काव्यलेखन

क्षणाचे सोबती....

Submitted by राजेंद्र देवी on 4 August, 2014 - 05:04

क्षणाचे सोबती....

कशाला हवेत नगारे नौबती
आपण सारे क्षणाचे सोबती

जुळुनी येती जेव्हा प्रेमाची नाती
कशाला हवीत रक्ताची नाती

नुसतेच फोफावती वृक्ष सारे
भगवंताच्या माथी तृणाचीच पाती

वृथा तळपती सूर्याची किरणे
तिमिरात उजळती समईच्याच ज्योती

रोवून दाव एकतरी निशाण
जगात आहेत मोजकेच जगज्जेती

राजेंद्र देवी

ऐक जरा ना.. (वृत्त चम्पकमाला)

Submitted by स्वामीजी on 4 August, 2014 - 02:17

सांजसकाळी कातरवेळी
गूज मनाचे ऐक जरा ना..

झांजर वारा कातळमाळी
भोकर बोरे काजळजाळी,
चाखुन घेता माधुर ओठी
बोलत जाऊ लाघव गोठी..

पाउलवाटा आड मळ्याची
धून सजावी गोड गळ्याची,
मावळतीला सूर्य बुडावा
लाजत हाती हात धरावा..


भेट घडाया मुक्त मनाची
चाहुल ना हो दूर कुणाची,
तू बरसावे बावर गाणे
स्वप्न मनीचे गोजिरवाणे..

आवरताना सावरलेले
पाझर डोळे बावरलेले,
प्रीत उरीची व्याकुळ व्हावी

भाव मनी हे, भेट घडावी..

(वृत्त चम्पकमाला - गालल गागा गालल गागा)

- स्वामीजी
(काही ठिकाणी या वृत्ताचे नाव "रुक्मवती" असे सुद्धा दिलेले आहे)

संपादन...

कुठे मनास गुंतवू....? ㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤ(पञ्चचामर)

Submitted by स्वामीजी on 3 August, 2014 - 12:42

"कुठे मनास गुंतवू?" विचित्र प्रश्न काय हा ?
चहू दिशातुनी कुणी मनास बोलवी पहा ।
असेल पर्वणी इथे क्षणोक्षणी लहानशी
अशा सुखा जपूनिया शिदोर ठेव छानशी ॥१॥

निसर्ग रंग माखतो सदैव जीवनास रे
तयास पांघरून घे, कधी नको म्हणू पुरे ।
लहान रोपट्यावरी नव्हाळ एक पान ते
दंवात चिंबते पहा जिथे उद्या पहाटते ॥२॥

लहानग्या मुलास जोजवी कुशीत माउली
तिच्या मुखावरी पहाल तृप्तता उजाडली ।
जरी कितीक वंचना विवंचना जगात या
कृतार्थता जिण्यातली सुखात झाकते तया ॥३॥

जबाबदार जाणिवा पुनश्च मार्ग रोखती
धरून धैर्य पावले पुढील मार्ग शोधती ।
थकूनिया घरी चहा पिता मनी निवान्त तो

निसर्गनाते ㅤㅤㅤㅤㅤㅤ(पादाकुलक)

Submitted by स्वामीजी on 3 August, 2014 - 12:31

नव्हाळ हिरव्या पानावरती
दंवबिन्दूंचे हिरकणगोंदण,
अस्फुट उमलत कळ्या सुगन्धी
पहाटवाऱ्याकडून आंदण..

कविमन बघते रोज अनावर
प्रमुदित होउन निसर्गवाटा,
मन्थन होउन उसळत येती
शब्दसागरा भरती लाटा..

सहजी प्रगटे निसर्गनाते
यात नसे हो प्रयत्न कसला,
आवर्जुनिया बांधिलकीच्या
आवेशाचा विचार कुठला..

अंधाराचा विरून पडदा
उजेड कानी कुजबुज करतो,
विसावलेल्या गात्रांमधला
उरला आळस दूर ढकलतो..

गोड शिरशिरी अंगावरती
हवेत भूपाळी पाझरते,
उरलासुरला आळस झटकत
नव्या दिसाचे स्वागत करते..

भले रोजचा असतो अनुभव
नवीन म्हणुनी काही नसते,
चिरंतनाच्या नवेपणाचे
नित्य नवेसे रूप झळकते..

सूर्योदयाप्रमाणे सूर्यास्त होत आहे

Submitted by जयदीप. on 2 August, 2014 - 14:52

आता हवेप्रमाणे गेलेत दूर वारे
आपापलीच हलती आशाळभूत पाने

ते ऎकतात काही गाणी जुनी नव्याने
गाते समोर कोणी, कोणी मनात गाते

ठरल्यानुसार सगळे काही घडून जाते
ओंजळ भरून सुद्धा पाणी निघून जाते

भरती पुसून गेली सारेच ठाव माझे
वाळूमधे कशाला लिहिलेस नाव माझे

सूर्योदयाप्रमाणे सूर्यास्त होत आहे
लिहिलेस तू तसे हे आयुष्य जात आहे

.....जयदीप

देहावर पडणारी पाल....

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 2 August, 2014 - 12:26

त्याची ,
पहिली प्रतिक्रिया
असते नकाराची
सहज टाळण्याची
पण..
वयाचे समजुतदारपण
पैशाचे शहाणपण
व्यवहाराची लागण
त्याला ,
घ्यायला लावते यु टर्न
त्याचं
उसन हसण
उसन वागण
माझ्या
येते अंगावर
नको असून
देहावर पडणारी
पाल होवून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

डोहाळे- [आईच मनोगत ]

Submitted by प्रभा on 2 August, 2014 - 08:46

मध्यंतरी आमच्या भाचीच डोहाळ- जेवण होत. तेव्हा सगळे म्हणाले ,''मामी तुमच डोहाळे- गीत ऐकवा न , '' मी आमच्या कन्येच्या डोहाळ -जेवणाच्या वेळेला माझ मनोगत व्यक्त केल होत. [काव्यात ] . तिला शुभेच्छा- कार्ड [ग्रिटींग ] म्हनुन ते दिल होत. पण आता ते निट आठवतही नव्हत . पण जुने अलब्म पहात असतांना त्या ग्रीटींगचा फोटो सापडला. त्यावरुन ते गीत ऐकवल सर्वांना. ते येथे देत आहे.. ७-८ वर्षापुर्वीच आहे ते. समस्त मातांच्या भावना त्यातुन व्यक्त होतील.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

आमचा घडा पालथाच

Submitted by विनायक. दि.पत्की. on 2 August, 2014 - 05:06

सत्व गुणी हिवाळा,
तमोगुणी उन्हाळा.
रजगुणी पावसाळा,
त्याच्या अंगी नाना कळा.

भाविकला गंगाजल हवे,
बळीराजाला कर्ज नवे.
कंत्राटदाराला नवी कामे,
कारखान्दाराला उत्पन्न व्हावे.

म्हणून ,सुरुंग लावून डोंगर फोडणार,
झाडी तोडून बोडखे करणार.

असतो का देह अभंग ?

Submitted by सुशांत खुरसाले on 2 August, 2014 - 00:09

टुमदार घरांच्या टोळ्या
बदनाम मनांची वस्ती
जर इथे भेटलो असतो
तर फिकीर पडली नसती

तू भेटीला बोलवले
ती जागा संथ निराळी
सांजवतो डोह तिथे अन्
सुर्याचा संप कपाळी

वर अशा सभ्य खडकांवर
टाकून पाय बसताना
मन तर-तम, तर-तम करते
भोवती तूच असताना

वाचल्या पहा डोहाने
सावल्या एकरुपताना
नवखेच जाणवे काही
हे शब्द नवे सुचताना

आठवे पुन्हा शब्दांना
सत्याचा धुरकट रंग
जन्मभर पुरावा इतका
असतो का देह अभंग ?

--सुशांत ..

स्मरणरंजन : (वृत्त चंपकमाला)

Submitted by भारती.. on 1 August, 2014 - 12:32

स्मरणरंजन : (वृत्त चंपकमाला)

त्या दिनराती त्या क्षणमाला
ती सुखदु:खे अंतरलेली
पैल नदीच्या अंधुक पात्री
नाव जुनीशी नांगरलेली

स्तब्ध नभाला मुग्ध भुईला
मंत्र कुणी का घालत आहे
धूळ धुक्याच्या चाहुलवाटा
दूर कुणी का चालत आहे

ओळख देता ती घरदारे
विस्कटलेले अर्थ कळावे
बांध फुटावा आणिक काही
आज नवे संदर्भ जुळावे

एक उसासा अस्फुट अश्रू
काजळओल्या पापणकाठी
आवर आता नीघच बाई
हीच असो श्रीशिल्लक गाठी..

भारती बिर्जे डिग्गीकर

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन