तुझी सावली होऊन..

Submitted by रसप on 13 August, 2014 - 00:00

तुला रोज पाहतो मी
तुला रोज ऐकतो मी
आणि तुला भेटण्याची
रोज वाट बघतो मी

दिस हळूहळू जातो
रात वाढतच जाई
वारी चालली क्षणांची
नाही कुणालाच घाई

अनुभव पहिलाच
अशी ओढ लागण्याचा
जणू अनेक दिसांनी
आरश्यास बघण्याचा

कुणी म्हणे आदिशक्ती
कुणी म्हणे तुज काळा
माझा-तुझा अंश एक
पुरे इतकाच चाळा

तुझ्या मागून फिरावे
तुझी सावली होऊन
वीट सरकली वाटो
तुझे पाऊल पाहून

....रसप....
१३ ऑगस्ट २०१४
http://www.ranjeetparadkar.com/2014/08/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>दिस हळूहळू जातो
रात वाढतच जाई
वारी चालली क्षणांची
नाही कुणालाच घाई..>>

अद्भुत !रोज, नित्य, घाई नसलेला असाही परतत्वाचा स्पर्श..

रणजित,
सामान्यत: या रचनेचा अर्थ सगुण उपासनापरक घेतला जाऊ शकतो.... पण तू स्वत:च रचनेमागचा तुझ्या स्वत:च्या मनातला भाव अन्यत्र मांडला आहेस, तो थक्क करणारा वाटला.... अफाट कल्पनाशक्ति !!
तुझ्याच शब्दात तुझा भाव उद्धृत करत आहे.......

तुला रोज पाहतो मी
तुला रोज ऐकतो मी
आणि तुला भेटण्याची
रोज वाट बघतो मी

प्रेग्नन्सीच्या काळात एक असा काळ असतो (सहावा/ सातवा महिना बहुतेक) की तेव्हापासून बाळाला काही आवाज ऐकू यायला लागतात. त्या आवाजांना बाळ आईच्या पोटातच हालचाल करून काही वेळेस प्रतिसाद देतं. त्याला आईचा आवाज तर कळत असतोच. पण नियमित ऐकू येणारा एखादा विशिष्ट आवाजही ओळखीचा होतो. जसा वडिलांचा. त्या आवाजालाही ते ओळखून रीस्पोंड करतं. त्याचं आईच्या पोटात असणं अश्याप्रकारे बापसुद्धा पाहत असतो, त्याला त्याच्या हालचालींतून ऐकत असतो. आणि ह्या सगळ्यातून त्याची त्या बाळाला प्रत्यक्ष पाहण्याची उत्कंठा सतत वाढत जात असते. रोज त्याला पाहून, ऐकूनही रोज त्याला भेटण्याची वाट तो बघत असतो.

दिस हळूहळू जातो
रात वाढतच जाई
वारी चालली क्षणांची
नाही कुणालाच घाई

ताणत चाललेल्या उत्कंठेमुळे हे शेवटचे २-३ महिने खूपच हळूहळू सरत असतात. रात्री तर अनेकदा हे बाळ जागवतंही !
विठ्ठलाच्या दर्शनाला जाणारे वारकरी पायी हळूहळू चालत जात असतात. कुठलीही घाई, गडबड नसते त्यांना. त्याच निवांतपणाने एकेक क्षण सरकत जात असतो.

अनुभव पहिलाच
अशी ओढ लागण्याचा
जणू अनेक दिसांनी
आरश्यास बघण्याचा

आजपर्यंतच्या आयुष्यात आईची, वडिलांची, बहिण-भावाची, आजी-आजोबांची, घराची, मित्राची, मैत्रिणीची, कॉलेज/ शाळेची, प्रेयसीची, बायकोची अशी वेगवेगळ्या प्रकारची ओढ अनुभवली असते. पण अशी ओढ प्रथमच आणि क्वचितच (आजकाल तर एकदाच!). जे आपल्या समोर येणार आहे, ते आपलं स्वत:चंच असणार आहे. स्वत:चं सृजन किंवा प्रतिबिंब ! त्यामुळे ही ओढ बरेच दिवस स्वत:लाच पाहिले नसल्यावर आरश्याची ओढ लागावी, तशी काहीशी असावी. बाळ कसं असेल ? आईसारखं की माझ्यासारखं ? वगैरे अनेक प्रश्न पडले असतील..

कुणी म्हणे आदिशक्ती
कुणी म्हणे तुज काळा
माझा-तुझा अंश एक
पुरे इतकाच चाळा

इथे आदिशक्ती म्हणजे 'ती' म्हणजे मुलगी आणि 'काळा' म्हणजे 'तो' म्हणजे मुलगा; असं अभिप्रेत आहे.
ह्या काळात घरातले, नात्यातले, ओळखीतले लोक सांगत असतात.. 'तुला मुलगाच होणार.... तुला मुलगीच होणार !' आपापली इच्छाही असतेच. पण सगळ्यात वर एकच आनंद असतो. तो हा की, मुलगा असो की मुलगी पण माझा अंश त्यात असणार आहे. जगात मी आणलेली ही पहिली चीज असणार आहे.

तुझ्या मागून फिरावे
तुझी सावली होऊन
वीट सरकली वाटो
तुझे पाऊल पाहून

एकच मनापासूनची इच्छा असते की त्याने लौकर बाहेर यावं. पटपट मोठं व्हावं. घरभर धावावं, त्याच्या मागे-मागे मला पळवावं. भरपूर मस्ती करून जेव्हा तो थकून जाईल, शांत गाढ झोपेल, तेव्हा त्याची इवलीशी गुलाबी पाउलं देवासारखीच वाटतील. (माझा भाचा लहान होता, तेव्हा हा अनुभव मी घेतला आहे. ती पाउलं इतकी सुंदर दिसतात की सांगू शकत नाही.) असं वाटेल की विठ्ठलाने वीट सोडली आणि माझ्यासमोर आला आहे.

अत्यन्त विलोभनीय रचना आणि तितकीच तरल त्यामागची भावना !! प्रचंड आवडली !