तरही गझल

"शांतता राखा" - तरही गझल

Submitted by डॉ अशोक on 8 June, 2014 - 02:16

"शांतता राखा" - तरही गझल

"शांतता राखा" असे कां, ओरडावे लागते?
कां सत्यही पुराव्यासह, दाखवावे लागते?
*
हे खरे की ना कळाले, आजवर काही तुझे
नजरेतले सारेच कां, ओळखावे लागते?
*
नाही मिळाले कुणाला, सौख्यही दु:खाविना
दागिना होण्या सोन्यासही, तापवावे लागते!
*
"तो" असे सर्वत्र अन, सर्वद्ऩ्य आहे म्हणे
कां संकटी ईश्वराला, आळवावे लागते?
*
सगळ्यांना सारे मिळते, असे कां झाले कधी?
येण्यास पहिले दुसऱ्यास, डावलावे लागते !

दरबार होता तिथे अन, पाच ही होते तिथे
तरीही तिला कृष्णास कां, बोलवावे लागते

-अशोक (०८/०६/२०१४)

(टीप: "तरही" ची प्रेरणा "शांतता राखा" असे कां, ओरडावे लागते?

शब्दखुणा: 

आता सुरू नव्याने...

Submitted by डॉ अशोक on 26 October, 2013 - 10:59

आता सुरू नव्याने...
(तरही गझल- एक प्रयत्न)

वाटेत वाटले ना, पूरे प्रयास झाला
आता सुरू नव्याने माझा प्रवास झाला

त्यांचेच बाण होते, त्यांचीच सांत्वने ही
तो श्रीहरी असावा, तो का हताश झाला?

स्वप्नात काल माझ्या, येऊन ती म्हणाली
"पाहून आपल्याला, चंद्रास त्रास झाला !"

सारे खरे असावे, की ते मिथ्याच होते?
ओठावरी मधाचा, भुंग्यास भास झाला !

हा डाव आज तू ही, खेळून घे "अशोका"
हारून तू म्हणावे, हा ही झकास झाला !
-अशोक
(मतल्यातली दुसरी ओळ: श्री सारंग भणगे यांचे सौजन्याने)

कवेत माझ्या अखेरचे भिजून तू विरघळून जा.. (तरही गझल)

Submitted by रसप on 14 October, 2013 - 07:44

निवांत माझ्यासमान तू कधी तरी ओघळून जा
कवेत माझ्या अखेरचे भिजून तू विरघळून जा

तुझी प्रतीक्षा किती करू? मनास समजावणे वृथा
समोर येऊन तू पुन्हा नजर फिरव अन् वळून जा

सरेल किंवा उरेलही, पुरेल देशील जेव्हढे
निरोप घेशील त्या क्षणी, मनातुनी हळहळून जा

कमावतो मी, गमाव तू, असेच आयुष्य चालले
लुटून झाल्यावरी तरी खरेखुरे फळफळून जा

जिथे म्हणालास तू तिथे सदैव आलो तुझ्यासवे
तिच्या घराची दिशा पहा, इथून रस्त्या वळून जा

जगायचे ते जगून घे, जिवंत आहेस तोवरी
पिकून पानासमान मग हसून अलगद गळून जा

पसंत मेघा जरी तुझे असे अनिर्बंध सांडणे
उनाड भटकायचे पुरे, हवे तिथे आढळून जा

शब्दखुणा: 

सारे जुनेच आहे... (तरही गझल)

Submitted by आनंदयात्री on 15 July, 2013 - 00:34

सारे जुनेच आहे, काही नवीन नाही
नुसताच बहर वरती, खाली जमीन नाही

विस्तारली घराणी, झाली नवीन भरती
कुठलाच देव येथे, आता कुलीन नाही

शिरतात रोज भुरटे, भु़ंगे तरी अजुनही -
बागेतल्या फुलांची कीर्ती मलीन नाही

एका क्षणी समजते, सारे समान येथे!
कोणी महान नाही, कोणीच हीन नाही

मन वागते कसेही, माझे कसे म्हणू हे?
माझ्यात राहते पण, माझ्या अधीन नाही

- नचिकेत जोशी

(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2013/07/blog-post_13.html)

शेवटी मिसळेन पण मातीत मी (तरही)

Submitted by मिल्या on 1 February, 2013 - 01:38

तरही लेखनाचा माझाही एक प्रयत्न

डॉ. नी दिलेली ओळ बदलून घेतल्याबद्दल आधी त्यांची माफी मागतो

काल तर झालो मला माहीत मी
आज का आलो पुन्हा शुद्धीत मी?

शक्य नाही आपले जमणे कधी
आग तू आहेस अन् नवनीत मी

कुवत नसताना भरारी घेउनी
लोटले आहे मला खाईत मी

सावलीने साथ देणे सोडले
अन् उन्हाला टाकले वाळीत मी

आज रस्ता संपता संपेचना
आज आहे नेमका घाईत मी

सोडले आता स्वत:ला भ्यायचे
(तेच घडले ज्यास होतो भीत मी)

रोज क्षितिजे नवनवी ओलांडतो
शेवटी मिसळेन पण मातीत मी

देव्हार्‍यात बसून ... (तरही)

Submitted by ज्ञानेश on 30 September, 2012 - 14:35

(दिलेल्या तरही मिसर्‍यात किंचित बदल केला आहे.)

============================

जगव्यापी अथवा दयाघन प्रभू त्याला म्हणावे कसे?
देव्हार्‍यात बसून जो ठरवतो, की मी जगावे कसे..

तो गेला अगदीच दूर, बहुधा हा सोडुनी चालला
हास्यास्पद ठरलेत आज सगळे माझेच दावे कसे?

रात्रीशी फटकून झोप असते, उत्साह होतो शिळा
ज्या स्वप्नास मुळात जन्म नसतो, ते पूर्ण व्हावे कसे?

माझा हात धरून घट्ट अगदी, जेव्हा निघालीस तू
तेव्हा मीच तुझ्याकडून शिकलो- झोकून द्यावे कसे

ह्रदयाला फुटतात रोज उकळ्या- स्वच्छंद होऊ, चला !
पोटाला बसताच एक चिमटा, कळते जगावे कसे !

जगावेगळे मागणे (तरही गझल)

Submitted by आनंदयात्री on 22 August, 2011 - 05:54

जगावेगळे मागणे मागते मी
मला शोध तू, फक्त तू! - हरवते मी!

पुन्हा रंग येतो नव्याने ऋतूंना
पुन्हा फूल होऊन गंधाळते मी

कवडसे, झुले, आरसे, बंद खोल्या
अशा चौकटींशीच सैलावते मी

असा मान आहे समाजात मजला -
नजर चुकवते, झेलते, सोसते मी!

नभातून येते खुळी हाक त्याची
उभी स्तब्ध जागीच नादावते मी

जरी करपते रोज मेंदी चुलीवर
बिछान्यातला चंद्र सांभाळते मी

असे साचले काय आहे तळाशी
अशी का सतत खिन्न फेसाळते मी?

कधी एकटी भांडते मी स्वतःशी
अखेरी स्वतःलाच समजावते मी

गुलमोहर: 

चांदणे आहे खरे की भास नुसता[तरही]

Submitted by छाया देसाई on 11 August, 2011 - 03:41

ते नभीचे शून्य मोठा आस नुसता
चांदणे आहे खरे की भास नुसता

हे रसायन जीवना फेसाळलेले
चषक हे आयुष्य प्यासी प्यास नुसता

गुंतलेल्या ,चहुदिशानी बांधलेल्या
आत्मरामा का तुला वनवास नुसता

भोगती कोणी इथे उपभोगतीही
भावनांचा रम्यसा हो रास नुसता

जगत जावे जो अलिप्तासारखे तो
लेपचंदन हो सुगंधी श्वास नुसता

प्रकटते मिटते स्वये ,''आस्तित्व''छाया
देह ना ती ,पण असे आभास नुसता

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

चांदणे आहे खरे की... (तरही गझल)

Submitted by आनंदयात्री on 11 August, 2011 - 02:07

चांदणे आहे खरे की भास नुसता?
भूतकाळाचा जिवाला त्रास नुसता!

अजुनही तितकीच आवडते मला ती
अजुनही फुलतो मनी मधुमास नुसता

अजुनही ती दाटते मेघांप्रमाणे
अजुनही मी बांधतो अदमास नुसता!

मार्ग होते वेगळे प्रत्येकवेळी
जवळ आल्याचा जरा आभास नुसता

ती तुझी नाहीच हे तू जाण वेड्या!
दोन खाटांनाच म्हण सहवास नुसता

अंबराचा थांगही लावेन म्हणतो
मोजला आहे धरेचा व्यास नुसता

मी विरक्ती घेतली आहे खरे तर
आत अजुनी नांदतो हव्यास नुसता!

मी कशी फेडू उधारी जीवना ही?
घेत असतो रोज मी गळफास नुसता

मी किती जगलो मलाही आठवेना
घेतला मी शेवटीही श्वास नुसता

- नचिकेत जोशी

गुलमोहर: 

रीत नाही (साती)

Submitted by साती on 3 August, 2011 - 10:07

वागणे शिस्तीत नाही
ही जगाची रीत नाही

धून वाटे ऐकलेली
ओळखीचे गीत नाही

चुंबताना ओठ माझे
कापले किंचीत नाही

यायचे कोठे भुतांनी
एक येथे शीत नाही

नाविकाने का मलाही
घेतले होडीत नाही

हाल हे व्हावे तुझेही
मी कधी चिंतीत नाही

द्यायची दाने कुणाला
'तो' कधी मोजीत नाही

राक्षसांवर कृष्ण हल्ली
चक्र ते फिरवीत नाही

एवढेसे सत्यदेखिल
या तुझ्या साक्षीत नाही

वाजवीचे बोलताना
घोळ मी घालीत नाही

भांडणे करतील त्यांना
सांग साती भीत नाही

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - तरही गझल