धार्मिक-साहित्य

लाभो संतसंग

Submitted by नवनाथ राऊळ on 24 June, 2015 - 03:06

लाभो संतसंग । भक्तीचा पैं ठेवा ।
घडो हरीसेवा । जन्मोजन्मीं ॥१॥

ज्ञानियांचा राजा । भक्तराज नामा ।
मार्ग विष्णूधामां । उजळितीं ॥२॥

आम्हा हरीदासां । आधार ते मेरू ।
करुणासागरु । धन्य संत ॥३॥

तुका एका चोखा । वैष्णव मंडळी ।
तयां पायधुळीं । नाथ शुद्र ॥४॥

नारायणी भाव

Submitted by नवनाथ राऊळ on 21 June, 2015 - 08:04

नारायणी भाव । परिस बा दासा ।
नुपजे सहसा । अकारणें ॥१॥

हरीप्रेम चित्तीं । खळाळें निर्झरु ।
उमळें पाझरु । अहोभाग्यें ॥२॥

ऐशा भावें पाहीं । बहुमोल ठेवा ।
पांडुरंगें जीवां । धाडिलासे ॥३॥

नाथ म्हणें रावें । प्रेमें भरविला ।
तोचि जाणियेंला । गुरूमंत्र ॥४॥

नवीन सभासदांसाठी प्रश्नावली

Submitted by दिनेश. on 19 June, 2015 - 06:33

मायबोलीवर एखाद्या नव्या सभासदाने थेट देवनागरीत काही लिहिले कि मनात प्रश्नांचे काहूर उठते. त्यामूळे ही प्रश्नावली भरून घ्यावी काय ? पडीक सभासदांनी भर घालावी.. हि विनंति ( नम्र वगैरे नाही, थेट विनंतिच )

१) तूम्ही मराठी टायपायला कुठे शिकलात ?
२) तूमचे वय इतके तास, इतके दिवस, इतके आठवडे आहे, ते का ?
३) यापुर्वी नेमक्या कुठल्या कारणासाठी तूमच्यावर कारवाई ( पक्षी हकालपट्टी ) झाली होती ?
३) जूना ( रेग्यूलर ) आय डी कुठला होता ?
४) त्या वेळचे डू. आय. कुठले होते ?
५) कुठल्या कंपूत होता ?
६) गेल्या वर्षाविहाराला आला होतात का ? का आला होतात ?
७) तूम्हाला काय येतं ( घाम सोडून ) ?

आपुलालें चित्त

Submitted by नवनाथ राऊळ on 18 June, 2015 - 03:10

आपुलालें चित्त । विठुचें राऊळ ।
राखावें निर्मळ । सकळांनी ॥१॥

काम क्रोध माया । मद मोह द्वेष ।
किंचितही लेश । धरों नये ॥२॥

विषय समूळ । कुर्वाळितीं चित्तां ।
अलिप्त सर्वथा । विठू राहें ॥३॥

नाथ म्हणें रितें । चित्त शुचिर्भूत ।
नित्य वसें तेथ । विठाबाई ॥४॥

शब्दखुणा: 

गा दीनदयाळा

Submitted by नवनाथ राऊळ on 16 June, 2015 - 13:34

गा दीनदयाळा । सख्या विठुराया ।
आता भेट द्याया । धांव बापा ॥१॥

स्थिरचर सारे । खिन्नसे भासती
निस्तेज दिसती । चंद्र सूर्य ॥२॥

नको पांहूं अंत । जीव कासावीस ।
व्याकुळ भेटीस । पंचप्राण ॥३॥

नाथ म्हणे प्रभो । येकचि पै आस ।
चित्ती हाचि ध्यास । दर्शनाचा ॥४॥

शब्दखुणा: 

बहुं शेतात राबावें

Submitted by नवनाथ राऊळ on 14 June, 2015 - 01:34

बहुं शेतात राबावें । कष्ट अपार करावें ।
नाम मुखीं तें धरावें । हरी पांडुरंग ॥१॥

वावरांस नांगरावें । तेथ बियाणे पेरावें ।
विठ्ठलासि आळवावें । श्रमपरिहारां ॥२॥

निगा शेताची करावी । माया मायेची धरावी ।
चित्तीं माऊली स्मरावी । हाचि नित्यनेम ॥३॥

भिन्न नोहें कर्म पुजा । हरिवीण कोण दुजा ।
वर्षवीं पर्जन्यराजा । विठु मायबाप ॥४॥

पांडुरंगकृपा होई । कीर्तन रंगात येई ।
जन्म शिवारांत घेई । हिरवें सुवर्ण ॥५॥

भात जोंधळा बाजरी । शाकें नानाविध तरी
गजर नामाचा करी । हरिदासमेळा ॥६॥

अंगणी धानाची रास । पूर्णब्रम्हाची आरास ।
भीमातीरी विष्णूदास । जैसें मेळविलें ॥७॥

शब्दखुणा: 

भक्तीमार्ग कैंचा

Submitted by नवनाथ राऊळ on 11 June, 2015 - 01:47

भक्तीमार्ग कैंचा । नेणों आम्हां जाण ।
विठूचें स्मरण । अखंडित ॥१॥

हरीनामजप । आम्हांसी पैं ठावा ।
भक्तीचा पुरावा । नसें पाशीं ॥२॥

परमार्थामृत । वर्णियेलें श्रेष्ठ ।
तयाहूनी मिष्ट । हरीनाम ॥३॥

नाथ म्हणें भक्ती । उत्तुंग शिखर ।
आम्ही हो पामर । पायथ्यासि ॥४॥

शब्दखुणा: 

नाथ वेडा

Submitted by नवनाथ राऊळ on 9 June, 2015 - 00:12

श्रीधर श्रीरंग । हरी पांडुरंग ।
गातसे अभंग । नाथ वेडा ॥१॥

पांडुरंगी कळां । लागलासे लळा ।
जाहलासे खुळा । नाथ वेडा ॥२॥

गजर नामाचा । गगनीं भिडला ।
तल्लीन जाहला । नाथ वेडा ॥३॥

भजतो विठ्ठल । पुजतो विठ्ठल ।
चिंततो विठ्ठल । नाथ वेडा ॥४॥

अधीर गा चित्त । कंठ दाटलासे ।
वाट पहातसे । नाथ वेडा ॥५॥

तुजलागी हरी । विनवणी करी ।
हट्ट येक धरी । नाथ वेडा ॥६॥

नको विठूराया । नको अन्य काही ।
द्वारी उभा राही । नाथ वेडा ॥७॥

दर्शनाचे दान । हे कृपानिधान ।
मागतो अजाण । नाथ वेडा ॥८॥

शब्दखुणा: 

विठ्ठल विठ्ठल

Submitted by नवनाथ राऊळ on 8 June, 2015 - 07:07

विठ्ठल विठ्ठल । नाम हेचि मुखीं ।
अवघाचि सुखी । भवताल ॥१॥

नामाचा महिमा । काय म्यां वर्णावा ।
अगाध जाणावा । सकळांनी ॥२॥

नाथ म्हणे माझा । सखा विठुराया ।
उद्धरीं जगा या । सदोदित ॥३॥

शब्दखुणा: 

“ शहाणपण “

Submitted by विनायक. दि.पत्की. on 19 May, 2015 - 11:41

पोटात भूक नसताना
अन्नाचे महत्व कळत नाही
वणवा पेटल्या शिवाय
ओले लाकूड जळत नाही

दिवाळे निघाल्या शिवाय
कष्टाचे महत्व कळत नाही
हरामाचे जगणे जगताना
कळते पण वळत नाही

गुर्मीने दुसर्याची कदर
करवत नाही
अंधार असल्याशिवाय
दिवा हाती धरवत नाही

पाण्यात राहून माश्याशी
वैर जमत नाही
मूर्ख बनल्याशिवाय
दुसर्याची अक्कल कळत नाही

मल्ल होताना अंग
मळल्या शिवाय राहणार नाही
सोन्याची शुद्धता हि
जळल्या शिवाय कळणार नाही

जेथे भरवसा तेथे संशय
मोलाचा नाही
जेथे संशय तेथे भरवसा
तोलाचा नाही

मला सर्व समजते या
म्हणण्याला काही अर्थ नाही
समजून लीनता बाळगण्या

Pages

Subscribe to RSS - धार्मिक-साहित्य