अक्षरवार्ता

नव्याजुन्या पुस्तकांची ओळख करून देणारा, त्यांचं स्वागत करणारा मायबोलीवरील हा नवीन विभाग. नुकतीच प्रकाशित झालेली, किंवा उत्कृष्ट असूनही जरा दुर्लक्षितच राहिलेली अशी दर्जेदार पुस्तकं या विभागात आपल्याला चाळता येतील. दर महिन्याला निवडक अशा पुस्तकांतील काही भाग इथे आपल्याला वाचता येईल. ही पुस्तकं मायबोलीवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत. ग्रंथाली, राजहंस, मृण्मयी, चिनार, समकालीन यांसारख्या मातब्बर प्रकाशनांचं सहकार्य आपल्याला यासाठी मिळाले आहे.

इन ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट - मनजीत बावा / इना पुरी

Submitted by चिनूक्स on 11 January, 2011 - 03:41

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चित्रकारांच्या प्रतिभेलाही धुमारे फुटले आणि आधुनिक भारतीय चित्रकलेचं दालन समृद्ध झालं. आरा, हुसेन, बाकरे, रझा, सुझा यांनी प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुपाची स्थापना केली. तय्यब मेहता, अकबर पदमसी यांसारखे चित्रकारही नंतर या ग्रुपाचे भाग झाले. मात्र या कलाकारांवर युरोपीय चित्रकलेचा प्रभाव असल्याचे आरोपही केले गेले. असं असलं तरी आधुनिक भारतीय चित्रकलेला जागतिक स्तरावर नेण्यात या चित्रकारांचा फार मोठा वाटा होता, हे नक्की.

manjeetbawapaintings.jpg

'तुटलेले पंख' - अम्बई, अनुवाद - सविता दामले

Submitted by चिनूक्स on 21 December, 2010 - 04:49

विभावरी शिरुरकरांपासून मेघना पेठ्यांपर्यंत असंख्य लेखिकांनी मराठीत भरघोस लेखन केलं असलं तरी इतर भारतीय भाषांमधलं स्त्रीसाहित्य मराठीत फारसं आलेलं नाही. हे ध्यानी घेऊन मनोविकास प्रकाशनानं 'भारतीय लेखिका' ही मालिका प्रसिद्ध केली आहे. या मालिकेअंतर्गत आतापर्यंत तीन कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. अकरा पुस्तकं लवकरच प्रकाशित होतील. सेन्सॉरशिपला धुडकावून लावणार्‍या या लेखनात लैंगिकता, राजकारण, पर्यावरण, मानवी नातेसंबंध अशा विविध विषयांचा थेट वेध घेतला आहे, जाणार आहे.

'मुक्तांगणची गोष्ट' - डॉ. अनिल अवचट

Submitted by चिनूक्स on 28 November, 2010 - 23:38

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचं हे रौप्यमहोत्सवी वर्षं. डॉ. सुनंदा अवचट आणि डॉ. अनिल अवचटांनी हे केंद्र सुरू केलं त्याला निमित्त ठरला त्यांच्या एका स्नेह्यांचा व्यसनाधीन मुलगा. दारू, गर्द यांचं विश्व किती भयप्रद आहे, हे या निमित्तानं अवचट दांपत्याच्या ध्यानी आलं. 'गर्द' ही लेखमालिका अनिल अवचटांनी व्यसनाधीनांच्या आयुष्यावर लिहिली, आणि त्यातून जन्म झाला 'मुक्तांगण'चा.

शहाण्यांचा सायकिअ‍ॅट्रिस्ट - डॉ. आनंद नाडकर्णी

Submitted by चिनूक्स on 29 October, 2010 - 02:58

आपल्याकडे मानसिक आजारांबद्दल प्रचंड पूर्वग्रह आहेत. मनोविकारग्रस्त म्हणजे 'वेडे' आणि मनोविकारांवर उपचार करणारे सायकिअ‍ॅट्रिस्ट म्हणजे 'वेड्यांचे डॉक्टर', ही समाजाची धारणा आजही टिकून आहे. शरीराचे जसे आजार असतात तसेच मनाचेही असतात आणि योग्य उपचारांनी ते बरे होऊ शकतात, हे लक्षात घेतलं जात नाही. आपल्या एवढ्या मोठ्या देशात आज केवळ सहा हजार मनोविकारतज्ज्ञ आहेत. तेही बहुतांशी शहरी भागांत. प्रचंड लोकसंख्या, डॉक्टरांची अपुरी संख्या यांमुळे फक्त अतितीव्र मानसिक आजारांच्या लक्षणांकडे गांभीर्यानं बघितलं जातं. त्यातही उपचारांसाठी उशिरा येणं, अगोदर अन्य उपाय करणं, या पायर्‍या घेतल्या जातात.

विषय: 

सुंदर ती दुसरी दुनिया - श्री. अंबरीश मिश्र

Submitted by चिनूक्स on 26 September, 2010 - 19:12

सिनेमाची गोष्ट १८९५ साली सुरू झाली, आणि बघता बघता या हलत्या चित्रांनी जग व्यापलं. टॉलस्टोयनं सिनेमाला 'गतिमानतेचं गूढ ईश्वरी वरदान लाभलेलं एक महान माध्यम' असं म्हटलं होतं. या हलत्या चित्रांनी माणसाला कितीतरी अद्भुत गोष्टी दाखवल्या. माणसाची निरनिराळी रूपं दाखवली. जणू एक नवीन प्रतिसृष्टी निर्माण केली.

जर्नी विथ अ हंड्रेड स्ट्रिंग्ज - पं. शिवकुमार शर्मा / इना पुरी

Submitted by चिनूक्स on 1 September, 2010 - 08:35

एक लाकडी पेटी आणि काही तारा असं रूप असलेलं संतूर हे सुंदर वाद्य म्हणजे वैदिक काळापासून प्रचलित असलेल्या शततंत्री वीणेचं एक सुधारित रूप. हे वाद्य पर्शियातून आपल्याकडे आलं, असंही काहींचं मत आहे. तसं असलं तरी काश्मीरच्या खोर्‍यांत प्रचलित असलेल्या या संतूरचे सूर गेली अनेक शतकं लोकांना भुरळ घालत आले आहेत.

मास्तरांची सावली - कृष्णाबाई नारायण सुर्वे

Submitted by चिनूक्स on 25 August, 2010 - 09:47

लक्ष्मीबाई टिळक, आनंदीबाई शिर्के, पार्वतीबाई ठोंबरे, सुनीता देशपांडे, कमल पाध्ये, सुमा करंदीकर, यशोदा पाडगावकर, रागिणी पुंडलिक यांच्या सकस आत्मचरित्रांनी मराठी वाङ्मयात मोलाची भर घातली. कृष्णाबाई नारायण सुर्वे यांचं 'मास्तरांची सावली' हे या समृद्ध परंपरेला अधिक श्रीमंत करणारं आत्मचरित्र.

विषय: 

कलात्म

Submitted by चिनूक्स on 9 August, 2010 - 02:06

कोणे एके काळी 'कला' या शब्दाला काही एक अर्थ होता. मान होता. गायन, वादन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला यांना सरकारदरबारी आश्रय होता. कालांतरानं परिस्थिती बदलली. अभिजात कलांना कोणी विचारेनासे झाले. एखाद्या कलेची साधना करणं म्हणजे आयुष्य वाया घालवणं, असा विचार केला जाऊ लागला.

त्यातच शिक्षणपद्धती बदलली. मळलेल्या वाटेवरून जाणं श्रेयस्कर ठरू लागलं. चाकोरीबद्ध आयुष्य जगण्यातच धन्यता मानणारा समाज निर्माण झाला आणि कलेचा आनंद घेणं म्हणजे काय, हेच आपण विसरून गेलो. कलेमुळे जीवन समृद्ध होतं, ही कल्पनाच मागे पडली.

'बाइकवरचं बिर्‍हाड' - अजित हरिसिंघानी / अनु. सुजाता देशमुख

Submitted by चिनूक्स on 15 July, 2010 - 17:07

जे.आर.डी. टाटा नेहमी म्हणत - 'Live the life a little dangerously. आयुष्यात किंचित धोका पत्करल्यामुळेच त्यातला थरार आणि स्वान्तसुखाय तृप्ती मला मिळवता आली.' जे. आर.डी हे अजित हरिसिंघानींचे आदर्श असल्यानं साहजिकच वेडी धाडसं करणं, किंवा सुरक्षित, बंदिस्त आयुष्य न जगणं, यांत हरिसिंघानींना काही जगावेगळं वाटत नाही. अजित हरिसिंघानी हे वाचोपचारतज्ज्ञ आहेत. पुण्यात राहतात. पुण्यातच प्रॅक्टिसही करतात.

कर के देखो - संपा. श्री. सदा डुंबरे

Submitted by चिनूक्स on 1 June, 2010 - 08:01

दांडीयात्रेच्या वेळी गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाचा कार्यक्रम आखला होता. पण त्यांच्या या कार्यक्रमाबद्दल शंका असणारे, घेणारे भरपूर होते. या मिठाच्या सत्याग्रहानं नक्की काय साध्य होणार? ब्रिटिश सत्ता हलायचीसुद्धा नाही तुमच्या चिमूटभर मिठाने.. अशी शंका घेणारे केवळ सामान्य लोकच नव्हते, तर मोतीलालजी नेहरूंसारखे नेतेही होते. मोतीलालजींनी गांधीजींना एक मोठ्ठं बावीस पानी पत्र लिहिलं. मोतीलालजी होते बॅरिस्टर. त्यांना नवीन मुद्दे मांडून समोरच्याला नामोहरम कसं करायचं, ते पुरतं ठाऊक होतं. 'या सत्याग्रहानं काहीही साध्य होणार नाही. झालंच तर हसं होईल.

अज्ञात गांधी - श्री. नारायणभाई देसाई

Submitted by चिनूक्स on 20 April, 2010 - 15:16

मोहनदास करमचंद गांधी हा 'माणूस' व 'विचार' समजणं अतिशय कठीण. गांधीजींचं आयुष्य, एका सामान्य माणसाचं 'महात्मा' बनणं खरोखर अद्भुतरम्य आहे. गांधीजींना ज्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, सहवासातून अनुभवलं अशांपैकी नारायणभाई देसाई हे एक. गांधीजींचे पुत्रवत स्वीय सचिव महादेवभाई देसाई यांचे सुपुत्र. गांधीजींच्या अंगाखांद्यावर खेळलेले आणि दांडीयात्रा, चलेजाव चळवळ वगैरे ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार. गांधीविचार व गांधीचरित्र लेखन-कथन हा नारायणभाईंचा ध्यास आहे. 'मारु जीवन एज मारी वाणी' (माझे जीवन हाच माझा संदेश) या नावाने चार खंडांत त्यांनी गुजराती भाषेत गांधी चरित्र लिहिलं आहे.

Pages