कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण

Submitted by कुमार१ on 7 December, 2020 - 07:30

या विषयाचे आधीचे संदर्भ :

१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)

२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)

३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य (https://www.maayboli.com/node/75809)

४. ( पूरक विषय) : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन (https://www.maayboli.com/node/76797) )

मागील चर्चेत आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
………………………………………..

करोना सार्स-२ या दुष्ट विषाणूने मानवजातीवर हल्ला केल्याला आता एक वर्ष झाले. त्यातून उदभवला कोविड१९ हा आजार. त्याची साथ आली आणि तिची व्याप्ती वाढत ती महासाथ झाली. त्यातून खूप लोक आजारी पडले. काहींचा आजार सौम्य राहिला तर काहींचा गंभीर होऊन ते मृत्युमुखी देखील पडले. महासाथ आटोक्यात आणण्यासाठी जगातील बहुतेक देशांना टाळेबंदीसारखे कठोर उपाय अमलात आणावे लागले. त्यातून अर्थव्यवस्थेची प्रचंड हानी झाली. अनेकांचे रोजगार बुडाल्याने सामाजिक मनस्वास्थ्य हरवले. पुढे काही देशांत आजाराचे प्रमाण कमी झाले आणि आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले. पण अन्य काहींत प्रमाण पुन्हा एकदा वाढल्याने ‘दुसरी लाट’ निर्माण झाली. या आजाराच्या वर्षपूर्ती निमित्ताने गेल्या वर्षातील त्यासंबंधीच्या ठळक घडामोडींचा हा मागोवा :

डिसेंबर 2019 :
चीनच्या वुहान प्रांतात न्युमोनिया या आजाराचे काही रुग्ण आढळले आणि त्याचे कारण अज्ञात होते.
* 31 डिसेंबरला या नव्या आजाराची WHOच्या दप्तरी नोंद झाली. करोना-सार्स २ हा विषाणू तर कोविड-१९ हा त्याचा आजार, अशी अधिकृत नावे दिली गेली.

जानेवारी 2020 :
* या आजाराचे RT-PCR या चाचणीने निदान झालेला पहिला रुग्ण अमेरिकेत आढळला.
* हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो हे स्पष्ट झाले.
* WHOने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली.

फेब्रुवारी :
बहुतेक देशात आंतरराष्ट्रीय विमानसेवांवर निर्बंध. परदेशातून आलेल्या व्यक्तीस 14 दिवसांचे विलगीकरण लागू.

मार्च :

* 11 मार्च रोजी WHO कडून कोविडची महासाथ जाहीर.
* HCQ या पारंपरिक औषधाचा वापर सुरू.
* संसर्ग साखळी रोखण्यासाठी बऱ्याच देशात टाळेबंदी जाहीर.
* भारतीय रेल्वेच्या १६७ वर्षांच्या इतिहासात (संप वगळता) प्रथमच प्रवासी सेवा काही काळ पूर्ण बंद.

एप्रिल-मे :

* Remdesivir औषधाला तातडीच्या उपचारासाठी मान्यता.
* रोगविरोधी लसनिर्मितीचे सूतोवाच.
* अमेरिकेतील मृत्यूंची संख्या एक लाखांवर पोचली

जुलै :
हा आजार हवेतील सूक्ष्मकणांच्याद्वाराही पसरत असल्याचे WHOचे निवेदन. तसेच बाधित पण लक्षणविरहीत लोकांकडूनही त्याचा प्रसार होत असल्याचे निवेदन.

ऑगस्ट :
बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातून काढलेल्या रक्तद्रवाच्या उपचारास मान्यता.

सप्टेंबर :
जागतिक कोविडमृत्यूंचा आकडा १० लाखांवर पोचला.

ऑक्टोबर
:
* Remdesivir ला अमेरिकी औषध प्रशासनाकडून अधिकृत औषधाची मान्यता (पण पुढे याबाबत WHOने नकारात्मक शेरा दिला).
• भारतात कोविडमृत्यूंचा आकडा १ लाखावर पोचला.

नोव्हेंबर : दुहेरी अँटीबॉडी उपचारास तातडीच्या वापरासाठी मान्यता.

डिसेंबर २०२० :
• काही लसी प्रयोगसिद्ध होऊन मान्यताप्राप्त. वितरणास तयार. चीनमध्ये लाखो लोकांना त्यांची लस दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध. रशियाने पण सुरवात केली. इंग्लंड ८ डिसेंबरला लसीकरण सुरु करण्याच्या तयारीत.
• आज अखेरीस या आजारावर निर्विवाद असे प्रयोगसिद्ध रामबाण औषध उपलब्ध नाही. त्यामुळे रोगप्रतिबंधावर अधिक लक्ष केंद्रित.
...............

समाजात या निव्वळ नैसर्गिक आजारातून पुरेशी सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे लसीकरणाची कल्पना पुढे आली. वर उल्लेख केल्याप्रमाणे संबंधित लस नव्याने निर्माण करून त्याचे काहीसे घाईतच प्रयोग केले गेलेत. लसीच्या अनेक उत्पादनांपैकी काही आता प्रयोगसिद्ध होऊन वापरासाठी तयार आहेत. लस देताना अर्थातच सामाजिक प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. ती सर्व नागरिकांना द्यायची की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. RNA तंत्रज्ञानावर आधारित लसी या नव्यानेच निर्माण केलेल्या आहेत. त्यांची उपयुक्तता आणि दुष्परिणाम अनुभवातून समजतील. लसीकरणातून महासाथ कशी आटोक्यात येते हे यथावकाश समजेल. आपण तसे स्वप्न बघावे अशी WHOने इच्छा व्यक्त केली आहे !

लसीसंबंधी आणि संबंधित घडामोडीबाबाबत चर्चा करण्यासाठी हा नवा धागा.
एव्हाना या आजारावर या धाग्यासह ५ धागे निर्माण झालेले आहेत. आता हा आजार लवकरात लवकर सामान्य होऊन आटोक्यात येवो ही इच्छा. जेव्हा तो सामान्य सर्दीपडशाप्रमाणे समाजात दखलपात्र राहणार नाही, तेव्हा अशा चर्चाधाग्यांचे प्रयोजनही संपेल. तसे लवकरात लवकर होवो आणि हे सर्व धागे इ-रद्दीत जावोत हीच आंतरिक इच्छा !
.............................................................................
चित्र जालावरुन साभार !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>ही लस प्रत्यक्ष श्वसनमार्गामध्ये स्थानिक प्रतिकारशक्ती कितपत देईल याबाबत शंका आहे.>>>
हा दुष्परिणामच म्हणायचा

रेव्यु,
हा दुष्परिणामच म्हणायचा >>>
नाही. ही एका बाबतीतील मर्यादा असते. त्याचा अर्थ असा की स्थानिक पातळीवरील antibody तयार होत नाही. परंतु रक्तातील Abs आणि टी-पेशी या निर्माण होतच आहेत. या दोन्हीचा वाटा मोठा असतो.

किंबहुना जी लस इंजेक्शनद्वारा दिली जाते तिला ही मर्यादा असतेच. नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या लसीला तो फायदा मिळतो.

किशोर,
ती बातमी तपासून घ्यावी लागेल.

इथे 'सत्यता पडताळणी' दिली आहे. --> These claims are partly false

लसीकरिता "rat race" दिसते .

कुमार सर,

लस घेतल्यानंतर किती दिवसांनी ती व्यक्ती safe from infection होईल ? अस लस निर्माते सांगताना दिसत नाही....

.

सतीश,

फायझर कंपनीच्या या लसीबाबतच्या प्रयोगानंतरच्या अधिकृत अहवालात असे म्हटले आहे :
• लसीच्या पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी पुरेशी प्रतिकारशक्ती निर्माण होते.
• तसेच दुसऱ्या डोस नंतर सात दिवसांनी देखील प्रतिकारशक्ती समाधानकारक दिसून आली.

https://www.pfizer.com/news/press-release/press-release-detail/pfizer-an...

करोनाची लस घेतल्यानंतर दोन महिने मद्यप्राशन करता येणार नाही
https://www.loksatta.com/photos/news/2350794/no-drinking-alcohol-for-two...
Submitted by साद on 10 December, 2020 - 14:49
>>>>>

तूर्त रशियन मंडळींची याबाबतची उलटसुलट विधाने बाजूला ठेवू आणि त्यातील विज्ञान पाहू.

मद्याचे प्रतिकारशक्तीवर होणारे प्रतिकूल परिणाम असे आहेत :

१. पचनसंस्था : मद्य आतड्यातील उपयुक्त जंतूंवर अनिष्ट परिणाम करते हे जंतू एरवी स्थानिक प्रतिकारशक्ती वाढवायला मदत करतात, ज्यामुळे तोंडाद्वारे आलेले अनेक घातक जंतू नेस्तनाबूत होत असतात. इथल्या टी-पेशींसह अन्य पांढऱ्या पेशीवरही विपरीत परिणाम होतो.

२. श्वसनसंस्था: इथल्या श्वासमार्गातील स्वच्छता पेशी आणि फुफ्फुसांतील पांढऱ्या पेशी या सर्वांवर अनिष्ट परिणाम होतात. त्यातून न्यूमोनिया आणि अन्य जंतुसंसर्गाचे आजार होण्याचा धोका वाढतो.

** पचन आणि श्वसनमार्ग या दोन मार्गांद्वारा जंतू शिरतात. तिथेच निसर्गाने ज्या ‘ढाली’ दिल्यात त्या मद्यप्राशनाने दुबळ्या होतात.

फायझरच्या लसीला अमेरिकेच्या औषध प्रशासनाने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. त्यासाठी संबंधित समितीत मतदान होऊन १७ विरुद्ध ४ अशा बहुमताने मान्यता मिळाली.

लस वापरासाठीच्या अटी :
१. ही लस फक्त सोळा वर्षे वयावरील व्यक्तींसाठी वापरली जावी.

२. ज्यांना एखादे औषध, अन्य लस अथवा खाद्यपदार्थाची तीव्र ऍलर्जी येते त्यांनी ती घेऊ नये

३. गरोदर स्त्रियांबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही.

Proud

मी डॉकटर आहे

पण मतदान होऊन असा निर्णय होणे , हे थोडे हास्यअसपद वाटले

ब्लॅककॅट,
यात हास्यास्पद असे काही नाही.

लस निर्मिती आधी लस-संशोधन मंजुरी देण्याची एक समिती असते. भारतातील अशा एका संशोधन समितीचा अध्यक्ष म्हणून मी दीर्घकाळ काम केलेले आहे. तिथेही असे मतदानाचे प्रसंग कधीतरी आलेले आहेत. त्यात गैर काही नाही.

विज्ञानात अंतिम सत्य असे काहीच नसते. तेव्हा काही मुद्द्यांवर तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता असू शकते.
शेवटी ही लोकशाही प्रक्रिया आहे.

हास्यास्पद नसले तरी विज्ञान दृष्टीने चुकीचे असू शकेल?
१७ विरुद्ध ४ बहुमत असले तरी विरोधी ४ मतांची वैज्ञानिक कारणे / स्पष्टीकरण जास्त सबळ, योग्य असू शकतील?
मतांबरोबर अनुमोदनाची / विरोधाची कारणे द्यावी लागतात का?
म्हणजे अनुकूल मत देतानाही { if (condition) then agree, else not } अशी काही लेखी भूमिका देणे गरजेचे असते का? दिली जाते का?
समिती सदस्य unbiased आहेत / असावेत याची काही खात्री, नियम असतात का?
ज्यांच्या बहुमताने निर्णय अमलात आणला जातो त्यांच्यावर पुढील विपरीत परिणामांची ( जर काही झालेच तर) कायदेशीर किंवा नैतिक जबाबदारी असते का?

कारवी,

मतांबरोबर अनुमोदनाची / विरोधाची कारणे द्यावी लागतात का?

>>> विरोधी मताची कारणे अहवालात नोंदली जातात.

समिती सदस्य unbiased आहेत / असावेत याची काही खात्री, नियम असतात का?

>>>>
नियम नक्कीच असतात. समिती सदस्य संबंधित औषधी कंपनीशी दुरान्वयानेही संबंधित नसावे लागतात.

ज्यांच्या बहुमताने निर्णय अमलात आणला जातो त्यांच्यावर पुढील विपरीत परिणामांची ( जर काही झालेच तर) कायदेशीर किंवा नैतिक जबाबदारी असते का?
>>>>
होय, असते. भविष्यात जर काही विपरीत झाले तर त्यांना चौकशीस सामोरे जावे लागते.

Medicine chemistry aani doctors हे दोन वेगवेगळे घटक असावेत असा माझा समज आहे.
त्या मुळे नवीन लस बनते तेव्हा ती शरीरात काय biochemical badal घडवेल ह्याचा अंदाज किंवा पूर्ण माहिती ही जी लोक लस बनवतात त्यांनाच असणार
त्यांनी सर्व डिटेल माहिती डॉक्टर न देणे गरजेचे आहे.
प्रश्न हा आहे.
अशी माहिती डॉक्टर ना दिली जाते का?

हेमंत,
चांगला मुद्दा.
होय, अशी माहिती दिली जाते.
किंबहुना समितीमध्ये डॉक्टर्स व्यतिरिक्त वैद्यकीय पदवीधर नसलेले सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ देखील असतात. अशा तज्ञांचा लस निर्मिती आणि मानवी शरीर अशा दोन्ही अंगाने अभ्यास असतो. लस ही रोगजंतुशी संबंधित असते.
त्यामुळे इथे हे तद्न्य निर्माणतज्ञापेक्षा अधिक महत्वाचे असतात.

तज्ञाचे काम लस देण्यास योग्य आहे का हे सांगणे इतकेच असावे

आता ते मोठ्या प्रमाणावर द्यावे का , हे सरकारी समितीवर ठरणार

मतदान होऊन लस योग्य की अयोग्य कसे काय ठरू शकेल ?

कुणी सांगावे , प्रारंभिक चर्चेत नाहीवाल्याचे बहुमत होत असेल आणि ऑपरेशन लोचट होऊन फायनल डे ला हो आले असेल

Submitted by कुमार१ on 12 December, 2020 - 12:20 >>>
धन्यवाद सर
म्हणजे अनुमोदन हे पूर्ण अनुमोदन असते. फक्त विरोधी मताची कारणे अहवालात नोंदली जातात.
चर्चेच्या मसुद्यात नोंदलेले मुद्दे, शास्त्रीय तथ्ये लक्षात घेऊन आम्ही अनुमोदन देतोय. पण या या अपवादात्मक परिस्थितीत किंवा या या निकषांची पूर्ती न झाल्यास किंवा मसुद्यात नसलेल्या आणि आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर / उपाय न मिळाल्यास आमचे अनुमोदन ग्राह्य धरू नये असे काही लेखी disclaimer अनुमोदनात दिले जात नाही.

सरकार चे काम मर्यादित च असेल पाहिजे.
1) सरकार चे स्वतः चे तज्ञ जे असतात त्यांनी निर्मिती कंपनीचे दावे तपासून पाहावे.
2) आणि लस कशी वितरीत करता येईल ह्याची काळजी घेणे.
आणि लस देण्याची यंत्रणा निर्माण करणे.
इथपर्यंत च मर्यादित असणे गरजेचे आहे.

वरील लसमंजुरी संबंधित बैठकीचा वृत्तांत वाचल्यावर काही गोष्टी स्पष्ट होतात :

१. विरोधी मत देणाऱ्यांचा मुख्य मुद्दा या लसीने तीव्र अलर्जिक प्रतिक्रिया उमटतील का, हा होता (संदर्भ :इंग्लंडमधील दोन घटना). त्यामुळे सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे.

२. पण सध्या अमेरिकेतील साथ अतितीव्र असून प्रतिदिन मृत्यूच्या आकड्याने तीन हजारी पार केली आहे. या क्षणी या रोगावर रामबाण औषध उपलब्ध नाही.

३. तेव्हा अन्य कुठलाच प्रभावी उपचार समोर नसल्याने लसिला आपात्कालीन मंजुरी देणे हिताचे ठरले.

४. दरम्यान लसीचे अजून प्रयोग चालूच राहणार असून अंतिम मंजुरीसाठी कंपनीला पुन्हा एकदा व्यापक विदा सादर करून अर्ज द्यावा लागणार आहे.

धन्यवाद डॉ.
>>>>>साथ अतितीव्र असून प्रतिदिन मृत्यूच्या आकड्याने तीन हजारी पार केली आहे>>>>

हा पॉइंट खूप महत्वाचा वाटतो.

एखाद्या लसीचे संशोधन आणि रुग्णप्रयोग चालू करण्याआधी तिला एका संशोधन समितीची मंजुरी घ्यावी लागते. अशा एका समितीचा माझा अनुभव असल्याने त्याबद्दल काही माहिती देतो. ती वाचकांना रोचक वाटेल.

अशा समितीमध्ये सात किंवा नऊ असे विषम आकडी सभासद असतात. त्यामध्ये प्रमुख्याने डॉक्टर असतात पण त्या व्यतिरिक्त खालील लोकांचाही समावेश असतो :
१. विज्ञान शाखेतील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
२. एक सामान्य नागरिक
३. एक सामाजिक कार्यकर्ता
४. एक कायदा सल्लागार.

कायदा सल्लागार हा मुख्यत्वे संशोधनापूर्वी औषध कंपनीने विमा उतरवला आहे ना, हे पाहतो. जर रुग्ण प्रयोगादरम्यान काही तीव्र ऍलर्जिक प्रतिक्रिया वगैरे उमटल्या आणि त्यातून एखाद्या व्यक्तीचे काही बरेवाईट झाले / अपंगत्व आले, तर त्यासाठी हा विमा असतो. त्याची रक्कम काही कोटी रुपयांमध्ये उतरवलेली असते. समितीच्या बैठकांमध्ये सामान्य नागरिकाची उपस्थिती अत्यावश्यक असते. तो येऊ न शकल्यास बैठक बरखास्त केली जाते. अशा सामान्य नागरिकाला हे प्रयोग सुरु करण्यापूर्वी, “या लसीची खरोखर आवश्यकता आहे काय?” असे विचारण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. (पश्चिमी देशांत असे लोक हिरीरीने काम करतात व वेळप्रसंगी न्यायालयातही जातात).

प्रत्यक्ष बैठकीमध्ये औषध कंपनीतर्फे एक जबाबदार अधिकारी (हा डॉक्टरही असू शकतो) लसीची तांत्रिक माहिती सादर करतो. नंतर प्रमुख संशोधक डॉ त्याचे मत देतो. त्यावर समितीमध्ये विचारविनिमय होऊन संशोधन प्रयोगांना मंजुरी दिली जाते. समितीत एकमत होत नसल्यास मतदानाची तरतूद असते.

युके युएसए ने फायझर परमिशन दिली आहे.जनरल युजसाठी. भारतातले तज्ञ काय चेक करत आहेत? फायझरने अप्लाय केले आहे.

फायझरने भारताच्या CDSO कडे त्यांची लस परदेशातून आयात करण्याची परवानगी मागण्याबाबत अर्ज केलेला आहे.
त्यावर समिती विचारविनिमय करीत आहे इतके समजले.

फायझरचे -७० C वाले प्रकरण आपल्याला कितपत झेपेल याबाबत शंका वाटते. त्यापेक्षा सिरम इंडियाची लस लवकर तयार झालेली बरी. तिला साध्या फ्रीजचे तापमान पुरणार आहे.

मला सॅनिटायझर घ्यायचा आहे जो मी वाणसामानाच्या पॅकिंग वर फवारू शकेन. पाव किलो पासून १० किलोपर्यंत सगळी व्हरायटी असते. आणि खूप सामान असल्यामुळे पटकन स्प्रे
फवारून उरका पाडायचा आहे.
(हे करायची खरं म्हणजे गरज नाही हे मी याच धाग्यावर वाचलं आहे पण घरात को-मॉर्बिड कंडिशन्स असलेले ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे प्रचंड काळजी घ्यावी असं डॉक्टर स्वत: म्हणाले आहेत.)
माझी बाहेर एकतरी फेरी १-२ दिवसांत असतेच त्यामुळे जनरल मेडिकल दुकानात मिळेल असा पर्याय मिळाला तर बरं होईल.

प्रज्ञा
सॅनिटायझर मधले अल्कोहोलचे प्रमाण कमीत कमी ६२% बघून घ्यावा.

मी साबण सोडून काहीच न वापरल्याने काय सांगू ? Bw

Pages