पाचट - श्री. योगीराज बागूल
बलुती संपली आणि नगर-बीड जिल्ह्यांतला मोठा दलित समाज ऊसतोडणीच्या कामाला लागला. या वर्गाला शिक्षणाचा गंध नव्हता. गाठीशी जमिनी नव्हत्या. असल्या तरी त्या बहुतेक निकस. पोट कसं भरायचं हा मोठाच प्रश्न उभा राहिला. अशातच सहकारी चळवळ उदयास आली. सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने, सहकारी पतपेढ्या भराभर स्थापन झाल्या. हे सहकारी साखर कारखाने चालवण्यासाठी दारिद्र्यात खितपत असलेला, हाताला कामाची आणि पोटाला भाकरीची गरज आहे, अशा कामगाराची नितांत आवश्यकता होती. त्यामुळे अनायासेच साखर कारखान्याच्या अगदी पायरीतल्या कामात, म्हणजे ऊसतोडीत हा साराच्या सारा समाज अलगद ओढला गेला.