आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी

Submitted by Meghvalli on 23 July, 2025 - 06:28

हृदयीच्या भावना या गुंफू कशा शब्दांत,
हृदयीची स्पंदने विरली पुन्हा हृदयात.
दुःख हृदयीचं गाते मुक गाणी,
आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी.

हे चांदणे कुणाचं पसरलं नभात,
जणू पुंजके आठवणींचे पसरले मनात.
ओघळलं डोळ्यात एका चांदण्याचं पाणी,
आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी.

हुळुवार भावना या जणू पाकळ्या फुलांच्या,
ठेवल्या सर्व जपून पुस्तकात आठवणींच्या.
सांगू कुणास मी ही हळवी जुनी गार्‍हाणी,
आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी.

वाटे मनास माझ्या मी विसरून तुज गेलो,
भेटीच्या त्या क्षणांना मागे सोडून आलो.
भैरवीत भिजवून का हे मन गाई गाणी,
आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी.

बुधवार - २३/७/२५ , ३:१९ PM
अजय सरदेसाई -मेघ

कवियत्री शांता शेळके यांच्या याच नावा च्या गीता वरुन प्रेरित

Group content visibility: 
Public - accessible to all site users