कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण

Submitted by कुमार१ on 7 December, 2020 - 07:30

या विषयाचे आधीचे संदर्भ :

१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)

२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)

३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य (https://www.maayboli.com/node/75809)

४. ( पूरक विषय) : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन (https://www.maayboli.com/node/76797) )

मागील चर्चेत आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
………………………………………..

करोना सार्स-२ या दुष्ट विषाणूने मानवजातीवर हल्ला केल्याला आता एक वर्ष झाले. त्यातून उदभवला कोविड१९ हा आजार. त्याची साथ आली आणि तिची व्याप्ती वाढत ती महासाथ झाली. त्यातून खूप लोक आजारी पडले. काहींचा आजार सौम्य राहिला तर काहींचा गंभीर होऊन ते मृत्युमुखी देखील पडले. महासाथ आटोक्यात आणण्यासाठी जगातील बहुतेक देशांना टाळेबंदीसारखे कठोर उपाय अमलात आणावे लागले. त्यातून अर्थव्यवस्थेची प्रचंड हानी झाली. अनेकांचे रोजगार बुडाल्याने सामाजिक मनस्वास्थ्य हरवले. पुढे काही देशांत आजाराचे प्रमाण कमी झाले आणि आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले. पण अन्य काहींत प्रमाण पुन्हा एकदा वाढल्याने ‘दुसरी लाट’ निर्माण झाली. या आजाराच्या वर्षपूर्ती निमित्ताने गेल्या वर्षातील त्यासंबंधीच्या ठळक घडामोडींचा हा मागोवा :

डिसेंबर 2019 :
चीनच्या वुहान प्रांतात न्युमोनिया या आजाराचे काही रुग्ण आढळले आणि त्याचे कारण अज्ञात होते.
* 31 डिसेंबरला या नव्या आजाराची WHOच्या दप्तरी नोंद झाली. करोना-सार्स २ हा विषाणू तर कोविड-१९ हा त्याचा आजार, अशी अधिकृत नावे दिली गेली.

जानेवारी 2020 :
* या आजाराचे RT-PCR या चाचणीने निदान झालेला पहिला रुग्ण अमेरिकेत आढळला.
* हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो हे स्पष्ट झाले.
* WHOने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली.

फेब्रुवारी :
बहुतेक देशात आंतरराष्ट्रीय विमानसेवांवर निर्बंध. परदेशातून आलेल्या व्यक्तीस 14 दिवसांचे विलगीकरण लागू.

मार्च :

* 11 मार्च रोजी WHO कडून कोविडची महासाथ जाहीर.
* HCQ या पारंपरिक औषधाचा वापर सुरू.
* संसर्ग साखळी रोखण्यासाठी बऱ्याच देशात टाळेबंदी जाहीर.
* भारतीय रेल्वेच्या १६७ वर्षांच्या इतिहासात (संप वगळता) प्रथमच प्रवासी सेवा काही काळ पूर्ण बंद.

एप्रिल-मे :

* Remdesivir औषधाला तातडीच्या उपचारासाठी मान्यता.
* रोगविरोधी लसनिर्मितीचे सूतोवाच.
* अमेरिकेतील मृत्यूंची संख्या एक लाखांवर पोचली

जुलै :
हा आजार हवेतील सूक्ष्मकणांच्याद्वाराही पसरत असल्याचे WHOचे निवेदन. तसेच बाधित पण लक्षणविरहीत लोकांकडूनही त्याचा प्रसार होत असल्याचे निवेदन.

ऑगस्ट :
बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातून काढलेल्या रक्तद्रवाच्या उपचारास मान्यता.

सप्टेंबर :
जागतिक कोविडमृत्यूंचा आकडा १० लाखांवर पोचला.

ऑक्टोबर
:
* Remdesivir ला अमेरिकी औषध प्रशासनाकडून अधिकृत औषधाची मान्यता (पण पुढे याबाबत WHOने नकारात्मक शेरा दिला).
• भारतात कोविडमृत्यूंचा आकडा १ लाखावर पोचला.

नोव्हेंबर : दुहेरी अँटीबॉडी उपचारास तातडीच्या वापरासाठी मान्यता.

डिसेंबर २०२० :
• काही लसी प्रयोगसिद्ध होऊन मान्यताप्राप्त. वितरणास तयार. चीनमध्ये लाखो लोकांना त्यांची लस दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध. रशियाने पण सुरवात केली. इंग्लंड ८ डिसेंबरला लसीकरण सुरु करण्याच्या तयारीत.
• आज अखेरीस या आजारावर निर्विवाद असे प्रयोगसिद्ध रामबाण औषध उपलब्ध नाही. त्यामुळे रोगप्रतिबंधावर अधिक लक्ष केंद्रित.
...............

समाजात या निव्वळ नैसर्गिक आजारातून पुरेशी सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे लसीकरणाची कल्पना पुढे आली. वर उल्लेख केल्याप्रमाणे संबंधित लस नव्याने निर्माण करून त्याचे काहीसे घाईतच प्रयोग केले गेलेत. लसीच्या अनेक उत्पादनांपैकी काही आता प्रयोगसिद्ध होऊन वापरासाठी तयार आहेत. लस देताना अर्थातच सामाजिक प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. ती सर्व नागरिकांना द्यायची की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. RNA तंत्रज्ञानावर आधारित लसी या नव्यानेच निर्माण केलेल्या आहेत. त्यांची उपयुक्तता आणि दुष्परिणाम अनुभवातून समजतील. लसीकरणातून महासाथ कशी आटोक्यात येते हे यथावकाश समजेल. आपण तसे स्वप्न बघावे अशी WHOने इच्छा व्यक्त केली आहे !

लसीसंबंधी आणि संबंधित घडामोडीबाबाबत चर्चा करण्यासाठी हा नवा धागा.
एव्हाना या आजारावर या धाग्यासह ५ धागे निर्माण झालेले आहेत. आता हा आजार लवकरात लवकर सामान्य होऊन आटोक्यात येवो ही इच्छा. जेव्हा तो सामान्य सर्दीपडशाप्रमाणे समाजात दखलपात्र राहणार नाही, तेव्हा अशा चर्चाधाग्यांचे प्रयोजनही संपेल. तसे लवकरात लवकर होवो आणि हे सर्व धागे इ-रद्दीत जावोत हीच आंतरिक इच्छा !
.............................................................................
चित्र जालावरुन साभार !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्या वर्षी तर कुठून कुठुन शोधून काढून करोना पाठोपाठ आता हा व्हायरस येत आहे, अजून तो ही येत आहे यात मृत्यूचे प्रमाण खूपच जास्त आहे "और उससे होती है बडी दर्दनाक मौत" वगैरे बातम्यांचा उत येत होता.
आता दुसरी लाट वाढत आहे, परत अशा बातम्या सुरू होतील.

Double Mutant >>>

आत्ताच ५ मिनिटांपूर्वी वाचले !
हा प्रकार पश्चिम महाराष्ट्रातील दोनशे जणांमध्ये सापडला आहे. “DM” ही शास्त्रीय संज्ञा नाही; केवळ माध्यमांची सनसनाटी.

या नव्या प्रकारात आधीच्याच दोन प्रकारांचे गुणधर्म आहेत. “मात्र हा नवा प्रकार अधिक घातक अथवा संसर्गजन्य असल्याचा पुरावा नाही”, असे श्री. रमानन लक्ष्मीनारायण या दिल्लीस्थित CDDEP संस्थेच्या संस्थापकांनी सांगितले आहे.

पोलिओ , स्मॉल पोक्स कसे गेले ? >> ह्या दोन आजारांच्या लशींवर संशोधन झाले त्याला अनुक्रमे ८५ आणि २२४ वर्ष झाली.
तेव्हा संशोधकांना/ लस उत्पादकांना रोग नष्ट करणे जास्त महत्त्वाचे वाटत होते.
लोकांना घाबरवून पैसे कमावण्यासाठी vaccine चा वापर करता येईल हे त्यांना सुचले नसेल. Happy

आजच्या बातमीनुसार महाराष्ट्रातला नवीन स्ट्रेन हा रोगप्रतिकार शक्तीवर आघात करणारा आहे आणि दुप्पट वेगाने पसरतो. //

अशीच बातमी जानेवारीत युकेमधील नवीन स्ट्रेनबद्दलही आली होती. हा तोच आहे का?
युकेमध्ये जानेवारी फ्रेब्रुवारीत शाळा बंद ठेवल्या होत्या.पण मार्चपासून तिथे परत सगळं बॅक टू नॉर्मल आहे. (म्हणजे जितकं घाबरवलं जात होतं तितकं काही तिथे झालं नाही.)
एकूणच काय चालू आहे काही कळायला मार्ग नाही.

महाराष्ट्रातला स्ट्रेन UK स्ट्रेन पेक्षा वेगळा आहे.

एकूणच काय चालू आहे काही कळायला मार्ग नाही.
हे अगदी खरं आहे

“एका कंपनीच्या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर काही काळाने त्याचा साठा संपलेला असेल तर काय करायचे ?”

हा प्रश्न मागच्या पानावर उपस्थित झालेला होता. या संदर्भातील काही रोचक संशोधन वाचनात आले. भारतात जसा हा प्रश्न उद्भवला तसाच तो प्रगत देशातही काही ठिकाणी उद्भवलेला आहे. मग अशा वेळेस दुसऱ्या डोसचे काय करायचे हा प्रश्न पडतो.

यासंदर्भात अमेरिकेतील कोलोरॅडो विद्यापीठातील डॉ. Ross Kedl या तज्ञांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मते योग्य अंतराने दुसऱ्या कंपनीचा डोस जर दिला तर प्रतिकारशक्तीच्या दृष्टीने उलट अधिकच फायदा होऊ शकतो !

या अनुषंगाने सध्या असे दोन अभ्यास चालू आहेत :
१. यु. के.मध्ये AZ(पहिला डोस) + Pfizer (दुसरा डोस) https://www.gov.uk/government/news/world-first-covid-19-alternating-dose...

२. रशियात Sputnik (पहिला डोस) + AZ (दुसरा). https://www.reuters.com/article/health-coronavirus-vaccine-russia-astraz...

वरील अभ्यासाचे निष्कर्ष काही महिन्यांनी समजतील.
दरम्यान अमेरिकेच्या CDC ने पहिले कडक धोरण शिथिल केले असून ‘अपवादात्मक परिस्थितीत दुसरा डोस दुसऱ्या कंपनीचा घेतलेला चालेल’, असे म्हटले आहे.

वरील संशोधनातील महत्त्वाचा भाग म्हणजे ज्या दोन कंपन्यांचे वेगळे डोस द्यावयाचे आहेत त्या दोन्ही लसींचे तंत्रज्ञान
वेगळ्या प्रकारचे आहे.

या विषाणूचे जनुकीय बदल सतत होत असल्यामुळे कदाचित या प्रकारचा लस-मिश्रणाचा प्रयोग अधिक फायदेशीर ठरेल, असे गृहीतक मांडले गेले आहे.

झ दा +१
बघूया काय निष्कर्ष येताहेत ते.

'एबोला' विषाणूच्या बाबतीत असे प्रयोग यशस्वी झालेले आहेत.

एकदा बादशहा प्रश्न विचारतो , कोणते शस्त्र सर्वात जास्त चांगले आहे ?

कोण बोलतो तलवार , कोण बोलतो भाला

बिरबल म्हणतो , जे आपल्याजवळ उपलब्ध असेल ते.

....

कोविड वॅक्सिंनही असेच झाले आहे,

जे आपल्याकडे उपलब्ध आहे , ते घेऊन गप्प बसणे

कुमार१, डॉक्टर तुम्ही सातत्याने या धाग्यावर फार उत्तम माहिती देत आहात त्यासाठी तुमचे मनापासून आभार __/\__

ब्लॅककॅट, खरं आहे!

कुमार१, डॉक्टर तुम्ही सातत्याने या धाग्यावर फार उत्तम माहिती देत आहात त्यासाठी तुमचे मनापासून आभार>>> +1

कुमार१, डॉक्टर तुम्ही सातत्याने या धाग्यावर फार उत्तम माहिती देत आहात त्यासाठी तुमचे मनापासून आभार >>>>> अगदी अगदी!

बिरबलाचा किस्सा झकास !

वरील सर्व नियमित आणि सजग वाचकांचेही मला आभार मानले पाहिजेत. आपण सर्वजण नियमित हे सदर वाचता व त्यावर अतिशय चांगल्या आणि अभ्यासू शंका विचारता. त्यामुळे मलाही अजून वाचनाला हुरूप येतो.

खरं म्हणजे हा धागा ३ महिन्यांपूर्वी जेव्हा काढला तेव्हा मी लिहिलंय की लवकरात लवकर हे सगळं संपूदे आणि हे कोविड धागे गाडले जाऊदेत.

दुर्दैवाने हा विषाणू अजून तशी काही संधी देत नाहीये. सध्या चालू घडामोडींचा आढावा घेत राहणे एवढेच आपल्या हातात आहे.

कुमार१, डॉक्टर तुम्ही सातत्याने या धाग्यावर फार उत्तम माहिती देत आहात त्यासाठी तुमचे मनापासून आभार>>> +1

१२ वर्षांखालील मुलांवर करोना लसीची चाचणी >>>

अमेरिकेत आतापर्यंत सुमारे ३४ लाख मुले बाधित आहेत. हा आकडा एकूण रुग्णांच्या १३.३% आहे.
त्यामुळे मुलांसाठी लस ही तिथली गरज असावी.

सर्वप्रथम डॉ. कुमार सरांचे आभार की त्यांनी हा धागा चालू केला.

काही सुचना किंवा मागण्या:-
१. हा धागा सर्वात वर सतत राहील (पीन अप) अशी सुविधा करता येणे शक्य आहे काय?

२. धाग्याचे नाव: कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण (अद्ययावत) असे करणे शक्य आहे काय?

३. धाग्याचे लेखक त्यांच्या क्षेत्रातील तज्ञ आहेत. त्यांचे या धाग्याला अनुसरून मत अधिकाराचे आहे. त्यामुळे हा धागा त्यांना कायमचा एडीट करता येईल का? जेणेकरून ते वेळोवेळी अपडेट त्या धाग्याच्या मुळ लेखातच करतील?

डॉक्टरांची मते, सल्ले हे प्रतिसादात जात असल्याने त्या माहितीचे स्वरूप विस्कळीत अन चर्चेच्या स्वरूपात झाले असल्याने या अनमोल माहीतीचा संग्रह एकाच ठिकाणी होत नाही.

४. मूळ धाग्यात शेवटचे अद्यतन हे डिसेंबर २०२० पर्यंतच दाखवते आहे. डॉक्टरांंना एडीट करता आले तर या पुढील तारखांचे अद्यतन होऊ शकते काय?

५. कोरोना संबधीत माहीती अन कोरोनावरील लसीकरण हे आता दोन वेगवेगळे विषय आहेत. माझा स्वत:चा देखील या लसींच्या नावावरून अन त्यांच्या कंपन्यांच्या नावावरून कायम गोंंधळ होत आलेला आहे.
या गोंधळाचे निराकरण या लसींचे नाव अन कंपनीचे नाव, भारतातील कंंपनी याचे तक्ता- टॅब्यूलर फॉर्म मध्ये माहीती देऊन ती धाग्याच्या/ पीन अप मध्ये सतत वरती राहील अशी सोय देऊन करता येईल काय?

जसे की:- (फक्त उदाहरणादखल तक्ता)
अनु. । लस । परदेशी कंपनी । भारतीय नाव
१. । कोविशिल्ड । मॉडर्ना । सीरम इंस्टीट्यूट

पाभे, तुमच्या सूचना मौलिक आहेत. धन्यवाद !

यानिमित्ताने माझेही काही मुद्दे व शंका :
१. इथे मूळ लेखाची संपादन सुविधा साधारण महिनाभर मिळते. ‘कोविड’ विशेष म्हणून संपादकांनी ती दीर्घकाळ दिल्यास मी आभारी होईन. याबाबत माझ्या काही शंका आहेत.

२. समजा, अशी संपादन सुविधा दिली आणि मी मूळ लेख संपादित करीत राहिलो, तर सदराचा जुना नियमित वाचक पुन्हा तो मूळ लेख बघण्यास उत्सुक असतो का ? की नव्या प्रतिसादांच्या वाटेनेच तो पुढे वाचणे पसंत करतो ? वाचकांनी सांगावे. पूर्ण नव्या वाचकाला मात्र या सुविधेचा फायदा होतो.

३. लसींचे तुलनात्मक तक्ते: ते तर मी आतापर्यंत या धाग्यासाठी ४ तर एकंदरीत कोविड मालिकेसाठी डझनभर किंवा अधिकच केलेले होते. त्यासाठी आपण ते आधी वर्डमध्ये तयार करतो, मग त्याचे ‘जे-पेग’ मध्ये रुपांतर करायचे आणि मग येथे चढवायचे असा तो क्रम आहे. परंतु इथे असे दिसते की अशाप्रकारे कष्ट घेऊन चढवलेल्या चित्राचे इथले आयुष्य जेमतेम एक महिना असते. त्यानंतर चित्रे लुप्त होऊन त्या जागी एक छोटीशी गूढ चौकट फक्त दिसू लागते.

अशी चित्रे कायम टिकण्यासाठी काही उपाय असल्यास तंत्रज्ञांनी जरूर सांगावा.

>> चित्रे कायम टिकण्यासाठी काही उपाय असल्यास तंत्रज्ञांनी जरूर सांगावा.>>
आपल्या खाजगी जागेत अपलोड केलेली चित्राची फाईल कायम ठेवायची. ती डिलीट केली की इथे चढवलेले चित्र जाते.

पादन सुविधा दिली आणि मी मूळ लेख संपादित करीत राहिलो, तर सदराचा जुना नियमित वाचक पुन्हा तो मूळ लेख बघण्यास उत्सुक असतो का ? की नव्या प्रतिसादांच्या वाटेनेच तो पुढे वाचणे पसंत करतो ? वाचकांनी सांगावे.>>>>>

माझ्या बाबतीत तरी नवीन प्रतिसादाच्या वाटेने पुढे वाचणे जास्त सोयीस्कर ठरेल/ आवडेल.

स्वाती, देवकी
धन्यवाद.
.....
खाजगी जागेत अपलोड केलेली चित्राची फाईल कायम ठेवायची. >>> हे महत्वाचे आहे ! त्यामुळे तिथला साठा फुगत जाईल हे खरे.

>>>> नियमित वाचक पुन्हा तो मूळ लेख बघण्यास उत्सुक असतो का ? >>>
मूळ लेखात तारीख टाकून वेळोवेळी थोडक्यात मुद्दे लिहिता येतील.

ठीक.

लसीकरण आणि रोगप्रसार
सध्या जगभरात कोविड-लसीकरण चालू आहे. “ते मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर तरी महासाथ संपणार ना ?” हा सामान्यांच्या मनातला यक्षप्रश्न आहे. यासंदर्भात पुढील शास्त्रीय निरीक्षणे महत्त्वाची ठरतात :

१. लसवंत लोकांना करोना संसर्ग झाल्यास ते लक्षणविरहित राहतील का आणि,
२. ते तसे राहिल्यास जवळच्या व्यक्तींना/इतरांना रोगप्रसार करू शकतील का ?

वरील प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी अमेरिकेत एक महत्त्वाचे संशोधन चालू झाले आहे. त्यामध्ये बारा हजार महाविद्यालयीन तरुणांचा समावेश केलाय. दोन टप्प्यांत त्यांना मॉडर्नाची लस दिली जाईल. त्या प्रत्येकाजवळ एक ‘इ-डायरी ऍप’ असेल. यातील प्रत्येकजण स्वतःच्या नाकातून रोज स्वाब घेईल. तसेच ठराविक काळाने त्यांचे रक्तनमुनेही तपासणी जातील.

पुढच्या टप्प्यात या तरुणांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक यांचीही संबंधित तपासणी केली जाईल. सुमारे पाच महिन्यानंतर या अभ्यासाचे निष्कर्ष हाती येतील.

डॉक्टर, जर तुम्हाला संपादनाची संधी मिळाली तर सर्व नवीन मजकूर हा धाग्यात सर्वात वरती लिहीता येईल म्हणजे त्यासाठी वाचकांना संपूर्ण धागा दरवेळी स्क्रोल करावा लागणार नाही. तारीख टाकून लिहिलेत की तो ही एक reference point राहील.
बाकी काही वाचकांच्या प्रश्नांना प्रतिसादात उत्तरं आणि महत्वाचे मुद्दे (लसींची नावं वगैरे) मुख्य धाग्यात अशी रचना करता येईल. You are already doing a fantastic job so kudos to you!

मला एक प्रश्न पडला आहे की अचानक दुसरी लाट कशी आली?
जानेवारी फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रातील नातेवाईक संक्रात हळदीकुंकू बोरनहाण गोवा कोकण ट्रिप लग्न समारंभ यांचे फोटो टाकत होते.मजेत फिरत होते. त्याच वेळी दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनासाठी खूप लोक जमले होते. मुंबईतही एक सभा झाली. माघी गणपती झाले. त्यावेळी अजिबात करोना झाला नाही. मग आताच कसा परत आला? हे लॉजिकल वाटत नाही. इतके महिने करोना काय ब्रेकवर होता का? की हा दुसरा स्ट्रेन आहे? नक्की काय सुरू आहे?

सध्या मला माहिती मिळते आहे की अगदी सौम्य लक्षणे असली किंवा लक्षणे नसली तरी पोझिटिव्ह व्यक्तींना कोव्हिड सेंटर ला जायला लावत आहेत. हे खरं आहे का? असं असल्यास कोव्हिड सेंटर पुरेशी कशी पडतील लोकांना?

सनव, मलाही हाच प्रश्न पडला आहे, पण माझ्याकडे माझे उत्तर देखील आहे, म्हणजे आम्हाला कोव्हिड जानेवारीत झाला होता. तेव्हा प्रशासन सुद्धा गंभीर नव्हते असे मला वाटते. मम्माला थोडा दम लागत होता अन वास येत नव्हता म्हणून आम्ही तिची टेस्ट केली तर ती पॉझिटिव्ह आली होती, टेस्ट खाजगी लॅब मध्ये केली होती जे घरी येऊन स्वाब घेऊन जायचे. जर रिपोर्ट पॉझिटिव्ह असेल तर आधी जवळच्या सरकारी केंद्रात रिपोर्ट जातो, मम्मी पॉझिटिव्ह आल्यावर आम्ही टेस्ट केली तर सगळेच पॉझिटिव्ह होतो, अगदी माझे महिन्याचे बाळ सुद्धा. तर त्या लॅबवलीने सांगितले होते की जर परवडत असेल तर मम्मी पप्पा ना private हॉस्पिटलमध्ये ठेवा म्हणून आम्ही उगा रिस्क नको म्हणून तसे केले, , भाऊ दुसऱ्याच घरी तर मी राहत्या घरी बाळासोबत होते. नवऱ्याला केअर टेकर म्हणून माझ्या सोबत राहू दिले होते .
पण हे सगळे रिपोर्ट आलेल्या दुसऱ्या दिवशी झाले, पालिकेचा माणूस येऊन सांगून गेला. बास त्यानंतर आज पर्यंत आम्हाला पालिका किंवा सरकारी हॉस्पिटल जिथे आमचे रिपोर्ट गेले होते त्यापैकी कोणीही विचारले सुद्धा नाही की कोव्हिड बरा झाला की नाही.
तर सांगायचे असे की जर असेच सरकारचे दुर्लक्ष होत असेल अन कोव्हिड झालेली व्यक्ती निष्काळजी असेल तर चार पाच दिवसात बाहेर पडणार, अन पूर्ण बरा झालेला नसल्याने आजार पसरवणार. म्हणजे किमान माझे असे मत झालेय.
गेल्या दोन तीन महिन्यात सगळेच गाफील होते, जणू कोरोना संपला असे वागत होते, अन बरेच जण नॉन सिम्पतेमटीक होते, ज्यांच्यामुळे कोरोनाने परत डोक वर काढले असावे असे वाटते.

माफ करा पण वर दिलेल्या अनुभवात सरकारची नक्की चूक काय आहे? कोविड झालेल्या प्रत्येक माणसावर सरकार लक्ष नाही ठेऊ शकत.

वर अनेक प्रतिसादांमध्ये efficacy व effectiveness यांच्यात गोंधळ झाला आहे.

ज्याला परिणामकारकता असा शब्द योजला गेला आहे, व आकडेवारी दिली आहे, ती वास्तविक efficacy आहे आणि लस घेताना तिचा संबंध येऊ नये.
सध्या मान्यता मिळालेल्या सर्व लशी गँभीर लक्षणे व मृत्यू यांविरुद्ध 100% परिणामकारक म्हणजे effective आहेत. त्यामुळे जी लस उपलब्ध होते आहे ती घ्यावी.

*

Efficacy साठी परिणामकारकता हा योग्य शब्द नाही. लशीची efficacy उदाहरणार्थ 95%आहे याचा अर्थ शंभरातल्या पाचजनांना आजार होईल, असा नव्हे.
प्रत्येक लस तुम्हाला गँभीर लक्षणे व मृत्यू यांपासून वाचवेल.
त्यामुळे 'लस घेऊनही कोव्हीड' अशा ज्या बातम्या आहेत, त्यांनी घाबरण्यात अर्थ नाही. लस घेऊनही तुम्हाला कोव्हीड हो ऊ शकतोच. पण तुमची लक्षणे सौम्य असतील व तुम्ही मरणार नाही. अर्थात यात तुमचा व्हायरल लोड किती का मुद्दा येतो.
*
एफिकसी कशी मोजतात याबद्दल नंतर लिहीन.

Pages