जगावेगळे मागणे

जगावेगळे मागणे (तरही गझल)

Submitted by आनंदयात्री on 22 August, 2011 - 05:54

जगावेगळे मागणे मागते मी
मला शोध तू, फक्त तू! - हरवते मी!

पुन्हा रंग येतो नव्याने ऋतूंना
पुन्हा फूल होऊन गंधाळते मी

कवडसे, झुले, आरसे, बंद खोल्या
अशा चौकटींशीच सैलावते मी

असा मान आहे समाजात मजला -
नजर चुकवते, झेलते, सोसते मी!

नभातून येते खुळी हाक त्याची
उभी स्तब्ध जागीच नादावते मी

जरी करपते रोज मेंदी चुलीवर
बिछान्यातला चंद्र सांभाळते मी

असे साचले काय आहे तळाशी
अशी का सतत खिन्न फेसाळते मी?

कधी एकटी भांडते मी स्वतःशी
अखेरी स्वतःलाच समजावते मी

गुलमोहर: 
Subscribe to RSS - जगावेगळे मागणे