तो
तो धावत राहतो सतत, ऊन वारा पित..
आवळलेल्या मुठीत दडलेला असतो कुटुंबाचा भार..
त्याच्या करारी नजरेला ओढ असते जिंकण्याची..
बंद ओठांमध्ये लपवलेल्या कितीतरी वेदना घेऊन तो परततो घरट्याकडे..
पिलं झेपावतात त्याच्या कडे, आईचा चिरपरिचित पदर सोडून,
त्याच्या भळभळणार्या जखमांना नाकारत मिठीत शिरतात..
अन् त्या रेशीम मिठीत विरघळू लागतं बापाचं प्रेम!
Happy Father's Day! __//\\__
अवांछित
पाउस कधीचा । पडत राहतो
नडत राहतो । जाणीवेसी
नभ काळेशार । काळोख मनात
हताशा जनांत । रुजलेली
नेत्री दाटतात । भयावह व्यथा
अगणित कथा । माणसांच्या
कधी मग येते । तिरीप जराशी
ऊन पावसाशी । बागडते
लख्ख उजळतो । रंग अंबराचा
भाव अंतरीचा । सावरतो
आकाश निळेले । भूतल हिरवा
मनाचा पारवा । झेप घेतो
नेतो तोच देतो । निरामय सृष्टी
आशामय दृष्टी । अवांछित
-श्रीराम
पाऊस
पाऊस पडतोय
झिरपतोय हळूहळू
रांगत येईल हळूच वाणसामानात
तिथून मग उद्याच्या विवंचनेतही..
पाऊस पडतोय
ओल्या भिंतीवर
चिंब भिजलेल्या आठवणी
हिरव्या होतील पुन्हा..
पाऊस पडतोय
घामात मिसळतोय
रक्तात भिनतोय
स्वेदफुलांना सुगंध येईल आता मातीचा..
निशब्द सांजशा वेळी
छेडीता तनूची धून,
मौनाशी बोले माझ्या
हे तुझे बोलके मौन
अस्पर्श मनीचा डोह
तो उठला झंकारून,
अन् तरंगातुनी त्याच्या
ही तान घेतसे मौन
सुरावटींचा साज
लेवून येतसे तान
त्या निश्वासांचे अर्थ
बघ कसे सांगते मौन
मिलन गीत हे अपुले
शब्दांचे नुरले भान
श्वासांचा ताल समेवर
मौनात मिसळते मौन
प्रणय असे हा खास
मुक शब्द मिरविती खूण
मिलनोत्सुक दोघांमध्ये
मूक शब्द, बोलके मौन
कधी कधी मनात इतकं असतं, इतकं असतं की शब्द बद्ध करणं सोप्प नसतं! अशा वेळेला काय करायचं. आपलं कविपण विसरून जायचं. कवितेला मनमुक्त भटकू द्यायचं. कुठे? आयुष्याच्या वाटेवर. मुक्त मुशाफिरी करायला. म्हणजे होईल असं की कविता पुन्हा येईल आणि ती येईल अशी की बस्स!
कशी बशी सुचत नसते ना, आतून काही यावं लागतं,व्हावं लागतं तेव्हाच
मनातून , आत्म्यातून, ते लहरीपण स्वतःला जाणवतं . शरीराशी असलेली फारकत, फकिरपण कवितेलाच माहिती हो
गझलेत काही कमतरता , चुका असल्यास
नक्की सांगा. त्यांचे स्वागतच असेल .
<
संवेदना होती नवी....
वृत्त : देवप्रिया / कालगंगा
गालगागा गालगागा गालगागा गालगा
याचकाची भंगलेली साधना होती नवी !
घाव तो होता जुना अन् वेदना होती नवी !
मी तुझी नाही सखी पण छान माझा मित्र हो,
त्याच दुःखाला भुलाया सांत्वना होती नवी !
ते विषारी बोलती मी मुंगुसासम धाडसी,
पण मनाला दंशण्याची कल्पना होती नवी !
सागराने त्या उन्हाशी सापळा रचला जरी,
श्रावणाला धाडण्याची प्रेरणा होती नवी !
मी पहिल्यांदा एखादी गजल वृत्तात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. काही चुका असल्यास नक्की सांगा.
वृत्त : आनंद ( गा गा ल गा ल गा गा )
बाकी अजून होते कित्येक श्वास माझे !
वाऱ्यात दरवळू द्या आता सुवास माझे
ठेवून जात आहे खोटे सुहास माझे !
गावून गीत माझे शाबासकी तुम्हाला
माझेच ओठ बोले गाणे उदास माझे !
मांडून स्तूत खोटे "चेले" उदंड जगली
घटवून घेतले मी आयुष्य "मास" माझे !
वैऱ्यास ठार केले वाटे कुणी न बाकी
त्यांनीच घात केला जे आसपास माझे !
आशेत आदराच्या शाई लयास गेली
दरसाल फक्त झाले काव्य झकास माझे !
आई
आई जणू असे
पंच महाभूत ।
भुमिका अद्भुत
आई होणे ।
आई जणू पाणी
मायेचा सागर ।
प्रेमाची घागर
सरली ना ।
आई जणू हवा
सजीवांना श्वास ।
अंतालाच कास
सुटतसे ।
आई जणू अग्नी
परीक्षेचा काळ ।
पती मुलं बाळ
सांभाळणे ।
आई जणू पृथ्वी
सृष्टीला आधार ।
कधी ना माघार
पोषणात ।
आई ती आकाश
खग घेती झेप ।
अन्नाची या खेप
पिलांसाठी ।
खेळ नियतीने थाटलेला आसमंत सारा फुललेला
अनमोल रूपी मोती मैत्रीच्या रूपात भेटलेला
जुळती जिथे घट्ट अशी स्पंदने
शब्दांत मांडता न येणारी तिथे बंधने
जिथे पतंग मैत्रीचा मनसोक्त उडणारा
निस्वार्थ भावना अन् प्रेमाचा झरा जपणारा
दिलखुलास जीवलग नाते मनास सुखवणारे
स्वरात कसे गुंफावे क्षण मैत्रीचे हर्षवणारे
खळखळणारा झरा जणू निर्मळ हास्य वाहती
मैत्रीचा सुगंध हा जणू चोहीकडे दरवळती
आठवणींची पाने चाळता नयनात अश्रू दाटते
चैतन्याची पालवी फुलता कधी हास्य उमटते
कैफ़ियत बिनधास्त झाली

- in the pleasurable presence of किमयागार _/\_