१४ फेब्रुवारी...(कोवीड अनुभव)

Submitted by 'सिद्धि' on 14 March, 2021 - 03:14

१४ फेब्रुवारी...
Valentine च यंदाच गीफ्ट, ते म्हणजे माझा कोरोना टेस्टचा आलेला रिपोर्ट.
detected म्हणजेच Positive ! Sad Sad Sad

बघता क्षणी मला घाम फुटला होता. एवढी काळजी घेतली तरीही?  कसं काय?  का?  काही समजेना. काय करावे सुचेना.नवरा सुदधा कोवीड positive.  एवढं कमी काय तर एक-एक करत घरातील इतर संगळ्यांचा रिपोर्ट positive आला.  सासू-सासरे, नवरा सगळे admit झाले. माझ्यासाठी तो पर्याय राहिला नाही. पाच महिन्यांच माझं छोटंसं पिल्लू... ते पण फक्त दुधावर अवलंबून, त्याला कुठेही ठेवता येत नव्हते. माझ्याशिवाय कुणाकडे ही जास्त वेळ राहत नाही. फॅमिली डॉक्टरांना विचारुन पाहिले. 'लहान मुलांची प्रतिकार शक्ती मोठयांपेक्षा चांगली असते, त्यामूळे तुम्ही बाळाला तुमच्या जवळ ठेवू शकता.  फक्त योग्य ती काळजी घ्या. मास्क लावा, समोर खोकू नका, sanitizer वापरा, वारंवार हात धुत जा...कोरोनाचा काही त्रास होणार नाही.' असा सल्ला मिळाला आणि त्यामुळे जीवात-जीव आला.

बाळाला घेऊन होम क्वारंटाइन राहण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. रिपोर्ट पाहिला तेव्हा एका क्षणी डोळ्यासमोर अंधारी आली होती. पण हार पत्करली नाही. आधी नेटवरती घरगुती उपचार शोधले. एक लिस्ट तयार केली. विज्ञान तंत्रज्ञान, वैद्यकीय उपचार कितीही पुढे गेले, तरीही आपल्या आयुर्वेदाला कशाचीही तोड नाही. आयुर्वेदिक काढा, लिंबू-तुलसी रस, आद्रक, गवती चाहा, ओली हळद हे सारे सारे उपाय सापडले. बिग बास्केट ने घरी सुद्धा पोहोचविले. कोरोना म्हटलं की शेजारी-पाजारी, नातेवाईक सगळेच सोयीस्कररीत्या पण अप्रत्यक्षपणे वाळित टाकतात. दाखवायला वरवरची आपुलकी बाकी वेळेला कोणी नाही. यामुळे सगळं काही स्वतःच ऑनलाइन मागवलं होत आणि सुरुवात केली.
रुग्णालयात घरचे सगळे ट्रिटमेंट घेत होतेच आणि मी घरुन. माझ्या छोट्याशा पिल्लूला फक्त दुधा पुरतेच जवळ घ्यायचे. नाहीतर ते आपलं टुकू टुकू वाट बघून रडून एकटंच झोपायच. त्याला रडताना बघून आपल्या आणि इतरांच्या निष्काळजीपणाची सारखी आठवण व्हायची. दारातूनच नुसती माझी झलक जरी दिसली, तरी हुंकारे देऊन हात पसरणार ते माझं पिल्लू बघून डोळे सारखे भरायचे.  ती वेळ आणि ती परिस्थिती खरंच शब्दात नाही सांगता येणार. 

एक आठवडा असाच ढकलला. मग शेवटी एकदा माझी आई आली, तिला माझी अवस्था पाहवेना. खरच एक आईच आईची अवस्था समजू शकते. तिचे उपकार मी या जन्मीच काय, सात वेळा जन्म घेतला तरीही फेडू शकत नाही. तिच्याकडे बाळाला सोपवल्यानंतर मला हायसे वाटले. मग मात्र मी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले... तिथेच सार खाणं-पाणी चालू होत. इकडे मी आणि होस्पीटल मध्ये घरचे बाकीचे अशी टांगती तलवार डोक्यावर होती. त्यातून पण सगळ्यांना माझीच जरा जास्त काळजी, कारण रुग्णालयात मिळाणारी ट्रिटमेंट म्हणजे सलाईन, इंजेक्शन यातले काही मला घरी मिळत नव्हते. पण काहीही झालं तरी सगळ्यांनी यातून बरं व्हायचं आहे. बास्स! दुसरा कसलाही विचार मनात येऊ दिला नाही.

नवव्या दिवशी रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि मी जिंकले. सुदैवाने मला शुगर, ब्लड प्रेशर नाही किंवा कोणतीही शस्त्रक्रिया झालेली नाही, कोणत्याही प्रकारचा आजार नसल्याने, फक्त घरगुती उपाय केले. त्याबरोबरच'पॉझिटिव्ह एनर्जी, विल पॉवर' आणि celine 500, raricap या दोन गोळ्या याच्या जोरावर पळवल त्या कोरोनाला. जवळपास एक महिना गेला या सगळ्यामध्ये, तो जो काही काळ होता, जणू काही आमच्यासाठी काळच थांबला होता, अस सारख वाटायच. आता हळुहळू सार काही पुर्ववत होत आहे. घरचे बाकीचे सगळे ही बरे होऊन घरी आले आहेत.

थोडक्यात हेल्दी खा आणि हेल्दी रहा. आरोग्य जपा. पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला खुप कणखर बनवते. मनात सतत सकारात्मक विचार करत राहिल तर पन्नास टक्के आजार तिथेच गायब होतो. सगळा रोगप्रतिकारशक्ती चा खेळ आहे बाकी काही नाही.

मी घरी करत असलेले काही साधेसोपे उपाय -
*रोज सकाळी उपाशीपोटी एक कप गरम काढा.
(लवंग ४, काळीमिरी ४, एक काडी दालचिनी, एक टिस्पून ओवा, एक टिस्पून ओली हळद, आर्दक एक इंच, तुळस पाने ८-१०, लिंबा एवढा गुळ यामध्ये चार पेले पाणी घ्यावे, ते दोन पेले होईपर्यंत आटवून तयार केलेला काढा. )

*रोज २-४ उकडलेली अंडी.

*सफरचंद, संत्री दोन्ही रोज एक-एक. उपलब्ध असल्यास किवी, ड्रॅगन फ्रुट सुद्धा खावे.

*पाणी गरम करून त्यात थोडी हळद घालून पिण्यास घ्यावे. गरम दूध मध्ये देखील हळद घालून ते पिण्यास घ्यावे.

*सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि संध्याकाळचे जेवण वेळेवर आणि भरपूर करावे. शक्यतो खाण्यामध्ये जास्त अंतर ठेवू नये. हिरव्या भाज्या-मोडाचे कडधान्य ई चा समावेश करावा.

*जेवनात तेलचा वापर अगदी कमी करावा.

*थंड पाण्याचा वापर टाळावा.

*रोज मीठ व कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्यात.

*सकाळी आणि संध्याकाळी कपूर आणि निलगिरी तेल टाकून वाफ घ्यावी.

(एखाद्याला कोरोना पेशन्टला याचा फायदा व्हावा या एकमेव हेतूने, फक्त एक अनुभव म्हणून मी हे इथे शेअर करत आहे.डॉक्टरचा सल्ला देखील जरुर घ्या.)
सिद्धि चव्हाण
https://siddhic.blogspot.com

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लढा देऊन बऱ्या झालात यासाठी अभिनंदन.

कोरोना आता मित्रांपर्यंत येऊन ठेपलाय. एक जवळचा नेहमी भेटणारा मित्र पॉजिटिव्ह आहे असे कळल्यानंतर धक्का बसला. तो सुद्धा तीन आठवड्यानी म्हणजे परवाच यातून बाहेर आला. अगदी अशीच केस. हा एडमिट व पत्नी मुलं होम क्वारंटाइन! बरं याला त्रास असा काहीच नव्हता. महिन्यापूर्वी त्यांच्या ऑफिसमध्ये एकजण पॉजिटिव्ह सापडला म्हणून सर्वांचीच टेस्ट केली त्यात हा पॉजिटिव्ह आला. मी विचारले जर माहित नसते आणि तुझी टेस्ट केली गेली नसती तर काय झाले असते? त्रास होत नाही लक्षणे नाहीत तर टेस्ट पॉजिटिव्ह आलीच कशी? तर म्हणे टेस्ट मध्ये काही काउंट्स पाहिले जातात (आता पट्कन त्यांची वैद्यकीय भाषेतली संक्षिप्त नावे आठवत नाहीत). ते काउंट्स जर योग्य पातळीपेक्षा अधिक असतील तर ते कोव्हीडचे लक्षण असते. उपचार/काळजी घेतले नाहीत तर नंतर त्रास सुरु होतो. पण तेंव्हा बराच उशीर झालेला असतो. ते ऐकून मी सर्द झालो. अशी या व्हायरस ची मोडस ऑपरेंडी असेल तर ते भयंकर आहे. त्यानेसुद्धा हेच सांगितले. म्हणाला, टेस्ट पॉजिटिव्ह आल्यास आपण घाबरून जातो व ती सर्वात मोठी चूक असते. घाबरून गेल्यास मन नकारात्मक होते. आणि एकदा मनात नकारात्मकता आली कि आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे...

>> आरोग्य जपा. पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला खुप कणखर बनवते.
+१११

तुम्ही केलेले उपाय शेअर केलेत त्याबद्दल अनेकानेक आभार.

अनिष्का, वावे, अतुल धन्यवाद

टेस्ट मध्ये काही काउंट्स पाहिले जातात.,.......
होय अतुल. १-३५ असतात. कितव्या राऊंड ला आपल्या शरिरात कोराना आढळला तो राऊंड म्हणजे काउंट्स . माझा १४ होता. यामध्ये जसे काउंटस वाढतात तसा धोका कमी कमी होत जातो. ३५ नंतर रिझल्ट not detected येतो. लोक याचा बरोबर उलट अर्थ घेतात. हे परसे्न्ट्स आहेत वगैरे वगैरे.... वाढले की धोका वाढतो अशीही चुकीची माहिती आम्हाला मिळाली होती. पण गुगल सर्च केल्यास खरी माहिती मिळते. आणि मिडिया मुळे लोक खुप घाबरलेत... त्यांची सनसनाटी बातमी आज आपल्याला भीती च्या पिंजऱ्यात उभे करते. आणि खरेखोटे समजण्या आधीच आपण शरणागती पत्करलेली असते. तसे करु नका.

अंधेरी च्या आसपास किंवा वेस्टर्न ला कोणीही कोवीड पेशंट असेल आणि काही मदत लागली तर नक्की कळवा. होईल ती मदत करु. रुग्णालय, औषधे किंवा इतर काही माहिती पाहिजे तर विपु मध्ये कळवा. त्वरीत संपर्क केला जाईल.

बापरे. . उचलून घे म्हणून रडणार्‍या बाळापासून लांब राहणे कसे सहन केले असशील? ???? तुमच्या आई नी खूप खूप मोठे काम केले.
आता काही त्रास नाही ना ?

सिद्धी खरंच तुम्ही धीराने यातून बाहेर पडलात त्यासाठी अभिनंदन. अगदी अशीच परिस्थिती माझ्या बहिणीवर आलेली तीला icu मध्ये ठेवावे लागले.... 5 दिवस... 8 वर्षाचा मोठा मुलगा पॉसिटिव्ह पण घरात ... 3 वर्षाची लहान मुलगी आणि भाऊजी निगेटीव्ह. त्यावेळी मी माझ्या 6 वर्ष मुलाला घेऊन तिच्याकडे गेलेले सुट्टी साठी सुदैवाने आम्ही दोघे पण निगेटीव्ह ... मग काय रिपोर्ट बघून काही वेळ काहीच सुचत नव्हते. बहिणीची परिस्थिती खूप अवघड होती तिला श्वास सुद्धा घेता येत नव्हता. पण आम्ही सगळ्यांनी मिळून त्या परिस्थिती वर मात केली. अगदी 3 वर्षे वयाच्या मुलीनं पण खूप साथ दिली ती आईला सोडून 10 दिवस माझ्या सोबत राहिली. ज्यांच्यावर वेळ येते ना तेच समजू शकतात कोरोना काय आहे ते. 10 दिवसाने बहीण घरी आली बरी होऊन ते सुद्धा तिच्या वाढदिवसाच्या दिवशी.

सिद्धी बिग हग, मी समजू शकते तू कश्यातून गेली असशील कारण तुला १४ फेब्रुवारी ला जे गिफ्ट मिळाले ते मला १० जानेवारी ला मिळाले होते. माझ्याही घरातील सगळे पॉझिटिव्ह नशिबाने नवरा सोबत नव्हता म्हणून तो निगेटिव्ह होता. माझा श्रीदत्त तरअवघ्या महिन्याचा होता अन तो सुद्धा पॉझिटिव्ह आला होता.
पण ते ही दिवस गेले, सुदैवाने सगळे ठीक आहोत आता, या सगळ्यात शारीरिक तासापेक्षा मानसिक त्रास जास्त होतो हेच खरे.

कोव्हिडवर मात केल्याबद्दल अभिनंदन. कोव्हिड संसर्ग होण्याचा नुसत्या शरीरावरच नाही, तर एकंदर जगण्यावरच मोठा परिणाम होतो. शरीरावर नाही झाला तरी होतो. तुम्ही सकारात्मक राहिलात हे कौतुकास्पद आहे..

पण तुम्ही जे काही घरगुती उपाय केलेत त्याने कोरोनाला पळवलंत हा काढलेला निष्कर्ष आणि इतरांच्या उपयोगासाठी ते उपाय इथे देणं हे अशास्त्रीय आणि धोकादायक आहे. त्या उपायांनी तुमची प्रतिकारशक्ती वाढायला मदत झाली असेल , कोव्हिडमुळे होऊ शकणा र्‍या त्रासावर आराम पडला किंवा तो झालाच नाही. पण याचा अर्थ ते कोव्हिडवरचे उपाय आहेत असं नाही.

तुमच्या स्वतः च्या प्रतिकारशक्तीने कोव्हिडवर मात केली. कदाचित तुमचा व्हायरल लोड कमी असेल. तुम्ही व्हिटॅमिन सी आणि मिनरल सप्लिमेंट घेत होता असंही लिहिलं आहे. उद्या हे वाचून ज्याची कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे असा कोणी वैद्यकीय सल्ला न घेता या उपायांवर अवलंबून राहिला आणि त्याचे भलतेच परिणाम झाले तर? होम आयसोलेशनच्या केसेसमध्येही वैद्यकीय सल्ला पाळला जातो असं इथे अनेकांनी लिहिलेल्या अनुभवांतून दिसलं आहे. प्रत्येकच बाधिताला सलाइन आणि ऑक्सिजनची गरज भासत नाही.

अतुल, तुमच्या प्रतिसादातलं "त्रास होत नाही लक्षणे नाहीत तर टेस्ट पॉजिटिव्ह आलीच कशी? " हे वाक्य वाचून नवल वाटलं. कोव्हिड पॉझिटिव्ह असलेल्या बहुसंख्य म्हणजे ७०-८० टक्के लोकांना कसलीही लक्षणे नसत . ही सरकारी आकडेवारी आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करताना असे रुग्ण सापडतात. याशिवाय ज्यांच्या टेस्ट होत नाहीत अशांतही कित्येक लोकांना कोव्हिड संसर्ग होऊन गेलेला असतो असंही सर्वेक्षणात दिसतं. म्हणजे लक्षणे दिसणा र्‍या बाधितांचं प्रमाण खूपच कमी आहे.
तुम्हीच लिहिलंत तसं - "महिन्यापूर्वी त्यांच्या ऑफिसमध्ये एकजण पॉजिटिव्ह सापडला म्हणून सर्वांचीच टेस्ट केली : हेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग. कधी शासकी यंत्रणा करतात. कधी लोक स्वतःहून करतात.

त्या काउंटबद्दल डॉ कुमार यांच्याकडून इथे वाचायला आवडेल.

अनु, देवकीताई, धन्वंतरी,मृणाली, सिमंतीनी, अस्मिता, हर्पेन
धन्यवाद!
देवरुप, vb., तुम्ही तुमचे अनुभव इथे शेअर केलेत बरं वाटलं. काळजी घ्या सगळ्यांनी.

भरत- आपले एक वेगळे मत मांडल्या बदल धन्यवाद. इतरांनाही हा प्रश्न पडला असेलच. पण हे देखील बरोबर आहे की,
हे उपाय अशास्त्रीय आणि धोकादायक वगैरे अजिबात नाहीत. युटुब वरती बर्याच डॉक्टर नी हे घरगुती उपाय सांगितले आहेत. आणि आपले आयुर्वेद सगळ्यात महत्त्वाचे शास्त्र आहे. आमची वहिनी स्वतः डॉ आहे, काकु डॉ आहे. ज्या गोळ्या सांगितलया त्याचबरोबर, पहिल्या फोन वरती त्यांनी हे घरगुती उपचार सांगितले होते. तसेच माझ्यासारख्याच एखाद्या लहान मुलाच्या आईने काय करावं. घाबरून जाऊन, हतबल होऊन परिस्थिती ला शरण जाण्यापेक्षा या उपायाने आराम मिळतो आहे तर ते करण्यात कसलाही धोका नाही.
होम आयसोलेशनचा सल्ला मला डॉक्टरांनी दिला आणि गोळ्या, औषधे त्याच बरोबर घरगुती उपाय हे ही त्यांनी सांगितले.
डॉक्टर करू नये असे मी अजिबात सांगणार नाही किंवा सांगितले देखील नाही.
हा माझा एक अनुभव आहे. असेही मी इथे नमूद केले आहे.

आम्ही सुद्धा खुप काळजी घेतली. मी स्वतः गेले वर्षभर डॉक्टर आणि घर याव्यतिरिक्त इतर कुठेही गेलेली नाही. नवर्याचे wfh आहे . इतर सगळे साठीपार कोणीही घराबाहेर पडत नाही. भाजी सकट,कपडे, औषधे सुद्धा online मागवते. पण कुठेतरी आम्ही कमी पडलो, जिथे आम्ही कमी पडलो तिथे त्यांने आम्हाला गाठले.

इतरांनी कितीही सांगितले किंवा मिडिया मध्ये समजले तरीही जेव्हा आपला स्वतःचा Positive रिपोर्ट येतो तेव्हा ते मानायला मन तयार नसते. कारण तेव्हा आपली बारी असते. थोडा ताप बाकी कोणतेही लक्षण नसताना झाला कसा हा प्रश्न आम्हाला ही पडला होता. सगळेच घाबरून जातात. पण तसे करु नका.

<फक्त घरगुती उपाय केले. त्याबरोबरच'पॉझिटिव्ह एनर्जी, विल पॉवर' आणि celine 500, raricap या दोन गोळ्या याच्या जोरावर पळवल त्या कोरोनाला> या वाक्याचा अर्थ काय लागतो?

<(एखाद्याला कोरोना पेशन्टला याचा फायदा व्हावा या एकमेव हेतूने, फक्त एक अनुभव म्हणून मी हे इथे शेअर करत आहे.) > इथे तुम्ही हे उपाय करताना आपल्या डॉक्टरचा सल्ला घ्या असा डिस्क्लेमर द्यायला हवा.

आयुर्वेद तुमच्यासाठी महत्त्वाचे शास्त्र असेल. पण आजार झाल्यावर अ‍ॅलोपथीची ट्रीटमेंट घेतच असाल. आयुर्वेदात आजार विषाणू जीवाणूमुळे होतात हा कन्सेप्ट आहे का? रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे , त्रासावर आराम पडणे यासाठी हे उपाय उपयुक्त आहेत हे मलाही माहीत आहे आणि मान्य आहे. पण तुमच्या लेखातून , विशेषतः त्या वाक्यातल्या फक्त या शब्दामुळे डॉक्टरकडे जायची गरज नाही असा अर्थ निघू शकतो. यासाठी मी लिहिले आहे.

रिपोर्टमधल्या आकड्याबद्दल मी डॉक्टर कुमार यांच्या धाग्यावर प्रश्न विचारला आणि त्यांनी त्वरित उत्तरही दिले आहे.

शीर्षक पाहून आधी धागा उघडला नव्हता. पण हा करोना अनुभवाविषयी धागा आहे हे दुसऱ्या धाग्यावर कळले तेव्हा वाचला.

तुम्ही धैर्याने करोनाला तोंड दिलेत, बऱ्या झाल्या आणि इतरांना कसली मदत लागल्यास ती करण्यास स्वतःहुन तयारी दाखवली याबाबद्दल अभिनंदन व कौतुक.

बाकी भरत यांच्या प्रतिसादाशी बहुतांश सहमत.
"विज्ञान तंत्रज्ञान, वैद्यकीय उपचार कितीही पुढे गेले, तरीही आपल्या आयुर्वेदाला कशाचीही तोड नाही" हे वाचून आश्चर्य वाटलं. करोनासाठी यातील काही उपायांनी काही लक्षणे नियंत्रीत ठेवण्यास मदत होउ शकते, पण हे काही करोना संसर्गावरील उपाय नव्हेत.

लोकांनी करोना झाला तर.. या भीतीने असे उपाय स्वतःहुन सुरू केले आणि त्याचा दुष्परिणामही झाला असे वाचनात आहे.

धन्यवाद मानव. लिंक बघते.
असे कोणते उपाय आणि किती प्रमाणात केले जातात. याचा अतिरेक तर होत नाही ना. हे पाहणे गरजेचे आहे.
मला सुद्धा ही माहिती मिळाली होती. पण गरजेपेक्षा जास्त सेवनाने कोणत्याही गोष्टी चे दुष्परिणाम होऊ शकतात, असा सल्ला मिळाला.

सिद्धी, देवरुप ( बहिणीसाठी ) व व्हिबी. अभिनंदन ! पुढेही काळजी घ्या, स्वतःची व तशीच बाळाची सुद्धा. आणी नेहेमीच पॉझीटिव्ह अ‍ॅप्रोच ठेवा, जो आता तुमच्या कामाला आला. भरत यांच्याशी १००० टक्के सहमत.

>> अतुल, तुमच्या प्रतिसादातलं "त्रास होत नाही लक्षणे नाहीत तर टेस्ट पॉजिटिव्ह आलीच कशी? " हे वाक्य वाचून नवल वाटलं.

कोणतीही लक्षणे नसताना सुद्धा टेस्ट पॉजिटिव्ह येतात हे माहित होतं. पण त्याची नेमकी कारणे काय आहेत हे प्रत्यक्ष त्यातून पार पडलेल्या व्यक्तीला विचारून जाणून घेण्याची उत्सुकता होती. म्हणून मी हा प्रश्न त्याला विचारला. तर त्याने सांगितले कि D Dimer आणि CRP या दोन टेस्ट मध्ये प्रत्यक्ष इन्फेक्शन किती झालेय हे कळते. जर आपण RTPCR (व्यक्ती कोविड पॉजिटिव्ह आहे कि नाही पाहण्यासाठी) केलीच नाही तर हे इन्फेक्शन धोकादायक पातळी गाठते आणि लक्षणे दिसू लागतात. म्हणजे तेंव्हा कदाचित उचाराना उशीर झालेला असू शकतो. म्हणून पॉजिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची सुद्धा प्रोएक्टीव्हली RTPCR करतात. जे खरेच तर्कसंगत व पटण्यासारखे आहे. माझी शंका प्रातिनिधिक आहे असे वाटल्याने इथे शेअर केले.

>> शीर्षक पाहून आधी धागा उघडला नव्हता.

मी शीर्षक वाचून उघडला Happy अर्थात कोविड मधून गेलेल्या व्यक्तीचा अनुभव सुद्धा वाचायचा होताच. पण मला वाटतेय धाग्याच्या शीर्षकात १४ फेब्रुवारी सोबत कोविड सुद्धा उल्लेख केला तर धागा योग्य ऑडीयन्स पर्यंत पोहोचण्यास मदत होईल. शिवाय ललितलेखन सोबत आरोग्यम् धनसंपदा मध्ये सुद्धा येऊ द्या.

>> तरीही आपल्या आयुर्वेदाला कशाचीही तोड नाही

या वाक्यावरून प्रतिसाद येतील हे अपेक्षितच होते. म्हणून मी माझ्या वरच्या प्रतिसादात सुद्धा "तुम्ही केलेले उपाय" इतकेच म्हटले आहे. कारण त्याचा फार फार तर मानसिक बल आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयोग होऊ शकेल (हे हि नसे थोडके). पण भरत आणि मानव यांच्या प्रतिसादांत लिहिल्यानुसार "विज्ञान तंत्रज्ञान, वैद्यकीय उपचार कितीही पुढे गेले, तरीही आपल्या आयुर्वेदाला कशाचीही तोड नाही" "रामबाण उपाय सापडले" अशा वाक्यांमुळे काही वाचक misguide होऊ शकतात हे सुद्धा खरे आहे. धाग्यामध्ये तिथे योग्य ते बदल करावेत असे वाटते.

सगळ्यांचे आभार!
अतुल धन्यवाद.‌.. नक्कीच आवश्यक ते बदल करते.

@भरत.
मला जी माहिती त्याने पुरवली त्यानुसार, संशय असेल (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग द्वारे इत्यादी) तर आधी RTPCR करतात. ती पॉजिटिव्ह आली तरच इन्फेक्शन किती आहे पाहण्यासाठी D Dimer आणि CRP करतात. पण हो, RTPCR पॉजिटिव्ह व्यक्ती सुद्धा asymptomatic असू शकते. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचे उत्तर असे द्यावे लागेल:
Asymptomatic व्यक्ती RTPCR मध्ये पॉजिटिव्ह आढळली तर इन्फेक्शन किती आहे पाहण्यासाठी D Dimer आणि CRP करतात

Covid ha जीवघेणा आजार नाही
Sars २ विषाणू ची बदनामी भांडवलदारी वृत्तीचे लोक करत आहेत.
पण हे काही covid नी स्वर्ग वासी झालेले नाहीत

सध्या कोविड झालाय. झाला होता असे सांगायलाही काही जण घाबरत आहेत. तुम्ही सगळे या भयानक संकटातून सुखरूप बाहेर आलात त्याबद्दल संपुर्ण कुटुंबाचे अभिनंदन आणि तुमचे सकारात्मक विचार आणि उपचार आमच्या पर्यंत पोहचविले त्याबद्दल तुमचे विशेष आभार. काळजी घेणे सुरूच ठेवा. माझ्या माहितीतल्या काही जणांना २ वेळा या आजाराने ग्रासले आहे.

Pages