मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
मन
मन.... तुझे नी माझे.....
मन तुझे आणि माझे
कुठेतरी खोलवर तरंगतय
काय शोधतय कुणास ठाऊक
जीवनाचे उथळ झरे?
की श्वासांची खोल दरी?
प्रेमाचा आनंदी सहवास?
की वास्तवाची अनुभविक दोरी?
नक्की जीवन म्हणजे काय
फुलपाखरु की भुंगा
सावली की झळ
मलम की ओरखडा
कळतच नाही
काय दडलय या मनात
कुठली दिशा
कसला ठाव
अतरंग की मायाजाल
याची दोरी कुणाच्या हातात
तुझ्या की माझ्या
की कुणाच्याच नाही
हे फक्त तरंगतय
आयुष्य नेइल त्या दिशेला
नव्या पहाटेकडे
नव्या किनार्यावर
वार्याच्या डौलावर
मन
मनीचे वस्त्र
मनीचे वस्त्र
**********
माझिया मनीचे
वस्त्र हे घडीचे
तुझिया पदाचे
स्वप्न पाहे ॥
किती सांभाळावे
किती रे जपावे
डाग न पडावे
म्हणूनिया ॥
मोडली न घडी
परी डागाळले
मोहाचे पडले
ठसे काही ॥
कुठल्या हवेचे
कुठल्या वाऱ्याचे
गंध आसक्तीचे
चिकटले ॥
कुठल्या ओठांचे
कुठल्या डोळ्यांचे
पालव स्वप्नांचे
फडाडले ॥
बहु दत्तात्रेया
समय तुम्हाला
आम्हा जोडलेला
काळ थोडा ॥
पाहुनिया वाट
जाहलो विरळ
फाटे घडीवर
आपोआप ॥
झोका
झोका
°°°°°°°
झोका घेई मन
पाळण्या वाचून
आत गाते कोण
शब्दाविन॥
प्रकाश फांदीला
असंख्य सुमन
पुंज पखरण
कणोकणी ॥
नाद रुणझुण
इवली कंपण
पराची स्पंदन
भ्रमराच्या ॥
तया पाहणारा
पाहता शोधून
शून्यची संपूर्ण
दाटू आले ॥
विक्रांत वलय
विलय डोहात
तळ कातळात
घनदाट॥
डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita. blogspot.com
मनाची देवता
मना ओरखाडे
नसावे मनाचे
प्रहार शब्दांचे
कधी काळी
मनाचे सुमन
मनाच्या हातांनी
जपावे हसुनी
सर्व काळ
मनाची देवता
ईश गुरुदत्त
दिसावा सतत
मज तिथे
तिथे बसलेल्या
पुजावे देवाला
जरी त्या देहाला
भान नसे
ऐसी मती देई
विक्रांत पामरा
दत्त प्रभुवरा
मागणी ही
****
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
**
मन
मन
मन भरून भरून आले
घनश्यामल नभ झाकळले
मन ओलेचिंब नहाले
आषाढसरी मेघ वर्षले
मन वाऱ्यासंगे भिरभिरले
अवखळ निर्झर खळखळले
मन पिसे बावरे खुळावले
जलदांनी इंद्रधनू लपवले
मन गहन गूढ हुरहुरले
जळ गडद डोहतळी साकळले
मन वेदनेत ठसठसले
जलौघ प्रपाती कोसळले
मन शांत निमग्न विसावले
ओंजळीतून अर्घ्य वाहिले.
कांचन
हक्क
हक्क
इतकेही धन नको देऊस की तू सोडून मला धनातच गुंतावसं वाटेल...
इतकेही कला गुण नको देऊस की त्यात रंगून गेल्यावर तुझाही विसर पडेल...
इतकेही सुख नको की त्यातच सुखावून तुलाच विसरेन..
इतकेही दुःख नको त्यात बुडून गेल्यावर तुझे पूर्ण विस्मरण होईल...
इतकाही मान नको की तुझ्या चरणांशी शरणागत व्हायच्या ऐवजी गर्वाने फुगून जाईन मी...
काय द्यावं, किती द्यावं हे तर सारं तुला ठाऊक असताना मी का सांगतोय हे तुला उगीचच ??
खरं तर तुझ्याकरता नाहीच्चे हे काही.., मी माझ्याच मनाला, माझ्याच बुद्धीला, अहंकाराला सांगतोय खरं तर...
श्रावण अंतरीचा
श्रावण अंतरीचा
नकोच आकाशी फुलणारे
इंद्रधनुचे रेशीम तोरण
घोर निराशा संपून जाता
मनात उमलत जातो श्रावण
हिरवाईचे लोभसवाणे
चित्र अंतरी जरा उमटता
निर्मळतेचा झरा घेऊनी
मनात झुळझुळ वाहे श्रावण
मंद सुगंधी जाईजुई वा
प्राजक्ताचा सडा नसू दे
माणूसकीचा लेश अंतरी
दरवळणारा होतो श्रावण
असो नसो वा त्या जलधारा
मोहक रंगांची ती पखरण
निष्कपटशा ह्रदयातूनही
क्षणात वेडा फुलतो श्रावण
बाह्य जगाचे बंध भ्रमाचे
वितळून जाता प्रशांत चित्ती
तनामनातूनी लहरत जातो
प्रसन्न निश्चल मृदूतम श्रावण
मनाचा बाजार
मनाचा सुमार
चालला बाजार
नच अंतपार
याला दत्ता ॥
हवेपणाला या
अंतर पडेना
स्वप्नांची सरेना
मोजदाद ॥
एक मिळताच
चिकटे दुजाला
मोहाच्या झाडाला
लाख फुले ॥
का रे तडफड
व्यर्थ धडपड
जरी डोईजड
उतरेना ॥
मोहात धावते
पापाला बुजते
अडते रडते
रात्रंदिन ॥
विक्रांत मनाला
वाहितो तुजला
स्वीकारा दयाळा
दत्तात्रेया॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
००००
Pages
