गजल

दिसत नाही का रे

Submitted by प्रतिक सोमवंशी on 30 March, 2019 - 00:49

रस्त्यावर चालताना तुला खड्डा दिसत नाही का रे?
रोजच्या चौकात तुला हल्ली कुणी पुसत नाही का रे?
.
तुझ्या समोर नुसता डोळ्यांनीच तिचा बलात्कार होतो
नाक्यावरच्या षंढावर तुझा हात उठत नाही का रे?
.
सावळ्याच लेकरू वाचवायला तर माऊली आलती
त्या पेठेच्या चिखलात तुझा पाय रुतत नाही का रे?
.
खूप बेचव झालीय रे आज तुझी आवडीची आमटी
देवळातून चोरलेल खोबरं तू खिसत नाही का रे?
.
रात्रीस 'प्रति' काय विचारतो जरा लक्षपूर्वक ऐक
लाच देऊन स्वर्गात थोडी जागा मिळत नाही का रे?
©प्रतिक सोमवंशी
इंस्टा @shabdalay

शब्दखुणा: 

एक गजल उशाला

Submitted by प्रतिक सोमवंशी on 24 March, 2019 - 09:39

रोज रात्रीला असते, एक गजल उश्याला
ती फक्त माझीच, सांगू तुम्हास कश्याला

तशी ती अजूनही होती तशीच आहे
जशी कोरत असते लाट त्या किनाऱ्याला

मी तिच्यात राहून करतो हलके ओझे
ती वाहते घेऊन तिला लिहिणाऱ्याला

दावताना वाट चालते मला घेऊन
संपतो मीही क्षितिजावर पुन्हा उदयाला

नसला कुणी वाली हा ‛प्रति’ उभाच आहे
ती नाहीच साद घालत कुणा दुसऱ्याला

शब्दखुणा: 

--गजल--

Submitted by Nilesh Patil on 21 April, 2018 - 09:17

--गजल--

शब्द गजल निःशब्द गजल,
हीच माझी मित गजल..।

या मनाची अशांत भावना,
तीच माझी प्रित गजल..।

उनाड होती मनी रुजलेली,
अशी ही माझी गीत गजल..।

अंगार झाली तप्ततारीका,
उगाच शिवली चित गजल..।

उजाड वनी ही सहज शिरली,
बहार झाली रीत गजल..।

प्रित गजल,मित गजल,
ह्रदयी पसरली गीत गजल..।

--निलेश पाटील,--
--पारोळा,जि-जळगाव--
--मो-९५०३३७४८३३--

विषय: 
शब्दखुणा: 

तुझी आठवण पुन्हा दे ना..!!

Submitted by दुसरबीडकर on 16 June, 2017 - 13:10

मेंदीचाही रंग खुलेना..
तुझी आठवण पुन्हा दे ना..!!

धुर्या-धुर्याचे टिचभर अंतर..
पार कराया जन्म पुरेना..!!

असह्य होतो जिवास उष्मा..
उन्हासही सावली मिळेना..!!

सुटी उन्हाळी हरवून गेली..
जन्माची शाळा समजेना..!!

नकळताच फोफावत जाते ..
दुःख असावे बहुदा केना..!!

लहान होतो,मोठा झालो..
लहान व्हावे कसे कळेना..!!

तिच्याएेवढे सुरेख जगणे..
तिच्याविनाही जगून घे ना..!!

-गणेश शिंदे दुसरबीडकर

तेवढे आयुष्य सावरण्यात जाते..

Submitted by दुसरबीडकर on 24 May, 2017 - 05:11

'हो-नको' च्या जेवढे वादात जाते..
तेवढे आयुष्य सावरण्यात जाते..!!

डांबरी सडकेत ती हरवून गेली..
एक गाडीवाट जी गावात जाते...!!

एेवढ्या जोरात भांडे बोलते की..
बातमी मग नेमकी चौकात जाते...!!

'फोडुनी' घर चांगले गावातले मग..
ती 'त्सुनामी' शेवटी शहरात जाते..!!

पावसाला वेळ लागू लागला की ..
स्वप्न हिरवेगार मग सरणात जाते..!!

एक नाते ओघळाया लागल्यावर..
तावदानी मन जुन्या काळात जाते..!!

गणेश शिंदे दुसरबीडकर

गद्दार होते का

Submitted by संतोष वाटपाडे on 24 February, 2017 - 04:57

जरी माघार होती घेतली..पळणार होते का
खरोखर सांग.. पुर्वज आमचे गद्दार होते का ...?

कशाला एवढी गर्दी जमा केलीत दुःखांनो
मला पाहून सरणावर कुणी रडणार होते का...?

मुलांना प्रेम दे मित्रा..तुझा पैसा नको फ़ेकू
बियाणे फ़क्त मातीने कधी गर्भार होते का..?

शहीदाची मिळाली देशभक्ती आज देशाला
घरी बापास त्याच्या लेकरु मिळणार होते का..?

तिला आनंद व्हावा याचसाठी शांत निजलो मी
गळा कापून हत्या एरवी अलवार होते का..?

तिला साडी पुरवताना...पुरवले शस्त्र का नाही
तुलादेखील अन्यायी कुणी म्हणणार होते का..?

शब्दखुणा: 

अशक्त वेदना

Submitted by संतोष वाटपाडे on 8 May, 2016 - 06:39

पुसून ओठ शेवटी प्रिया निघून जायची
बराच वेळ पावले नशेत अडखळायची...

म्हणून सांगतो व्यथे रडायचे शिकून घे
सहीष्णुता तुझी इथे कुणास ना कळायची...

जळून जायचा जरी पतंग ज्योत चुंबुनी
समर्पणात त्या मिजास केवढी असायची...

असेल त्या घरात फ़ास घेतला कुणीतरी
म्हणून भाकरी घरास पोटभर मिळायची..

तिला रफी उदास अन किशोर आवडायचे
तरी समोर माझिया गुलाम गुणगुणायची..

लबाड एवढी कशी असेल ओढणी तिची
मला समोर पाहुनी उगाच फडफडायची...

जखम हवीच एक.. जीवनास कैफ़ यायला
अशक्त वेदना मनातली किती पुरायची...!

-- संतोष

शब्दखुणा: 

लाभते सौख्य मित्रा

Submitted by संतोष वाटपाडे on 28 April, 2016 - 01:45

हीच शिक्षा खरोखर मला पाहिजे
की तुझी आठवण यायला पाहिजे...

जीव जाणार नाही गळा कापुनी
घाव पाठीमधे घातला पाहिजे...

आसवांना नशा जर कधी पाहिजे
एकदा दुःखही प्यायला पाहिजे ...

प्रेम आहे तुझे तर दुरुन बोल ना
हात अंगास का लावला पाहिजे?

प्रेत म्हसणात नेले गड्या जाळण्या
ते म्हणे जातिचा दाखला पाहिजे..

लाभते सौख्य मित्रा निखार्‍यात पण
वेदनेचा लळा लागला पाहिजे..

धुंद स्वप्ने नको जडजवाहिर नको
मी भुकेला.. मला खायला पाहिजे...

-- संतोष

शब्दखुणा: 

चार खांद्यावर

Submitted by संतोष वाटपाडे on 25 April, 2016 - 03:19

ठेवला विश्वास आम्ही वादळावर
अन म्हणालो की सुरक्षित जाहले घर..

शांतता होती चिवट मेलीच नाही
झाडल्या गोळ्या जरी त्यांनी तिच्यावर..

शेवटी पर्याय सापडला व्यथेवर
की निजावे शांत चित्ताने चितेवर..

काल ओठांचा पुन्हा अपघात झाला
हात कमरेला सख्याचा लागल्यावर...

जाळले आम्हास दुनियेच्या दयेने
दोष शेवट लादला गेला उन्हावर...

नेहमी ठेवायच्या पकडून त्याला
जीव जडला पापण्य़ांचा आसवावर...

चार खांद्यांवर मला उचलून नेले
एवढा मी भार होतो का जगावर...

-- संतोष वाटपाडे ( नाशिक)

शब्दखुणा: 

गुन्हा नसून

Submitted by संतोष वाटपाडे on 18 April, 2016 - 01:29

निरोप द्यायचा म्हणून ती मिठीत घ्यायची
निरोप देउनी पुन्हा तिथेच घुटमळायची..

निघून जायचे खुशाल तेल पाठ फ़िरवुनी
दिव्यात वात एकटीच रात्रभर जळायची...

तिला समोर पाहुनी जरी न दुःख व्हायचे
जखम जुनी मनातली उगाच दरवळायची...

बघून दुःख भरजरी नकोस जीवना जळू
सदैव वाटते भिती तुझी नियत चळायची...

मनुष्यजन्म दे कधीतरी चुकून विठ्ठला
किड्यासमान जिंदगी किती युगे जगायची...

हवेमुळे तिची खट्याळ ओढणी उडायची
गुन्हा नसूनही प्रिया मलाच दोष द्यायची...

तव्यामधेच बाप राहिला रुतून जन्मभर
चुलीत माय भाबडी अधेमधे दिसायची...

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - गजल