नदीच्या किनारी...

Submitted by मुग्धमानसी on 29 July, 2015 - 06:21

उभी स्तब्ध आहे नदीच्या किनारी तिच्या सौम्य लाटांत नादावुनी
खडे पावलांशी, धुके काळजाशी, जिथे टोचते त्यास सांभाळुनी!

असे मोकळे केस पाठीवरी की जसे चांदणे रान-पानांवरी,
जरा सार रात्रीस हलक्या करांनी... तळाशी तिच्या मीच मी दाटुनी!

जरा रात्र चढते.. नशेचा प्रवाह.. अनाकार एकेक पेशी अशी...
मुकी स्वैर बोली खुळ्या शांततेची मला व्यापते गल्बला होउनी!

तुला काय सांगू किती या जीवाने मुके साहिले पोळते उन्ह ते...
तुझे पावसाळे किती दूर होते... मला तेच भिजवायचे मन्मनी!

अनंतात आहे तुझे गीत राजा... सुटा त्यातला एकटा सूर मी,
जरा थांबते ना तुझ्या सांद्र ओठी, मला यापरी ना विसावा कुणी!

अता या नदीच्या किनार्या वरी तू, तिथे त्या जळी, पैलतीरास तू...
तुला टाळूनी लांब जावे जरा पण... कसे मी मला द्यायचे टाकुनी?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहाहा!!! एकेक शब्द आनंद देणारा..
निव्वळ अप्रतिम!

अनंतात आहे तुझे गीत राजा... सुटा त्यातला एकटा सूर मी,
जरा थांबते ना तुझ्या सांद्र ओठी, मला यापरी ना विसावा कुणी!

व्वाह! Happy

मस्त.