कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण

Submitted by कुमार१ on 7 December, 2020 - 07:30

या विषयाचे आधीचे संदर्भ :

१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)

२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)

३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य (https://www.maayboli.com/node/75809)

४. ( पूरक विषय) : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन (https://www.maayboli.com/node/76797) )

मागील चर्चेत आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
………………………………………..

करोना सार्स-२ या दुष्ट विषाणूने मानवजातीवर हल्ला केल्याला आता एक वर्ष झाले. त्यातून उदभवला कोविड१९ हा आजार. त्याची साथ आली आणि तिची व्याप्ती वाढत ती महासाथ झाली. त्यातून खूप लोक आजारी पडले. काहींचा आजार सौम्य राहिला तर काहींचा गंभीर होऊन ते मृत्युमुखी देखील पडले. महासाथ आटोक्यात आणण्यासाठी जगातील बहुतेक देशांना टाळेबंदीसारखे कठोर उपाय अमलात आणावे लागले. त्यातून अर्थव्यवस्थेची प्रचंड हानी झाली. अनेकांचे रोजगार बुडाल्याने सामाजिक मनस्वास्थ्य हरवले. पुढे काही देशांत आजाराचे प्रमाण कमी झाले आणि आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले. पण अन्य काहींत प्रमाण पुन्हा एकदा वाढल्याने ‘दुसरी लाट’ निर्माण झाली. या आजाराच्या वर्षपूर्ती निमित्ताने गेल्या वर्षातील त्यासंबंधीच्या ठळक घडामोडींचा हा मागोवा :

डिसेंबर 2019 :
चीनच्या वुहान प्रांतात न्युमोनिया या आजाराचे काही रुग्ण आढळले आणि त्याचे कारण अज्ञात होते.
* 31 डिसेंबरला या नव्या आजाराची WHOच्या दप्तरी नोंद झाली. करोना-सार्स २ हा विषाणू तर कोविड-१९ हा त्याचा आजार, अशी अधिकृत नावे दिली गेली.

जानेवारी 2020 :
* या आजाराचे RT-PCR या चाचणीने निदान झालेला पहिला रुग्ण अमेरिकेत आढळला.
* हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो हे स्पष्ट झाले.
* WHOने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली.

फेब्रुवारी :
बहुतेक देशात आंतरराष्ट्रीय विमानसेवांवर निर्बंध. परदेशातून आलेल्या व्यक्तीस 14 दिवसांचे विलगीकरण लागू.

मार्च :

* 11 मार्च रोजी WHO कडून कोविडची महासाथ जाहीर.
* HCQ या पारंपरिक औषधाचा वापर सुरू.
* संसर्ग साखळी रोखण्यासाठी बऱ्याच देशात टाळेबंदी जाहीर.
* भारतीय रेल्वेच्या १६७ वर्षांच्या इतिहासात (संप वगळता) प्रथमच प्रवासी सेवा काही काळ पूर्ण बंद.

एप्रिल-मे :

* Remdesivir औषधाला तातडीच्या उपचारासाठी मान्यता.
* रोगविरोधी लसनिर्मितीचे सूतोवाच.
* अमेरिकेतील मृत्यूंची संख्या एक लाखांवर पोचली

जुलै :
हा आजार हवेतील सूक्ष्मकणांच्याद्वाराही पसरत असल्याचे WHOचे निवेदन. तसेच बाधित पण लक्षणविरहीत लोकांकडूनही त्याचा प्रसार होत असल्याचे निवेदन.

ऑगस्ट :
बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातून काढलेल्या रक्तद्रवाच्या उपचारास मान्यता.

सप्टेंबर :
जागतिक कोविडमृत्यूंचा आकडा १० लाखांवर पोचला.

ऑक्टोबर
:
* Remdesivir ला अमेरिकी औषध प्रशासनाकडून अधिकृत औषधाची मान्यता (पण पुढे याबाबत WHOने नकारात्मक शेरा दिला).
• भारतात कोविडमृत्यूंचा आकडा १ लाखावर पोचला.

नोव्हेंबर : दुहेरी अँटीबॉडी उपचारास तातडीच्या वापरासाठी मान्यता.

डिसेंबर २०२० :
• काही लसी प्रयोगसिद्ध होऊन मान्यताप्राप्त. वितरणास तयार. चीनमध्ये लाखो लोकांना त्यांची लस दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध. रशियाने पण सुरवात केली. इंग्लंड ८ डिसेंबरला लसीकरण सुरु करण्याच्या तयारीत.
• आज अखेरीस या आजारावर निर्विवाद असे प्रयोगसिद्ध रामबाण औषध उपलब्ध नाही. त्यामुळे रोगप्रतिबंधावर अधिक लक्ष केंद्रित.
...............

समाजात या निव्वळ नैसर्गिक आजारातून पुरेशी सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे लसीकरणाची कल्पना पुढे आली. वर उल्लेख केल्याप्रमाणे संबंधित लस नव्याने निर्माण करून त्याचे काहीसे घाईतच प्रयोग केले गेलेत. लसीच्या अनेक उत्पादनांपैकी काही आता प्रयोगसिद्ध होऊन वापरासाठी तयार आहेत. लस देताना अर्थातच सामाजिक प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. ती सर्व नागरिकांना द्यायची की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. RNA तंत्रज्ञानावर आधारित लसी या नव्यानेच निर्माण केलेल्या आहेत. त्यांची उपयुक्तता आणि दुष्परिणाम अनुभवातून समजतील. लसीकरणातून महासाथ कशी आटोक्यात येते हे यथावकाश समजेल. आपण तसे स्वप्न बघावे अशी WHOने इच्छा व्यक्त केली आहे !

लसीसंबंधी आणि संबंधित घडामोडीबाबाबत चर्चा करण्यासाठी हा नवा धागा.
एव्हाना या आजारावर या धाग्यासह ५ धागे निर्माण झालेले आहेत. आता हा आजार लवकरात लवकर सामान्य होऊन आटोक्यात येवो ही इच्छा. जेव्हा तो सामान्य सर्दीपडशाप्रमाणे समाजात दखलपात्र राहणार नाही, तेव्हा अशा चर्चाधाग्यांचे प्रयोजनही संपेल. तसे लवकरात लवकर होवो आणि हे सर्व धागे इ-रद्दीत जावोत हीच आंतरिक इच्छा !
.............................................................................
चित्र जालावरुन साभार !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोविशिल्ड तयार करणाऱ्या पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट मध्ये भीषण आग:
https://www.ndtv.com/india-news/fire-breaks-out-at-building-under-constr...
आगीमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याचे नुकतेच रेडियोच्या बातम्यांमध्ये ऐकले .

मृतांना आदरांजली.
कोविशिल्ड लसीचा विभाग सुरक्षित आहे हे चांगले झाले

कुमार सर, I have a question about the covid vaccines administered in India. Is taking blood thinners a contraindication for either of the vaccines? If so, why? धन्यवाद!

आता पर्यंत अनेक साथी आल्या आणि गेल्या पण कविड विषयी उलट सुलट मत स्वतःला तज्ञ समजणाऱ्या व्यक्ती नी व्यक्त केली असे पहिल्या वेळेस च घडले .
अजुन सुधा covid म्हणजे काय ह्या विषयी एकमत नाही.
ज्या प्रतिबंधक लसी निर्माण केल्या आहेत त्या लसी किती परिमाण कारक असतील ह्या विषयी एकमत नाही.
अविसरमिय साथ होती ही.

जिज्ञासा, चांगला प्रश्न.
इथे (https://www.mohfw.gov.in/pdf/LetterfromAddlSecyMoHFWregContraindications...) भारत सरकारचे यासंदर्भातील अधिकृत मार्गदर्शक पत्रक आहे.

त्यानुसार रक्तस्त्राव अथवा रक्त गोठण्याचे दोष ज्या व्यक्तींना आहेत त्यांना भारतीय लसी योग्य ती खबरदारी घेऊन (with caution) द्याव्यात, असे म्हटले आहे.

ज्यांना रक्त पातळ करण्याची औषधे काही आजारांसाठी चालू असतील, त्यांच्याबाबतीत संबंधित आजार काय आहे ते प्रथम पाहावे लागेल. मुख्य म्हणजे ज्या डॉ ने संबंधित औषधे चालू केलेली असतील त्याचा सल्ला याबाबतीत सर्वात महत्त्वाचा ठरेल.

सरसकट असे कुठलेही विधान इथून करता येणार नाही.

There is no problem in administering Covaxin and Covishield to people who are on blood thinners such as aspirin and clopidogrel, contrary to what currently appears in the factsheets of the two Covid-19 vaccines, Indian Council of Medical Research (ICMR) Director General Dr Balram Bhargava said Thursday.
https://theprint.in/health/covaxin-covishield-safe-for-those-on-aspirin-...

मानव +१
इथे रक्त पातळ करणाऱ्या औषधांच्या दोन उपप्रकारांमध्ये काही फरक आहे.
१. पहिल्या गटात aspirin व clopidogrel ही औषधे मोडतात. ती चालू असणाऱ्यांना ही लस घेण्यात काहीच अडचण नाही.

२. दुसऱ्या गटात Heparin हे औषध मोडते. अशा रुग्णांना जर लसीचे इंजेक्शन दिले, तर इंजेक्शनच्या ठिकाणी रक्तस्त्राव होऊन रक्तगाठ (hematoma) होण्याचा धोका असतो. अशांच्या बाबतीत डॉक्टरांच्या सल्ल्यानेच काय ते ठरवावे, असा वरील माहितीचा सारांश आहे.

डॉक्टर, करोना मुळे पुरुषांच्या शुक्रजंतूवर परिणाम होतो हे खरे आहे काय ?

साद,
पुरुषाचे अंडकोष हे करोना-२ आणि अन्य काही विषाणूंना संवेदनशील आहे. आजाराच्या तीव्रतेनुसार शुक्रजंतूवर परिणाम होऊ शकतो. पण बऱ्याच वेळा तो तात्पुरत्या स्वरूपाचा असतो.

कोविडसंदर्भात आतापर्यंत अशी 14 संशोधने प्रसिद्ध झालीत. काही अभ्यासात असे दिसले, की मध्यम स्वरूपाचा आजार झालेल्यांत शुक्रजंतूचे प्रमाण, रचना आणि त्यांच्या हालचालींवर विपरीत परिणाम होतो. अर्थात हे अभ्यास लघु मुदतीचे होते. त्यामुळे यावरून दीर्घकालीन परिणामांचा निष्कर्ष काढता येणार नाही. तसेच संबंधित रुग्णांबाबतचे खालील मुद्दे ही विचारात घ्यावे लागतील :

१.रुग्णांचा लठ्ठपणा
२. उपचारांसाठी दिलेली विविध विषाणूविरोधी औषधे. यांचाही शुक्राणूवर दुष्परिणाम होऊ शकतो.

सारांश : सध्याचे संशोधन हे निष्कर्ष काढण्यास अपुरे आहे. कालांतराने अधिक प्रकाश पडेल.

लाळेच्या माध्यमातून करोनावरील चाचणी शोधून काढणाऱ्या वैज्ञानिक अँड्रय़ू ब्रूक्स यांचे निधन
(https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/andrew-brooks-profile-abn-97-2...)

आदरांजली !

मला पहिला डोस मिळाला

प्रिय DR. GAJ***********AR,
आपले कोव्हीड-19 लसीकरणाचे सत्र 05-02-2021 रोजी 09:00 AM to 05:00 PM वाजताच्या दरम्यान Shatabdi Hospital 1(Vaman Tukram Patil Marg Govandi ) (https://tinyurl.com/y4uvzjs2) येथे ठरवण्यात (ठेवण्यात) आलेले आहे. कृपया नोंदणी करताना जमा केलेला आपला फोटो आयडी सोबत न्या. (आणा.) - CoWIN

सॉफ्ट वेअर आहे , नाव टाकून आयडी पॅन वगैरे चेक करतात

आमचे आमच्यच दवाखान्यात झाले

इंजेक्शन देऊन अर्धा तास थांबवतात

किरकोळ ताप येऊ शकतो

सूज , उलटी , मोठी लक्षणे दिसल्यास एक कॉल सेंटरचा नंबर आहे , त्याला फोन करायचा

BC,
शुभेच्छा !
अनुभव जरूर लिहा

बहुतेक नाही.
पेपरातील बातम्या नुसार ते तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे.

अजून पहिलाच टप्पा चालू असावा

कोविड लसींच्या प्रकारांमध्ये फायझर व मॉडर्नच्या लसी या एम-आरएनए तंत्रज्ञानाने बनवलेल्या आहेत. यानिमित्ताने या नव्या तंत्राचे अन्य काही उपयोग दृष्टिक्षेपात आहेत.

एम-आरएनए या नव्या तंत्रज्ञानाचे अन्य काही गंभीर आजारांमध्येही औषध (उपचार ) म्हणून उपयोग होऊ शकतील. त्या दृष्टीने गेली काही वर्षे संशोधन प्रगतिपथावर आहे.

या संदर्भात एम-आरएनए हे एक प्रकारे “आयुष्याचे सॉफ्टवेअर’ म्हणून काम करते असे संशोधकांचे म्हणणे आहे. अर्थात या संशोधनाला बराच काळ जावा लागणार आहे. काही संशोधने प्रयोगावस्थेत आहेत.
भविष्यात हे तंत्रज्ञान खालील आजारांसाठी उपचार म्हणून प्रभावी ठरू शकते :

• जनुकीय आजार
• एचआयव्ही
• काही प्रकारचे हृदयविकार आणि
• बऱ्याच अवयवांचे कर्करोग

१ मार्च म्हणजे उद्यापासून देशभर कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु होत आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाईन वर्कर्सना लसीकरण करण्यात आलं. दुसऱ्या टप्प्यात सामान्य नागरिकांना लस देण्यात येणार आहे. खाजगी रुग्णालयांसाठी केंद्र सरकारने कोरोना लसीची किंमत 250 रुपये इतकी निश्चित केली आहे. खासगी रुग्णालये कोरोनाच्या लसीच्या प्रत्येक डोसाठी 250 रुपये शुल्क आकारू शकतात. म्हणजे एकूण दोन डोससाठी 500 लागतील. उद्यापासून देशात 60 वर्षांपेक्षा जास्त व 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांना लस देण्याची तयारी सुरु आहे. कोरोनाची लस सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत दिली जाणार आहे.

Colchicine हे औषध गाऊटच्या उपचारांसाठी वापरले जाते.

त्याचा उपयोग कोविडच्या सुरवातीच्या अवस्थेत होऊ शकेल असे गृहीतक आहे. त्या संदर्भात कॅनडातील
प्रयोग आशादायी ठरलेत.

आता इंग्लंडमध्येही त्याचे प्रयोग अभ्यास सुरू झालेत.

कुमारजी, काल एक बातमी वाचली की कोरोना विषाणू पूर्वी पेक्षा जास्त वेळा म्युटेट होत आहे.

https://timesofindia.indiatimes.com/india/covid-bluru-samples-show-11-mutations-each-virus-mutating-faster-than-before/articleshow/81333377.cms

मला वैद्यकीय ज्ञान नाही पण सामान्य माणसाला पडणारे 3 प्रश्न विचारत आहे,
1. कोणत्याही विषाणूंचे एवढ्या कमी वेळात इतक्या वेळा म्युटेट होणे नॉर्मल आहे का?
2. जर तो इतक्या वेळा बदलत आहे आणि पूढे पण बदलत राहिला तर त्याची तीव्रता कमी होईल की वाढेल?
3. असाच बदलत राहिला तर ज्या Assumptions वर सध्याच्या लसी बनवल्या आहेत त्या काम करतील का त्या पण बदलाव्या लागतील?

Pages