

ही लस जर घाईघाईत तयार केली तर तिच्या संशोधनातील बरेच टप्पे नजरेआड करावे लागतात. कुठलीही लस तिच्या संशोधनादरम्यान अनेक लोकांना देऊ पहावी लागते, तसेच तिचे निरनिराळे डोस देखील देऊन पहावे लागतात. त्यानंतर संबंधित लोकांचे दीर्घकाळ निरीक्षण केल्यावरच योग्य निष्कर्ष निघतात.
हे सर्व पाहता सुरक्षित आणि प्रभावी अशी लस लवकर वापरात येणे अवघड दिसते. म्हणून कोविडशी सामना करीतच बराच काळ जावा लागेल असे दिसते.
.................................................................................................................................................
११. करोनाचा संसर्ग डोळ्यांच्यावाटे होतो का?

ज्याप्रमाणे फ्ल्यूचे अन्य विषाणू डोळ्यांच्यावाटे शिरू शकतात तसेच हाही विषाणू शिरू शकतो. पण, अशा प्रकारे संसर्ग झालेल्या व्यक्ती अत्यल्प आहेत. किंबहुना त्याचा पुरेसा विदा उपलब्ध नाही. आरोग्यसेवकांनी काम करताना आपला चेहरा पूर्ण झाकावा हे योग्यच. पण सामन्यांसाठी तशी शिफारस नाही. नाक व तोंड झाकणे पुरेसे आहे. हात नेहमी स्वच्छ ठेऊन ते डोळ्यांना लागणार नाहीत, ही काळजी घेतली की पुरे.
...................................................................................................
१२. सध्या जे रोगी कोविड१९ होऊन बरे झाले आहेत त्यांना यापुढे हा आजार पुन्हा होत नाही, हे खरे आहे का?

याचे उत्तर गुंतागुंतीचे आहे. जे रोगी या आजारातून बरे झाले आहेत, त्यांच्या रक्तातील विशिष्ट प्रथिनांचा (antibodies) चा अभ्यास केला जातो. ही प्रथिने दोन प्रकारची असतात :
1. मारक (Neutralizing)
2. अ-मारक
यापैकी फक्त पहिल्याच प्रकारची प्रथिने त्या विषाणूने पुन्हा हल्ला केल्यास उपयुक्त ठरतात. ज्या रुग्णांत ही प्रथिने भरपूर तयार झाली असतील, त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असेल. (अर्थात अशी प्रथिने किती काळ रक्तात टिकू शकतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही).
पण ज्यांच्यात दुसऱ्या प्रकारची प्रथिने जास्त असतील, त्यांना हा फायदा होणार नाही. कारण ही प्रथिने त्या विषाणूचा (पुढच्या संसर्गात) नाश करू शकत नाहीत.
........................................................................................................................
१३. “ आपला विशिष्ट रक्तगट (A) आणि कोविड१९ होण्याची शक्यता यांचा खरंच संबंध आहे का ?

या संदर्भात मोजके अभ्यास युरोपमध्ये झालेले आहेत. त्यामध्ये ‘ए’ रक्तगट असणाऱ्या रुग्णांचा विशेष अभ्यास केला गेला.
या गटाच्या माणसांना जर कोविड झाला, तर त्यांच्यात श्वसनकार्य मोठ्या प्रमाणावर ढासळू शकते (failure). इतकाच सध्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
अर्थात रक्तगट आणि हा आजार होण्याची अधिक शक्यता, यावर अजून पुरेसे संशोधन झालेले नाही. तेव्हा घाईने या मुद्द्याचे सरसकटीकरण करता येणार नाही.

१३ ब
ओ (positive,निगेटिव्ह) रक्तगट आणि covid 19 च्या आजाराची तीव्रता ह्याचा काही संबंध आहे का ?

२००८ मधील करोना-१ या विषाणू संदर्भात असे काही जुजबी संशोधन प्रयोगशाळेत झाले होते. तूर्त सध्याच्या करोना-२ बाबत मात्र असे संशोधन बाल्यावस्थेत आहे. ‘ओ’ गटाच्या लोकांमध्ये काही विशिष्ट antibodies तयार होत असतात. त्यांच्यामुळे या विषाणूला पेशीत शिरण्यास प्रतिबंध होतो, असे एक गृहीतक आहे. पण सध्या कुठलाही निष्कर्ष काढलेला नाही........................................................................................................................................................
१४. हा आजार उच्चरक्तदाबाच्या रुग्णांना जेवढा वाईट आहे तेवढा दम्याच्या लोकांना नाही, असे वाचले. हे खरं आहे का ?

होय त्यात काही तथ्य आहे.
या आजाराचा विषाणू पेशीत शिरताना एका विशिष्ट एंझाइमला चिकटतो आणि मग पुढील प्रक्रिया होतात. त्यातून आजार उद्भवतो.
रक्तदाबाच्या आणि हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये या एंझाइमचे प्रमाण जास्त असते. याउलट ते प्रमाण दम्याच्या बऱ्याच रुग्णांमध्ये कमी असते.
सध्या हे गृहितक चर्चेत आहे. अधिक संशोधन होत आहे.
.................................................................................................................................................................................
१५. रुग्णाचा कोविड’मुळे’ मृत्यू झाला की अन्य आजार आणि कोविड’सह’ मृत्यू झाला, हे कसे ठरवायचे ?

मृत्यूचे निदान ही अचूक गोष्ट असते. पण, मृत्यूचे खरे कारण ही मात्र काही वेळेस (विशेषतः साथींच्या काळात ) वादग्रस्त गोष्ट ठरते. बऱ्याच वेळा मृत्यूचे कारण हे संबंधित डॉक्टरांचा अनुभव आणि परिस्थितीजन्य पुरावा यावरून दिले जाते. मृत्यूनंतर काही मृतदेहांचे अभ्यासासाठी शवविच्छेदन केले जाते. त्यातच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होते. अर्थात ही प्रक्रिया सर्वांचे बाबतीत केली जात नाही; तसे शक्यही नसते.
..........................................................................................
१६. “कोविड१९ हा आजार दीर्घकालीन होऊन त्याचे भविष्यात मोठे दुष्परिणाम होतील का?” हा प्रश्न १ महिन्यापूर्वी माझ्या या आधीच्या धाग्यात विचारला गेला होता.
आता हा आजार समाजात उद्भवल्याला सहा महिने उलटलेत. त्यादृष्टीने काही माहितीची भर:
१. असे काही रुग्ण तब्बल तीन महिने अंथरुणात खिळून आहेत.
२. काहींना उपचारानंतर लक्षणे अजिबात नाहीत, पण दोन महिने उलटल्यावरही त्यांच्या चाचणीचे निष्कर्ष होकारात्मकच आहेत.
३. काहींमध्ये कालांतराने विशिष्ट प्रकारचा न्युमोनिया होऊ शकेल.
...............................................................................................
१७.
हॅप्पी हायपोक्सिया हा काय प्रकार आहे ?

‘हॅपी हायपोक्सिआ’ हे भयानक चुकीचे टोपणनाव आहे. योग्य वैद्यकीय नाव ‘सायलेंट H’ असे आहे.
म्हणजे काय ते सांगतो.

१. निरोगी माणसात ऑक्सिजनचे रक्तप्रमाण सुमारे ९५ mmHg इतके असते.
२. काही श्वसन आजारात ते कमी होऊ लागते. परंतु ते जेव्हा ६० पर्यंत खाली येते तेव्हाच रुग्णास जोराचा दम लागतो.

३. म्हणजेच ९५ ते ६० या टप्प्यात रुग्ण सायलेंट H अवस्थेत असतो.
४. या अवस्थेत रुग्णात दम लागलेला तर नसतोच, पण तो शांत आणि वरवर ‘सुखी’ (लक्षणविरहित )असतो. हा खरा विरोधाभास आहे.

५. मात्र असा रुग्ण अचानक गंभीर अवस्थेत (decompensation) जाऊ शकतो, हा या अवस्थेतील गर्भित धोका आहे. म्हणून त्याला हॅपी म्हणणे चुकीचे आहे.
.................................................................................
१८. करोना- २ विरोधी औषध शोधायला एवढा वेळ का लागतोय?

या संदर्भात काही मूलभूत माहिती:
विषाणूंच्या रचनेनुसार त्यांचे DNA व RNA असे दोन प्रकार आहेत. करोना- २ RNA या प्रकाराचा आहे. अशा प्रकारच्या विषाणूंची काही वैशिष्ट्ये:

१. त्यांचा जनुकीय संच खूप लहान असतो.
२. त्यामुळे त्यांचे जनुकीय बदल वेगाने आणि वारंवार होतात.

३. त्यांची रचना बरीच भिन्न स्वरूपाची असते.
४. त्यांची उत्क्रांती वेगाने होत राहिल्याने औषधांना त्यांचा 'पाठलाग' करणे तुलनेने अवघड जाते.

५. म्हणून नवनवी औषधे लवकर निष्प्रभ होऊ शकतात.
...........................................................................
१९. करोना विषाणू हवेतून पसरतो काय?

यावर डॉ. सौम्या स्वामीनाथन ( वैज्ञानिक WHO) यांचे स्पष्टीकरण असे आलेले आहे:

१. हा विषाणू हवेतून पसरतो, पण अत्यंत मर्यादित वातावरणात.
२. मुख्यता हवेतून पसरणारे जे विषाणू (उदाहरणार्थ गोवर) असतात, त्या तुलनेत करोनाचे पसरणे बरेच कमी आहे.

३. करोनाचे वातावरणात उडालेले कण 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ राहत नाहीत.
४. जर तो वरील २ प्रमाणे मुख्यतः हवेतून पसरणारा असता, तर एव्हाना आपणा सर्वांनाच त्याचा संसर्ग झाला असता.
………
२०. वाफ घेणे व रोगप्रतिबंध

वाफ आणि श्वसनसंस्था याबद्दल काही मूलभूत माहिती:
कुठल्याही श्वसनविकारात जेव्हा नाक चोंदणे, घशात खूप द्राव साठणे असे होते, तेव्हा वाफेने ते स्वच्छ व मोकळे होण्यास मदत होते. सूक्ष्म श्वासनलिकांपर्यंत वाफ पोचत नाही. तेव्हा ‘वरच्या’ श्वसनमार्गाची स्वच्छता हा वाफेचा खरा उपयोग आहे.
तो कुठल्याही विशिष्ट सूक्ष्मजंतूच्या विरोधातील उपाय असत नाही.
त्याचे महत्व श्वसनविकारातला पूरक उपचार इतकेच आहे.
.............................................................................
२१. इटोलीझुमॅब आणि रेमडेसीविर यात काय फरक असतो ?

१. रेमडेसीविर हे थेट विषाणूविरोधक आहे. ते आपल्या पेशींतील या विषाणूची तुफान वाढ थांबवते. ( अशा सर्व औषधांच्या नावात अंत्य ‘विर” असते. Antiviral या अर्थी)

२. इटोलीझुमॅब ही मुळात विशिष्ट प्रकारची antibody आहे. (अशा सर्व औषधांच्या नावात अंत्य ‘मॅब’ असते). जेव्हा विषाणू पेशीत हल्ला चढवतो, तेव्हा त्याला प्रतिकार म्हणून तिथे प्रचंड दाहप्रक्रिया होते. काही वेळेस ही अनियंत्रित होते >> गंभीर आजार >> मृत्यू.
हे औषध दाहप्रक्रिया नियंत्रित करते.
...............................................................................................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथली सुरुवात vt220 यांच्या मागील धाग्यातील प्रश्न इथे घेऊन करतो.

एखादे औषध ह्या आजारासाठी वापरावे हे कसे ठरवतात?

चांगला प्रश्न जेव्हा एखाद्या नवीन औषधाचा शोध लावला जातो तेव्हा ते माणसांसाठी वापरण्याआधी खालील पायऱ्या असतात.

१. त्या औषधाचे प्रयोग विशिष्ट प्राण्यांवर प्रयोगशाळेत करणे. त्यातून प्राथमिक निष्कर्ष मिळतात.
२. ते योग्य असल्यास मानवी चाचण्या सुरू होतात. आधी काही मूठभर रुग्णांवर त्याचा प्रयोग होतो. याला निरीक्षणात्मक अभ्यास म्हणतात.

३. यानंतर रीतसर शास्त्रीय पद्धतीने रुग्णप्रयोग (trials) सुरू होतात. यात एखाद्या आजाराचे रुग्ण दोन गटांत विभागले जातात. त्यातील एकाला नवे औषध दिले जाते तर दुसऱ्याला जुने औषध किंवा placebo दिले जाते.
४. अशा प्रयोगातून पुढे संख्याशास्त्रीय निकष लावून अंतिम निष्कर्ष काढला जातो.

५. वरील सर्व चाचण्या पार केल्यावरच नवे औषध सर्वांच्या वापरासाठी बाजारात येते.

उपयुक्त माहिती.
हा धागा ग्रुप पुरता मर्यादित नसेल तर व्हॉटसप वर लेखाची लिंक शेअर करतेय.
सध्या काही हॉटेल्स ने आपल्या मेनूत आधी साधे 'छोले, डाल माखनी, राजमा' असलेल्या पदार्थांचं बारसं करून मेनूत नावं 'इम्युनिटी बूस्टर छोले' 'आयर्न पॉवर हाऊस राजमा' 'स्ट्रेंथ बुस्टिंग डाल माखनी' केली आहेत.म्हणजे, हे पदार्थ आधी पण या गुणांनी उपयुक्त होते पण आता ते तसे आहेत हे ठासून सांगणं विक्री ला जास्त उपयुक्त ठरतं.
ऑक्सि मीटर सध्या 4000 पर्यंत मिळतायत.बरेच लोक घेतायत.हार्ट पेशंट, एरवी पण श्वासाचे विकार असलेले वृद्ध यांना घेतल्यास जास्त उपयोग होत असेल.करोना साथ नसतानाही मॉनिटरिंग ला.

ओ (positive,निगेटिव्ह) रक्तगट आणि covid 19 च्या आजाराची तीव्रता ह्याचा काही संबंध आहे का
>>>>
२००८ मधील करोना-१ या विषाणू संदर्भात असे काही जुजबी संशोधन प्रयोगशाळेत झाले होते. तूर्त सध्याच्या करोना-२ बाबत मात्र असे संशोधन बाल्यावस्थेत आहे. ‘ओ’ गटाच्या लोकांमध्ये काही विशिष्ट antibodies तयार होत असतात. त्यांच्यामुळे या विषाणूला पेशीत शिरण्यास प्रतिबंध होतो, असे एक गृहीतक आहे. पण सध्या कुठलाही निष्कर्ष काढलेला नाही.
….
विविध रक्तगट आणि काही आजार होण्याचे प्रमाण यावर गेल्या ५० वर्षांत बरेच संशोधन झाले आहे. मात्र त्यातील बरीच गृहीतके पुरेश्या पुराव्याअभावी सिद्ध झाली नाहीत.

अशा बऱ्याचशा अभ्यासांचा, रोगनिदान आणि उपचार या दृष्टीने उपयोग नसतो. वैद्यकातील पूरक अभ्यास इतकेच त्यांचे महत्त्व असते.
‘रक्तगट व आजार’ असे अनेक अभ्यास आतापर्यंत ‘गृहितके’ याच पातळीवर राहिलेले आहेत.

हा विषाणू कोणत्या पृष्ठभागावर बराच काळ टिकतो, ही माहिती स्पष्टपणे उपलब्ध नाही
उदा. हे निसर्गात किती काळ टिकू शकते उदा. गवत, झाडे, फळांच्या, फुलांवर.
जर दोन लोक एकाच फुलाने सुगंध ​​घेतल्या तर संक्रमित होईल?

धन्यवाद डॉक्टर !
गैरसमज कमी होण्यासाठी शास्त्रीय माहिती सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोचणे आवश्यक आहे..
माझा प्रश्न:
काही देशात (अमेरिका, जर्मनी, रशिया) अँटीबॉडी टेस्टिंग चे प्रयोग झाले आहेत. भारतात देखील बहुतेक एक प्रयोग झालेला आहे. Swab based testing ni detect झालेल्या संख्येपेक्षा अनेकपटीनी (१०-१५ पट) जास्त लोक पॉसिटिव आहेत, असा साधारण निष्कर्ष दिसतोय.
या टेस्टिंग पद्धतीचा / यानी मिळालेल्या माहितीचा नक्की कसा उपयोग आहे ?

धन्यवाद डॉक्टर! एखादे रसायन औषध होउ शकेल हे ठरवल्यावर ते सर्वसाधारण वापरात आणण्याची पध्दत तुम्ही सांगितली. परंतु माझ्या प्रश्नाचा रोख वेगळा होता. एखादे रसायन (पुर्णपणे नवीन किंवा सध्या दुसर्‍या आजारासाठी वापरले जाणारे) ह्या नव्या आजारात वापरले जाउ शकते हे कसे ठरवले जाते?
HCQ बद्दल सुरुवातीला वाचलेले तेव्हा मलेरिया व्यतिरिक्त लुपस सारख्या ऑटोइम्युन आजारात ते वापरले जाते ते माहित झाले. तेव्हाच covid19 ने मरण्यासाठी cytokinesis म्हणजे इम्युन सिस्टिमचा आपल्याच चांगल्या पेशींवर हल्ला हे कारण कळालेले. त्यामुळे HCQ relevant वाटलेले. पण आता ह्या नव्या steroid उपचारामागे काय कारणमिमांसा असावी असा प्रश्न पडला.

जोशी,

तुमचा मुद्दा बरोबर आहे. सर्जिकल मास्कच्या पृष्ठभागावर देखील हा विषाणू सातव्या दिवशीही काही प्रमाणात असतो. पण, इथे अजून एक मुद्दा अधिक विचारात घेतला पाहिजे. समजा एखाद्या पृष्ठभागावर हा विषाणू काही दिवस राहतोय. पण प्रत्येक दिवसागणिक त्याची संसर्गक्षमता कमी होत जाते.

त्यामुळे अशा क्षमता कमी झालेल्या विषाणूच्या संपर्कात आपण आलो, तर आपल्याला त्रास होण्याची शक्यता बरीच कमी होते. किंबहुना, वस्तूंच्या स्पर्शापेक्षा (बाधित) माणसाकडून माणसाकडे या प्रकारेच संसर्ग अधिक फैलावतो.

एक प्रश्न
अशी काही टेस्ट उपलब्ध आहे का ज्याने कळू शकेल if you are immune to the virus or susceptible to the virus ?...
माझी काही वर्षांपूर्वी ही ब्लड टेस्ट झाली होती ज्यात मी हेपेटायटीस बी साठी susceptible होते हे कळले होते.
धन्यवाद
स्वतंत्र धागा केल्याबद्दल आभार.

चिन्मय,
या प्रतिसादात swab चाचणीची उपयुक्तता बघू. यामध्ये विषाणूचा आरएनए शोधला जातो.

१. हे swabs नाक, घसा, थुंकी आणि थेट श्वासनलिकेत खाली जाऊन (bronchi) सुद्धा घेता येतात.

२. आपण श्वसनमार्गात जेवढे खोलवर जाणार( म्हणजे bronchi) तेवढे चाचणीचा निष्कर्ष होकारात्मक येण्याचे प्रमाण वाढते (९३%).
३. हेच प्रमाण घशाच्या swabचे बाबतीत ३३% इतके खाली उतरते.

४. जरी चाचणी नकारात्मक आली, तरीपण जर रुग्णास लक्षणे असतील तर ती अधिक महत्वाची. किंबहुना त्याचे निरीक्षण करणे गरजेचे.
५. शेवटी सर्व घटकांची सांगड घालूनच रोगनिदान केले जाते.

चिन्मय,
आता अँटीबॉडी चाचणीबद्दल:
ही रोगनिदान चाचणी नसून पूरक चाचणी आहे.

काही बाबतीत असेही चित्र दिसले आहे. रुग्णांना ठराविक लक्षणे होती पण त्यांची swab ही रोगनिदान चाचणी नकारात्मक होती. त्यांची प्रत्यक्ष तपासणी केल्यावर ( क्ष किरण वगैरे) तपासणीत हा आजार दिसून आला. तसेच अन्य काही कोविडचे पुरावेही मिळाले. त्यांच्या काही दिवसांनी केलेल्या रक्ततपासणीत अँटीबॉडीचे प्रमाण बऱ्यापैकी होते.
आता अशा केसेस मध्ये सर्व गोष्टी एकत्रित तपासल्या (correlation), तर या तपासणीचा उपयोग होतो.

तसेच हा आजार होऊन बरा झालेल्या रुग्णांत या चाचणीचा उपयोग रुग्णाच्या भविष्यकालीन अभ्यासात (prognosis) होतो.

Vt220,

Dexamethasone आणि कोविड
>>>>>

प्रथम आपण हे औषध नक्की कुठल्या रुग्णांसाठी वापरलय ते बघू.
१. ज्या गंभीर रुग्णांना बाहेरून ऑक्सिजन आणि श्वसनाची मदत द्यावी लागली होती, त्यांच्याच बाबतीत याच्या वापराने मृत्युदर कमी झाला.
२. पण ज्यांना वरील १ प्रमाणे नव्हते, त्यांना हे औषध उपयोगी पडलेले नाही.

३. तूर्त हा प्रयोग फक्त एकाच देशात मर्यादित स्वरूपात झाला आहे. त्यावर अजून अन्य तज्ञांचे अभ्यास व मतप्रदर्शन बाकी आहे. त्यानंतरच तो शोधनिबंध प्रकाशित होईल.

पुढे चालू.....

Vt220,
Dexamethasone आणि कोविड >>>>>

आता Dexamethasone पेशीत कसे काम करते ते बघू.
१. मुळात ते दाह प्रतिबंधक असल्याने cytokines चा प्रभाव कमी करते. अशी ५ रसायने या आजारात वाढलेली असतात.
२. ते फुफ्फुसातील हवेच्या sacs चे रक्षण करते आणि तिथला सूक्ष्म रक्तप्रवाह सुधारते.

अस्मिता,

तुम्ही म्हणता तशा चाचण्या सध्या तरी सिद्ध नाहीत.
विशिष्ट जनुकीय आराखडा असलेल्यांना करोना-२ चा संसर्ग होतो का, यावर अभ्यास चालू आहेत. अर्थात या पंचवार्षिक योजना असतात !
तूर्त रोगोपचार आणि लस-संशोधन यांना प्राधान्यक्रम आहे.

माझा एक बाळबोध म्हणा हवा तर, एक प्रश्न आहे
जशी व्हेहिकल मध्ये हवा फिल्टर करून कंबश्चन साठी टाकली जाते तशी काही यंत्रणा नाकाच्या छिद्रात /जवाळपास करता येईल का जेणे करून त्या इन्ग्रेस पॉइंट वर व्हायरस फिल्टर औट होईल? मग उरले दोन पॉइंट्स---- डोळे व तोंड.... एक्स्टेंडेड नोज अट्~एचमेम्ट ... अस काहीतरी मेकॅनिकल इंजिनियर्स म्हणजे माझ्या कळपातील व आपण वैद्यकिय एक्स्पर्ट्स मिळून काही कंट्रॅप्शन तयार करता येईल का डॉ. कुमार? फिल्टर अगदी ऑपरेशन थियेटरच्या ~ओरिपिस साईझचे असेल वा चेहर्यावर चिलखत असेल

रेव्यु,
तुमची कल्पना रोचक आहे. मी इतकेच सुचवू शकतो ,की विषाणूची खालील मापे लक्षात घ्यावीत :
(साधारण रेंज)
व्यास : २०-४०० nm.
लांबी : ७००-१००० nm.

व्याख्यान दुव्याबद्दल धन्यवाद. त्याचा सारांश ऐकला होता

सर, आधी १००० पार्टिकल्स पर स्केअर सेमी म्हणजे एका चौरस सेंमी चे १००० भाग केले तर त्यातून जाऊ शकणार्या पार्टिकल साइ़झचे फिल्टर अशक्यप्राय समजले जायचे. आता ते १००००० या साइ़झ पर्यंत उपलब्ध (वाणिज्य धर्तीवर) उपलब्ध आहे व त्याचे हेपा फिल्टर असे नाव आहे. असे एका मागोमाग लेयर लावले तर ओव्हलेप होऊन या पार्टिकल ला रोखता येईल. विकिपिडिया "Coronaviruses are large, roughly spherical, particles with bulbous surface projections.[41] The average diameter of the virus particles is around 125 nm (.125 μm). " म्हणजे ०.१२५ मायक्रॉन आहे. आज मितीस लहानात लहान साइ़झ रोखू शकणारे पार्टिकल फिल्टर म्हणजे ०.२२ मायक्रॉन्स. आणखी मिळालेली माहिती अशी... Virus clearance filters are broadly classified into two categories: Filters that provide >4 or >6 log10 removal of large viruses, typically 80–100 nm endogenous retroviruses. Filters that provide >4 log10 removal of small and large viruses (larger than 18–24 nm parvoviruses). या वर काही काम होत आहे का?

खूप महाग आहेत

साधे सर्जिकल मास्क रोज नवा वापरणे पर्वडत नाही

रेव्यु,.

एक अभियंता म्हणून तुमचा संशोधनाचा दृष्टिकोन आवडला. या विषयावर मी थोडा वेगळ्या बाजूने विचार मांडतो.

असंख्य सूक्ष्मजीव हे पृथ्वीवर यत्र तत्र सर्वत्र आहेत. आपण आपला चेहरा झाकण्याची कितीही अवरोध साधने निर्माण केली, तरी ती काही आपण २४ X ७ लावून ठेवू शकत नाही. आणि जंतूंचा शिरकाव शंभर टक्के थांबवणे हे अशक्य कोटीतले आहे.

त्यामुळे वैयक्तिक आणि समूह प्रतिकारशक्ती वर अधिक लक्ष केंद्रित केले तर बरे होईल. तसेही दशकातून एखादी साथ येणारच, शतकातून एखादी महासाथ येणारच. हा निसर्गक्रम असतो. तर तेवढ्या कालावधी पुरती सध्याची अवरोध साधने चालून जावीत.
या विषयाला अनेक पदर आहेत आणि सर्व बाजूंनी अभ्यास कुणाही एका माणसाचा नसतो. पण मला जे भावले ते मी मांडले आहे.

डॉक्टरसाहेब अतिशय उपयुक्त लेख.
प्र. १ आतापर्यंत वायरस या प्रकाराला लस खूप कमी वेळा मिळाली आहे हे खरे आहे काय?.
प्र. २ एकंदरीत परिस्थिती पाहिली तर प्रत्येकाला आज ना उद्या एका वर्षात हा आजार होण्याची शक्यता ५० % टक्क्याच्या वर आहे/असेल (?) हे खरे आहे काय?.

माझी एक सूचना :
याच्या इस्पितळातील उपचाराच्या खर्चाचे लाखावरचे आकडे पाहिले व घरात एकाला झाला तर सर्वांना व्हायची शक्यता पाहिली तर बर्‍याच कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडू शकते. येवढी मोठी शक्यता असेल तर नेहेमीची गणिते चुकू शकतात.

आमच्या ओळखीच्या एकाच्या पत्नीला इस्पितळात औषधोपचार द्यावा लागला. त्याच्या कंपनीची लिमिट एकीसाठीच संपली. आता आई वडिल पण पॉझिटीव आहेत. आता तो काळजीत पडलाय.
सुदैवाने तो स्वतः व मुलगा यांचे रिपोर्ट निगेटीव आले.

कोविदसाठी वेगळा इन्शुरन्स सध्या मिळतो. तो सर्वांनी शक्य असेल तर प्रत्येकासाठी घ्यावा असे माझे मत आहे. (माझा अथवा माझ्या कुठल्याही संबंधीताचा कुठल्याही इंन्शुरन्स कंपनीशी संबंध नाही). एक दुर्लक्षीत असलेली गोष्ट नजरेत आणून देतो इतकेच. १५०० ते २००० किंमत असू शकते. अर्थात इस्पितळात जायची शक्यता ज्येष्ठ नागरीकांना जास्त आहे. त्यांनी तर घ्यावाच.

वातानुकुलीत यंत्रणेमध्ये अतीनील किरणांच्या वापराने वायरस नष्ट होउ शकतो. ही यंत्रणा सहज बसवता येउ शकते.

विक्रम,
१. आतापर्यंत वायरस या प्रकाराला लस खूप कमी वेळा मिळाली आहे हे खरे आहे काय?.
>>>
नाही, असे बिलकुल नाही. सध्या दोन डझनांचेवर अनेक विषाणू विरोधी लसी उपलब्ध आहेत. काही विषाणूंच्या बाबतीत मात्र लस निर्मितीला बराच त्रास पडला आहे. उदा. एच आय व्हीची अजून तयार झालेली नाही; एबोलाची तयार व्हायला वीस वर्षांहून अधिक काळ लागला.

बाकी विम्याची सूचना आणि तांत्रिक माहिती बद्दल आभार !

Pages