कवेत माझ्या अखेरचे भिजून तू विरघळून जा.. (तरही गझल)

Submitted by रसप on 14 October, 2013 - 07:44

निवांत माझ्यासमान तू कधी तरी ओघळून जा
कवेत माझ्या अखेरचे भिजून तू विरघळून जा

तुझी प्रतीक्षा किती करू? मनास समजावणे वृथा
समोर येऊन तू पुन्हा नजर फिरव अन् वळून जा

सरेल किंवा उरेलही, पुरेल देशील जेव्हढे
निरोप घेशील त्या क्षणी, मनातुनी हळहळून जा

कमावतो मी, गमाव तू, असेच आयुष्य चालले
लुटून झाल्यावरी तरी खरेखुरे फळफळून जा

जिथे म्हणालास तू तिथे सदैव आलो तुझ्यासवे
तिच्या घराची दिशा पहा, इथून रस्त्या वळून जा

जगायचे ते जगून घे, जिवंत आहेस तोवरी
पिकून पानासमान मग हसून अलगद गळून जा

पसंत मेघा जरी तुझे असे अनिर्बंध सांडणे
उनाड भटकायचे पुरे, हवे तिथे आढळून जा

पहाटवेळीच रोज हा विचित्र काळोख ग्रासतो
मलाच मी सांगतो 'जितू, मनात तू मावळून जा !'

....रसप....
१४ ऑक्टोबर २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/10/blog-post_14.html

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पसंत मेघा जरी तुझे असे अनिर्बंध सांडणे
उनाड भटकायचे पुरे, हवे तिथे आढळून जा<<< मस्त

पहाटवेळीच रोज हा विचित्र काळोख ग्रासतो
मलाच मी सांगतो 'जितू, मनात तू मावळून जा !'<< व्वा

गझल व अनेक ओळीही आवडल्याच.

लुटून झाल्यावरी तरी खरेखुरे फळफळून जा <<< वा वा

सरेल किंवा उरेलही, पुरेल देशील जेव्हढे
निरोप घेशील त्या क्षणी, मनातुनी हळहळून जा.............. हे मस्तच

उनाड भटकायचे पुरे, हवे तिथे आढळून जा ... आवडले

सर्वच शेर छान .........

चांगली गझल
वळून जास्त आवडला मक्ताही आवडला
अनेक शेर नीट उमजून यायला अर्थासाठी जरा वेळ शब्दांवर घुटमळावे लागत आहे यामुळे गम्मत वाढते आहे हे खूप आवडले अशी शैली तुझ्या आधीच्या गझलांमध्ये इतक्या प्रमाणात आढळल्याचे स्मरत नाही आहे आत्तातरी

जिथे म्हणालास तू तिथे सदैव आलो तुझ्यासवे
तिच्या घराची दिशा पहा, इथून रस्त्या वळून जा

पहाटवेळीच रोज हा विचित्र काळोख ग्रासतो
मलाच मी सांगतो 'जितू, मनात तू मावळून जा !'

तुमच्याच ओळीची तरही होती ना ही ? मस्त ट्रीट केली आहे रसप.

आहा...
जगायचे ते जगून घे, जिवंत आहेस तोवरी
पिकून पानासमान मग हसून अलगद गळून जा

पसंत मेघा जरी तुझे असे अनिर्बंध सांडणे
उनाड भटकायचे पुरे, हवे तिथे आढळून जा

खूप आवडली गझल

धन्यवाद !!

----------------------------

वैभू,
तुझा विठ्ठल तुला ह्या टोमण्यासाठी क्षमा करणार नाही !! Wink

तुझा विठ्ठल तुला ह्या टोमण्यासाठी क्षमा करणार नाही !! <<थांब आता हझलच करतो....

हा घे एक शेर .............
दरोज ऑफीसला उशिर मला मुळी ना जमायचे
करून थोडा उशीर तू कणीक तितकी मळून जा

आता बोल !!!:हाहा:

सरेल किंवा उरेलही, पुरेल देशील जेव्हढे
निरोप घेशील त्या क्षणी, मनातुनी हळहळून जा

......खूप आवडली गझल