कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण

Submitted by कुमार१ on 7 December, 2020 - 07:30

या विषयाचे आधीचे संदर्भ :

१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)

२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)

३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य (https://www.maayboli.com/node/75809)

४. ( पूरक विषय) : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन (https://www.maayboli.com/node/76797) )

मागील चर्चेत आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
………………………………………..

करोना सार्स-२ या दुष्ट विषाणूने मानवजातीवर हल्ला केल्याला आता एक वर्ष झाले. त्यातून उदभवला कोविड१९ हा आजार. त्याची साथ आली आणि तिची व्याप्ती वाढत ती महासाथ झाली. त्यातून खूप लोक आजारी पडले. काहींचा आजार सौम्य राहिला तर काहींचा गंभीर होऊन ते मृत्युमुखी देखील पडले. महासाथ आटोक्यात आणण्यासाठी जगातील बहुतेक देशांना टाळेबंदीसारखे कठोर उपाय अमलात आणावे लागले. त्यातून अर्थव्यवस्थेची प्रचंड हानी झाली. अनेकांचे रोजगार बुडाल्याने सामाजिक मनस्वास्थ्य हरवले. पुढे काही देशांत आजाराचे प्रमाण कमी झाले आणि आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले. पण अन्य काहींत प्रमाण पुन्हा एकदा वाढल्याने ‘दुसरी लाट’ निर्माण झाली. या आजाराच्या वर्षपूर्ती निमित्ताने गेल्या वर्षातील त्यासंबंधीच्या ठळक घडामोडींचा हा मागोवा :

डिसेंबर 2019 :
चीनच्या वुहान प्रांतात न्युमोनिया या आजाराचे काही रुग्ण आढळले आणि त्याचे कारण अज्ञात होते.
* 31 डिसेंबरला या नव्या आजाराची WHOच्या दप्तरी नोंद झाली. करोना-सार्स २ हा विषाणू तर कोविड-१९ हा त्याचा आजार, अशी अधिकृत नावे दिली गेली.

जानेवारी 2020 :
* या आजाराचे RT-PCR या चाचणीने निदान झालेला पहिला रुग्ण अमेरिकेत आढळला.
* हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो हे स्पष्ट झाले.
* WHOने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली.

फेब्रुवारी :
बहुतेक देशात आंतरराष्ट्रीय विमानसेवांवर निर्बंध. परदेशातून आलेल्या व्यक्तीस 14 दिवसांचे विलगीकरण लागू.

मार्च :

* 11 मार्च रोजी WHO कडून कोविडची महासाथ जाहीर.
* HCQ या पारंपरिक औषधाचा वापर सुरू.
* संसर्ग साखळी रोखण्यासाठी बऱ्याच देशात टाळेबंदी जाहीर.
* भारतीय रेल्वेच्या १६७ वर्षांच्या इतिहासात (संप वगळता) प्रथमच प्रवासी सेवा काही काळ पूर्ण बंद.

एप्रिल-मे :

* Remdesivir औषधाला तातडीच्या उपचारासाठी मान्यता.
* रोगविरोधी लसनिर्मितीचे सूतोवाच.
* अमेरिकेतील मृत्यूंची संख्या एक लाखांवर पोचली

जुलै :
हा आजार हवेतील सूक्ष्मकणांच्याद्वाराही पसरत असल्याचे WHOचे निवेदन. तसेच बाधित पण लक्षणविरहीत लोकांकडूनही त्याचा प्रसार होत असल्याचे निवेदन.

ऑगस्ट :
बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातून काढलेल्या रक्तद्रवाच्या उपचारास मान्यता.

सप्टेंबर :
जागतिक कोविडमृत्यूंचा आकडा १० लाखांवर पोचला.

ऑक्टोबर
:
* Remdesivir ला अमेरिकी औषध प्रशासनाकडून अधिकृत औषधाची मान्यता (पण पुढे याबाबत WHOने नकारात्मक शेरा दिला).
• भारतात कोविडमृत्यूंचा आकडा १ लाखावर पोचला.

नोव्हेंबर : दुहेरी अँटीबॉडी उपचारास तातडीच्या वापरासाठी मान्यता.

डिसेंबर २०२० :
• काही लसी प्रयोगसिद्ध होऊन मान्यताप्राप्त. वितरणास तयार. चीनमध्ये लाखो लोकांना त्यांची लस दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध. रशियाने पण सुरवात केली. इंग्लंड ८ डिसेंबरला लसीकरण सुरु करण्याच्या तयारीत.
• आज अखेरीस या आजारावर निर्विवाद असे प्रयोगसिद्ध रामबाण औषध उपलब्ध नाही. त्यामुळे रोगप्रतिबंधावर अधिक लक्ष केंद्रित.
...............

समाजात या निव्वळ नैसर्गिक आजारातून पुरेशी सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे लसीकरणाची कल्पना पुढे आली. वर उल्लेख केल्याप्रमाणे संबंधित लस नव्याने निर्माण करून त्याचे काहीसे घाईतच प्रयोग केले गेलेत. लसीच्या अनेक उत्पादनांपैकी काही आता प्रयोगसिद्ध होऊन वापरासाठी तयार आहेत. लस देताना अर्थातच सामाजिक प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. ती सर्व नागरिकांना द्यायची की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. RNA तंत्रज्ञानावर आधारित लसी या नव्यानेच निर्माण केलेल्या आहेत. त्यांची उपयुक्तता आणि दुष्परिणाम अनुभवातून समजतील. लसीकरणातून महासाथ कशी आटोक्यात येते हे यथावकाश समजेल. आपण तसे स्वप्न बघावे अशी WHOने इच्छा व्यक्त केली आहे !

लसीसंबंधी आणि संबंधित घडामोडीबाबाबत चर्चा करण्यासाठी हा नवा धागा.
एव्हाना या आजारावर या धाग्यासह ५ धागे निर्माण झालेले आहेत. आता हा आजार लवकरात लवकर सामान्य होऊन आटोक्यात येवो ही इच्छा. जेव्हा तो सामान्य सर्दीपडशाप्रमाणे समाजात दखलपात्र राहणार नाही, तेव्हा अशा चर्चाधाग्यांचे प्रयोजनही संपेल. तसे लवकरात लवकर होवो आणि हे सर्व धागे इ-रद्दीत जावोत हीच आंतरिक इच्छा !
.............................................................................
चित्र जालावरुन साभार !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉक्टर, काही कारणास्तव जर दुसरी लस २९व्या दिवशी घेता आली नाही तरी ४० व्या दिवसापर्यंत घेतली तरी चालते हे खरे आहे का?

<< मी फायझरची पहिली लस घेतली . काहीही त्रास झाला नाही. मला दुसऱ्या वेळी त्रास होण्याची शक्यता आहे का ?? >>

मी दोन्ही डोस घेतले आहेत. दोन्ही वेळी काहीही त्रास झाला नाही.

VB,
कोविशील्डच्या दोन डोस मधील अंतर जर तीन महिने ठेवलं तर त्याची परिणामकारकता वाढते असा एक अभ्यास लॅन्सेट मध्ये प्रसिद्ध झाला आहे.
परंतु भारतात मात्र 28 दिवसांचेच अंतर ठेवण्याचे ठरले आहे.

माझ्यामध्ये जर काही कारणाने तो दिवस चुकला तर जरा उशिरा घेण्यात काही नुकसान नाही.

https://science.thewire.in/health/india-retains-short-dose-gap-for-covis...

मलापण 4 दिवस लेट झाला
चालते तितके

दुसऱ्या डोसनंतर लगेच मेसेज येतो , त्याला क्लिक केले की मोदीमुद्रा असलेले सर्टीफिकेट मिळते

कोव्हॅक्सिन घेतलेले कोणी आहे का इथे?
कुमारसर तुमचा काय सल्ला राहील?
सध्या कोविशिल्ड देणं शॉर्टेजमुळे थांबवलय असं ऐकलं।

करोना-2 च्या जनुकीय बदलाने सुमारे १६ नवे विषाणू-अवतार अस्तित्वात आले आहेत. त्यापैकी हे पूर्वीच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहेत. त्यापैकी चौघे सद्य लसींना मध्यम प्रमाणात विरोध करणारे (evasion) आहेत, तर एक अल्प विरोध करणारा आहे.

डब्ल्यूएचओने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या माहितीचा हा संक्षेपित तक्ता :

cov varaiants new.jpg

दुसरा डोस बरोबर 28व्या दिवशी घेतला तर चालतो का की 28 दिवस पूर्ण होऊन 29 व्या दिवशी घ्यावा लागेल?
18 फेब्रुवारी ला पहिल इंजेक्शन घेतलं आहे,त्याचा कोणताही msg सर्टिफिकेट मिळालं नाही,फक्त पहिल्या साठी फोन आला होता,
दुसऱ्या डोस साठी अजूनही फोन आलेला नाही,पण तिकडेच जवळपास एक काम निघालं आहे तर घेतला तर चालेल का दुसरा डोस की उद्या घ्यावा?

आदू
इतके काटेकोर नाही. १-२ दिवस पुढे चालेल.
...
हा प्र पाहा :
कोविशील्डच्या दोन डोस मधील अंतर जर तीन महिने ठेवलं तर त्याची परिणामकारकता वाढते असा एक अभ्यास लॅन्सेट मध्ये प्रसिद्ध झाला आहे.
परंतु भारतात मात्र 28 दिवसांचेच अंतर ठेवण्याचे ठरले आहे.

माझ्यामध्ये जर काही कारणाने तो दिवस चुकला तर जरा उशिरा घेण्यात काही नुकसान नाही.

https://science.thewire.in/health/india-retains-short-dose-gap-for-covis...

Submitted by कुमार१ on 17 March, 2021 - 09:15

आमच्या गावात मोडेर्ना, फाईझर आणि जॉन्सन अँड जॉन्सन असे तीन पर्याय आहेत. कुठला पर्याय त्यावरुन लसीकरण कुठे व कधी ते ठरेल. त्यातले काय निवडावे याबद्दल मनात फार गोंधळ झाला आहे. काय करावे?

स्वाती,
अमेरिकेतील Pfizer & Moderna ची परिणामकारकता 94 ते 95 टक्के दाखवली आहे, तर जॉन्सनची 72%.
जॉन्सनचा एकच डोस घ्यायचा आहे हा एक फायदा दिसतो.

तुम्ही तुमच्या परिचयातील डॉक्टरांशी चर्चा करून ठरवू शकता.

सहसा निवडस्वातंत्र्य देत नाहीत. केंद्रावर जी लस असेल ती घ्यावी लागते. निवडायचे स्वातंत्र्य असेल तर फायजर बरी कारण व्हेरियंट्स बद्दल डाटा आहे. मॉडर्ना व इतरही चांगल्या आहेत पण अजून व्हेरियंट्स बद्द्ल डाटा आलेला ऐकीवात नाही. जी मिळेल ती घ्यावी.

सगळ्या कम्पण्यांचे सगळे डोस घेतले तर काय होइल ? Rofl ,आज सेम माझ्या मैत्रिणी बाबत झालं हे,
आज तिनेअसंच विचारलं डोस देणाऱ्या सिस्टर ला,खरं म्हणजे सर्टिफिकेट नव्हतं म्हणून तिला नक्की सांगता येत नव्हतं पहिल्या वेळी कोविशील्ड घेतलं होतं की कॉवीक्सिन
शेवटी तिला विचारलं,काय फरक पडेल का?एक वेगळा एक वेगळा द्या म्हणजे दोन्ही प्रकारच्या इम्मूनुटी येतील.त्या सिस्टरने ज्या नजरेने पाहिलं की ज्याचे नाव ते।, Lol

कोव्हीशिल्ड च्या लसीच्या कमतरतेबद्दल बातम्यांमध्ये दाखवत आहेत, मग ज्यांना पहिला डोस मिळाला आहे त्यांचे काय होणार? २८ दिवसात जर परत लस उपलब्ध झाली नाही तर काय करतील?

कोविड, बाळंतपण आणि फुप्फुसरोपण : अमेरिकेतील अभूतपूर्व घटना

31 वर्षांची एक तरुणी. गरोदरपणाचे 36 आठवडे पूर्ण झालेले. अचानक तिला खोकला व दम लागतो. रुग्णालयात दाखल. कोविडचे निदान. एक आठवड्यात डॉक्टर तिचे बाळंतपण घडवून आणतात.

बाळ झाल्यावर या तरुणीला न्यूमोनिया होतो - अगदी गंभीर. व्हेंटिलेटर, ECMO वर देखील ठेवावे लागले. फुफ्फुसात बिलकुल सुधारणा नाही; दोन्ही अगदी निकामी झालेली. सुदैवाने १० दिवसांत फुफ्फुसदाता मिळाला. मग दोन्ही फुफ्फुसांचे प्रत्यारोपण करण्यात आले.

आता तब्येत उत्तम.
रुग्णास शुभेच्छा आणि डॉक्टरांच्या चमूचे अभिनंदन !

https://www.freep.com/story/news/local/michigan/2021/03/17/wyandotte-dou...

बापरे,
बरं झालं सर्व सुरळीत झालं ते.
बाळाला व मातेला शुभेच्छा

दोन आठवड्यांपूर्वी जेंव्हा महाराष्ट्रात रुग्ण संख्या वाढायला लागली होती तेंव्हा डॉ. तात्याराव लहाने यांची एका चॅनेलवर मुलाखत पहिली होती. तेंव्हा त्यांचे मत असे होते की ही रुग्णवाढ तात्पुरती आहे आणि भारतात दुसरी लाट येण्याची शक्यता नगण्य आहे. रुग्णसंख्येत चढ उतार चालू असतात. आताची परिस्थिती पाहता त्यांचे अनुमान पूर्णतः चुकीचे होते. काल पुण्यात म्हणे आजवरची सर्वात मोठी रुग्णवाढ झाली (4900 ). कोविड बाबतीत भल्या भल्या तज्ज्ञांची मते चुकलेली ह्या आधी ही पाहिली आहेत. हा आजार अजूनही आपल्याला समजला नाही हेच खरे.

आताची परिस्थिती पाहता त्यांचे अनुमान पूर्णतः चुकीचे होते. >> काय माहिती? डॉ. तात्याराव लहाने यांचे अनुमान चुकीचे आहे की रुग्ण्वाढीचे आकडे चुकीचे आहेत?
वर्तमानपत्रात आलेल्या बातमीनुसार खाजगी लॅब मध्ये जे लोक टेस्ट्स करतात त्यातील ५०% लोक Covid positive येत आहेत आणि सरकारी लॅब मध्ये हे प्रमाण २५ ते ३० % एवढेच आहे. त्यामुळे अनेक खाजगी लॅब ची आता चौकशी करण्यात येणार आहे.

पुण्यात फार भीषण परिस्थिती आहे. हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत. सप्टेंबर मध्ये जशी परिस्थिती होती अगदी तशीच. त्यामुळे रुग्णवाढीला खाजगी लॅबची सदोष टेस्ट्स कारणीभूत असतील असे नाही वाटत.

वरील चार प्रतिसाद वाचून मी थोडा विचार केला. माध्यमातील बातम्या आणि वास्तव हा एक गहन विषय आहे.

मग मी माझ्या दोन सहकारी डॉक्टर मित्रांकडे विचारणा केली. त्यापैकी एक पुण्यातील राज्य शासनाच्या तर दुसरा मुंबईच्या महापालिका रुग्णालयामध्ये आहे. दोघांनीही साधारण सारखेच उत्तर दिले. ते जसेच्या तसे इथे लिहितो :

कोविड संदर्भातील इथली परिस्थिती खरोखर भीषण आहे. असे असूनही सामान्य लोक अजूनही पुरेशी जागरुकता दाखवत नाहीत याचा खेद वाटतो”.

Pages