अशक्त वेदना
पुसून ओठ शेवटी प्रिया निघून जायची
बराच वेळ पावले नशेत अडखळायची...
म्हणून सांगतो व्यथे रडायचे शिकून घे
सहीष्णुता तुझी इथे कुणास ना कळायची...
जळून जायचा जरी पतंग ज्योत चुंबुनी
समर्पणात त्या मिजास केवढी असायची...
असेल त्या घरात फ़ास घेतला कुणीतरी
म्हणून भाकरी घरास पोटभर मिळायची..
तिला रफी उदास अन किशोर आवडायचे
तरी समोर माझिया गुलाम गुणगुणायची..
लबाड एवढी कशी असेल ओढणी तिची
मला समोर पाहुनी उगाच फडफडायची...
जखम हवीच एक.. जीवनास कैफ़ यायला
अशक्त वेदना मनातली किती पुरायची...!
-- संतोष