आनंदयात्री

चांदणे आहे खरे की... (तरही गझल)

Submitted by आनंदयात्री on 11 August, 2011 - 02:07

चांदणे आहे खरे की भास नुसता?
भूतकाळाचा जिवाला त्रास नुसता!

अजुनही तितकीच आवडते मला ती
अजुनही फुलतो मनी मधुमास नुसता

अजुनही ती दाटते मेघांप्रमाणे
अजुनही मी बांधतो अदमास नुसता!

मार्ग होते वेगळे प्रत्येकवेळी
जवळ आल्याचा जरा आभास नुसता

ती तुझी नाहीच हे तू जाण वेड्या!
दोन खाटांनाच म्हण सहवास नुसता

अंबराचा थांगही लावेन म्हणतो
मोजला आहे धरेचा व्यास नुसता

मी विरक्ती घेतली आहे खरे तर
आत अजुनी नांदतो हव्यास नुसता!

मी कशी फेडू उधारी जीवना ही?
घेत असतो रोज मी गळफास नुसता

मी किती जगलो मलाही आठवेना
घेतला मी शेवटीही श्वास नुसता

- नचिकेत जोशी

गुलमोहर: 

दु:ख म्हणजे सावली होती

Submitted by आनंदयात्री on 5 August, 2011 - 06:11

माणसे गावातली होती
वाटले, ती आपली होती

गवगवा नुसताच दानाचा
मूठ त्यांनी झाकली होती

वेदनेच्या भरदुपारीही
आसवे सुस्तावली होती

मी सुखाच्या पुस्तकामधली
खंतही अभ्यासली होती

उंबरा ओलांडला तेव्हा
पावले रेंगाळली होती

मी खुळा समजून घेणारा!
(ती कुठे ओशाळली होती?)

मी जगावर प्रेम केले अन्
जवळच्यांशी जुंपली होती

वादळे नशिबातही होती
छप्परे भेगाळली होती

श्वास झाला उंच झोपाळा
ती अचानक भेटली होती

सुख उन्हासम तळपले होते
दु:ख म्हणजे सावली होती

- नचिकेत जोशी

गुलमोहर: 

कारणे (तरही गझल)

Submitted by आनंदयात्री on 27 July, 2011 - 00:25

काय होती वेदना आनंदण्याची कारणे?
प्रसवली होती जणू पस्तावण्याची कारणे

वेस आली आडवी अन् गाव तेथे थांबला
हेरली तेव्हाच मी ओलांडण्याची कारणे

वाचले सारे खुलासे लाजर्‍या डोळ्यात मी
गोड होती तू दिलेली बिलगण्याची कारणे

मी फुलांचा गंध होतो अन् ऋतूंचा लाडका
ही अशी स्वप्नेच होती झोपण्याची कारणे

एवढे झाले तरीही भेटतो आहोत ना?
सांग ना आतातरी नाकारण्याची कारणे!

वाट अंधारात होती, जायचे होते पुढे
देत गेलो चांदण्यांना चमकण्याची कारणे

स्फोट झाले, जीव गेले, क्षणभरातच संपली -
माणसांनी माणसांना जगवण्याची कारणे

कारणांमध्येच गेला जन्म सारा बापुडा
भाळण्याची कारणे, सांभाळण्याची कारणे

गुलमोहर: 

तुझी खबर (तरही)

Submitted by आनंदयात्री on 12 July, 2011 - 00:31

"खोल खोल आतवर तुझी नजर" या तरहीसाठी माझा सहभाग -

खोल खोल आतवर तुझी नजर
पोचते तिथे जिथे तुझेच घर

आसवांत वाहिल्या तुझ्या खुणा
साचले रूमालभर तुझे शहर!

विरह वाढता रडायचीस तू
(मी असायचो उगाच थेंबभर)

आठवांत राहती जुन्या व्यथा
सांग मग पडेल का तुझा विसर?

चालतो तसेच पाय ओढुनी
वाट हरवली कधीच दूरवर

जीवना तुझा लळाच लागला
मरणही तुझीच वाटते कुसर

तू निवांत वाच एकदा कधी
मी तुझेच पत्र अन् तुझी खबर

- नचिकेत जोशी

गुलमोहर: 

जपणूक

Submitted by आनंदयात्री on 30 June, 2011 - 00:39

त्याला एकटक पाहत बराच वेळ बसलो होतो मी -
तो स्वतःच पाऊलभर चिखलात बुडालेला.
खाली जुन्या उन्हाने घायाळ झालेल्या जमिनीवर
नुकत्याच आलेल्या फुंकरपावसाचा ओलावा..

स्वतःशीच पुटपुटत त्याने खाली बसून
थोपटलं मातीवर - आणि बाजूला केलं तिला.
खाली होते तिच्या आत रूतलेले तण, कुजलेली मुळं, हट्टी दगड.
ते सगळं काढायला जरा जडच गेलं त्याला,
पण त्याने काढले - निर्विकारपणे ओढून ओढून!

सनातन आदिम श्रद्धेने आकाशाकडे पाहिलं मग!
आणि धोतराच्या सोग्यात बांधून आणलेले मूठभर कोवळे दाणे पेरत बसला..
मग अपार जिव्हाळ्याने बराच वेळ माती पुन्हा सारखी केली
आणि घाम पुसत शांतपणे खाली बसला.

गुलमोहर: 

कुठून पोचलो इथे...

Submitted by आनंदयात्री on 18 June, 2011 - 05:24

कुठून पोचलो इथे
कुठे इथून जायचे
तुला दुरावलो तरी
तुझ्याकडेच यायचे

जरा वसंत दे मला
जरा उसंत दे मला
राहिले फुलायचे
भरून श्वास घ्यायचे
तुला दुरावलो तरी...

धुक्यात पाहिले खुळे
उन्हात स्वप्न संपले
मनातल्या धुक्यामध्येच
अर्थ सापडायचे
तुला दुरावलो तरी...

- नचिकेत जोशी (१०/४/२०११)

गुलमोहर: 

अजून काही वर्षांनी...

Submitted by आनंदयात्री on 24 May, 2011 - 03:11

आता आपण मोठे झालो, नाही का?
आज आपल्या मैत्रीला काही कोवळी वर्षे पूर्ण झाली!
एकत्र घालवलेल्या जेमतेम दहा-वीस संध्याकाळ , तेवढ्याच चर्चा,
त्यातही कधीतरी मौनातल्या गप्पा,
मोजून पाच-पन्नास भांडणे,
हजारो विनवण्या, कोट्यवधी मिलिसेकंदांचा अबोला
आणि कायमचा पसेसिव्हनेस...
हा आत्तापर्यंतचा ढोबळ हिशेब!
आतली उलथापालथ आपली आपल्यालाच माहित!

अजून काही वर्षांनी
आपल्या मैत्रीला काही जाणती वर्षं पूर्ण होतील...
संध्याकाळी आकाश भरलेलं असलं, तरी दोघांचं वेगळं असेल...
चंद्र घेऊ वाटून तेव्हाही..
भांडायला शक्यतो वेळ नाही मिळाला तर उत्तम!
विनवण्या, अबोला यांची मला
आतापासूनच भीती वाटायला लागली आहे...

गुलमोहर: 

मजकूर (तरही गझल)

Submitted by आनंदयात्री on 16 May, 2011 - 01:34

विसरणेही तुझ्या लक्षात नाही
मना, सुटका तुझी इतक्यात नाही

तुझा मजकूर तर केव्हाच कळला
भलेही तो तुझ्या पत्रात नाही

जवळ येणे तुला जमलेच केव्हा?
विलगणे अन् तुझ्या हातात नाही

नको ती ओढ स्वप्नांची जराही
खरे आयुष्य हे स्वप्नात नाही

मना, तू चल, पुकारे चांदणे बघ!
तुझे कोणीच या गावात नाही

तुझीही वेगळी आहे कहाणी
हवे जे तुज, तुझ्या नशिबात नाही

तुम्ही जो पाहता तो मोकळा मी
खरा मी कैद! - पण माझ्यात नाही

- नचिकेत जोशी

गुलमोहर: 

पुस्तक परिचयः "वॉल्ट डिस्ने - द अल्टिमेट फँटसी"

Submitted by आनंदयात्री on 12 May, 2011 - 07:42

राजहंस प्रकाशनने आणलेलं यशवंत रांजणेकर लिखित "वॉल्ट डिस्ने - द अल्टिमेट फँटसी" हे पुस्तक म्हणजे एका असामान्य कर्तृत्त्वाची चरितगाथा आहे.

मिकी माऊस, डॉनाल्ड डक या जगप्रसिद्ध कार्टून पात्रांचा निर्माता आणि अभूतपूर्व अशा डिस्नेलँडचा जनक वॉल्टर इल्यास डिस्ने (संपूर्ण पुस्तकात डिझ्नी ऐवजी डिस्ने हाच शब्द वापरला गेला आहे) या सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या, शिक्षण अर्धवट सोडलेल्या एका अवलिया मुलाने पुढील आयुष्यात जी झेप घेतली त्याचं सार्थ वर्णन हे पुस्तक करतं.

विषय: 

परीघ

Submitted by आनंदयात्री on 11 May, 2011 - 07:34

एकटेपणाच्या कैदेत कुढत असताना
पहिल्यांदाच जाणवला स्वत:च्या दु:खांचा काळागर्द परीघ -
दिवसांमागून दिवस गिळत
तुझ्यासोबत चक्रामध्ये मी फिरत असताना,
जो लाटेसारखा पायापाशी येऊन फुटायचा अधूनमधून!
पण त्यावेळी हे जाणवलं नाही की-
कधी ना कधी ह्या लाटा
आपल्याला एकट्यालाच पार करायच्या आहेत,
कारण -
शेवटी त्या आपल्या स्वत:च्या आहेत!

इतके दिवस तुझी सोबत होती मला
म्हणून कदाचित ते जाणवलं नसेल!
पण हे खरं नाहीये...
खरं हे आहे की, केंद्राशी इमान राखून
त्या चक्रात फिरतांना तळहातावर जपलेली दु:खं -
तुझी होती!

आणि तुझ्या दु:खांपुढे माझी दु:खं छोटी ठरली,
हे सत्य त्या परिघात शिरण्यापूर्वी

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - आनंदयात्री