विनविते तुम्हा राजसा, निवान्तच बसा, विसावा घ्यावा
शिणलात म्हणुन शिणगार करत अलवार, रातिचं ऱ्हावा ।
नि:शंक झोकला देह, कवेची ठेव, समर्पण करता
करवितो कसा हा खेळ, असुनिया वेळ जायचे म्हणता ?
ㅤ
प्रेमात कसा अनमान, फुकाची शान, काळजी घ्यावी
थकविता किती हा देह, चेपते पाय, जराशी प्यावी ।
उतरवा मनाचा भार, उगा बेजार एकटे बनता
बहरेल दिलाची साथ, मनाची गाठ मोकळी करता ॥
ㅤ
कसलीच नसे मज हाव, तुम्हावर जीव म्हणुन कळवळते
पाहता कपाळी अठी, भिरभिरी दिठी, मनाशी जळते ।
जो वाघ म्हणुन पाहिला, साजणा मला आज ना दिसला
दिलदार रांगडा वीर, मनाचा धीर आज का रुसला ?
ㅤ
दिवसात कितीही येत, बिदागी देत ऐकती गाणी
मजला न मिळे आधार, दिलाचा यार तुम्हाविण कोणी ।
मालकी छळुन दावता, जवळ ओढता बटिक हक्काची
रडवून किती बेजार मला करणार, सजा झुरण्याची ॥
ㅤ
घडलाय पहा उपवास, नको वनवास असा पोटाचा
ओठांनी भरविन घास, भाकरी खास परतुनी ठेचा ।
सांगते हात जोडुनी, पुन्हा विनवणी, रातिचं ऱ्हावा
भरगच्च मिठी मारून, जरासा शीण मलाही द्यावा ॥
ㅤ
(मात्रावृत्त भवानी १३+८+९=३० मात्रा)
ㅤ
- स्वामीजी ११-८-१४
विनवणी.... (कटावाची लावणी )
Submitted by स्वामीजी on 15 August, 2014 - 23:10
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाहवा! एकदम सुंदर.
वाहवा!
एकदम सुंदर.
सुंदर... लहान तोंडी मोठा
सुंदर...
लहान तोंडी मोठा घास.. "जराशी प्यावी" असा थेट शब्दप्रयोग लावणीत सहसा नसतो.. !
इतका अनेकस्तरी आकृतीबंध चक्क
इतका अनेकस्तरी आकृतीबंध चक्क लावणीच्या परिवेषात ! कमाल आहे स्वामीजी तुमची.
वा ! छान लावणी. "दिवसात
वा ! छान लावणी.
"दिवसात कितीही येत,..... सजा झुरण्याची ॥" >>> हे कडवं सर्वात छान.