चांदणे आहे खरे की... (तरही गझल)

Submitted by आनंदयात्री on 11 August, 2011 - 02:07

चांदणे आहे खरे की भास नुसता?
भूतकाळाचा जिवाला त्रास नुसता!

अजुनही तितकीच आवडते मला ती
अजुनही फुलतो मनी मधुमास नुसता

अजुनही ती दाटते मेघांप्रमाणे
अजुनही मी बांधतो अदमास नुसता!

मार्ग होते वेगळे प्रत्येकवेळी
जवळ आल्याचा जरा आभास नुसता

ती तुझी नाहीच हे तू जाण वेड्या!
दोन खाटांनाच म्हण सहवास नुसता

अंबराचा थांगही लावेन म्हणतो
मोजला आहे धरेचा व्यास नुसता

मी विरक्ती घेतली आहे खरे तर
आत अजुनी नांदतो हव्यास नुसता!

मी कशी फेडू उधारी जीवना ही?
घेत असतो रोज मी गळफास नुसता

मी किती जगलो मलाही आठवेना
घेतला मी शेवटीही श्वास नुसता

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2011/08/blog-post_11.html)

गुलमोहर: 

अजुनही ती दाटते मेघांप्रमाणे
अजुनही मी बांधतो अदमास नुसता!>>> सुंदर

ती तुझी नाहीच हे तू जाण वेड्या!
दोन खाटांनाच म्हण सहवास नुसता>>>> सुंदर

मार्ग होते वेगळे प्रत्येकवेळी
जवळ आल्याचा जरा आभास नुसता>>> फार आवडला हा! Happy

जवळ आल्याचा जरासा भास नुसता!

मी विरक्ती घेतली आहे खरे तर
आत अजुनी नांदतो हव्यास नुसता!...व्वा !!

मार्ग होते वेगळे प्रत्येकवेळी
जवळ आल्याचा जरा आभास नुसता...वा वा वा !!

मी किती जगलो मलाही आठवेना
घेतला मी शेवटीही श्वास नुसता...सुरेख शेर.

या तरहीवरील सर्वोत्कृष्ट गझलांपैकी एक. Happy

जवळ आल्याचा जरासा भास नुसता! >> व्वाह!>>>>

अरे?? मी ओळ आवडली म्हणून पुन्हा खाली लिहावी म्हणून गेलो अन चुकीची टाईप झालि आणि तीच तुम्हालाही आवडली??? Happy

आभास चे भास करण्याची इच्छा नव्हती पण आपोआप झाले बहुधा!

अंबराचा थांगही लावेन म्हणतो
मोजला आहे धरेचा व्यास नुसता

क्लास्स्स्स्स्स्स्स!!!!

आवडली..:)

अंबराचा थांगही लावेन म्हणतो
मोजला नाही धरेचा व्यास नुसता
अशीही मजा घेतली

अजुनही ती दाटते मेघांप्रमाणे
अजुनही मी बांधतो अदमास नुसता!
अजुनही तितकीच आवडते मला ती
अजुनही फुलतो मनी मधुमास नुसता.....अजुनही ?

पण शेर छान झालेत.

अंबराचा थांगही लावेन म्हणतो
मोजला नाही धरेचा व्यास नुसता

व्वा..शामने केलेला बदल मस्तच. Happy

अंबराचा थांगही लावेन म्हणतो
मोजला आहे धरेचा व्यास नुसता......... वा साहब व्वा, जीओ

अंबराचा थांगही लावेन म्हणतो
मोजला नाही धरेचा व्यास नुसता ....... शाम ने केलेल्या बदलाने मजा आली जीओ यार
गजल छानच...

<<अंबराचा थांगही लावेन म्हणतो
मोजला आहे धरेचा व्यास नुसता

मी विरक्ती घेतली आहे खरे तर
आत अजुनी नांदतो हव्यास नुसता!<<<

अ प्र ति म!! क्लासिक!! Happy

ती तुझी नाहीच हे तू जाण वेड्या!
दोन खाटांनाच म्हण सहवास नुसता >>> काय लिवता राव !

"जरासा भास "सही वाटले मलाही ! Happy

दोस्तहो, सर्वांना thanks.. Happy

शाम, "धरेचा नुसता व्यास मोजला आहे, अंबराचा थांगही लावेन म्हणतो" असंच म्हणायचं होतं...

काफिया आणि रदीफ यांचा संबंध पाहायचा म्हटला तर वरील आशय better आहे असं मला वाटतं..

अंबराचा थांगही लावेन म्हणतो
मोजला नाही धरेचा व्यास नुसता
- धरेचा नुसता व्यास मोजला नाहीये तर अंबराचा थांगही लावेन म्हणतो यात 'ते' expression नाहीये! Happy
आपलेही आभार! Happy

Pages