marathi gazal

आनंदी आयुष्याची एखादी ओळ..

Submitted by दुसरबीडकर on 9 November, 2014 - 09:06

आनंदी आयुष्याची एखादी ओळ लिहावी..
जी दुःखाच्या मंचावरती आधारास पुरावी..!!

इतक्या वेळा तुटलो की उठताही आले नाही..
या तूट-फुटींची सांगा,कोणी भरपाई द्यावी..??

आयुष्याचे अवघे जगणे नितळ करावे म्हणतो..
फक्त जरा श्वासांची तुरटी देवा पुरुन उरावी..!!

आभाळाचा हेवा अन धरतीशी वैर नसावे..
जाणुन मोठेपण इतरांचे आपण लवती घ्यावी..!!

शेतामधल्या मातीला घामाचे देता अत्तर..
गात्रे अन गात्रे पीकांची गंधाळून निघावी..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..

तू येण्याच्या आधी काही तू गेल्याच्या नंतर..

Submitted by दुसरबीडकर on 17 October, 2014 - 10:05

तू येण्याच्या आधी काही तू गेल्याच्या नंतर..
सखये मी मग मोजत बसतो दोघांमधले अंतर..!!

सोपे नसते.कळले..!आयुष्याचे चंदन होणे..
वेढा घालुन बसलेला प्रश्नांचा नाग निरंतर..!!

येता-जाता 'तो' डोकावत असतो विहिरीपाशी..
'भरल्या' विहिरीतुन नक्की जगण्याचा मिळतो मंतर..!!

सारवलेली मायेने स्वप्ने शेणा-मातीची..
फरशीवर त्यांना 'पुसण्या'वाचुन नाही गत्यंतर..!!

कृष्णाला पाहुन त्या पुतनेलाही फुटला पान्हा..
मग का आजमितीच्या कैक यशोदांचे स्थित्यंतर..??

-गणेश शिंदे..
दुसरबिड,बुलडाणा...

इथे पहा केवढे खलाशी

Submitted by अ. अ. जोशी on 25 February, 2011 - 13:16

इथे पहा केवढे खलाशी
तरी गझल चालली तळाशी

कुणी हसावे, कुणी रडावे
कधीच नाते नसे कुणाशी

कधी कधी दानशूर असते...
कधी कधी वाटते अधाशी

कधीच नव्हतेच होय नाते ?
उगा मला वाटले मगाशी...!

नकोस माझ्याकडे बघू तू...
तुझे असे बघ तुझ्याचपाशी

नको बघू रोज डाग माझे
कधी तरी बघ तुझ्या मुळाशी

कधीच मी तूप सोडलेले....
तरी पहा शिंकलीच माशी

कधी नसे आपल्यात स्पर्धा
तुझीच स्पर्धा असे तुझ्याशी

गुलमोहर: 
Subscribe to RSS - marathi gazal