कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण

Submitted by कुमार१ on 7 December, 2020 - 07:30

या विषयाचे आधीचे संदर्भ :

१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)

२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)

३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य (https://www.maayboli.com/node/75809)

४. ( पूरक विषय) : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन (https://www.maayboli.com/node/76797) )

मागील चर्चेत आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
………………………………………..

करोना सार्स-२ या दुष्ट विषाणूने मानवजातीवर हल्ला केल्याला आता एक वर्ष झाले. त्यातून उदभवला कोविड१९ हा आजार. त्याची साथ आली आणि तिची व्याप्ती वाढत ती महासाथ झाली. त्यातून खूप लोक आजारी पडले. काहींचा आजार सौम्य राहिला तर काहींचा गंभीर होऊन ते मृत्युमुखी देखील पडले. महासाथ आटोक्यात आणण्यासाठी जगातील बहुतेक देशांना टाळेबंदीसारखे कठोर उपाय अमलात आणावे लागले. त्यातून अर्थव्यवस्थेची प्रचंड हानी झाली. अनेकांचे रोजगार बुडाल्याने सामाजिक मनस्वास्थ्य हरवले. पुढे काही देशांत आजाराचे प्रमाण कमी झाले आणि आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले. पण अन्य काहींत प्रमाण पुन्हा एकदा वाढल्याने ‘दुसरी लाट’ निर्माण झाली. या आजाराच्या वर्षपूर्ती निमित्ताने गेल्या वर्षातील त्यासंबंधीच्या ठळक घडामोडींचा हा मागोवा :

डिसेंबर 2019 :
चीनच्या वुहान प्रांतात न्युमोनिया या आजाराचे काही रुग्ण आढळले आणि त्याचे कारण अज्ञात होते.
* 31 डिसेंबरला या नव्या आजाराची WHOच्या दप्तरी नोंद झाली. करोना-सार्स २ हा विषाणू तर कोविड-१९ हा त्याचा आजार, अशी अधिकृत नावे दिली गेली.

जानेवारी 2020 :
* या आजाराचे RT-PCR या चाचणीने निदान झालेला पहिला रुग्ण अमेरिकेत आढळला.
* हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो हे स्पष्ट झाले.
* WHOने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली.

फेब्रुवारी :
बहुतेक देशात आंतरराष्ट्रीय विमानसेवांवर निर्बंध. परदेशातून आलेल्या व्यक्तीस 14 दिवसांचे विलगीकरण लागू.

मार्च :

* 11 मार्च रोजी WHO कडून कोविडची महासाथ जाहीर.
* HCQ या पारंपरिक औषधाचा वापर सुरू.
* संसर्ग साखळी रोखण्यासाठी बऱ्याच देशात टाळेबंदी जाहीर.
* भारतीय रेल्वेच्या १६७ वर्षांच्या इतिहासात (संप वगळता) प्रथमच प्रवासी सेवा काही काळ पूर्ण बंद.

एप्रिल-मे :

* Remdesivir औषधाला तातडीच्या उपचारासाठी मान्यता.
* रोगविरोधी लसनिर्मितीचे सूतोवाच.
* अमेरिकेतील मृत्यूंची संख्या एक लाखांवर पोचली

जुलै :
हा आजार हवेतील सूक्ष्मकणांच्याद्वाराही पसरत असल्याचे WHOचे निवेदन. तसेच बाधित पण लक्षणविरहीत लोकांकडूनही त्याचा प्रसार होत असल्याचे निवेदन.

ऑगस्ट :
बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातून काढलेल्या रक्तद्रवाच्या उपचारास मान्यता.

सप्टेंबर :
जागतिक कोविडमृत्यूंचा आकडा १० लाखांवर पोचला.

ऑक्टोबर
:
* Remdesivir ला अमेरिकी औषध प्रशासनाकडून अधिकृत औषधाची मान्यता (पण पुढे याबाबत WHOने नकारात्मक शेरा दिला).
• भारतात कोविडमृत्यूंचा आकडा १ लाखावर पोचला.

नोव्हेंबर : दुहेरी अँटीबॉडी उपचारास तातडीच्या वापरासाठी मान्यता.

डिसेंबर २०२० :
• काही लसी प्रयोगसिद्ध होऊन मान्यताप्राप्त. वितरणास तयार. चीनमध्ये लाखो लोकांना त्यांची लस दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध. रशियाने पण सुरवात केली. इंग्लंड ८ डिसेंबरला लसीकरण सुरु करण्याच्या तयारीत.
• आज अखेरीस या आजारावर निर्विवाद असे प्रयोगसिद्ध रामबाण औषध उपलब्ध नाही. त्यामुळे रोगप्रतिबंधावर अधिक लक्ष केंद्रित.
...............

समाजात या निव्वळ नैसर्गिक आजारातून पुरेशी सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे लसीकरणाची कल्पना पुढे आली. वर उल्लेख केल्याप्रमाणे संबंधित लस नव्याने निर्माण करून त्याचे काहीसे घाईतच प्रयोग केले गेलेत. लसीच्या अनेक उत्पादनांपैकी काही आता प्रयोगसिद्ध होऊन वापरासाठी तयार आहेत. लस देताना अर्थातच सामाजिक प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. ती सर्व नागरिकांना द्यायची की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. RNA तंत्रज्ञानावर आधारित लसी या नव्यानेच निर्माण केलेल्या आहेत. त्यांची उपयुक्तता आणि दुष्परिणाम अनुभवातून समजतील. लसीकरणातून महासाथ कशी आटोक्यात येते हे यथावकाश समजेल. आपण तसे स्वप्न बघावे अशी WHOने इच्छा व्यक्त केली आहे !

लसीसंबंधी आणि संबंधित घडामोडीबाबाबत चर्चा करण्यासाठी हा नवा धागा.
एव्हाना या आजारावर या धाग्यासह ५ धागे निर्माण झालेले आहेत. आता हा आजार लवकरात लवकर सामान्य होऊन आटोक्यात येवो ही इच्छा. जेव्हा तो सामान्य सर्दीपडशाप्रमाणे समाजात दखलपात्र राहणार नाही, तेव्हा अशा चर्चाधाग्यांचे प्रयोजनही संपेल. तसे लवकरात लवकर होवो आणि हे सर्व धागे इ-रद्दीत जावोत हीच आंतरिक इच्छा !
.............................................................................
चित्र जालावरुन साभार !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता हा आजार लवकरात लवकर सामान्य होऊन आटोक्यात येवो ही इच्छा. >>>११११
छान लिहिलाय आढावा!
घटनाक्रम वाचता वाचता प्रसार माध्यमातून कळलेली बातमी, शाळा-ॲाफिस ॲानलाईन झाल्यावर त्याच्याशी जुळवून घेताना आलेल्या अडचणी, वाणसामान भरून ठेवायची झालेली घाई, शेजाऱ्यांपर्यंत हा आजार पोचला तेव्हा वाटलेली काळजी, लोकांनी या आजाराला दिलेला लढा आठवला.

छान आढावा .
हे वर्ष भरकन गेल्यासारखे वाटले.
Remdesivir ला आता पूर्ण बाद समजायचे का ?

वरील सर्वांना धन्यवाद.
साद,
Remdesivir ला आता पूर्ण बाद समजायचे का ?
>>>

या औषधाबाबत तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता आहे. WHOच्या अभ्यासानुसार त्याचा विशेष उपयोग होत. परंतु युरोपातील काही देश आणि अमेरिकेतली व भारतातील काही राज्यात या औषधाचा वापर चालू आहे. काही तज्ञांच्या मध्ये ते आजाराच्या लवकरच्या अवस्थेत दिले असता त्याचा उपयोग जरूर होतो.

वाचायला पण नको वाटतय, त्यात ज्यांनी नुकसान अनुभवले ते कधीच नाही विसरणार
पण सगळ्यातून निभावून उरलोय तर पुढेही जाऊच ठीकठाक असेही वाटते. बघू २०२१ काय करते.
संशोधक, तज्ज्ञ, WHO, डॉ त्यांचे काम करतील. आपण तारतम्य, संयम, सहकार्य, सावधगिरी, आशा, स्थिरचित्त यांच्या मदतीने वाट शोधू.

RNA तंत्रज्ञानावर आधारित लसी या नव्यानेच निर्माण केलेल्या आहेत. त्यांची उपयुक्तता आणि दुष्परिणाम अनुभवातून समजतील. >>> यावर कृृृपया जरा सविस्तर लिहिणार का ?

वरील सर्वांचे आभार.
शशांक,

या विषाणूच्या बाबतीत RNA प्रकारच्या लसी प्रथमच तयार केलेल्या असल्याने त्याबाबत पूर्वानुभव नाही. या तंत्रज्ञानामध्ये विषाणूच्या जनुकांचा ठराविक भाग आपल्या शरीरात सोडला जातो. त्याच्या संदेशानुसार विषाणूंचे टोकदार प्रथिन आपल्यात तयार होते. त्याच्या विरुद्ध antibodies नंतर तयार होतात. अशी प्रक्रिया आहे. त्या किती काळ आपल्याला संरक्षण देतील हे अद्याप अस्पष्ट आहे.

आता संभाव्य धोक्यांबद्दल.
सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो. ह्या लसीचा मानवी प्रयोग प्रथमच होत असल्याने धोक्यांबाबत केवळ अंदाजच बांधता येईल. असे जे काही अभ्यास झाले आहेत ते सर्व प्राण्यांमध्ये झालेले आहेत. त्यांच्यात दिसलेली निरीक्षणे ही माणसाला जशीच्या तशी लागू पडतीलच असे नाही. त्यामुळे निव्वळ अंदाज म्हणून काही गोष्टी अशा असू शकतील :

१. अनपेक्षित प्रकारची ऑटोइम्युन प्रतिक्रिया उमटणे
२. एखाद्याचा आधीचा श्वसनविकार बळावणे
३. विषाणूची जनुके आपल्या जनुकांमध्ये घुसून ढवळाढवळ करतील आणि त्यामुळे काही अनिष्ट होऊ शकेल का, अशी एक शंका.

अशा निव्वळ अंदाजांवर काही ऐकून कोणीही मनात भीती बाळगू नये.

अजून एक मुद्दा.
या लशी मान्यता मिळण्यापूर्वी त्यांचे काही मर्यादित प्रयोग स्वयंसेवकांवर झालेले असतात. हा गट तसा लहान असतो. त्यांच्यावरील अभ्यास हा जेमतेम दोन ते तीन महिने झालेला आहे. त्यामुळे जेव्हा आपण मोठ्या प्रमाणावर सामूहिक लसीकरण सुरू करू, त्यानंतर दीर्घकालीन परिणाम काय होऊ शकतील, याचा अंदाज वरील अल्पकालीन प्रयोगांत येत नाही.

छान आढावा!
इतक्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या लशी येत आहेत. त्यातली कुठली लस दिली गेली वगैरे सामान्यांना सांगितले जाईल का? त्यात काही पर्याय असेल की गावचे आरोग्य खाते/ कामाचे ठिकाण जे ठरवेल ते मान्य करायचे असे असेल.

स्वाती , धन्यवाद.

विविध कंपन्यांच्या लसी वेगवेगळ्या तंत्रज्ञानावर आधारित आहेत. त्यापैकी फायझर आणि बॉयोटेक यांच्या RNA तंत्रज्ञानावर आधारित आहेत. त्याची साठवण, वाहतूक इत्यादी अतिशीत तापमानात करावी लागते. तेव्हा ज्या देशांना ते सक्षमतेने जमेल ते या लशी निवडतील.

अन्य काही कंपन्यांच्या लशी पारंपरिक तंत्रज्ञानाने केलेल्या असून त्यासाठी सामान्य फ्रीजचे तापमान पुरते. त्यामुळे प्रत्येक देश आपापल्या ठिकाणची लस साठवण यंत्रणा बघून लशीची निवड करेल अशी अपेक्षा आहे.

छान आढावा आणि माहिती.
संबंधित लस नव्याने निर्माण करून त्याचे काहीसे घाईतच प्रयोग केले गेलेत. > घाई नसताना प्रयोगाचे टप्पे आणि आताचे यासंबंधी तुलनात्मक माहिती मिळेल का

रावी,
नवीन लस निर्मिती अशा टप्प्यांतून जावी लागते:

१. संशोधन प्रक्रिया
२. प्राण्यांवरील अभ्यास
३. मानवी प्रयोग : हे ३ टप्प्यांत होतात. पहिल्या टप्प्यात लहान गटाला लस देतात तर तिसऱ्यात हजारो लोकांना देऊन पाहतात.

४. औषध प्रशासनाकडे मान्यतेसाठी सादर ( इथपर्यंत यायला साधारण ४-५ वर्षे लागणे अपेक्षित असते !)
५. गरज भासल्यास वरील ३ च्या पुढील चौथा टप्पाही घेतात.
६. उत्पादन
७. दर्जा नियंत्रण
..
अधिक माहिती :
https://www.cdc.gov/vaccines/parents/infographics/journey-of-child-vacci...

नावात काय आहे !

इंग्लंडमध्ये लसीचा डोस दिलेल्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव आहे ....... (क्रमांक २)
विल्यम शेक्सपिअर !! वय ८१.
https://www.hindustantimes.com/world-news/william-shakespeare-among-firs...

धन्यवाद डॉक्टर खूप उपयुक्त माहिती. पुढील काही दिवस, महिने मास्क घालूनच गर्दीच्या ठिकाणी जाणे हा उपाय.

करोना प्रतिबंधक लसीचा आपातकालीन वापर करण्याची परवानगी मिळावी, यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि हैदराबादच्या भारत बायोटेकने प्रस्ताव पाठवले होते. पण हे प्रस्ताव मंजूर होऊ शकले नाहीत. लसीची सुरक्षितता आणि प्रभावीपणाबद्दल पुरेशी माहिती दिलेली नसल्यामुळे हे प्रस्ताव मंजूर झाले नाहीत, असे बुधवारी सूत्रांनी सांगितले.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/serum-institute-bharat-biotech...

हो, काल त्या शेक्स्पियर बद्दल वाचले होते Happy पहिली पेशंट आजी पण मस्त होती. आता ख्रिसमसला नातवंडांना भेटेन म्हणून खूष होती.

सध्या इंग्लंडमध्ये फायझर कंपनीची वापरून लसीकरण सुरू झालेले आहे. ही लस mRNA या नव्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. तिचे फायदे, मर्यादा आणि संभाव्य दुष्परिणाम याबद्दल काही माहिती:

फायदे

१. शरीरात टोचल्यानंतर ही पेशींमध्ये सहज पोचते.
२. ती उत्पादन करताना त्यात प्रत्यक्ष विषाणू वापरत नाहीत. त्यामुळे ती काही पारंपरिक लसींपेक्षा अधिक सुरक्षित असते. या लसीचे दोन डोस द्यावयाचे असल्यामुळे हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो.

३. तिचे उत्पादनही निर्धोकपणे करता येत असल्याने ते मोठ्या प्रमाणात व वेगात करता येते.
४. मान्यता मिळण्याआधीच्या प्रयोगांमध्ये ही लस टोचल्यानंतर संबंधित लोकांमध्ये अँटीबॉडीज आणि टी- सेल्स असे दोन्ही प्रतिसाद चांगले आलेले आहेत.

मर्यादा
१.तंत्रज्ञान नवीन आहे त्यामुळे या लसीपासून मिळणारी सुरक्षा किती काळ असेल हे आज सांगता येणार नाही.

२. ही लस प्रत्यक्ष श्वसनमार्गामध्ये स्थानिक प्रतिकारशक्ती कितपत देईल याबाबत शंका आहे.

दुष्परिणाम

कुठलीही लस टोचल्यानंतर टोचलेल्या ठिकाणी वेदना, लाल होणे थोडाबहुत ताप येणे या गोष्टी काही लोकांमध्ये होऊ शकतात.

सध्या या लसी संदर्भात अशी सूचना देण्यात आलेली आहे, की ज्यांना कुठलेही औषध, अन्नपदार्थ अथवा अन्य एखाद्या लसीची पूर्वी तीव्र एलर्जी आली असेल, तर त्यांनी ही लस घेऊ नये.

>>>ज्यांना कुठलेही औषध, अन्नपदार्थ अथवा अन्य एखाद्या लसीची पूर्वी तीव्र एलर्जी आली असेल, तर त्यांनी ही लस घेऊ नये.>>> हे महत्वाचे.

आताच हे वाचले-
करोनाची लस घेतल्यानंतर दोन महिने मद्यप्राशन करता येणार नाही
https://www.loksatta.com/photos/news/2350794/no-drinking-alcohol-for-two...

मानव,
सदर औषधासंबंधी माहिती अद्याप अधिकृत वैद्यकीय व्यासपीठांवर वाचायला मिळाली नाही. तूर्तास आपण विकिपीडिया पाहिले असता ही माहिती मिळते :
(https://en.wikipedia.org/wiki/Molnupiravir)

१. 3 डिसेंबर च्या ‘नेचर’ मध्ये या औषधाचे पाळीव प्राण्यांवर झालेल्या प्रयोगांचा अहवाल आहे. बाकी मानवी प्रयोगांबाबत जरा संदिग्ध माहिती आहे.

२. हे औषध जनुकांवर काही वाईट परिणाम करु शकतो का, हाही मुद्दा तिथे चर्चिला आहे.

३. तेव्हा वृत्त माध्यमांमधील धडकलेल्या बातम्यांवर तूर्त कोणतीही प्रतिक्रिया न देणे बरे होईल.

औषधाचे प्रयोग अद्याप अर्धवट स्थितीत असताना त्याला औषध प्रशासनाच्या मान्यतेचा प्रश्नच उद्भवत नाही.
ही तर पहिली महत्त्वाची पायरी असते.

हे असे काही नसताना " हे औषध या विषाणूचा 24 तासात खातमा करणार" अशा बातम्या देणे सर्वथा अयोग्य आहे.

मुळात
लसीकरण हे भारतात रिती रीवजा प्रमाणे चर्ण्यास योग्य कुरन आहे
.
लोक मध्ये किती भीती आहे त्याच प्रमाणात चरण्या स योग्य कुरणाची किंमत ठरेल.
मुळात लस ही खरोखर covid पासून किती काळ संरक्षण देईल ह्याची खात्री काय.
त्या लसी चे परिणाम हे covid पेक्षा भयंकर भविष्यात नसावेत ही भीती मनात असणार च आहे.
सरकार किती ही बोलत असेल फ्री मध्ये लस देवू पण आड मार्गाने लसीची किंमत नक्कीच सामान्य लोकांना देण्या शिवाय पर्याय असणार च नाही.

Pages