प्रतिमे...!
Submitted by चैतन्य दीक्षित on 18 April, 2011 - 04:26
प्रतिमे, तुजला एक विनंती,
रहा सदा चांगली,
मला तोलणार्यांची दृष्टी,
तुझ्यावरी लागली ।
म्हणायचो मी,
प्रतिमा बितिमा खोटे सारे,
आतिल माणुस खरा...
कळेचना पण, कुठून आला
ह्या चेहर्यावर चरा...!
दुभंगलो मी, कळले जेव्हा,
मला कसे पाहती-
- लोक हे, अन् त्यांच्या पद्धती,
जे श्रेयस्कर त्यांना, तितुके
सोयिस्कर बघती ।
"अशा जगाची कशास पर्वा?
जगेन माझ्यापरी",
विचार केला असा कितीदा
जमले नाही तरी.
जगतो मी कोणासाठी?
हा प्रश्न लांबचा फार..
अंतर आता थकले सोसुन
प्रतिमेवरचे वार !
ओळखूच ना शकलो तुजला,
इतकी तू भिनलेली-
-अंतरात या,
प्रतिमे माझी ओळख तू बनलेली !
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा