कर के देखो - संपा. श्री. सदा डुंबरे

Submitted by चिनूक्स on 1 June, 2010 - 08:01

दांडीयात्रेच्या वेळी गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाचा कार्यक्रम आखला होता. पण त्यांच्या या कार्यक्रमाबद्दल शंका असणारे, घेणारे भरपूर होते. या मिठाच्या सत्याग्रहानं नक्की काय साध्य होणार? ब्रिटिश सत्ता हलायचीसुद्धा नाही तुमच्या चिमूटभर मिठाने.. अशी शंका घेणारे केवळ सामान्य लोकच नव्हते, तर मोतीलालजी नेहरूंसारखे नेतेही होते. मोतीलालजींनी गांधीजींना एक मोठ्ठं बावीस पानी पत्र लिहिलं. मोतीलालजी होते बॅरिस्टर. त्यांना नवीन मुद्दे मांडून समोरच्याला नामोहरम कसं करायचं, ते पुरतं ठाऊक होतं. 'या सत्याग्रहानं काहीही साध्य होणार नाही. झालंच तर हसं होईल. तुम्ही हा सत्याग्रहाचा कार्यक्रम मागे घ्या', असं त्यांनी गांधीजींना लिहून पाठवलं.

गांधीजींनी मोतीलालजींना उलट पत्र पाठवलं, "प्रिय मोतीलाल, तुम्हारा पत्र मिला. कर के देखो!" फक्त दोन ओळींचं उत्तर. मोतीलालजींना कळलं की गांधीजी काही ऐकत नाहीत, त्यांचं नेतृत्व मान्य करणंच इष्ट. मोतीलालजींनी सत्याग्रहात सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला. 'मी उद्या निघणार' असं आपल्या अनुयायांना सांगून टाकलं. त्याच रात्री पोलिसांनी त्यांना पकडून तुरुंगात टाकलं. जे ब्रिटिश या सत्याग्रहाची दखलही घेणार नाहीत, असं मोतीलालजींना वाटत होतं, त्या ब्रिटिशांनी सत्याग्रहात सामील होण्याआधीच मोतीलालजींना तुरुंगात डांबलं. जेलमध्ये जाण्यापूर्वी मोतीलालजींनी बापूंना तार केली, "बापू, करनेसे पहलेही देख लिया."

'साप्ताहिक सकाळ' या नियतकालिकातर्फे एक उपक्रम गेली वीस-बावीस वर्षं राबवला जातो. साप्ताहिकाच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी देशातील एका नामवंताचं व्याख्यान पुण्यात आयोजित केलं जातं. गेली दोन दशकं या उपक्रमात खंड पडलेला नाही. ही सारी भाषणं बरीच गाजली. त्यांवर चर्चाही झाली. आपल्यासमोर असलेले, आपल्याला गोंधळवून टाकणारे प्रश्न, आणि त्या प्रश्नांचा वेध घेत उत्तरं शोधण्याचा या व्याख्यानांद्वारे केलेला प्रयत्न अनेकांना मनापासून आवडला. समकालीन प्रकाशनाने या व्याख्यानांचं महत्त्व ध्यानी घेऊन निवडक बारा व्याख्यानांचं संग्रह प्रकाशित केला. या संग्रहाचं नाव - 'कर के देखो'.

या पुस्तकात ज्यांच्या भाषणांचा समावेश केला गेला आहे, ती माणसं जागतिक स्तरावर त्यांच्या कार्याबद्दल नावाजली गेली आहेत. त्यांच्या बोलण्याला अभ्यासाची, अनुभवांची आणि साक्षेपी विचारांची बैठक आहे. आपल्या देशातल्या परिस्थितीचं त्यांना पुरेपूर भान आहे. गेल्या काही वर्षांत आपल्या देशानं स्वीकारलेल्या धोरणांमुळे समृद्धीच्या खुणा दिसत असतानाच बकाल होत जाणारी खेडी आणि लुप्त होणारी साहित्यसंस्कृती त्यांना अस्वस्थ करते. याबाबत या मंडळींचं काहीएक ठाम मत आहे, आणि ते या पुस्तकात संग्रहित केलं आहे.

भाषा, साहित्य, संस्कृती, आरोग्य, क्रीडा, राजकारण, पर्यावरण अशा शीर्षकांखाली या पुस्तकातल्या बारा भाषणांची वर्गवारी करणं शक्य आहे. पण ही भाषणं वाचल्यावर सहज लक्षात येतं की, या सार्‍या भाषणांचं अंतःसूत्र समान आहे. समाजाचं भलं कशात आहे हे ध्यानी घेऊन, सत्य, न्याय, समता यांना केंद्रभागी ठेवून, मानवी जीवनाला प्रतिष्ठा देण्याच्या प्रेरणेनं ही मनोगतं साकारली आहेत. हे सारे वक्ते 'सक्रीय कार्यकर्ते' आहेत. आपापल्या क्षेत्रांत त्यांनी बहुमोल काम केलं आहे. आपल्या विचारांशी ही मंडळी कायम ठाम राहिली आहेत, आणि त्याची किंमतही प्रसंगी त्यांनी चुकवली आहे. आपण जसं पाहतो तसंच जग आहे, तसाच आपला देश आहे, तसाच आपला समाज आहे, असा विचित्र गंड समाजातल्या एका वर्गात आहे. त्यापेक्षा निराळा दृष्टिकोन, निराळी भूमिका, निराळे अनुभव असूच शकत नाहीत, असा या वर्गाचा ठाम समज आहे. या समजाला धक्का देण्याचं आणि समाजाच्या सदसद्विवेकबुद्धीला जागं करण्याचं काम ही भाषणं करतात.

पी. साईनाथ, वंदना शिवा, सुनिता नारायण, डॉ. अभय बंग, योगेंद्र यादव, रामचंद्र गुहा, यू. आर. अनंतमूर्ती, एमटी वासुदेवन नायर, जावेद अख्तर, प्रमोद तलगेरी, राजा रामण्णा या ज्येष्ठ व श्रेष्ठ विचारवंत कार्यकर्त्यांची भाषणं आपल्याला भानावर आणतात. 'सत्तर टक्के निरक्षरांच्या या देशात रामानंद सागर आणि बी. आर. चोप्रा हे व्यास-वाल्मीकींपेक्षा वरचढ असल्याचं पटवलं गेलं आहे', असं एमटी. वासुदेवन नायर म्हणतात तेव्हा आजच्या बाजारू संस्कृतीच्या आक्रमणाची आपल्याला जाणीव होते. 'व्यक्तीस्वातंत्र्य हे सामाजिक ध्येय आहे आणि अशा समाजाची व्यवस्था अबाधित राखणं ही व्यक्तीची जबाबदारी आहे', असं सांगत प्रा. प्रमोद तलगेरी जेव्हा सेक्युलर असण्याचं महत्त्व विशद करतात, तेव्हा आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे, हे कळून चुकतं. गरिबी, दारिद्र्य आणि पर्यावरणाच्या अर्थकारणाचा मूलभूत अभ्यास केलेले अनिल अग्रवाल, वंदना शिवा, सुनीता नारायण यांच्या भाषणांतून 'आधी प्रदुषण करायचं, आणि मग ते निस्तरायचं' हे आपल्याला कसं परवडणारं नाही, हे समजतं. राजकारण म्हणजे काहीतरी वाईट आणि अनैतिक, अशी समजूत चुकीची ठरवणारे योगेंद्र यादव, सामाजिक व वैयक्तिक आरोग्याचं महत्त्व पटवणारे डॉ. अभय बंग, क्रिकेट आणि देशप्रेम यांच्या परस्परसंबंधांचं विश्लेषण करणारे डॉ. रामचंद्र गुहा आणि आधुनिक भारताच्या अणुधोरणाचे शिल्पकार डॉ. राजा रामण्णा त्यांच्या व्याख्यानांद्वारे आपण दुर्लक्षिलेल्या प्रश्नांची जोरकस जाणीव करून देतात.

ही भाषणं वाचून खरी जाणीव होते ती आपल्या निष्क्रीयतेची. कृती तर दूर, आपण विचारही करायचा आळस करतो. हा वैचारिक आळस किती घातक आहे, हे 'कर के देखो' या पुस्तकाद्वारे आपल्याला छान समजतं.

प्रा. यू. आर. अनंतमूर्ती हे कन्नड साहित्यातील नवसाहित्य चळवळीचे एक प्रणेते आहेत. त्यांनी कथा-कादंबरी-कविता-नाटक-समीक्षा असं अनेक अंगांनी लेखन केलं आहे. 'संस्कार' ही त्यांची कादंबरी बरीच गाजली, शिवाय इंग्रजी, फ्रेंच, रशियन, जर्मन यांसह असंख्य भारतीय भाषांत अनुवादितही झाली.

जागतिकीकरणाच्या रेट्यात सर्व थरांवर सांस्कृतिक सपाटीकरणानं जोर धरला आहे. यातून आपल्या भाषाही सुटलेल्या नाहीत. खरं म्हणजे विविधता हे आपलं वैशिष्ट्य. बहुसांस्कृतिक, बहुभाषिक असण्याचा आपण अभिमान बाळगून असतो. मात्र जागतिकीकरणामुळे आपलं हे बहुभाषिकत्व हरवण्याच्या बेतात आहे. आपल्या भाषांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी आपल्याला नक्की काय करता येईल, आपल्या भाषा नांदत्या-गाजत्या राहण्यासाठी आपण काय करावं, हा 'साप्ताहिक सकाळ'च्या वर्धापनदिनी ज्ञानपीठ पारितोषिकविजेते प्रा. यू. आर. अनंतमूर्ती यांच्या भाषणाचा विषय होता. हे भाषणही 'कर के देखो' या पुस्तकात संग्रहित करण्यात आलं आहे.

'कर के देखो' या पुस्तकातलं प्रा. यू. आर. अनंतमूर्ती यांचं हे भाषण...

karkeCover.jpg

आजच्या भाषणात मला भारतीय भाषांमधील साहित्याविषयी एक मांडणी करायची आहे. टागोरांनी १९१९मध्येच आपल्या भाषांच्या सामर्थ्याविषयी विचार मांडले होते. संकल्पन, अंकन, प्रेषण, अन्वयन किंवा अन्य कोणत्याही व्यवहारासाठी भारतीय भाषा समर्थ आहेत, असं त्यांनी म्हटलं होतं. बंगालात शिक्षणाचं माध्यम बंगाली भाषा असावी, असंही प्रतिपादन त्यांनी केलं होतं; पण आज मात्र प्रादेशिक भाषांचं भवितव्य धोक्यात आलेलं दिसू-भासू लागलं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात गुरुदेव टागोर खर्‍या अर्थाने भारतीय साहित्यातील अग्रणी बनले होते, ही एक अभूतपूर्व गोष्ट होय. त्यांच्यापूर्वी भारतीय साहित्याचे मानदंड संस्कृत साहित्यातून आलेले होते. लेखकांचा आदर्श कालिदास. भाषेपुरतं तर मी खात्रीनं सांगू शकतो की, दहाव्या शतकातील पंप या लेखकाच्या मनात कालिदास हाच कविकुलगुरू होता. तो संपूर्ण देशाचा अग्रगण्य कवी होता. या संस्कृत भाषेऐवजी एका प्रादेशिक भाषेतील कवीला 'भारतीय' जनमनांत, साहित्यातील अग्रणीचं स्थान मिळालं. ही घटना स्वातंत्र्यपूर्व काळात घडली; ती पुन्हा घडली नाही. आता एका भाषेतील साहित्यिकाची दखलसुद्धा इतर भाषा घेत नाहीत; मग तो कोणत्याही कोटीचं लिहीत असो. अधूनमधून एखादं भाषांतर वाचलं जातं; पण कोणीही लेखक 'दुसर्‍या भारतीय भाषेतील लेखकामुळे मी घडलो', असं म्हणताना दिसणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात हे घडत असे. तिथून आपण उलटे फिरलो आहोत आणि आज तुमच्या, माझ्या वर्गातील नशीबवान आणि जबाबदार समजल्या जाणार्‍या लोकांची मुलं भारतीय भाषांच्या माध्यमाच्या शाळांमध्ये जाताना दिसत नाहीत. ती नशीबवान मुलं कुठे जातात आणि त्यांचं काय होतं, हे आपल्याला माहीत आहेच. त्यांना इंग्रजीत उत्तम वाचनीय साहित्य उपलब्ध आहे, याबद्दल शंकाच नाही; पण त्यांना फक्त इंग्रजीच वाचता येतं. ते घरात आपली भाषा बोलत असतीलही. कारण अजून तरी सुदैवाने एखादी इंग्रजी न कळणारी आजीबिजी असते बापडी. ते सुदैव त्या कुटुंबाचं. आमच्या पिढीपर्यंत दोन्ही भाषांमध्ये उत्तम काम करणार्‍यांची उदाहरणं आहेत. मराठीतच डॉ. अशोक केळकर आहेत. कदाचित पुढच्याच पिढीतली मुलं हे करणार नाहीत. ज्यांची मुलं कानडी वाचू शकत नाहीत, असे कानडी भाषेतले अनेक लेखक मला माहीत आहेत. वाचलंच तर 'र...ट...फ...' करत वाचतात. हे फक्त कानडीबाबतच नव्हे तर भारतभर सर्व भाषांमध्ये घडत आहे. आणखीही एक चिंता आहे, ती वाढत्या असहिष्णुतेची. सलमान रश्दींचं उदाहरण आपणा सर्वानाच लज्जास्पद आहे. कलाकृतीची समीक्षा व्हावी, तिच्यावर बंदी येऊ नये. साहित्यसमीक्षेचं काम नीरक्षीरविवेकाचं आहे. तुम्ही कितीही कठोर टीका करा, चिंध्या उडवा, तुमचं स्वागत आहे. कारण आमचा भाषेच्या सामर्थ्यावर विश्वास आहे. भाषा दुसर्‍याला पटवून देण्यासाठी, समजावून घेण्यासाठी, आपली प्रचीती दुसर्‍याला सांगण्यासाठी समर्थ आहे. मला कादंबरी टाकाऊ वाटली, तर माझ्या समीक्षेत मी हे मत तुमच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करु शकतो. भाषेनं मन वळवता येतं, यावर तुमचा विश्वास असतो. तेव्हा तुम्ही बंदीची भाषा वापरत नाही; पण तोच उडाला की, मनगटशाही जवळ करावीशी वाटू लागते.

दुसर्‍या बाजूने जागतिकीकरण सर्वच प्रादेशिकतेच्या मुळावर येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मला भारतीय संस्कृतीच्या मूलभूत वैशिष्ट्यांचा पुनरुच्चार करायचा आहे. 'विविधतेतील एकता' हेच ते वैशिष्ट्य. भारतीय प्रबोधनांच्या अग्रणींनी, टागोर-गांधी यांनी ओळखलेली आणि उराशी बाळगलेली ही प्रतिमा आजवर अतिवापराने, केवळ शाब्दिकतेने गुळगुळीत होत गेली. मीही ती अर्थ उमजल्याशिवायच वापरत असे. एक दिवस या प्रतिमेच्या खर्‍या अर्थाचा लख्ख प्रकाश माझ्या डोक्यात पडला. हे मी अनेक चर्चासत्रांमध्ये, परिसंवादांमध्ये अनुभवलं आहे. जर तुम्ही एकतेवर जोर देणारं प्रतिपादन करू लागलात, तर सर्वजण सर्व प्रकारची विविधता दाखवून प्रतिवाद करतात आणि उलटपक्षी, तुम्ही विविधतेवर भर दिलात, तर आपण कसे एक आहोत, हे सांगत सर्वजण तुटून पडतात!

मला वाटतं भारतीय साहित्यानं हे वैशिष्ट्य तत्वतः आणि कृतीतूनही दाखवून दिलं आहे. त्यामार्फत विविधता आणि एकता या दोन्हींची जपणूक होताना दिसते. भले आपल्याकडे बावीसहून अधिक भाषा असतील; पण तीन-चार भाषांपैकी एखाद-दुसरी येत असली, तर सबंध देशभर फिरता येतं. धर्म, तत्त्वज्ञान या क्षेत्रांतही भारतीय भाषांमध्ये संवाद शक्य होतो. जेव्हाजेव्हा अस्मितेचा पेच उभा राहतो, तेव्हा ही विविधतेतील एकता आपल्याला आधार देते, तारून नेते. ही प्रतिमा केवळ चलनी नाणं म्हणून वापरली, तर मात्र या शक्तीचा थांगपत्ता लागत नाही.

हेच वैशिष्ट्य आपल्या धार्मिक जीवनातही आढळतं. माझ्या काही मित्रांनी मला एका जत्रेला नेलं. तिथे एक लहानसं देऊळ आहे. तिथे पंचक्रोशीतूनच नव्हे, तर शंभर मैलांवरुनही लोक येतात. बहुसंख्य खेडूत हे बायकांना घेऊन आलेले असतात. कारण जत्रा बायकांचीच असते. तिथे त्यांच्या अंगात येतं. एरवी जन्मात बोलणार नाहीत, अशा गोष्टी संचार झाला की बोलतात. भावांना, नवर्‍याला धारेवर धरतात. तेही बिचारे चळचळा कापत असतात! तो सर्व देखावा म्हणजे एक विराट विधिनाट्यच होतं. याच यात्रेत एक म्हातारी अंगात आल्यावर विड्या मागायला लागली. नातवाने एक दिली, दुसरी दिली, करता करता तिने अख्खा जुडगाच पेटवून ओढला! काय तिला म्हणायचं होतं? काहीतरी होतं नक्की. तिच्या नातवंडांना एकीकडे गंमतही वाटत होती; पण ते तिचा अवमानही करु धजत नव्हते. ही अशी यात्रा दरवर्षी भरते. पण अनेक उच्चवर्णीय लोकांना तिची माहिती नाही. या यात्रेत शिव, विष्णू या देवांच्याही पालख्या निघतात; पण तिथली खरी आराध्यदेवता 'सीरीभूत' हीच! यात्रेला सीरीजत्रा म्हणूनच ओळखतात. हा तर विविधतेतील एकतेचा कृतिकार्यक्रमच! खुद्द उडुपीमध्ये कन्नडखेरीज तुळु, कोंकणी, थोडी उर्दू अशा अनेक भाषा सुखाने नांदतात. पूर्वी मध्वाचार्यांनी 'हरि: सर्वोत्तमः' असं म्हणून ठेवलं असलं तरी वैष्णव उडुपीत शिवमंदिरही आहे, जैन पंथ जिवंत आहे, जुनं ख्रिश्चन चर्च आहे, मुसलमानी अस्तित्वही जाणवण्याइतकं आहे. या भाषा-धर्मांचं गुण्या-गोविंदाचं सहअस्तित्व तालुका पातळीवरील गावात दिसतं. ही विविधता पेलू शकणारी व्यवस्थापकीय प्रतिभा आपल्या समाजाने दाखवली आहे. चौदाव्या शतकात वादिराजाने तर, कृष्ण मंदिरातील पूजेचा मान सर्वच मंदिरातील स्वामी आळीपाळीने स्वीकारतील, असा पर्याय सुचवला आणि रूढही केला. या व्यवस्थापकीय प्रतिभेने विष्णू-शिव-भूत अशी उतरंडही निर्माण केली आणि प्रत्येकाच्या वेगळ्या; परंतू सहअस्तित्वाला अवकाशही निर्माण केला.

असं इतर देशांत घडत नाही. तिथे कुणा एकाने 'सत्य' सापडल्याचा दावा केला की, तेच एकमेव ठरवण्याची धडपड सुरू होते. इतरांना नामशेष करुन टाकण्याकडे प्रवास होतो. इथे उतरंड आहे. प्रत्येकाच्या उत्सवाचा एकेक दिवस आहे, कोणी दडपण्याचा प्रश्न नाही. ही विविधतेत एकतेची जपणूक करु शकणारी जीवनरीती आपल्या देशात निर्मांण झाली,रुजली. तिची मुळं या मातीत खोलवर आणि सर्वदूर पसरली. आज मात्र ही जमीन धुपून आपण ही प्रतिभा हरवून बसू, अशी भीती मनात घर करू लागली आहे.

हीच गोष्ट साहित्यातही घडते. माझे दिवंगत स्नेही कवी रामानुजन एक गंमत सांगत, एका लोकरामायणाची. आपल्याला ठाऊकच आहे की, असे रामायणाचे अनेक पाठ आहेत. हजारभर तरी आहेत. आता रामायणातली सीता रामाबरोबर वनवासात जाण्याचा हट्ट धरते, हा प्रसंग नानापरीने रंगवला जातो. त्यात ही लोकरामायणातील सीता अनेक युक्तिवाद लढवल्यानंतर शेवटी बिनतोड सवाल करते, 'एवढ्या सगळ्या रामायणांमधून जर सीता वनवासात जाते, तर मी का म्हणून मागे? मलाच कसं अडवतात?' या विविध संहितांच्या परस्परप्रभावांचं हे एक अजब उदाहरण! आपण कुणीच वाल्मीकीचं रामायण वाचत नाही. ते आपल्याला न वाचताच माहीत असतं. तीच गोष्ट महाभारताची. कुणी उठून व्यासांचं महाभारत पढायला बसत नाही. ते न वाचताच माहीत असतं. जणू या दोन भाषाच आहेत - एकमेकींत मिसळणार्‍या, प्रादेशिक संहितांमध्ये अवतार घेणार्‍या. या मौखिक परंपरांमधील नात्याप्रमाणेच लोकवाड़मयाचं आणि साहित्याचं दृढ नातं आहे.

गिरीश कर्नाडांचं 'नागमंडल' नाटक म्हणजे अहल्येच्या गोष्टीचं उलटून दाखवलेलं रूप आहे. अहल्येची गोष्ट आपल्याला माहीत आहे. 'देवराज कतूहलात्' अहल्येला यातना सोसाव्या लागल्या. इंद्राने तिला फसवलं आणि तिला प्रमादाची शिक्षा म्हणून शिळा होऊन पडावं लागलं. वाल्मीकी रामायणात ती शिळा न होता यातना भोगणारी अशरीरी वाणी झाली. आता कर्नाडांच्या नाटकात पती कधीच रात्रीचा येत नाही; पण प्रियकर नाग रात्रीचा येतो. कदाचित तिलाही तो आपला पती नाही हे कळतं. त्यामुळे अहल्येप्रमाणे ती आत्मवंचना करते. इथून पुढे नाटकाची गोष्ट वेगळ्या वाटेने जाते. तिला दिवस गेल्यावर नवर्‍याला संशय येतो. तो तिला शासन करू पाहतो. ती नाग हातात धरून शपथेवर सांगते की, मी हा सर्प आणि तुझा हात एवढ्याच गोष्टी हाती धरल्या आहेत. ती खरं बोलते! पुढे तिला मूल होतं, नवरा-बायकोची दिलजमाई होते आणि नाग आत्महत्या करतो. यामध्ये अहल्येला आत्मभोग नाही. मूळ कथा उलटली आहे. आपल्याकडील लोकपरंपरा साहित्यिक परंपरेला पूरक प्रवाह चालवत आली आहे. या आपापलं 'सत्य' सांगणार्‍या, वेगळं विश्व आकारास आणणार्‍या परंपरा. सत्य एकमेव नाही. कर्मविरहित,कर्मफलरहित असंही विश्व शक्य आहे, असं मानलं गेलं आहे. कर्म, कर्मजन्य अपराध, पापभावना इत्यादी ज्या गोष्टी उच्चवर्णीयांच्या साहित्यात आढळतात, त्यापेक्षा वेगळं, उलटं विश्व. लोक आणि साहित्य या परंपरांचं नातं असा पूरकतेचा प्रत्यय देतं.

झालं काय की, पश्चिमेच्या प्रभावाखाली आल्यामुळे विरोध म्हणजे अटळ संघर्ष, असं आपणही मानू लागलो. एक जिंकला म्हणजे दुसर्‍याचा नि:पात, ही संकल्पना लावून बघू लागलो. खरंतर भारतीय संस्कृती समजावून घेण्यासाठी आपल्याला वेगळ्या संकल्पना लागतात. संघर्षाऐवजी सहजीवनाचं, पूरकतेचं चलन स्वीकारावं लागते. मी भाषाशास्त्रज्ञ नाही; परंतु भाषेच्या बाबतीतही ही अडचण मला जाणवते. मातृभाषा हा शब्दप्रयोगही आपल्याकडे अपुरा ठरतो. आता माझंच उदाहरण सांगतो. माझी आई तिच्या भावाशी तुळु बोलायची आणि माझ्याशी कन्नड. मग माझी मातृभाषा कोणती? मला जर मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायचं असेल, तर माझी सोय होते. मी युक्तिवाद लढवतो, की मी तुळुभाषक. कन्नड नव्हेच. तेव्हा मूल इंग्रजी शाळेत जाऊ दे. अशी राज्याची प्रादेशिक भाषा टाळण्यासाठी इतर सगळ्या भाषा उपयोगी पडतात! एक आहे, तेव्हा दुसरीचं उच्चाटन! मातृभाषा या शब्दाचा आपण बराच दुरुपयोग केला आहे.

मला पुन्हा रामानुजनची आठवण येते. तो सांगायचा, 'मी रस्त्यामध्ये कन्नड, स्वयंपाकघरात तमीळ आणि वरच्या माडीत इंग्रजी भाषक आहे!’ वरच्या माडीत इंग्रजी, कारण त्याचे गणितज्ञ पिताजी तिथे असत; इंग्रजी बोलत. शे-दोनशे वर्षांपूर्वीची गोष्ट असती, तर वरच्या माडीत संस्कृत विराजमान दिसली असती. तिथली श्रेष्ठीभाषा वेगळी; पण स्वयंपाकघरात मात्र तमीळ! या कर्नाटकवासी अय्यंगार मंडळींप्रमाणेच परप्रांतात राहणार्‍या सर्वच भाषक समूहांनी स्वयंपाकघरात, बायकामंडळींसाठी आपापल्या भाषा सांभाळल्या आहेत! मुलींची लग्नं करताना सोपं जातं ना! मग ते कर्नाटकातले मुस्लिम असोत किंवा मराठी भाषक असोत.

आता या सगळ्याचा जमिनीवर पाय रोवून विचार करण्याची वेळ आली आहे. आपण बहुभाषक वातावरणात राहतो. सर्व भारतभर ही स्थिती आहे. यामुळे मी 'मनेमातु' म्हणजे 'घरची भाषा' असा शब्दप्रयोग अधिक पसंत करतो. दुसरी असते 'संपर्कमातु', त्या-त्या प्रदेशाची भाषा. या दोन्ही भाषा आपल्या मुखात सुखाने नांदतात. प्रश्न येतो रस्त्यावरच्या भाषेचा. याबाबत पूर्वी काय घडत आलं? आपण महाकवी बेंद्रे यांचं उदाहरण घेऊ. ते एकदा सांगत होते, 'मी बारा-एक वर्षांचा होईपर्यंत मी दोन भाषा बोलतो, हे मला जाणवतच नव्हतं....’ ते बोलत असतानाच त्यांच्या सूनबाई आल्या. त्यांच्याशी चार वाक्यं मराठीत बोलून ते पुन्हा माझ्याकडे वळले आणि कन्नडमध्ये बोलू लागले, 'ही जाणीव नव्हती. कारण भाषांचा वापर आपण वेगळ्या हेतूंसाठी करतो.’ कितीतरी कानडी साहित्यिक रुढार्थाने कन्नड मातृभाषा असणारे नाहीतच. तमीळ, तुळु, मराठी, तेलुगु, उर्दू, कोंकणी अशा कितीतरी जोडभाषा त्यांच्या कन्नडच्या बरोबर होत्या. त्यांची 'मनेमातु' वेगळी, 'संपर्कमातु' वेगळी. अशी उदाहरणं युरोपात दाखवता येतील का? कॉनरॅड एकटा अपवाद आहे. त्याची 'मनेमातु' पोलिश; पण लिहायचा इंग्रजीत. इथे तो नियम म्हणता येईल, इतक्या विपुल संख्येने असे लेखक आहेत. भारतीय माणूस परमुलखात तिथली भाषा, राजभाषा आत्मसात करतो; त्या भाषेत आपलं योगदान देतो. यात वादाचा, संघर्षाचा प्रश्न नसतो पण तो घरची भाषा टिकवून ठेवतो. असलं काही अमेरिकेत घडत नाही, घडलं नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अमेरिकेत स्थायिक होणार्‍यांना आपला भूतकाळ जाळून टाकावा लागतो. इटालियन, स्पॅनिश भाषकांनी तिथे जाऊन आपापल्या भाषा संपवल्या आहेत. मला भीती आहे की, असं काही अभद्र इथे घडू पाहतं आहे की काय? ते झालं तर भारतीय भाषांना भवितव्य नाही. आपण परभाषक मुलखात जाऊन तिथले होतो; होऊ शकतो, ही आपली शक्ती आहे. पूर्वकाळात या शक्तीची जोपासना झाली, संस्कार झाले, आदानप्रदान झाले, बदलही झाले. आपापल्या प्रयोजनाने भाषा टिकल्या, कुणाची गळचेपी झाली नाही. ज्या क्षणी आपण एकाच भाषेचा आग्रह धरू, त्या क्षणी विविधतेचा अस्त होईल. आपण फुटू, मोडू. माझं आजचं सूत्र हेच सांगतं, की विविधतेमुळे एकता मुळीच धोक्यात येत नाही. एकतेचा आग्रहच आपल्याला धोका आहे.

हे झालं भाषांबद्दल. पण मग इंग्रजीचं काय? ती तर आहेच इथे. ती जोवर अनेकींपैकी एक होती, तोवर शिकण्याची अडचण नव्हती. माध्यमिक शाळेपर्यंत आपली भाषा, पुढे इंग्रजी असा क्रम होता. इंग्रजी विरोधाचा पवित्रा घेण्याचं कारण नाही. इंग्रजी चांगल्याप्रकारे शिकवली जायला हवी. पोटापाण्याच्या उद्योगांमध्ये तिला महत्त्व आहे; पण दहावीपर्यंत शिक्षणाचं माध्यम भारतीय भाषाच हवी. आणखी एक भाषा म्हणून इंग्रजी शिकता येईल. असं झालं तर आपली साहित्य परंपरा जिवंत राहील. परमुलुखात गेल्यावर तिथली भाषा मान्य करण्याची, आपलीशी करण्याची रीत चालू राहिली पाहिजे. व्यर्थ वाद करणं थांबायला हवं. आज राजकीय हिशोबांसाठी आपण आपल्या भाषांची जागा इंग्रजीला देऊ करत आहोत. अशाने आपण फार गमावून बसू.

काहीवेळा वाटतं, आपण काही चिंता करू नये. जोवर निरक्षरता आहे, तोवर आपल्या भाषांना मरण नाही! निरक्षरतेमुळेच भाषांच्या परंपरा पूर्वापार अखंडित राहिल्या आहेत. पूर्वीच्या काळीही फ्रेंच, फार्शी या आंतरराष्ट्रीय भाषा होत्याच, पण फक्त राज्यकर्त्या समूहाची भाषाच बोलू, असं आपण कधीही केलेलं नाही. आज मात्र खुद्द कर्नाटकात एखाद्या शाळेत कन्नड बोलल्याबद्दल शिक्षा होऊ शकते. इतरत्रही हीच दशा आहे. मग निरक्षरांशिवाय भाषेला वाली नाही आणि मागासलेल्यांशिवाय संस्कृतीला प्रदेश नाही. एरवी युरोप इथे केव्हाच घुसला असता. आपण अभेद्य राहिलो ते निरक्षरता आणि मागासलेपणा यांच्या ढालीमुळेच!

कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. मी निरक्षरतेचा पुरस्कर्ता नाही! हा युक्तिवाद सध्याचा धोका स्पष्ट करण्यासाठी मी वापरत आहे. प्रादेशिक भाषांच्या उच्चाटनाचा प्रकार थांबला नाही, तर वीसच वर्षांत अशी वेळ येईल की, एकही उच्चवर्णीय लेखक प्रादेशिक भाषेत आढळणार नाही. उच्चवर्णीय उच्चतर शिक्षणाच्या संधीमागे जातात. मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात आणि एकदा इंग्रजी आलं की, प्रादेशिक भाषेकडे कोण बघतो? (निरक्षर आणि मागासच!) इंग्रजीमुळे मुलांभोवती एक कोष तयार होतो. अवतीभवतीच्या प्रत्यक्ष जीवनाशी त्यांचा संबंध राहत नाही. डॉ. अशोक केळकरांनी केलेला एक उल्लेख मला आठवतो. आणीबाणीच्या काळात मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये जाणारी मुलं कोणाला अटक झाली, काय झालं याबद्दल बातम्या घेऊन घरी येत. शाळासोबत्यांमध्ये चर्चा होई; इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील मुलांना याच्या गंधवार्ताही नसत. हे एकप्रकारचं तुटलेपण, एक कृतक कोष उभारणारं शिक्षण आपखुशीने आणण्यात लोक मग्न आहेत. त्या शाळा सर्वांना परवडत नाहीत म्हणून बरं. मूठभर तरी साहित्यिक शाबूत आहेत!

इंग्रजी भाषा श्रेष्ठ आहे, थोर साहित्याची जननी आहे, याबद्दल काही वाद करण्याची जरुरी नाही; पण ती तशी का आहे, हे मात्र समजावून घेतलं पाहिजे. या भाषेला एक पुढचं अंगण आहे आणि एक मागील दारचं अंगण, परसही आहे. भाषांबाबत ही एक प्रतिमा मी वापरतो. संस्कृतला आता फक्त पुढचं अंगण उरलंय. त्यात साहित्य वगैरे ग्रांथिकता आहे; पण आपल्या प्रादेशिक भाषांचं तसं नाही. त्यांच्या परसात गाणी, गोष्टी, रीती-भाती, लोककथा असं कितीतरी आहे. खेडोपाडीच्या जातीजमातींच्या रुपाने ते केवढं विस्तृत आहे! आपल्या भारतीय साहित्यात नवी भर पडत राहते. कारण या परसदारच्या खजिन्यातून धांडोळा घेता-घेता नवी दर्शनं घडतात. त्यातून चित्रण उतरतं. दलित, शूद्र, स्त्रिया आज जे लिहीत आहेत ते अजून व्यक्तच झालं नव्हतं. हे नव्यानेच पुढच्या अंगणात आलं आहे.

हा पुढच्या-मागच्या अंगणांचा अनुभव घेतच मी मोठा झालो. आमच्या गावाकडच्या घरी पुढील दारी वडील बसत. त्यांची मित्रमंडळी येत. आठवड्यातून एकदा वर्तमानपत्र येई. बातम्यांवरून गप्पा चालत. राजकारणाची चर्चा होई. दिल्ली, लंडनच्या गप्पा होत. हे विश्व सोडून मागीलदारी धावलं, की तिथे आईचं राज्य. तिच्याकडे बायका येत. त्यांच्या गप्पांमध्ये रोजच्या जीवनातल्या सुखदु:खाचं रहाटगाडगं येई. कोणाची गाय चुकली, कोणाची आटली, कोणाची सडाला हात लावू देत नाही... हे सगळं मागील दारी. गायींच्या आणि वाघांच्या गोष्टी, कुत्र्या-मांजरांच्या गोष्टी, उण्यादुण्याच्या, मानापमानाच्या कहाण्या. या दोन्ही विश्वातून भाषा समृद्ध होई. दहाव्या शतकात कानडी साहित्य कालिदासाशी स्पर्धा करू पाहात होतं. बाराव्या-तेराव्या शतकापासून भक्तिकाव्याने संतकवींनी आपापली भाषा सकस केली. ज्ञानाचे दरवाजे स्त्री-शूद्रादिकांना खुले केले. त्यांची भाषा संस्कृतच्या मांडीला मांडी लावून बसू शकेल, इतकी समर्थ असल्याचा प्रत्यय दिला. पुढे युरोप आला. मला खात्री आहे की, प्रत्येक मराठी लेखकाच्या पूर्वसंचितामध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम आहेत. तसाच वर्डस्वर्थ आहे. तॉलस्तोय, दोस्तायेव्हस्की सगळे आहेत. त्याच्या जाणिवा व्यापक आहेत.यातील शक्ती आपण ओळखली पाहिजे. एखाद्या जिल्ह्याच्या गावातल्या कॉलेजचा सामान्य विद्यार्थी घ्या. त्याला शेक्सपिअर माहिती आहे का? खोलवर नाही, पण कानावर आहे.अशाच लहान ठिकाणच्या अमेरिकन कॉलेजात जाऊन विचारा कालिदासाबद्द्ल. पूर्ण अंधार असेल. आपल्याकडचा सर्वसामान्य शिक्षित मनुष्य अधिक व्यापक विश्व ओळखतो. त्याला संस्कृतीच्या पातळ्यांची, विविधतेची अधिक सहजपणे जाण आहे. मी हे उच्च कोटीचा व्यासंगाबद्द्ल म्हणत नाही, सामान्यांबद्द्ल म्हणतो आहे. उच्च कोटीचा व्यासंग शिकागोत चालत असेल ; पण इथल्या भाषा सामान्य जाणिवेतून शक्ती घेतात. त्यांना कालिदास आणि शेक्सपिअर एकाच वेळी प्रतीत होतात. भक्तिकाव्य आणि अस्तित्ववाद, गांधी आणि मार्क्स असे कितीतरी प्रवाह या भाषांनी कवेत घेतले आहेत, परंपरा मिसळू दिल्या आहेत. युरोपातील थोर साहित्य मागास गणलेल्या रशियातून आलं, प्रगत युरोपमधून नव्हे. एकोणिसाव्या शतकात रशिया, तर विसाव्या शतकात दक्षिण अमेरिका. यामुळेच आपल्या भाषाही अतुलनीय कामगिरी करू शकतील असं मला वाटतं.

अशावेळी अडचणींनी गांगरून जाण्याचं कारण नाही. थोर साहित्य निर्माण करण्याची शक्ती आपल्या भाषांमध्ये निश्चितच आहे. त्यांच्याजवळ पुढची- मागची अंगणं आहेत. त्यांच्याजवळ अभिजात परंपरा आहेत. शिवाय युरोपही आहे. मी याबद्द्ल बोलताना माझ्या भाषेतला शब्द वापरतो - जीर्णाग्नि. हा जीर्णाग्नि भारतीय भाषांमध्ये वसतो आहे. जीवन पचवणारा अग्नि. त्याने संस्कृत पचवलं. ज्ञानेश्वरांच्या रूपाने मराठी समृध्द झाली, तर आजच्या आधुनिक साहित्यिकांनी बराच युरोपही पचवला आहे. गिरीश कर्नाड, यशवंत चित्तळ, शांतिनाथ देसाई यांच्यासारखे माझ्या भाषेतले लेखक असं बरंच पचवून 'तेजस्वी' झाले आहेत. यातूनही संहिता-संपर्क (इंटरटेक्स्टुअ‍ॅलिटी) उत्पन्न होतो. माझ्या आजच्या सूत्राला, विविधतेतील एकतेला बळकटी येते.
या बाबतीत ललित साहित्य प्रकाशित करणारी नियतकालिकंही काही भूमिका पार पाडू शकतात. प्रत्येक अंकात त्यांनी थोडा तरी मजकूर अन्य भारतीय भाषांमधून भाषांतरित केलेल्या साहित्याचा छापावा. कधी ललित, कधी वैचारिक ; पण याही सूचनेत एक सर्वत्र आढळणारा अडथळा आहे.एका भारतीय भाषेतून दुसर्‍या भारतीय भाषेत थेट भाषांतर करू शकणार्‍यांची वानवा आहे. सुदैवाने मराठी- कन्नड शेजाराला आहेत आणि उभयपक्षी भाषांतरं होत असतात. सुदैवाने या दोन राज्यात सीमा आखणं शक्य झालेलं नाही, कुठलीही रेषा सीमा होऊच शकत नाही. रेषा महाराष्ट्राकडे सरकवा, कितीतरी मराठी लोक कर्नाटकात पडतील. रेषा कर्नाटकाकडे सरकवा , कितीतरी कन्नडिग महाराष्ट्रात येतील. यात सुरी लावताच येत नाही, हीच तर आपल्या विविधतेतीची अतूट एकतेची मजा आहे. ही शक्ती साक्षर समाज भाषांतराने वाढवू शकतो.

विद्यापीठ अनुदान मंडळाकडेही मी एक योजना पाठवली आहे. ही योजना तरूण, कल्पक विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यांना अभ्यासवृत्ती देऊन दूरच्या भाषिक प्रदेशात पाठवावं. तिथे तीन-चार वर्षं राहून त्यांनी स्थानिक भाषा आत्मसात करावी आणि त्या भाषेतील एक कलाकृती आपल्या भाषेत आणावी. आपल्या भागात परतल्यानंतर त्या भाषेचा एक प्राथमिक अभ्यासक्रम शिकवावा. या सर्व कामासाठी - परभाषा शिकणं, त्यातील साहित्यकृतीचा अनुवाद करणं, परत येऊन शिकवणं - त्याला पीएच. डीची पदवी मिळावी. हा उपक्रम पंचवीस-तीस वर्षभर भारतभर चालवला तर आपल्याकडे उत्तम भाषांतरकार तयार होतील. युरोपमध्ये हे अभिसरण आढळतं. फ्रान्समध्ये जेम्स जॉईसवर अधिकारवाणीनं बोलणारा तज्ज्ञ आढळतो. एखादा ब्रिटिश अभ्यासक टोमासमानसारख्या जर्मन लेखकावर जर्मनांच्या वरताण अभ्यासपूर्ण पुस्तक लिहितो. पण आपल्याकडे एखाद्या उत्तर भारतीय विद्यापीठात सुब्रह्मण्य भारतींचा अधिकारी भाष्यकार आढळतो ? कोणी शिवराम कारंतांच्या साहित्याचा अभ्यासक आढळतो ? नाही, का?

कारण असं दिसतं की , वसाहती गेल्यानंतर आपणच नववसाहतवादी झालो आहोत. साम्राज्याच्या काळातील जेत्यांचा दृष्टिकोन आपण अंगिकारला आहे. आम्हाला सार्त्र किंवा काम्यु यांवर काम करणं प्रतिष्ठेचं वाटतं; पण अन्य भारतीय भाषांमधील लेखन दखलपात्रही वाटत नाही. संस्कृतइतक्याच प्राचीन तमिळ भाषेचा तज्ज्ञ शोधायला मला शिकागोला जावं लागतं. आज हिंदी भाषिकांची तमिळशी, मराठीची कन्नडशी, मल्याळमची आसामीशी साखळी जोडत रहाणं निकडीचं आहे. जुनी परंपरा अजून पूर्णपणे नष्ट झालेली नाही , तोवर हे केलं पाहिजे.

आज खरी आंतरिक अडचण म्हटली तर अशी आहे की , आपण प्रथम कोटींचे भारतीय असण्यापेक्षा दुय्यम दर्जाचे युरोपीय असणं, हेच भूषणावह मानतो. या पार्श्वभूमीवर मला आपल्या समृद्ध वारशाची जपणूक करण्याची आस्था जागी करायची आहे. आपण विविध आहोत म्हणूनच समृद्ध झालोत. ही बहुमुखी विविधता केवळ ’खपवून घेण्याची’ गोष्ट नाही; ती गौरवाने जपण्याची गोष्ट आहे. विविधतेपासून आपल्या एकतेला कोणताही धोका नाही, कारण आपण युरोपसारखे नाही. उथळ प्रादेशिकता किंवा फुटिरपणा म्हणजे विविधता नव्हे आणि एकता म्हणजे भेदशून्यता नव्हे. यासाठी सर्वांनी गांभीर्याने विचार करून कृतिशील बनायला हवं. निदान प्रादेशिक भाषांचा माध्यम म्हणून आग्रह धरण्याची चळवळ करावी, असं माझं आवाहन आहे. छोटी-मोठी नियतकालिकं चांगली चालवणं, मध्यमवर्गीय जबाबदार अभिरुचीची जोपासना करणं, असे सर्व मार्ग चोखाळत राहिलो तर आकाशमार्गे चालू असलेलं आक्रमण निष्फळ होईल, निष्फळ करता येईल.

मागच्या अंगणात मशागत आणि पुढच्या अंगणात सुगी, अशा आपल्या भाषा नांदत्या-गाजत्या राहोत, हीच इच्छा.

*****

अनुवाद व शब्दांकन - श्यामला वनारसे (२००५)

*****

कर के देखो

संपादक - श्री. सदा डुंबरे
समकालीन प्रकाशन
पृष्ठसंख्या - २१५
किंमत - रुपये दोनशे

*****

टंकलेखन साहाय्य - आशूडी, श्रद्धा, अनीशा

*****

हे पुस्तक मायबोली खरेदी विभागात उपलब्ध आहे -
http://kharedi.maayboli.com/shop/Karke-Dekho.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद सगळ्या चमुला. हा लेख छान आहे. पुढचे अंगण-मागचे अंगण उपमा आवडली Happy

नेहमीप्रमाणेच सुंदर ओळख करून दिली आहे पुस्तकाची! भाषांमधली व भाषिकांमधली साखळी जोडत राहण्याचा विचार अतिशय स्फूर्तीदायी व अनुकरणीय! धन्यवाद Happy

मस्तच... (हे पुस्तक विकत घ्यायचे असेल तर मिशिगन पर्यंत शिपिंग चार्जेस साधारणपणे किती होतात? )

सुरेख लेख. भाषा हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पुढचे अंगण-मागचे अंगण प्रतिमा फारच आवडली.
दुवा दिल्याबद्दल स्नेहाचे आभार.

छान पुस्तक ओळख. वाचायला हवं हे पुस्तक.

भाषेचा मुद्दा खूप पटला. आम्हीच घरात कित्येकदा बोलताना मराठी कन्नड असे रूळ बदलतो आम्हालाच समजत नाही. अगदी अलगद होतं हे!!

अप्रतिम लेख आहे......................... धन्स चिनूक्स अन टीम

सुंदर लेख, चिनुक्स. अनंतमुर्तींचं भाषण किती भिडतय... मनेमातु, संपर्कमातु... आणि पीएचडी साठी अभिनव कल्पना?... मला खरच असं काही करायला आवडेल. मलाच काय, अनेकांना आवडेल. भाषेची संस्कृतीची किती दालनं उघडतील...
चिनुक्स, तुझे आणि तुझ्या चमूचे आभार मानायला शब्दं नाहीत. ह्याच एका लेखासाठी नाही पण सातत्याने मायबोलीवर असं सकस पुरवत राहिल्याबद्दल.

काय मस्त लेख आहे.
'मी रस्त्यामध्ये कन्नड, स्वयंपाकघरात तमीळ आणि वरच्या माडीत इंग्रजी भाषक आहे!>> अगदी मस्त.