काव्यलेखन

माझ्यात राहुन जगतात बाबा..!

Submitted by अ. अ. जोशी on 17 August, 2014 - 09:24

१७ ऑगस्ट ...! माझ्या वडिलांचा (कै. अनंतराव जोशी यांचा) जन्मदिवस. त्या निमित्ताने....

फोटोमधुनही बघतात बाबा..!
बिनधास्त जग तू, वदतात बाबा..!

नाहीत बाबा, हे मान्य नाही;
माझ्यात राहुन जगतात बाबा..!

झोळी रिकामी माझी तरीही;
प्रेमास हृदयी भरतात बाबा..!

पाठीवरी तेंव्हा हात फिरला...
तो आठवा, मग कळतात बाबा..!

तू मान किंवा मानू नको, पण..
असतेच आई, असतात बाबा..!

एक श्रावन मनात होता.....

Submitted by नभ on 16 August, 2014 - 08:58

चिंब करणार्या सरीमध्ये जेव्हा तूझा साथ होता
प्रित गंधाने ओला श्रावन एक मनात होता

झरणार्या या नभातूनी एक प्रित ओघाळीत होती
अनोळ्खीशी धुंद 'त्या' पावसातूनी होती
पानापानातुनी डोकावणारा तो पाऊस वेडा होता
प्रित गंधाने ओला.....

ओढ होती अनामिक लागली कशाची
नभातूनी नितळ्त होती बरसात प्रेमाची
अलगद तुषार उडवणारा वारा खट्याळ होता
प्रित गंधाने ओला.....

दिशातून गुंजत होते सूर ओल्या प्रितीचे
नयनातूनी बोलत होते भाव अबोल मनीचे
हरवलो होतो सपशेल मी फक्त ..... चिंब श्वास उरात होता

प्रित गंधाने ओला एक श्रावन मनात होता.....

विनवणी.... (कटावाची लावणी )

Submitted by स्वामीजी on 15 August, 2014 - 23:10

विनविते तुम्हा राजसा, निवान्तच बसा, विसावा घ्यावा
शिणलात म्हणुन शिणगार करत अलवार, रातिचं ऱ्हावा ।
नि:शंक झोकला देह, कवेची ठेव, समर्पण करता
करवितो कसा हा खेळ, असुनिया वेळ जायचे म्हणता ?

प्रेमात कसा अनमान, फुकाची शान, काळजी घ्यावी
थकविता किती हा देह, चेपते पाय, जराशी प्यावी ।
उतरवा मनाचा भार, उगा बेजार एकटे बनता
बहरेल दिलाची साथ, मनाची गाठ मोकळी करता ॥

कसलीच नसे मज हाव, तुम्हावर जीव म्हणुन कळवळते
पाहता कपाळी अठी, भिरभिरी दिठी, मनाशी जळते ।
जो वाघ म्हणुन पाहिला, साजणा मला आज ना दिसला
दिलदार रांगडा वीर, मनाचा धीर आज का रुसला ?

दिवसात कितीही येत, बिदागी देत ऐकती गाणी

दोन अश्रू आणि एक सलाम..!

Submitted by अ. अ. जोशी on 14 August, 2014 - 03:05

शाळेत ज्यांच्यावर भरभरून लिहिलं,
त्यांना कधीच विसरलो आहोत...
त्यांच्या नावानं जे पुढारले,
त्यांच्यावरच विसंबलो आहोत...

15 ऑगस्ट, 26 जानेवारी...
मिळणाऱ्या सुट्टीमुळे लक्षात असतील..
सुट्टी जर जोडून आली,
तर फारच बहार आणतील...

तीन-चार दिवस स्वातंत्र्याला,
बघा कसं उधाण येईल..
स्वातंत्र्यासाठी ज्यांनी जीव दिले,
त्यांच्या प्रयत्नांचं चीज होईल...

जुन्या लोकांच्या जुन्या गोष्टी,
पुन्हा कशाला आठवायच्या..?
असे जर म्हणत असाल,
तर मग सुट्ट्या कशाला घ्यायच्या..?

आपण करतो मौज-मजा,
त्यांनी सांडलेल्या रक्तावर..
आपण उपभोगतो स्वातंत्र्य,
त्यांनी भोगलेल्या शिक्षांवर...

जे जगतो ते लिहिणारा

Submitted by विजय दिनकर पाटील on 14 August, 2014 - 03:00

परदु:खाचे स्तोम केवढे बरकतदायक आहे
जे जगतो ते लिहिणारा हा कोण कफल्लक आहे

दोघेही विश्वासाच्या दरडी कोसळत्या ठेवू
संबंधांचा घाट बंद होणे आवश्यक आहे

दृश्य जवळचे डोळ्यांच्या कक्षेत मावते कोठे
जरा दूर जा त्रयस्थ हो मग म्हण आकर्षक आहे

नसेल त्याच्याकडून झाले निराकरण दु:खाचे
धीर दिलेला सावरताना निश्चित पूरक आहे

तुझ्या मालकीच्या वस्तूंच्या गच्च कपाटामध्ये
दिलास कप्पा तूर्त एक हेही आश्वासक आहे
-----------------------
विजय दिनकर पाटील

या पावसात माझी काया अजून विरुदे

Submitted by जयदीप. on 13 August, 2014 - 10:51

भरती पुसून गेली सारेच ठाव माझे
वाळूमधे कशाला लिहिलेस नाव माझे

या पावसात माझी काया अजून विरुदे
केव्हातरी जगाला दिसतील घाव माझे

स्वप्नासवे निघाली स्वप्ने कुणाकुणाची
ओसाड होत गेले टुमदार गाव माझे

मी विस्कटून जाणे होते ठरून गेले
तिकडे सुरूंग होते, जिकडे पडाव माझे

वार्यात जोर नाही विझवायचा मला पण
फुंकर चलाख जाते मोडून डाव माझे

जयदीप

तुझी सावली होऊन..

Submitted by रसप on 13 August, 2014 - 00:00

तुला रोज पाहतो मी
तुला रोज ऐकतो मी
आणि तुला भेटण्याची
रोज वाट बघतो मी

दिस हळूहळू जातो
रात वाढतच जाई
वारी चालली क्षणांची
नाही कुणालाच घाई

अनुभव पहिलाच
अशी ओढ लागण्याचा
जणू अनेक दिसांनी
आरश्यास बघण्याचा

कुणी म्हणे आदिशक्ती
कुणी म्हणे तुज काळा
माझा-तुझा अंश एक
पुरे इतकाच चाळा

तुझ्या मागून फिरावे
तुझी सावली होऊन
वीट सरकली वाटो
तुझे पाऊल पाहून

गाठता यावा तुझ्याही तळ मनाचा

Submitted by सुप्रिया जाधव. on 12 August, 2014 - 15:11

मानला ताईत.... बसला फास ज्याचा
पुत्र तो थरकाप उडवे काळजाचा

येथली स्थित्यंतरे त्याच्याचसाठी
आजही आहे तिच्यास्तव तोच साचा

कैफियत मांडू कशी माझी इथे मी
बोलताना वाटते जाईल वाचा

यायचा नाही तुला अंदाज माझा
लिंपलेला चेहरा, ह्रदयास खाचा

आरसा त्याच्या मनाचा तडकलेला
स्पर्शण्या धावू नको रुततील काचा

जेवढा काढायचा तो यत्न करतो
तेवढा चिखलात फसतो पाय त्याचा

लांबचा पल्ला तुला गाठायचा तर..
सोस कळ पायातली...झिजणार टाचा

पारदर्शी कोवळ्या पानांप्रमाणे
गाठता यावा तुझ्याही तळ मनाचा

-सुप्रिया.

किशोर, चांदोबा, चंपक, ठकठक, आनंद, गंमतजंमत - आपलं भावविश्व व्यापून टाकलेली मासिकं

Submitted by मामी on 12 August, 2014 - 02:43

शालेय जीवनात शत्रुपक्षातील पुस्तकांबरोबरच अत्यंत जिव्हाळ्यानं वाचली जाणारी मित्रपक्षातील मासिकं होती. किशोर, चांदोबा, चंपक, ठकठक, आनंद वगैरे अनेक मासिकांनी अपरीमित आनंद दिला आहे. आपल्या या लाडक्या मित्रांच्या आठवणी इथे जागवूयात.

विशेष सुचना : कृपया कोणत्याही मासिकातील उतारा इथे जसाच्या तसा लिहू नये.

पैसा येतो आणिक जातो

Submitted by अभय आर्वीकर on 11 August, 2014 - 05:35

पैसा येतो आणिक जातो

पैसा येतो आणिक जातो
मला केवळ मोजायला लावतो
कधी लळा लावतो, कधी कळा लावतो ...॥

कधी चिल्लर, कधी नोटा
लाभ कधी, कधी तोटा
येण्यासाठी दारे कमी
जाण्यासाठी लक्ष वाटा
माणसाच्या वचनाला
पाडतो हा खोटानाटा
येताना हा झुकूझुकू
अन्
जाताना धडधड जातो ...॥

माझी पर्स, माझा खिसा
माझ्या तिजोरीला पुसा
त्यांचे हाल असे जणू
एस टी चा थांबा जसा
बस येते, जरा थांबते
अन्
भर्रकन निघून जाते ...॥

कुणी अभय, कुणी भयभीत
पैसोबाची वेगळी रीत
कुणा देतो मलमली छत
अन्
कुणाला रस्त्यावर आणतो ...॥

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन