हे असे आभासवाणे चांदणे(तरही)

Submitted by दुसरबीडकर on 12 October, 2014 - 22:26

तरही गझल...
मूळ मिसरा आदरणीय गझलकारा संगिताताई
जोशी ह्यांचा...!!
'हे असे आभासवाणे चांदणे आता नको..'

स्पंदनांची रेशमी तारांगणे आता नको..
(हे असे आभासवाणे चांदणे आता नको..!! )

साजरा कैफात करुया मीलनाचा सोहळा..
पण तुझे 'येते..!' असे ते सांगणे आता नको..!!

घे मना,आकार आता वर्तुळाचा तू जरा..
भावनांचे 'कोपर्याशी' भांडणे आता नको..!!

वादळाचे नेहमी येणे सुरू असतेच ना..?
त्यामुळे तर आणखी घर बांधणे आता नको..!!

श्वास कणसांना मिळो तू एवढे नक्की वहा..
उंच ताटांचे भुईवर रांगणे आता नको..!!

एवढे तारूण्य गेले शोधण्या दैवास ह्या..
मान हलतांना तयाचे पांगणे आता नको..!!

रोज नयनी पावसाळा,हा उन्हाळा आणतो...
फार झाले या ऋतुंना सांधणे आता नको..!!

-गणेश शिंदे,
दुसरबिड,बुलडाणा ..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच

अरविंदसर आभार..

'रेशमी तारांगणे' हा शब्द प्रेयसीच्या दिसण्याबद्दल अथवा कुठेतरी 'चमकते',त्याक्षणाचे भाव म्हणून घेतलाय..म्हणजेच प्रेयसी दिसल्यानंतर काळजाचे ठोके बदलतात..किंवा चुकतात...ते आता नकोय..
जस्ट असा...काही चुकीच वाटल्यास दुरुस्तीसाठी स्वागत आहे डाॅक्टरसाहेब. .धन्यवाद..!!

तुम्ही जो अर्थ सांगितला आहे...तो न सांगता वाचकापर्यन्त पोचायला हवा.

दुर्दैवाने तसे झाले नाही.असो...लिहित रहावे गणेशजी...

स्पंदनांची रेशमी तारांगणे <<< तुम्ही जो अर्थ सांगितला आहे...तो न सांगता वाचकापर्यन्त पोचायला हवा.>> +१
किंवा तुम्ही अर्थाचे स्पष्टीकरण दिल्यावर तो तसाच दिसायलातरी हवाच !

आपण स्पंदनांची रेशमी तारांगणे असे म्हटले त्यावरून मी ..रेशमी स्पर्शामुळे हृदयात उठणारी स्पंदने आणि त्यामुळे नजरेसमोर तरळलेली तारांगणे ( चकाकी लकाकी ह्या अर्थी ) असा अन्वय लावला होता .आपण सांगीतलेल्या अन्वयातून केवळ तारांगणे चे स्पष्टीकरण मिळाले रेशमी स्पंदनांचे नाही .

असो
धन्यवाद व शुभेच्छा