संत

भक्तपराधीन

Submitted by पुरंदरे शशांक on 16 June, 2019 - 22:54

भक्तपराधीन

नाही भुलत स्तुतीला
ना ते बाह्य दिखाव्याला
शुद्ध भाव उमजोनी
विठू येई चाकरीला

काय कुंभार तो गोरा
जाणे काय स्तुती मोठी
शुद्ध भाव घाली धाक
देव मळतसे माती

नसे जनाबाईपाशी
पंचपक्वान्न जेवण
रानी तिच्यासंगे हरी
पायी फिरे वणवण

माळी सावता महान
आवडीने नाम घेई
मळा राखण्यास काठी
सर्सावून देव जाई

एकनाथा घरी देव
पाणी भरी कावडीने
शेले कबिराचे विणी
फेडी दामाजीचे देणे

हरी किर्ती गुढी

Submitted by पुरंदरे शशांक on 18 March, 2018 - 00:42

हरी किर्ती गुढी

हरीनाम सार । हरी संकीर्तन । हरी गुणगान । संत गाती ।।

हरी महिमान । संतांसी प्रमाण । हरी हे निधान । संतजना ।।

गुढी उभारोनी । हरी महात्म्याची । मिरविती साची । हरीभक्ती ।।

हरिविणे जिणे । व्यर्थ वाटे संती । नित्य रमताती । हरीनामी ।।

प्रेमे जाऊ आम्ही । संतांसी शरण । तेणे हरी जाण । संतुष्टेल ।।

प्रेम भक्तीभाव । सुख समाधान । लाभे कृपादान । अनायासे ।।

हरी किर्ती गुढी । उभारू आनंदे । तेणे विश्व कोंदे । निजानंदी ।।

शब्दखुणा: 

संत

Submitted by मकरन्द वळे on 13 December, 2017 - 03:58

ज्याचे ध्यानीमनी भगवंत
त्यालाच म्हणावे संत. ।।

उपकार करी निष्काम
भूतदयेत भेटतो राम
सुखदु:खाची न ज्याला खंत
त्यालाच म्हणावे संत ..

ना गुंततो मायाजाली
हा बोले तैसा चाली
नामाविण ना ज्याला उसंत
त्यालाच म्हणावे संत ..

परदु:खाने जो द्रवतो
जगकल्याणासाठी झटतो
दुरिताचा करि जो अंत
त्यालाच म्हणावे संत ..

श्रीहरीस वसवितो चित्ती
आत्मज्ञानाची त्या प्रचिती
भक्तीमार्ग चालतो अनंत
त्यालाच म्हणावे संत ..

शब्दखुणा: 

खेळिया

Submitted by पुरंदरे शशांक on 7 July, 2017 - 04:59

खेळिया

खेळ मांडूनि पुढ्यात
गेला कळेना कोणास
खेळामधे दंग सारे
माथी एक कासाविस

कधी हासूनी मजेत
कधी रडती जोरात
त्याच सार्‍या विवंचना
एकरूप त्यात मस्त

धन्य धीराचे ते कोणी
खेळ देती भिर्काऊन
विचारती अांत अांत
कोण खेळिया महान

खेळियासी ओळखता
मनी कौतुक दाटले
रूप मनींचे अाघवे
उभे पुढ्यात ठाकले

खेळियाने विचारले
कोण व्हावे सांगा फक्त
हासोनिया संत बोले
देव तूचि, मी तो भक्त....

संतांचे उपकार

Submitted by पुरंदरे शशांक on 27 June, 2016 - 23:43

संतांचे उपकार

भक्तासाठी देव | होतसे प्रगट | येरा तो अदृष्ट | आकळेना ||

भाव ऐसा थोर | देवापायी नित्य | जीवभाव सत्य | लुप्त होई ||

आठविता चित्ती | एकमात्र हरि | लौकिक विसरी | पूर्णपणे ||

वेड लागे देवा | भक्ताचेच पूर्ण | सांडिले निर्गुण | अरुपत्व ||

ठाकतसे उभा | भक्ताचे ह्रदयी | निर्गुण सामायी | सगुणत्वे ||

आकळावे वाटे | कोणासी श्रीहरि | अभंग उच्चारी | सप्रेमाने ||

ज्ञानेश्वरी गाथा | मनन - चिंतन | स्वये नारायण | दृष्य होई ||

अगा करुणाकरा करितसें धांवा । या मज सोडवा लवकरि.......

Submitted by पुरंदरे शशांक on 18 June, 2014 - 23:57

अगा करुणाकरा करितसें धांवा । या मज सोडवा लवकरि.......

मध्यंतरी एक शेर वाचनात आला -

दिलके आईनेमें है तस्वीर ए यारकी
बस, जरासी गर्दन झुकायी देख ली...

वस्तुतः उर्दू काय, हिंदी काय किंवा मराठी काय - शेरो शायरीमधले मला काहीही कळत नाही- म्हणजे त्यातल्या तांत्रिक बाबी - अलामत, काफिया, मतला वगैरे. पण एखादा शेर का भावतो तर तो थेट मनालाच स्पर्श करतो म्हणून.
आता हा वर दिलेला शेर एखादा प्रियकर आपल्या प्रेयसीसाठी म्हणत असेल का एखादा भक्त आपल्या ह्रदयस्थ भगवंतासाठी म्हणत असेल ??

Subscribe to RSS - संत