अता मी नशेत आहे!

Submitted by मुग्धमानसी on 31 December, 2015 - 02:37

असले माझे उगा बरळणे मानु नका रे खरे... अता मी नशेत आहे!
ऐका माझे मला अता एकटे सोडणे बरे... अता मी नशेत आहे!

कसे रात्रभर अंधाराशी दोन हात केले मी?
नक्की कुठल्या प्रहरी जाणे अशी शांत निजले मी?
तुझे नाव पुटपुटले तेंव्हा उरी जाग होती का?
तुला पाहीले ती स्वप्नांची खुळी रांग होती का?
मलाच काही उमगेना ठग कोण कुणाचे खरे... अता मी नशेत आहे!
ऐका माझे मला अता एकटे सोडणे बरे... अता मी नशेत आहे!

इथे उशाशी ओल... छातीही खोल खोल भिजलेली...
स्वप्नांचा लगदा पायांशी, व्यथा क्लांत थिजलेली!
खरेच आलेले वादळ की तो फक्त भास झालेला...?
मला स्मरेना शेवटचा पाऊस कधी आलेला...
काळजात साठल्या पुराचे बहुदा झाले झरे... अता मी नशेत आहे!
ऐका माझे मला अता एकटे सोडणे बरे... अता मी नशेत आहे!

सांज वाटुनी घेतो आम्ही रोज दूर जाताना
पुन्हा नव्याने भरतो स्वप्ने रोज रिते होताना!
फिरून जगणे घुटमळते का त्याच त्याच फाट्याला?
तो माझ्या वाट्याला येतो मी त्याच्या वाट्याला...
त्या वळणावर धडपडते अन् मनास उठती चरे... अता मी नशेत आहे!
ऐका माझे मला अता एकटे सोडणे बरे... अता मी नशेत आहे!

निघून जा ना इथून सारे... नादि नका ना लागू...
सारी धुंदी सरल्यावर मग पुन्हा बेगडी वागू!
तोवर या बेशुद्ध जगातील शुद्ध जिणे भोगूद्या
मला नागव्याने माझ्या या बंद घरी वागूद्या!
कपड्यांच्या दुनियेत बापडी धुंद नागवी उरे... अता मी नशेत आहे!
ऐका माझे मला अता एकटे सोडणे बरे... अता मी नशेत आहे!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.....