जलद

मन

Submitted by कांचनगंगा on 22 November, 2019 - 14:35

मन
मन भरून भरून आले
घनश्यामल नभ झाकळले

मन ओलेचिंब नहाले
आषाढसरी मेघ वर्षले

मन वाऱ्यासंगे भिरभिरले
अवखळ निर्झर खळखळले

मन पिसे बावरे खुळावले
जलदांनी इंद्रधनू लपवले

मन गहन गूढ हुरहुरले
जळ गडद डोहतळी साकळले

मन वेदनेत ठसठसले
जलौघ प्रपाती कोसळले

मन शांत निमग्न विसावले
ओंजळीतून अर्घ्य वाहिले.

कांचन

शब्दखुणा: 

ताम्हिणी घाट, पावसाळी माहोल

Submitted by पुरंदरे शशांक on 15 September, 2019 - 10:42

ताम्हिणी घाट, पावसाळी माहोल

तलम तलमसे जलद उतरती मधेच धरणीवर
हिरवे कुंतल माळून बसले मोत्यांची झालर

भर माध्यान्ही रवि किरणही येती ना भुईवर
मेघ अडविती वाट तयांची विरविरती चादर

झरे वाहती अगणित नाजूक खळखळती सुस्वर
विराट रुपे घेऊनी काही कोसळती भूवर

ओलावा हा भरुन राहिला इथवरुनी तिथवर
एक चिमुकला पंख वाळवी ऊडून वरचेवर

पागोळ्या ओंजळीत वेची पोर कुणी अवखळ
रानफुले डोलती घुमूनीया तरुतळी त्या निश्चळ

...........................................................

जलद..... ढग

कुंतल.... केस

विरविरती.....विरलेली

Subscribe to RSS - जलद